डार्क डेथ भाग १

काळ्या जगातील मृत्यू
डार्क डेथ

भाग १

"ते मला मारतील. त्यांनी त्याला मारले. मला पण मारतील. मला ते सोडणार नाही."

"त्यांच्या वाट्याला जो जाईल, ते त्या सर्वांना मारतील.
ते कोणाला दिसत नाहीत, पण त्यांना आपण दिसतो.
ते मारतील. तिकडे जाऊ नका. चुकूनही जाऊ नका." तो बोलतच होता की तेवढयात त्याला चेहऱ्यावर पाण्याचा मार बसला आणि तो खडबडून जागा झाला.

"कोण? कोण आहे?"

"बे साल्या फट्टू, काय बडबडत होता? दिवसा ढवळ्या स्वप्न पाहत बसतो." त्याचा मित्र राहुल त्याच्या पुढे उभा होता.

"तू? तू आतमध्ये कसा आला?" किरण आपला चेहरा पुसत इकडे तिकडे बघत म्हणाला.

"कोणी नाही, मीच आहे. अन् हे इथून दारातून आतमध्ये आलो." राहुल.

"दार?" तो प्रश्नार्थक नजरेने बघत होता.

"उघडं होत." राहुल.

"पण मी तर दार बंद केले होते. की नव्हते केले? काहीच आठवत नाहीये." तो स्वतःशीच विचार करत होता.

"मजाक करतोय. माझ्याकडे किल्ली होती. तूच दिलेली. विसरला काय? अन् हे संध्याकाळचं कोणतं स्वप्न बघत बसला होता. आजकाल क्रिमिनल वेब सिरीज जास्त बघतो वाटते?" राहुल.

"काही नाही."

"चार दिवस झाले ऑफिसला दांडी मारतोय. एकतर फोन लागत नाही, अन् लागला तर उचलत नाहीस. तुझ्या गर्लफ्रेंडचा पण मला फोन आलेला. किरण फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय करत नाही, म्हणाली. चाललं काय?"

"फोन खराब झालाय. पाण्यात पडला होता. त्यामुळे बंद सुरू, बंद सुरू होतोय."

"ब्रेकअप बिकप झालेला की काय? हे असे देवदास बनून बसला आहेस? आरशात चेहरा बघ जरा." राहुल हसत म्हणाला.

"नाही. असं काही नाही." किरण हातांनी आपले केस नीट करत म्हणाला.

" भांडण बिंडण झाले असेल तर लवकर सोडवून घे. तू बोलत नाहीयेस, पोरीच्या जीवात जीव नाही. तुझ्यासोबत कधी कधी बोलतेय, तिला असे झालेय. बघ बाबा, लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे, थोडेसेही गैरसमज पुरेसे आहे नातं तुटायला. वेळीच आवरून घे."

"हो. फोन ठीक झाला की बोलतो."

"मला मेसेज करून करून, माझ्यासोबत बोलत राहिली तर तिला माझ्या प्रेमात पडायला वेळ लागणार नाही." राहुल मस्करीच्या सुरात म्हणाला.

त्यावर किरण कसंनुसं हसला.

"घे, एकदा बोलून घे." राहुलने त्याला आपला फोन दिला.

"हॅलो, ऋता मी बोलतोय." किरण फोन वर बोलत थोडा बाजूला गेला. राहुल तिथेच टीव्ही बघत बसला.

"किरू, किती फोन, मेसेजेस केले. एकाला पण उत्तर दिले नाही." पलीकडून ऋताचा आवाज आला.

"फोन खराब झालाय. नवीन घेतो मग बोलतो." किरण.

"तसे तर मी ठरवले होते, रुसून बसायचे. कितीही मनावले तरी मानायचे नाही. कितीही गिफ्ट पाठवले तरी घ्यायचे नाही. पण काय करणार, तुझा आवाज ऐकायला कान अगदी आतुरलेले असतात. तुझ्याशिवाय माझा प्रत्येक क्षण अपूर्ण आहे."

"हम्म."

"हे काय, असला खडूस रिप्लाय. शी बाबा, तुला माझी आठवणच येत नाही." ती रुसल्याचे नाटक करत म्हणाली.

"असं काही नाहीये. कशी आहेस? एक्झाम कशी झाली?"


"एकदम भारी. बस आणखी दोन सेमीस्टर, मग मीच सरळ तुझ्या घरी येऊन तुझा हात मागणारे. आता मला तुझ्यापासून दूर राहवत नाही." ती अतीउत्साहात म्हणाली.

"हम्म."

"हे काय म्हशीसारखा, सॉरी सॉरी रेड्या सारखा नुसता हम्म ह्मम करतोय?"

त्याला हसू आले. " असं काही नाहीये सोने."

"सोने? किती दिवसांनी ऐकतेय. उम्ममहाsssss."

तिचा आवाज ऐकून तो गालातच गोड हसला.

"ओये होये, कुणीतरी लाजतंय.." ती चिडवू लागली.

"बरं ऐकना, वीकेंड येतोय. ये ना इथे. खूप दिवस झाले, भेटलास नाही." ती म्हणाली.

"सद्ध्या नाही जमणार ग. कामं खूप आहेत."

"शनिवारी, रविवारी तुला कोणते कामं आहेत?"

"आहेत ग."

"बरं मग मी येते."

"नाही नाही नको." तो एकदम थोड्या जोरात म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर थोडे घाबरल्यासारखे भाव उमटले होते.

"मी येणार म्हणजे येणार."

"ऋतू हट्टपणा करू नकोस. माझी कामं आटोपली की मीच तुला भेटायला येईल.." तो तिला समजावत म्हणाला.

"खडूस."

"हो चालेल. आणि आता परीक्षा येत आहे, त्यावर लक्ष दे."

"अगाऊ."

"आणि सध्या मला फोन करू नकोस. मेसेज, मेल पण नाही. माझा फोन ठीक झाला की मीच फोन करेल."

"हिटलर."

"काळजी घे. बाय. ठेव फोन."

"आधी ते म्हण."

"पिल्लू, लव यू."

"सेम टू यू. बाय." तिने फोन कट केला.

फोन कट करत तो हॉलमध्ये आला.

"थॅन्क्स." राहुलला फोन देत म्हणाला.

"एनीटाईम." राहुलने फोन खिशात ठेवला.

"ऑफिसला का येत नाही?" राहूल.

"असेच. थोडे बरे वाटत नव्हते, म्हणून."

"काय झाले? डॉक्टरकडे गेला होतास?"

"वर्क लोड. त्याचंच थोडं टेन्शन."

"बरं ठीक आहे. उद्या येणारेस?"

"उद्या फ्रायडे. मंडे पासून येतो."

"ओके. आज आमची कूक आली नाही. चल डिनरला जाऊ."

"नको. मला बाहेर जावं वाटत नाही. तू जा."

"झालं तरी काय? पैशाचं काही टेन्शन आहे का? घरून काही प्रेशर येतोय का? पैसे वगैरे हवे आहेत काय? काही प्रोब्लेम असेल तर शेअर करू शकतोस?"

"नाही नाही, असे काही नाही."

"मग? उगाच नखरे?" राहुल फ्रीज उघडत त्यात काहीतरी शोधत म्हणाला.

"नाहीये. संपलीये."

"क्या बात. जगातले आठावे आश्चर्य, किरणच्या फ्रिजमध्ये बिअर नाही." राहुल परत हसू लागला.

"हम्म. बाहेर पडलोच नाही."

"चल मग, स्टॉक फुल करून ठेऊ."

राहुल जबरदस्ती किरणला बाहेर घेऊन गेला. किरण मात्र सतत इकडेतिकडे बघत होता. कुणीतरी आपला पाठलाग करतोय, आपल्यालाच बघतोय, असे त्याला वाटत होते.

*****
३-४ दिवसांनी…

"इन्क्रिमेंट बद्दल विचारायला गेले तर साले वर्षभर काहीच काम केले नाही म्हणतात.."

"हो. अन् सुट्टी मागायला गेलं तर काम कोण करेल म्हणतात?"

"सालं समजतच नाही नौकरी करतो की हमाली? काम संपतच नाही."

"हा हा, अन् सुरू पण होत नाही."

त्यावर सगळे हसू लागले.

ऑफिसच्या खानावळीत बसून जेवता जेवता किरण, राहुल आणि मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. किरण फक्त ऐकत होता आणि बाकीचे मजा मस्करी करत होते.

"किरण, तू घर बदलले म्हणे?" मित्रांपैकी एकाने विचारले.

"हो, परवाच शिफ्ट केले." किरण उत्तरला.

"अरे काय, कसला मस्त फ्लॅट होता. आणि व्ह्यू पण कसला भारी होता." एक मित्र म्हणाला.

"एक्झॅक्टली कुठल्या व्ह्यू बद्दल बोलतोय? नाही म्हणजे तलाव दिसत होता ते की तो समोरचा फ्लॅट?" दुसऱ्याने मस्करी केली.

"हा हा हा, दोन्ही." परत त्यांचे हसणे सुरू झाले.

"थोडा घरमालकाचा आणि पाण्याचा पण प्रोब्लेम होता." किरण म्हणाला.

"तरी फारच तडकाफडकी बदलले. महिना पण संपायचा होता."

"हम्म, बदलायचा होताच. मग शिफ्ट करून घेतले." किरण.

"३० वर्षीय सुप्रसिद्ध मॉडेल रेश्मा बेपत्ता."

टीव्हीवर न्यूज फ्लॅश होत होती.

ते बघून किरणला जोरदार ठसका लागला.

*****

किरण सोबत काही घडले आहे की खरंच तो स्वप्न बघत होता?

कोण आहे जे किरणचा पाठलाग करत आहेत?

कोण आहे ही रेश्मा? किरणचा आणि तिचा काही संबंध आहे काय?

किरण ऋता सोबत बोलायचं का टाळतोय? खरंच त्याचा फोन खराब झाला आहे की आणखी काही आहे?

ऋता किरणचे लाँग डिस्टांस रिलेशन्शीप मध्ये काही प्रोब्लेम येणार काय? की त्यांचे प्रेम सफल होईल? की राहुल काही घोळ करेल?

किरणने एवढे तडकाफडकी घर का बदलले?


क्रमशः🎭 Series Post

View all