दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 5

अमेरिका ते कोकण हा बदल कसा असेल आशू आणि उन्मेष करिता

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 5

मागील भागात आपण पाहिले पुण्यात आल्यावर आशू आणि आजी दोघींचे फार काही जुळत नव्हते. दुसरीकडे कान टोचणारा मिळाला म्हणून अनघा आनंदी होती. तर दापोलीला जायचा धक्का आशुला पचत नव्हता. आता पाहूया पुढे.


"मॉम,आजी आंबा कशाला मागत आहे." उन्मेष बोललाच.

त्याला बाजूला सारून अनघा पटकन आंबेहळद गरम करून घेऊन आली. आजीने गुडघ्यावर लेप लावला. हळूहळू आशुला बरे वाटू लागले. तसे तिला पुढील धोक्याची जाणीव झाली.

दापोली? कशी राहणार मी तिकडे? तिथे वायफाय असेल का? नसेल तर माझ्या स्कूलच्या वेळापत्रकाचे काय? असंख्य प्रश्न तिच्या डोक्यात येत होते. त्याबरोबर दापोली टाळणे आवश्यक आहे त्यासाठी काय करावे याचा विचार ती करत असताना तिला झोप लागली.

जवळपास दोन तासांनी आशुला जाग आली. अनघा शेजारीच काम करत बसली होती.

"मॉम,तू मला आपण पुण्यात राहणार असे प्रॉमिस केले होतेस." आशू सौम्य आवाजात विचारत होती.

" हो,पण अग आजी आणि आण्णाआजोबा दोघांनी हे ठरवले." अनघाने अंदाज घेत उत्तर दिले.

"दिस इज नॉट फेअर हा. ते काही नाही तू आजीला सांग की आम्ही तिकडे येणार नाही." आशू आता चिडली होती.

"अग,असे कसे सांगणार. त्यांची इच्छा समजून घे." अनघा समजावत होती.

त्यावर आशुने जवळ असलेली डॉल फेकून दिली. "मी येणार नाही म्हणजे नाही. थांब मी डॅडला फोन लावते."

आशुने लॅपटॉप हिसकावला आणि सुबोधला व्हिडिओ कॉल केला. पलीकडून कॉल कट झाला.

इकडे काम बंद झाल्याने अनघा वैतागली.

"आशू, काय हा वेडेपणा. जरा नीट वागायला शिक."

"मॉम,मी दापोलीला येणार नाही. तू आता लगेच आजीला जाऊन सांग." आशू जोरात किंचाळली.

त्यासरशी अनघाने तिला जोरात एक कानाखाली वाजवली. आशू धाडकन दार उघडुन बाथरूममध्ये शिरली.
"आय हेट यु." दरवाजा धाडकन बंद झाला.


विजयाताई हा आवाज ऐकून आत आल्या. अनघाला शांत रहायची खूण करून त्या पुढे आल्या.

"आसावरी,तुम्ही आता जवळपास आठ वर्षांनी आलात. वुई आर ओल्ड पीपल्स. कदाचित तू पुढच्यावेळी येशील तर..." विजयाताई थांबल्या.

"हे आजी. तू अशी रडकी शोभत नाहीस हा." आशू दरवाजा उघडून बाहेर आली.

"पण माझी एक अट आहे. कबूल असेल तरच मी येईल."

अनघा आईकडे पाहू लागली.

"बोल,काय आहे तुझी अट?" विजयाताई म्हणाल्या.

"मला माझी स्वतंत्र रूम हवी. चोवीस तास नेट कनेक्शन हवे." आशू एकेका शब्दावर जोर देत म्हणाली.

"ठीक आहे. बदल्यात तुला एक गोष्ट ऐकावी लागेल. आम्ही हाक मारू तेव्हा दार उघडले पाहिजे आणि रात्री नेट बंद राहील."

अखेर कसेबसे दोघी तयार झाल्या आणि अनघाने हुश्श केले. विजयाताई अनघाला घेऊन खरेदीला गेल्या. आठवणीने सर्वांसाठी त्यांनी काही उपयोगी पडतील अशाच वस्तू घेतल्या. दोन दिवस इथल्या घराची व्यवस्था लावण्यात गेले. तिसऱ्या दिवशी पहाटे दिनू गाडी घेऊन हजर.


गाडीने वेग पकडला आणि सगळे पेंगु लागले. जवळपास पाच तासांचा प्रवास होता. पहाटेच निघाल्याने वातावरण अगदी प्रसन्न होते. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता. त्यामुळे वातावरणात उष्णता असली तरी अनघा आणि दिनू कोकणात जायच्या विचारांनीच आनंदी झाले होते. भोर ओलांडले आणि पोटात कावळे कोकलू लागले.


"दिनू,फर्मास मिसळ खाऊ. किती वर्ष झाली मिसळ खाल्ली नाही." अनघाने दिनुला सुचवले.

" मिसळ, व्हॉट मिसळ? हे बघ मॉम जरा थोड थाई,इटालियन मिळेल का बघ." आशू नाक मुरडत म्हणाली.

"काय म्हणालीस? अग ह्या ठिकाणी तुला लोकल फुडच मिळेल." दिनू हसत होता.

मिसळ खाताना नाकाचा शेंडा लाल झाला होता आणि कानातून रागाने धूर निघत होता. कसेबसे चार पाच घास आशुने खाल्ले.

एवढ्यात विजयाताईंनी मस्त मुरांबा लावलेली पोळी रोल करून तिच्या पुढे धरली.

"वाव आजी स्प्रिंग रोल. कसली यममी टेस्ट आहे याची. आधी सांगायचं की इथे रोल मिळतो." आशू खाताना बोलत होती.

"आशू,सावकाश खा. घास खाताना बोलू नकोस. हा रोल आणि त्यातील मुरांबा ह्या दिनुच्या आईने घरी बनवला आहे."

तसे आशुने दिनुला हाताचा मोर दाखवला.

"मामा,एक नंबर. किती छान. मॉम तू पण घे."

"ये नाही हा. तो पोळी आणि मुरांबा आम्ही नाही खाणार." दोघेही एकाच सुरात म्हणाले.

"आशू,दोघांना लहान असताना हे खायचे नसे. सारखं वडापाव आणि मिसळ." विजयाताई हसून म्हणाल्या. मस्त पोटभर खाऊन सगळे पुढे निघाले.


गाडी कोकणात शिरली. ताडामाडाची झाडी,मधून जाणारी लाल पायवाट, उतरत्या छप्पर असणारी घरे. सगळे पाहून उन्मेष खुश झाला.

तेवढ्यात दिनू म्हणाला,"बाई,हिरवे तळकोकण कविता ऐकवा ना. तुमच्या आवाजात परत एकदा."

विजयाताई पुन्हा एकदा वर्गात शिरल्या आणि त्यांच्या तोंडी कवी माधव ज्युलियन यांची कविता आपोआप आली.
" सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण.
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन."


दिनू आणि अनघा भान हरपून कविता ऐकत होते. आशूने सगळे रेकॉर्ड केले. आजी थांबली.

"आजी मला सगळे नाही समजले. पण काय भारी म्हणत होतीस तू. नंतर गुगल ट्रान्सलेट वर समजून घेईन मी."

प्रवास गप्पा मारत संपला आणि दापोलीचे टुमदार घर आणि वाडी दिसू लागली.


कथेत वापरलेल्या ओळी माधव ज्युलियन यांच्या आहेत.


आता इथे आसावरी कसे जुळवून घेईल? कुटुंब काय असते याचे धडे अनघाच्या मुलांना कसे मिळतील.
वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all