दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 6

आशू आणि आजीची मैत्री खुलेल का?

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 6

मागील भागात आपण पाहिले की विजयाताई आशुला दापोलीत रहायला तयार करतात. कोकणात पोहोचताना अनेक गमती जमती होतात. अखेर एकदाची सिलिकॉन व्हॅलीमधून सुरू झालेली सफर कोकणात येऊन पोहोचते. आता पाहूया पुढे.


आण्णा आणि सुलभाताई दारातच उभे होते. लांबून गाडी दिसू लागली आणि शेजारी राहणारी पूर्वा जोरात ओरडली,"आजे गाडी आली ग!"

सुलभाताई पटकन ताट आणायला आत गेल्या. विजयाताई आणि इतर सगळेजण गाडीतून उतरले. अनघा पटकन पुढे होऊन पाया पडली. उन्मेषने तिचे अनुकरण केले. आशू मात्र कानात हेडफोन घालून होती. तिने पटकन हात मिळवला. तसे विजयाताईंच्या कपाळावर एक अठी उलटली.

"चला सगळे परसात जाऊन हातपाय धुवून घ्या. तोवर मी पाने मांडते." सुलभाताई आत गेल्या.

"परस, व्हॉट परस आजी?" उन्मेष आजीला विचारू लागला.

"थांब हा मी दाखवते तुला परस." पूर्वा पटकन त्याचा हात पकडुन म्हणाली.

सगळे आत येऊन बसले. बाहेरून कौलारू दिसणाऱ्या त्या वाड्यात आतून सगळ्या सोयी होत्या. आशुला मनातून बरे वाटले.

तेवढ्यात आजीने जेवायला हाक मारली. छान गरम तांदळाची भाकरी, आळूची पातळ भाजी, मस्त मुरलेले लोणचे आणि वाफाळलेले गरम उकडीचे मोदक पाहून अनघा आणि दिनू टुणकन उडी मारून बसले. आशू मात्र नाराज होती.

"आशू,जेवायला बस." विजयाताई बोलल्या.

"आजी,हे काय आहे?" उन्मेष मोदकाकडे बोट दाखवत बोलला.

"ते ना? गोड मोमोज आहेत असे समज. पण त्याला मोदक म्हणतात."सुलभाताई त्याला समजावत होत्या.

दुसरीकडे त्यांनी मोदक फोडला आणि तुपाची धार धरली. मोदक उन्मेषला दिला. त्याला मोदक प्रचंड आवडला. तसे सुलभाताई आशुला मोदक देऊ लागल्या.

"आजी,मला नकोय हा. एकतर माझ्या गालावर पिंपल्स आलेत. वर इतके ऑईली आणि गोड खाऊन परत वजन वाढेल." तिने नाक मुरडले.

आण्णा बोलणार एवढ्यात सुलभाताईंनी त्यांना नजरेने गप्प केले. सर्वजण छान जेवले. आशुला लोणचे,भाकर आणि भाजी आवडली होती.


आशू आणि उन्मेष दोघांना एकच खोली दिली होती. अनघा आता मदत करायला गेली. तेवढयात पूर्वा भांडी उचलू लागली. सावळी,शांत पूर्वा पाहून विजयाताई हसल्या.

"तू कुठे राहतेस? शाळेत जातेस का?" त्यांनी विचारले.

"मी शेजारी राहते. आई इथ काम करते. तिला मदत करायला येते. यंदा दहावीला आहे. पण दोन वर्षे शाळा बंद होती ना." पूर्वा भरभरून बोलत होती.

तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली. ती निघून गेली तरी विजयाताई मात्र मंद हसत काहीतरी ठरवत होत्या. खोलीत आल्यावर आशुने अनघाचा लॅपटॉप घेऊन एलीला व्हिडिओ कॉल केला.

"एली, व्हॉट हॅपन? लूक ॲट यु?" आशू काळजीने विचारत होती.

"ॲश, आय डोन्ट वॉन्ट टू लिव्ह. माय लाईफ इज फिनिश." एली उदास होती.

दोघी बराच वेळ बोलत होत्या. आशुशी बोलायला आलेल्या विजयाताई हा संवाद ऐकून परत गेल्या. दिनू यांना सोडून परत निघून गेला. त्याला कामावर जायचे होते. दुपारची विश्रांती झाली.

"आशू,उन्मेष बाहेर या." विजयाताई हाक मारत होत्या.

दोघेही बाहेर आले.
"मॉम कुठेय?" उन्मेषने विचारले.
"अरे तुझी आई आणि आजी आजोबा जरा शेजारी गेलेत. तोवर तुम्ही नाष्टा करा." त्यांनी दोघांना डिश दिल्या.

" वॉव, आजी. नुडल्स मला फार आवडतात." आशू खुश झाली.

"अग,ह्यांना आपण शेवया म्हणतो बर. घरी केलेल्या आहेत " आजीने उत्तर दिले.
"काय? इतक्या यम्मी नुडल्स घरी बनवल्या?" उन्मेष डोळे मोठे करत म्हणाला.
अशा गप्पा चालू होत्या.
"आशू,ही एली कोण आहे?" विजयाताई म्हणाल्या.

"मॉमने तुला सांगितले ना? काय यार इकडे प्रायव्हसी नाही काही." आशू चिडली.

"नाही,तिने नाही सांगितले. सकाळी कानावर पडले. प्रायव्हसी कोणापासून हवी असते आशू? अनोळखी लोकांचे ठीक आहे. पण आपले आई वडील,घरातले मोठे यांना खूप अनुभव असतात. ते आपली मदत करू शकतात. तू आजच सांग असे नाही. तुला वाटले तर बोल मी नक्की मदत करेल."

एवढे बोलून विजयाताई कॉफी करायला गेल्या.

आशू कॉफी घेऊन खोलीत आली. तिने पाहिले तर रॉनीचा मॅसेज होता. त्याने त्याचे काही फोटो पाठवले होते. तसेच तिने पाठवावे असे खाली लिहिले होते.
तिने फोटो पाहिले. अर्धनग्न फोटो पाहून तिला जरा भीती वाटली. तिने ते डिलीट केले. तेवढ्यात अनघा आत आली.

"आशू,तुझा लॅपटॉप आलाय. आता तुझे स्कूल सेशन सुरू होतील ना." असे म्हणून कुरिअरने आलेला लॅपटॉप तिने दिला.


आशू मात्र विचारात पडली. फोटो पाठवले नाहीत तर रॉनी नाराज होणार. त्याच्याशी रात्री बोलू असे ठरवून तिने शाळेचा होमवर्क करायला घेतला.

आशू फोटो पाठवेल का? आण्णा आजोबा मुलांशी कसे वागतील? आशू आजीची मदत घेईल का?
वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all