डार्क डेथ भाग ५

किरण चे मरण


डार्क डेथ

भाग ५

पूर्वार्ध:
मागच्या भागात पोलीस रेश्माच्या मृत्यूची चौकशी करत होते की परत एक तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी आली. पोलिस तिथे पोहचले आणि तिथली विचारपूस करू लागले.

आता पुढे…


"किरण, अरे बाळा हे काय केलं? तुझ्याशिवाय कसं जगायचं? अरे काय चुकलं होतं रे या आईचं?" किरणची आई जीवाच्या आकांताने रडत होती. त्यांच्या शेजारी त्याची बहीण सुद्धा रडत होती.

किरणच्या फ्लॅटमध्ये, समोर एका पांढऱ्या कापडात किरणचे मृत शरीर बांधलेले होते. ते जमिनीवर ठेवले होते. किरणचे वृद्ध वडील एकटक त्याच्याकडे बघत बसले होते. त्यांच्या आयुष्याचा आधारच गेला होता. इतर नातेवाईक, मित्र मैत्रिणी सुद्धा बाहेर जमले होते. किरणने असे का केले? याची कुजबुज करत होते.

"सर, हेमंत आणि किरणचा तर काही संबंध पण दिसत नाही. फारच गडबड आहे." माने.

"तुम्हाला तीच गडबड सोडवायची आहे. वाढवायची नाही." अभिजीत.

"येस सर."

इन्स्पेक्टर अभिजीत आणि माने यांनी नातेवाईक, मित्रांचे काही जबाब नोंदवून घेतले. तिथे बऱ्यापैकी सर्वांची विचारपूस केली आणि दोघेही तिथून निघून गेले.


"मी अडवायला हवे होते. त्याला मी अडवायला हवे होते.. " राहुलच्या डोक्यात सतत हेच सुरू होते. त्याचा गळा दाटून आला होता. भीतीने शरीराचा थरकाप उडत होता. सतत इकडे तिकडे बघत, पालथ्या हाताने डोळे पुसत होता. जसे कोणीतरी त्याच्यावर नजर ठेऊन आहे, असे वाटत होते. तो कोणाशीच काही बोलत नव्हता, किंबहुना बोलायचं टाळत होता, असे वाटत होते. बोलायला कोणी जवळ आले की दूर जात होता. कोणत्याच प्रश्नांचे उत्तर देत नव्हता. कोणाशीही काही न बोलता, दूर एका कोपऱ्यात सगळ्यांचा आक्रोश बघत उभा होता. आणि त्याला तो दिवस जसाच्या तसा आठवला, जेव्हा किरणने रेश्माच्या मृत्यूची बातमी ऐकली होती. आणि त्यानंतर तो चक्कर येऊन खाली आदळला होता.

" त्या दिवशी जसा किरण उठला होता, काश आता पण तसाच उठावा.." सगळं कळत असून सुद्धा राहुल देवाकडे प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यांपुढे वारंवार किरण येत होता.

ऑफिसचा तो दिवस…

"मॉडेल रेशमाचा मृतदेह सापडला आहे." टिव्हीवर बातमी ऐकली आणि किरण तिथेच चक्कर येऊन पडला. बरेच प्रयत्न करूनही तो उठत नव्हता. तेव्हा लगेच डॉक्टरांना बोलावण्यात आले.

"इंजेक्शन दिले आहे, थोड्या वेळात शुद्धीवर येईल." डॉक्टर किरणला तपासत म्हणाले.

"पण डॉक्टर असे अचानक?" एका मित्राने विचारले.

"अशक्तपणा आहे. काही दिवसांपासून जेवण नीट केलेले दिसत नाही. कशाचे तरी टेन्शन घेतले असावे. तसे घाबरण्यासारखे तरी काही दिसत नाही. पण तरी बरे वाटले की एकदा क्लिनिकमध्ये या, पूर्ण चेकप करून घेऊ." डॉक्टर काही सूचना आणि औषध देऊन निघुन गेले.

थोड्या वेळाने किरण शुध्दीवर आला.

"हाऊ आर यू फिलिंग नाऊ, यंग मॅन?" किरणच्या बॉसने विचारले.

"बेटर सर." किरण उत्तरला.

"ओके टेक ए रेस्ट. उद्या ऑफिसला नाही आलास तरी चालेल." एवढे बोलून बॉस निघून गेला.

"क्या बात है यार, एवढी मेहेरबानी?" त्याचे मित्र बॉसचे बोलणं ऐकून चिडवू लागले.

पण एवढे असले तरी अजूनही त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती राहुलला स्पष्ट जाणवत होती. तो कुठल्या तरी विचारात हरवलेला वाटत होता.

"तू ठीक आहेस?" राहुल त्याच्या जवळ बसत म्हणाला.

"हम्म!" किरण उत्तरला.

"नाही. काहीतरी आहे जे ठीक नाही. गेल्या दहा बारा दिवसांपासून बघतोय, तू काहीतरी खूप मोठं लपवत आहेस. हे असे अचानक घर बदलणे, फोन खराब होणे, ऋताच्या दूर राहणे, या मॉडेलची न्यूज ऐकून चक्कर येणे, हे सगळं अजीब नाहीये?" राहुल बोलत होता. राहुलच्या एक एक शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.

"या मॉडेल बद्दल तुला काहीतरी माहिती आहे. तू काही बघितले, ऐकले आहे काय? माझ्या पासून काही लपवू नकोस. सांग काय झालंय?" राहुल परत खोदून खोदून त्याला विचारत होता. किरणने होकारार्थी मान हलवली.

"व्हॉट? काय? काय माहिती आहे?" राहुलला एकदम झटका लागला.

"माहिती नाही जे मी बघितले आहे ते खरं आहे की फेक आहे. पण खूप डीस्टर्बींग आहे." किरण घाबरत म्हणाला.

"काय?"

"इथे नाही. वॉशरूममध्ये चल." म्हणत किरण उठून पुढे जाऊ लागला. त्याचा पाठोपाठ राहुल सुद्धा वॉशरूममध्ये गेला.

"ह बोल आता." राहुल.

किरणने इकडे तिकडे बघितले आणि वॉशरूमचे दार बंद केले.

"दहा बारा दिवसांपूर्वी, शनिवारी हे सगळे माझ्या फ्लॅटवर आले होते." किरण.

"मी कुठे होतो?"

"तू गावाला तुझ्या घरी गेला होता, तेव्हाची गोष्ट आहे."

"ओके. मग?"

"आम्ही बियर घेता घेता मूव्ही बघत होतो. पण तो मूव्ही सर्वांना बोर झाला." त्या दिवशी घडलेले तो जसेच्या तसे सांगू लागला.

"यार बोर वाटतोय पिक्चर." समीर.

"यार कसल्या भारी मुली आहेत." तेजस बाल्कनीमधून बाहेर बघत म्हणाला.

"हम्म. सॉफ्टवेअर आणि फॅशन डिझायनिंगवाल्या आहेत. जाम हायफाय आहेत." किरणने माहिती पुरवली.

"तुझ्या घराला भारी व्ह्यू आहे. तुझा तर असाच टाईमपास होत असेल." समीर हसत म्हणाला.

"यार तो चित्रपट बंद करा. सगळा मूड चालला. काहीतरी वेगळं बघुया." तेजस.

"साऊथचे दोन तीन मूव्ही डाऊनलोड केलेले आहेत. बघायचा काय?" किरण.

"नको. काहीतरी मस्त मूड बनवणारे लाव." तेजस.

"काय?" किरण.

"पॉर्न व्हिडिओ बघुयात. मजा येईल." तेजस अतिउत्साह म्हणाला.

********

क्रमशः

*******

किरणचा मृत्यू कसा झाला असेल?

त्याने खरंच आत्महत्या केली होती काय?

*******

🎭 Series Post

View all