दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 9

आशू हळूहळू कुटुंबाचा अर्थ समजू लागेल.



दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 9

मागील भागात आपण पाहिले की एलिला भारतात बोलवायचे हा निर्णय विजयाताईंनी घेतला. आशू आणि पूर्वा यांची मैत्री हळुहळू खुलू लागली. तरीही अनघा आणि सुलभाताई मात्र थोड्या साशंक होत्या. आता पाहूया पुढे.


सकाळी मस्त पापलेट फ्राय खाऊन झाले. तेवढ्यात आशुने नोटिफिकेशन वाचले.

"मॉम सी लाईफ वर प्रोजेक्ट दिला आहे. मी गुगल वर रेफ्रेन्स शोधते. तू प्लीज प्रिंट्स काढशील?" आशू बोलत होती.

"म्हणजे तू फक्त माहिती कट पेस्ट करून मग त्यावर तुझे मत लिहिले की संपले असेच ना?" आजीने तिला विचारले.

"नाही,मी त्याचे प्रेझेंटेशन करणार आहे. काही व्हिडिओ बनवणार." आशू उत्साहाने बोलत होती.

"तरीही यात तू स्वतः काहीच शोधले नाहीस. मग तुला केवळ इन्फॉर्मेशन मिळेल ज्ञान नाही." विजयाताई परत शांतपणे बोलल्या.

तशी आशू हिरमुसली.

"अग इथे शंभर पावलांवर समुद्र आहे. तिथे जाऊन बस. तुझा तो महागडा कॅमेरा बाहेर काढ. स्केचबुक काढ. नोट्स लिही." विजयाताई सांगत असताना सुद्धा आसावरीला गंमत वाटत होती.

तेवढ्यात पूर्वा अभ्यासाला आली. अनघा आणि उन्मेष आज तिच्या एका मैत्रिणीकडे जाणार होते. आशू आत जाऊन आजीने सांगितले त्यावर विचार करून साहित्य जमवत होती.


विजयाताई आणि पूर्वा दोघी समोर बसल्या त्यांनी तिला इंग्लिश बेसिक गोष्टी शिकवायला सुरुवात केली. अगदी साधी सोपी उदाहरणे देऊन विजयाताई तिला शिकवत होत्या. पूर्वा मुळात तल्लख असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

इंग्लिश वरून गाडी गणिताकडे वळली इथे तर उजेडच होता. तरीही विजयाताई तिला सहज समजावत होत्या.

"आजी,किती छान शिकवतेस तू गणित."आशू आत येत म्हणाली.

"अग मी गणित आणि इंग्लिश जवळपास पस्तीस वर्षे शिकवले आहे. पण माझी खरी आवड मराठी बर." विजयाताई खुलून सांगत होत्या.

छान गप्पा आणि शिकवणी रंगली.

"पुर्वा उद्या तू पण ये सकाळी लवकर आपण समुद्रावर जाऊ." आशू म्हणाली.

"आशू,सकाळी आई कामावर जाते. मला सगळी कामे आवरावी लागतात." पुर्वाने उत्त्तर दिले.
तशी आशू थोडी गप्प झाली.

"पण मी पहाटे उठून सगळे आवरून येईल. तू नको काळजी करुस."

पुर्वा हे बोलत असताना विजयाताई आसावरीकडे पहात होत्या. काहीतरी आत रुजायला सुरुवात झाली होती आता फक्त त्या अंकुराचे संगोपन करायचे होते.


संध्याकाळी जेवायला फक्त आशू,विजयाताई आणि सुलभाताई होत्या. आण्णा काही कामानिमत्त मुंबईला गेले होते.

"आशू,खायला काय करू ग?" आजीने आवाज दिला.

"आजी,ऐक ना! मस्त सूप बनव प्यायला.टेस्ट येईल मस्त." आशुने फरमाईश केली.

सुलभाताई दहा पंधरा मिनिटांनी एका छान पितळी वाटीत काहीतरी घेऊन आल्या. मसाल्याचा वास आणि लख्ख चमकणारी वाटी.

"आशू,पिऊन सांग हे कोकणातील सूप तुला आवडलं का?" विजयाताई म्हणाल्या.
आशुने ते सूप प्यायलं आणि तिला ते प्रचंड आवडले.

"आजी किती मस्त चव आलीय. टोमॅटो कुठून आणलेस तू? ऑनियनपण किती छान मिक्स झाले." आशू विचारत होती.

"अग कोकणात चार महिने पाऊस असतो. मग काय हे सगळे पदार्थ वाळवून ठेवायचे." सुलभाताई तिला सांगत होत्या.

दुसऱ्या दिवशी समुद्रावर जायला तयारी करत तिघी मस्त गप्पा मारत सूप पित होत्या.


दुसऱ्या दिवशी आशुने मस्त लाईट ब्लू कलर कॉटन जंपसुट घातला आणि गळ्यात कॅमेरा,स्केचबुक सगळे घेऊन तयार झाली. पुर्वा आवरून आली होती. तिघीजणी निघाल्या. दुरूनच ताज्या माशांचा वास येऊ लागला. आजीने तिला लांबूनच दाखवले.

कित्येक प्रकारचे मासे,खेकडे,शिंपले विकायला ठेवले होते.

"आजी किती टाईपचे फिश आहेत. कुठे सापडतात?" आशू प्रश्न विचारत होती.

"पुर्वा,तू का नाही एक्सप्लेन करत आशुला." विजयाताईंनी सुचवले.

"पण आजी तिला समजेल का माझे इंग्लिश?" पुर्वा जरा साशंक होती.

"तू सुरू तर कर. काही अडले तर मी आहेच." असे म्हणून हा प्रयोग सुरू झाला.

आशुने सुद्धा पुर्वाला कॅमेरा धरणे,फोटो काढणे शिकवले. जवळपास तीन तास भटकून भरपूर माहिती घेऊन त्या परत आल्या.

"आजी,मस्त मजा आली. माझा प्रोजेक्ट बेस्ट होणार. थँक्यू आजी आणि पूर्वा."

आशू सगळे ठेऊन आत आली. तिने फोन पाहिला आणि ती घाबरली. रॉनीचे कित्येक मॅसेज आणि फोटो होते. शिवाय तिने फोटो पाठवले नाही तर बोलणार नाही असेही सांगितले होते. आशुने पटकन त्याला रिप्लाय केला. इथे प्रायव्हसी नाही. संधी मिळाल्यास पाठवेल. हे सेंड करतानाही तिला अपराधी वाटत होते.

तेवढ्यात एलिचा तिकीट कन्फर्म झाल्याचा मॅसेज दिसला आणि आशुच्या चेहऱ्यावर हसू परतले.


दुपारच्या जेवणाला आजीने मस्त वाळवलेली अंबाडीची आणि हरभरा भाजी केली होती.विजयाताई येताना पुण्यातून घेऊन आल्या होत्या.


त्याचवेळी गडी वर्दी द्यायला आला,"बाय,तिकड खालच्या वाडीत आंबे पिकायला आल्यात."

त्याला चहा देत सुलभाताई विचारपूस करत होत्या.

"तुझी पोरगी काय म्हणते? यंदा दहावीला आहे ना?"

"लगीन करून टाकतय म्या." त्याने उत्तर दिले.

"आम्ही उद्या येतो तिकडे. तुझ्या मुलीला आणि बायकोला छान काहीतरी बनवायला सांग. सकाळीच येऊ." गडी निघून गेला. आशुच्या मनात खूप प्रश्न साठले होते.

आशू प्रोजेक्ट करताना अजून काय शिकेल? रॉनी आणि तिचे पुढे काय होईल?

वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all