दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 1

दोन संस्कृती एक कुटुंब कसे होईल मिलन

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 1

"हे ॲश, इज इट ट्रू? यू आर गोइंग बॅक देअर? फॉर वन इयर." एला जोरात ओरडून आसावरीला विचारत होती.

"थिंग्ज आर नॉट इन माय हॅण्ड डियर." ॲश उर्फ आसावारी तिला समजावत होती तरी मनातून प्रचंड चिडली होती.

आसावरी वय वर्षे चौदा आणि बॉर्न इन यु. एस. त्यामुळे फक्त नावाला आसावरी आणि पक्की अमेरिकन. गेले आठवडाभर आसावरी अस्वस्थ होती. तिला सतत तीच वाक्य ऐकू येत होती.

"आशू,वुई आर गोइंग बॅक टू इंडिया फॉर नेक्स्ट वन इयर."

ते वाक्य तिच्या आयुष्यात संपूर्ण उलाथापालथ करून गेले. कोरोना लॉकडाऊन नंतर आलेल्या मंदीमुळे तिच्या मॉमचा जॉब गेला होता. शिवाय तिच्या वडिलांचा जॉब आणि बदललेली व्हिसा पॉलिसी यामुळे पुढील एक वर्ष भारतात राहावे लागणार होते.

इथे संपूर्ण अमेरिकन झालेली आसावरी आणि त्याच वाटेवर असलेला तिचा भाऊ आठ वर्षीय उन्मेष दोघेही नाराज होते.

टिन एज मध्ये असलेली आसावरी अलीकडे तिची आई अनघा आणि वडील सुबोध दोघांनाही जुमानत नसे. पब्ज, नाईट पार्टी, बॉयफ्रेंडस आणि मुक्त वातावरण ह्या सगळ्याची भुरळ तिच्या मनावर होती.


इकडे अनघाला एकीकडे आनंद होत होता तर दुसरीकडे ही मुले कसे जुळवून घेतील याची भीती वाटत होती. अनघा पुण्यात तिच्या आईकडे राहणार होती. सुबोधचे आई वडील कोकणात होते. अनघाची आई विजया पाटील म्हणजे हाडाची शिक्षिका आणि पक्के भारतीय संस्कार. तर इकडे ॲश उर्फ आसावरी पूर्णपणे अमेरिकन भारतीय.


"सुबोध,तसेही ही पोरं ऑनलाईन शिकणार तर मी कोकणात राहते ना आई बाबांकडे." अनघा त्याला विनवत होती.

"अनघा,अग माहेरी राहायची संधी मिळते तर ती तुला नकोय का?" मिश्किल हसत सुबोध म्हणाला.


"तुला काय जातेय दात काढायला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी माझी अवस्था होईल. आई आणि आशू दोघी एकत्र मी कल्पनाच करू शकणार नाही." अनघा काळजीने बोलत होती.


"मॉम, विलकडे पार्टी आहे. मी उद्या सकाळी परत येईल." मिनी स्कर्ट आणि स्मोकी मेकअप केलेल्या अवतारात आशू बाहेर आली.

"आशू,काय हे? असे कपडे?" अनघा शक्य तितक्या सौम्य आवाजात बोलली.

"मॉम,आजची थीम हीच आहे. मला आउटडेटेड व्हायचे नाही." असे म्हणत धाडकन दार आपटून ती निघून गेली.


इकडे विजयाताई मात्र खुश होत्या. एकुलती एक मुलगी वर्षभर येणार होती. तेवढ्यात त्यांना फोन आला.

"अग बाई,सुलभाताई,बोला किती दिवसांनी?" "विहीनबाई कशा आहात?" सुलभाताई म्हणाल्या.


"मस्त आहे. एकदम मजेत. तुम्ही दोघे कसे आहात." विजयाताई बोलू लागल्या.

"तुम्हाला एक विचारायचे होते?"सुलभाताई संकोचत होत्या.

"अग बाई,मग इतकी प्रस्तावना कशाला? हक्काने बोला की? तितक्या तर ओळखतोच आपण एकमेकींना.

" विजयाताई हसल्या."नाही म्हणजे,अनघा आणि मुले येतायेत तर त्यांना काही गोष्टी पाठवायच्या होत्या." सुलभाताई हळूच म्हणाल्या.

"बर झालं तुम्ही विषय काढलात. मला एक सुचवायचे होते. मला ह्या पुण्यात फार बोअर झाले आहे. तर मीच ह्या तिघांना घेऊन दापोलीला आले तर? म्हणजे तुमची हरकत नसेल तर." विजयाताई म्हणाल्या.

"अग बाई,हरकत कशाला? उलट एवढा मोठा बंगला, वाडी. आम्ही केव्हाचे बोलावतो आहोत. तुम्हीच येत नव्हता. तुम्ही एकट्या राहता ते यांनाही पटत नव्हतेच. कधी एकदा यांना सांगते असे झाले आहे." सुलभाताई प्रचंड आनंदात होत्या.


इकडे अनघाने सगळी तयारी करत आणली होती. आता फारतर आठ दिवसांनी निघायचे होते. आसावरी यायला तयारच नव्हती. तिला पुण्यात राहायला कसेबसे तयार केले होते. कामे उरकत असताना तिने व्हॉट्स ॲप उघडले.

"सुबोध! सुबोध लवकर ये." अनघा किंचाळली.

"अनघा,केवढ्याने ओरडलीस? काय आग लागली की काय?"

अनघाने शांतपणे फोनवरचा मॅसेज त्याला वाचायला दिला. सुबोध मटकन खाली बसला.
दोघे एकमेकांना आता कसे? असे खुणावत होते?

काय असेल मॅसेज? आसावरी भारतात आल्यावर काय घडेल? हा एक वर्षाचा मुक्काम दोन कुटुंबे जोडेल का?

वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर


🎭 Series Post

View all