दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 3

आशू भारतात काय काय अनुभव घेणार?दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 3

मागील भागात आपण पाहिले की एलिने केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि त्यानंतर अनघाने केलेली मदत. त्यानंतर आसावरी भारतात जायला तयार होते. आता पाहूया पुढे.


"आशू,इथे बस. मला आता हा सगळा प्रकार काय आहे सांगशील?"

अनघाने तिला विचारताच आसावरी आईच्या कुशीत शिरली.

"मॉम,एलीचे रॉन बरोबर अफेअर होते. तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे. विल्मासुद्धा अशीच रिलेशनमध्ये होती. त्यांना मिळणाऱ्या महाग भेटी,फिरणे आणि...... ह्या सगळ्याचं आकर्षण मलाही वाटायचे.

पण हिंमत होत नसे. सारखा तुम्हा दोघांचा चेहरा समोर यायचा. आय वॉज स्टक इन अ क्रायसिस. मला कळत नसे की काय करावे?

त्यातून मग मी सारखी चिडत असे. तुला आठवत दोन दिवसांपूर्वी झालेल्या पार्टीला मी गेले होते. तिथे मला एलिने सांगितले."
आसावरी थांबली.

"काय सांगितले एलिने? असे काय कारण आहे की दोन मुली मरायला तयार होतात?"

अनघाचा आवाज थोडासा वाढला होता.

" मॉम,त्यांचे व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकले होते. दोघींचे बॉयफ्रेंड गायब झालेत. त्यामुळे खूप भिती वाटत होती."

अनघाला हा मोठा शॉक होता. इतके सगळे घडेल असे तिला कधीच वाटले नव्हते. आता भारतात जायची तयारी सुरू झाली.

एली आता सावरली होती. परंतु तिला आता मानसिक उपचार घ्यावे लागणार असल्याने तिची आई तिला घरी घेऊन गेली. इकडे आसावरी,उन्मेष आणि अनघा तिघेही भारतात जायला विमानात बसले.


मुंबई विमानतळावर उतरताच आशुने रुमाल नाकाला लावला.

"मॉम किती डस्ट आहे इकडे. चल लवकर कॅब बोलावं."
आशू वैतागून बोलली.

" कॅब बोलवायची गरज नाही. आजीने पाठवले आहे दिनुमामाला."
अनघा म्हणली.

तेवढ्यात लांबूनच आवाज आला.
"अनघा ताई! अनघा ताई! इकडे बघ."
दिनू बाहेरील दाराजवळ उड्या मारून बोलावत होता.
"ई ssss कोण आहे हा मॉम,किती मोठ्याने ओरडतोय.सगळे लोक आपल्याकडे बघत आहेत."
आशुच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता.

तोपर्यंत दिनू धावत पोहोचला.

"बाईंनी कालच सांगितले होते. तुला घ्यायला जायचे. किती वर्षांनी येते आहेस."
एकीकडे बडबड करत दिनू सामान गाडीत भरत होता.

"ही आसावरी ना? किती मोठी झालीय."

"कॉल मी ॲश. आसावरी साऊंड सो डाऊनमार्केट ड्रायव्हर अंकल."
आसावरी नाक उडवत म्हणाली.

"आशू, से सॉरी. दिनू काही ड्रायव्हर नाही."
अनघा रागावली होती.

"ताई,नको रागावू. गाडी चालवणारा ड्रायव्हर एवढेच तिला माहीत आहे. चल लवकर बाई वाट पहात असतील."
उन्मेष मात्र सगळीकडे उत्सुकतेने बघत होता.
गाडीने वेग घेतला आणि मग अनघा आणि दिनू मस्त गप्पा मारू लागले.

"दिनू,काम कसे चालले आहे तुझे?"
अनघाने विचारले.
" अरे,आता मी व्ही एफ एक्स एक्स्पर्ट आहे. सध्या मार्वल स्टुडिओ बरोबर एक प्रोजेक्ट चालू आहे."

वॉव,मामा किती भारी." उन्मेष ओरडला.

तेवढ्यात खंडाळ्याच्या घाटात गाडी आली. सगळीकडे हिरवळ आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पाहून उन्मेष प्रचंड आनंदी झाला. गाडी घाट चढून आली.

"ताई,पोरांना भूक लागली असेल. मी खायला घेऊन येतो."
दिनू पटकन निघूनही गेला.

"मॉम,हे असल स्ट्रीट फूड मी खाणार नाही ह. ऊन बघ किती आहे. माझी स्किन खराब होईल."
आशू कुरकुर करत होती.
"मॉम,तो मामा तुला टाई का म्हणतो. तू थोडीच टाय आहेस."
उन्मेष विचारू लागला.

"अरे वेड्या, ते टाई नसून ताई आहे. ताई म्हणजे सिस्टर." अनघा हसत उत्तर देत म्हणाली.
"वा,मी पण आता माझ्या सिस्टरला ताई म्हणेल." उन्मेष आशुला चिडवत होता.

आशू काही बोलणार इतक्यात दिनू परत आला.

"गरमागरम वडापाव आणि चाय."

अनघाच्या तोंडाला पाणी सुटले.

तिने पटकन एक वडापाव उन्मेषला दिला. दुसरा आशुला द्यायला घेतला.

"मॉम,मला हे नको हा. किती ऑईली आहे."

अनघाने तो वडापाव स्वतः ला घेतला. मस्त गप्पा मारत पुण्याकडे प्रवास सुरू झाला. अनघा मात्र चिंतेत होती. आता पुण्यात पोहोचल्यावर काय होईल?


आशुला दापोलीला जायचे कळल्यावर काय होईल? विजयाताई आणि आशू यांच्यात काय गंमत येईल?

वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all