दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 7

आता आशू आजीची मदत घेईल का?

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 7

मागील भागात आपण पाहिले कोकणात पोहोचल्यावर विजयाताई पुर्वाला पाहून काहीतरी ठरवतात. एलिबद्दल आशू काहीच सांगायला तयार होत नाही. रॉनी नावाचा मुलगा आशुकडे फोटो मागतो. आता पाहूया पुढे.


दिवसभर शाळेचा अभ्यास,ऑनलाईन सेशन पाहून आशू कंटाळली होती.

"टाई! टाई! लवकर बाहेर ये." उन्मेष तिला बोलावत होता.

आशू पटकन बाहेर आली. आजी मस्त ड्रेस घालून छोटीशी बॅग घेऊन तयार होती. बरोबर सकाळी आलेली मुलगी पण होती.

"आशू जा पटकन तयार हो. आपण थोडे फिरून येऊ." आजीने सांगितले.

तसेही घरात बसायचा कंटाळा आल्याने आशू पटकन शॉर्ट आणि टी शर्ट घालून आली. विजयाताई फक्त हसल्या. चौघेही चालू लागले. घराच्या जवळच समुद्रकिनारा होता.

" आशू दिदी तुला इंग्लिश छान येत असेल ना? मला शिकवशील?" पुर्वाने विचारले.

आशुने तिच्याकडे सरळ दुर्लक्ष केले आणि हेडफोन कानात टाकले. पूर्वा थोडी हिरमुसली.

"हे पूर्वा टाई,इंग्लिश मला पण येते. मी शिकवीन तुला." उन्मेष हसत म्हणाला.


अचानक आशुला जाणवले सगळे तिच्याकडे वळून पहात आहेत. काहीजण हसत आहेत. ते पाहून पूर्वा तिच्या बाजूने चालायला लागली. तरीही काही मुले तिला पाहून हसली.

"आजी,सगळे मलाच का बघत आहेत? किती घाण वाटते ते?" आशू चिडली होती.

"दिदी,तू हे कपडे घालायला नको होते." पुर्वा हळूच म्हणाली.

"कपड्यांचा काय संबंध? इथे लोकच चीप आहेत." आशुची प्रचंड चिडचिड होत होती.

" आशू,प्रत्येक परिसरातील राहण्याचे,बोलण्याचे,कपडे घालण्याचे नियम असतात. पॅटर्न म्हण हवे तर. ह्या गावात तुझ्या वयाच्या मुली असे कपडे घालत नाहीत. त्यामुळे तुला हा अनुभव येणारच." विजयाताई म्हणाल्या.

"हू केअर्स? मला हवे तेच कपडे मी घालणार."

इतक्यात समोर समुद्र दिसू लागला. तेवढ्यात एका मुलाने आशुबद्दल कमेंट केली. तो सायकलवर होता. काही कळायच्या आत पुर्वाने त्याच्या सायकलवर शहाळे फेकून मारले. तसा तो मुलगा तोंडावर आपटला. आशुने पुर्वाच्या हातावर टाळी दिली.

"पुर्वा,तू उद्यापासून अभ्यास करायला माझ्याकडे येत जा." विजयाताई म्हणाल्या.


"आजी तू टीचर होतीस ना?" उन्मेष विचारू लागला.

तेवढ्यात भेळ दिसली आणि विजयाताई भेळ आणायला गेल्या.

"दिदी,तुला एक सांगू. कितीही काळ बदलला तरी निसर्ग बाईच्या शरीरावरच काही गोष्टींच्या खुणा सोडून जातो. तू कपडे कसेही घातले तरी." बोलताना पुर्वाच्या डोळ्यात पाणी आले.

"अग रडू नकोस. मी आपले असेच म्हणत होते." आशू तिला गप्प करत होती.

तेवढ्यात विजयाताई परत आल्या. समुद्रावर शांत वेळ घालवून सगळे घरी परत आले.


संध्याकाळी आशू ऑनलाईन येताच रॉनीचा मॅसेज दिसला.

"ॲश,प्लीज फोटो पाठव ना.मला तुझी खुप आठवण येते."

पुढे अश्लील संभाषण होते. आशुला ते वाचताना घाम फुटला. ती पटकन बाहेर पाणी घ्यायला आली.

"आशू, घाबरलीस का? कोणी काही बोलले का तुला?" आण्णा आजोबा विचारत होते.

ती मानेने नाही म्हणून पटकन निघून गेली. आण्णा मात्र अस्वस्थ झाले.

"आशुला काही अडचण असेल का? एवढी कशाला घाबरली ती?" आण्णा सुलभाताईंना म्हणाले.

"अहो,घाबरली असेल पिक्चर वगैरे पाहून. उगी नसत्या शंका काढू नका." सुलभाताई पटकन बोलल्या.

अनघा आणि सुलभाताई स्वयंपाक करत होत्या. तेवढ्यात विजयाताई आत आल्या.

"अनघा,ही एली कोण आहे? मैत्रीण आहे का आशुची?"

"आई,त्या दोघी खूप घट्ट मैत्रिणी आहेत." असे म्हणून अनघाने पुढे घडलेले सगळे सांगितले.

"अग,अशा वयात आलेल्या पोरीला एकटेच टाकून आई बाप जातातच कसे?" सुलभाताई रागाने म्हणाल्या.

"आई,अहो तिकडे असे घटस्फोट,मुलांनी एकटे राहणे कॉमन आहे. किशोरवयीन मुले मुली त्यामुळे अशी अनेकदा फसतात." अनघा हताश होऊन बोलली.

"आसावरी वर नीट लक्ष ठेव ग." सुलभाताई काळजीत पडल्या.

"लक्ष ठेवण्यापेक्षा तिला काही गोष्टी म्हणजे कुटुंबसंस्था,स्त्री पुरुष आकर्षण हे सगळे समजावून सांगायला हवे." विजयाताई हसून म्हणाल्या.

"आई,आता तूच हे करू शकतेस. तिला इथल्या मातीची आणि कुटुंबाची मूल्ये सांगू शकतेस." अनघा आपल्या आईला सांगू लागली.

"मूल्ये सांगणार नाही तर रुजवणार आणि त्याचवेळी तिकडचे काही चांगले असेल तर तेही शिकणार." विजयाताई ठाम आवाजात म्हणाल्या.


एलिबद्दल विजयाताई काय ठरवतील? आशुला त्या कसे समजावतील?

वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all