दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 11

एक नवा प्रवास सुरू.



दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 11


मागील भागात आपण पाहिले की आण्णा आशुला आलेला मॅसेज अनघाला सांगतात. त्यानंतर आशू नाराज होते. इकडे पुर्वाबद्दल आशुला काही समजले होते. मुंबईहून कोणीतरी येणार होते. आता पाहूया पुढे.


आशू रागाने घरातून बाहेर पडली तिने काहीही खाल्ले नव्हते. पुर्वाच्या घराबाहेर आल्यावर तिच्या लक्षात आले की आपल्याला भूक लागली आहे.

तेवढ्यात पुर्वाने आवाज दिला,"आशू,ये लवकर गरम गरम आंबोळ्या करतेय खाऊन घे."

आशू आत आली. मोजकी भांडी,चूल आणि त्यावर पूर्वा करत असलेला स्वयंपाक पाहून आशुला आपले अमेरिकेतील घर आठवले. ह्या संपूर्ण किचनपेक्षा आपल्या घरातील बाथरूम मोठी आहे. तरीही ही मुलगी किती आनंदी आहे.

"पूर्वा,तुला हे असे सगळे करायचा कंटाळा येत नाही का?" आशुने विचारले.

"कंटाळा येतो,खूप वेळा वाटत बाहेर फिरावं.
पण मग माझी कष्ट करणारी आई आठवते. छोटा धाकटा भाऊ आठवतो.
तू काय म्हणतेस?
हा! फॅमिली.
फॅमिली म्हणजे फक्त मजा,आनंद असेच असतं का?
सुख दुःख एकत्र सोसायला हवी."


पुर्वा बोलत होती.


"पूर्वा, काल कृष्णा विषयी तुझ्या मैत्रिणी बोलत होत्या. हु इज ही?" आशुने विषय छेडला.

आजूबाजूला पहात पूर्वा म्हणाली,"आमच्या दोन वर्ग पुढे आहे. खूप हुशार आहे कृष्णा."

"तुला आवडतो का तो?" आशुने विचारले.

" मलाच काय कोणाही मुलीला आवडेल तो." पूर्वा मंद हसत म्हणाली.

"वॉव,तू त्याला येस म्हण. किती छान मजा येईल." आशू आनंदाने ओरडली.

"आशू,चल आपण घरी जाऊ. तिकडे आईला मदत करता येईल." पुर्वाने विषय टाळला. दोघी घरी निघाल्या.


घरासमोर गाडी उभी होती. कुरळ्या केसांची,संपूर्ण काळ्या कपड्यात पाठमोरी उभी असलेली मुलगी पाहून आशू धावत सुटली. पुर्वाला काय कळेना.

"एली, फायनली यु आर हिअर. आय एम सो हॅप्पी." आशू एलिला मिठी मारत बोलली.

"अग थांब तिला आत येऊ दे. मग निवांत बोलू आपण." विजयाताई म्हणाल्या.

" हॅलो, ग्रॅनी. व्हेअर इज अनघा आंटी?" एली आत येताना विचारत होती.

आनंदाचा भर ओसरल्यावर आशू नीट निरखून पाहू लागली. डोळे आत गेलेले,गालफाडे वर आलेली. म्लान डोळे आणि हरवलेला आत्मविश्वास. आपल्या जिवलग मैत्रिणीची अवस्था पाहून आशुचे डोळे आपोआप भरून आले.

"हॅलो एली, हाऊ वॉज द जर्नी?" अनघा बाहेर येत म्हणाली.

एली शांतपणे बसली होती. इतक्यात सुलभाताई पाणी घेऊन आल्या. एलिचा गोड पण निस्तेज चेहरा पाहून सुलभाताई क्षणभर थांबल्या आणि त्यांनी सहज प्रेमाने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

त्याक्षणी एलिने त्यांच्या कंबरेला मिठी मारली. इकडे आण्णा आजोबा आणि विजयाताई हे पाहून समाधानी झाले. आशू आणि पूर्वा एलिला खोलीत घेऊन गेल्या.


आत येताच एली आणि आशू समोरासमोर उभ्या राहिल्या. दोन भिन्न वंशाच्या,भिन्न देशातील पण मनाने एक असलेल्या जिवलग मैत्रिणी.

"एली, लूक ॲट यू? काय अवस्था झाली तुझी? किती त्रास?" आशू रडत विचारत होती.

"आशू आय डोन्ट वॉन्ट टू लिव्ह. मला मृत्यू का नाही येत?" एली अतिशय नाराज होती.

"मरण? मेले की सगळे संपून जाते का?" पूर्वा दोघींना शांत करत म्हणाली.

"एली, मीट माय न्यू फ्रेंड पूर्वा. शी इज वेरी नाईस." आशुने ओळख करून दिली.

त्यानंतर एलिला आराम करायला सांगून पूर्वा बाहेर निघून गेली. एली फ्रेश व्हायला गेली आणि आशुने फोन पहायला घेतला.

"ॲश,आय कान्ट लिव्ह. आय लव्ह यू. ओन्ली युअर रॉनी."

रॉनीचा गोड मॅसेज पाहून आशू हसली. तिने त्याला लव्ह यू असा रिप्लाय केला आणि फोन खाली ठेवला.


इकडे सुबोध विजयाताईंचा फोन आल्यावर अस्वस्थ झाला होता. त्याची गोड परी एवढी मोठी झाली. आजूबाजूला युवकांचे वर्तन पाहून त्याला नेहमी काळजी वाटत असे.

त्यात अनिर्बंध वागणे पाहून सुबोध चिंतेत असे. त्याने लगेच रॉनीला शोधायला घेतले.

त्यांच्याच कॉलनीत तीन बंगले पलीकडे फिटनेस इन्फ्ल्युएन्सर म्हणून काम करत असलेला रॉनी त्याने फेसबुकवर शोधून काढले.

लॅटिन अमेरिकन वंशाचा अतिशय प्रभावी फिटनेस असलेला हा वीस एकवीस वर्षांचा मुलगा आपल्या आशुला आवडला यात नवल नाही. कारण किशोरवय म्हणजे आकर्षणाचे वय.

आता ही कामगिरी कशी फत्ते करायची हा विचार सुबोधने सुरू केला.


एलिला कितीतरी महिन्यांनी अशी छान झोप लागली होती. थोड्या वेळाने तिच्या कपाळावर मायेने फिरणारा हात तिला जाणवला.

हसऱ्या चेहऱ्याने बोलक्या विजयाताई तिच्या शेजारी बसलेल्या होत्या.

"हाऊ आर यू माय डियर? कशी आहेस तू?" विजयाताई विचारत होत्या.

एली खूप दिवसांनी गोड हसली.


"तुला मराठी समजते आणि बोलता येते असे आशुने सांगितले." विजयाताई विचारत होत्या.

"येस,आम्हा दोघींना काही सिक्रेट शेअर करायला अमेरिकेत मराठी वापरत असू."
एली हसून सांगत होती.

"विजयाताई, पाहुणी उठली का? मी छान चहा बनवला आहे. लवकर बाहेर या." सुलभाताई बोलावत होत्या.

एली आणि विजयाताई बाहेर आल्या. आता हे सुंदर घर एली नीट पहात होती. सुंदर असे साधे घर पाहून तिला मनापासून आनंद झाला.

तेवढ्यात तिला भिंतीवर एक सुंदर निसर्गचित्र दिसले.

"वा,किती छान!" तिच्या तोंडातून शब्द निघून गेले.

"चला,कोणीतरी ह्या चित्राला छान म्हणाले." मागून गडगडाटी हसत आण्णा आजोबा म्हणाले.

"कम ऑन आजोबा.अतिशय छान आहे हे चित्र. तुम्ही काढलेय?"

त्यानंतर मात्र एली खूप बोलत होती. इतके सकारात्मक वातावरण पाहून तिला छान वाटत होते.

तेवढयात तिचा फोन वाजला. मॉम असे नाव फ्लॅश झाले.एलिने फोन सायलेंट केला आणि बाजूला ठेवला.


एली पुन्हा भरारी घेईल? पूर्वा आणि आशु दोघी काय निर्णय घेतील? अनघा आणि आशू पुन्हा बोलतील?


वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all