दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 4

आशू आणि आजीचे संस्कार यात पहिली चकमक

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 4

मागील भागात आपण पाहिले अनघा मुलांना घेऊन भारतात आली. मुंबई पुणे प्रवासात आसावरी सतत कुरकुर करत होती. दिनू आणि अनघा बालपणीच्या गप्पा मारत होते. अनघा मात्र आता पुण्यात काय होईल याच्या चिंतेत बुडाली होती. आता पाहूया पुढे.


हळूहळू आसावरी आणि उन्मेष झोपी गेले. गाडी पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग बाजूने पुण्यात शिरली.

इकडे विजयाबाई तयारच होत्या. छान चिंच गुळाचा सार घालून केलेली आमटी,मऊ भात,मऊसूत पोळ्या असा छान घरगुती बेत केला होता. बऱ्याच दिवसांनी बाई स्वतः स्वयंपाक करत होत्या. एकीकडे कान गाडीच्या आवाजाकडे आणि दुसरीकडे हात चालत होते.

गाडीचा हॉर्न वाजला. बाई धावत अंगणात आल्या. सात आठ वर्षांनी त्या नातवंडे आणि लेकीला भेटणार होत्या. अनघा,उन्मेष आणि आशू गेटमधून आत आले.

"अनघा,पायावर पाणी घेऊन आत ये." बाईंनी आवाज दिला.

अनघा,दिनू आणि उन्मेष त्याप्रमाणे पाणी घेऊन आले. आसावरी तशीच पुढे आली.

"आसावरी,आधी जाऊन पाय धुवून ये." विजयाताईंचा आवाज जरा कडक झाला होता.

"जा लवकर पाय धुवून ये." अनघाने तिला पिटाळले.

आसावरी पाय आपटत पाय धुवून आली.

"आशू,तुला राग आला असेल. परंतु बाहेरून आल्यावर घरातील जमिनीला आपले पाय पहिल्यांदा लागतात. मग त्यातून बाहेरचे जंतू, बॅक्टेरिया घरात यायला नको. त्यासाठी ही पद्धत आहे बरं."
विजयाताई आता सौम्य झाल्या.
"येस, ग्रॅनी. मी रीड केले आहे." उन्मेष दुजोरा देत होता.

" लबाड,इकडे ये. पहिली गोष्ट ग्रॅनी नाही हा. आजी म्हणायचे. किती गोड वाटते आजी ऐकायला."
त्याचे गाल ओढत विजयाताई हसल्या.

"झाले का नातवंडांना भेटून. मी सुद्धा आले आहे हा बरोबर."
अनघा लटक्या रागाने बोलत होती.

विजयाताई सर्वांना औक्षण करू लागल्या. कुंकू लावताना आसावरीच्या कपाळावर आठी होतीच. पण ह्यावेळी ती काहीच बोलली नाही.


"मॉम, आय एम हंगरी. प्लीज काहीतरी खायला दे." आसावरी तशीच सोफ्यात बसली.

ती बॅगेत पाकिटे शोधत होती.

"अनघा,हातपाय धुवून घ्या. पाने मांडायला घेते." विजयाताई आत गेल्या.
"मम्मा,आजी आपल्याला पान म्हणजे लिफ खायला देणार?" उन्मेष हळूच विचारत होता.

"अरे, पाने म्हणजे डिश. डिश सर्व्ह करणे म्हणजे पाने मांडणे." दिनू त्याला समजावत होता.

आसावरी पटकन हात धुवून आली. समोर असलेले जेवण पाहून ती ताडकन उठली.

"मॉम, गिव्ह मी युअर फोन. आय वॉन्ट टू ऑर्डर सम पिझ्झा बर्गर अँड ऑल. मी हे नाही खाणार." आशू नाक उडवत म्हणाली.

"आशू,आधी खाली बस. तुझी आई तुला काही फोन वगैरे देणार नाही. तुला हेच जेवण करायला लागेल. हवा तर हा रुल आहे असे समज." विजयाताई शांत आवाजात बोलल्या.

खर तर मनातून अनघाला आनंद झाला होता. अमेरिकेत मनात असले तरी हे बोलणे शक्य नव्हते. आसावरी रागाने आत गेली. तिला समजावून सांगायला कोणीच आले नाही.

तिने एलिला व्हिडिओ कॉल केला.
"आय वॉन्ट टू कम बॅक देअर. रुल्स आणि हे सगळे नाही आवडत मला." आशू रागाने बोलली.

"ॲश कुल डाऊन. ॲट लिस्ट यु हॅव अ फॅमिली." एली अगदी शांत बसली.
त्यावर मात्र आशुकडे उत्तर नव्हते.
"हाऊ आर यू एली? हाऊ द ट्रीटमेंट गोइंग ऑन?" आशुने विचारले.

"आय डोन्ट वॉन्ट मेडिसिन. आय वॉन्ट लव्ह अँड केअर. बट ..."

एली शांत झाली. तिला थोडे समजावून आशुने फोन ठेवला.


जवळपास तीन तास झाले तरी आई आपल्याला समजवायला आली नाही. ते पाहून आशू स्वतः हळूच बाहेर आली. तेवढ्यात शेजारच्या रूम मधून आवाज आला.

"आई,पाहिलेस का? अशी वागते ही. ती नाही राहणार दापोलीत." अनघा म्हणाली.

"अनघा,आधी तिथे जाऊ. त्यानंतर बघू आपण. तसेही ह्या वयात मुलांना थोडा धाक आणि थोडे प्रेम असे वागावे लागते." विजयाताई बोलल्या.

"आई,मला मारे फटके देऊन सांगायचीस. आता बघ ती जेवली नाही तर स्वतः पण जेवली नाहीस. तुला गोळ्या घ्यायच्या आहेत. खाऊन घे." अनघा परत समजावत होती.

"अग पण पोर उपाशी आहे. मला नाही जाणार जेवण." विजयाताई उदास झाल्या.

आशू हे ऐकून हळूच माघारी फिरली. टेबलवर जाऊन बसली. स्वतः वाढून घेतले आणि जेवू लागली. आजीच्या हाताची अप्रतिम चव पाहून ती आनंदी झाली. तरीही दापोलीला जायचे तिला आवडले नव्हते. पण नाहीच जमले तर येऊ परत पुण्याला सध्या शांत राहू असे ठरवून ती जेवत होती.

"वा टाई.आता हा फोटो सगळ्यांना सेंड करणार." उन्मेष ओरडला.

ॲश चिडली आणि त्याच्या मागे पळता पळता घसरून पडली.

"मॉम,मॉम लवकर ये. टाई घसरून पडली." उन्मेष जोरात ओरडला.

" थांब तुला दाखवते." आशू उठायला गेली आणि परत खाली पडली.

तोवर आजी धावत आली. पटकन तिला सोफ्यावर झोपवले आणि अनघाला ओरडली.

"बघत काय बसलीस. जा लवकर आंबेहळद गरम करून आण."

आईला आजी ओरडली हे पाहून आशुला त्याही स्थितीत हसायला येत होते. दुसरीकडे दापोलीला जायचे टेन्शन आणि तिसरीकडे गरम आंबा आणि हळद घेऊन आजी काय करणार. पार डोक्याचे दही झाले होते.


दापोलीला जाताना काय मजा घडेल? आशुला कोकण आवडेल का? आजी आणि तिचे सुर जुळतील का?

वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all