दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 10

अनघा आणि पूर्वा यांच्यातील अबोला कसा दूर होईल?



दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 10
मागील भागात आपण पाहिले आशुचा प्रोजेक्ट आणि पुर्वाची शिकवणी सुरु झाली. तर दुसऱ्या दिवशी दिवसभर वाडीवर जायची योजना सुलभाताई आणि विजयाताईंनी बनवली. आता पाहूया पुढे.


दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही आज्या, आण्णा आजोबा,उन्मेष आणि अनघा सगळे जय्यत तयार झाले.

"आशू,आवर लवकर. किती वेळ लावतेस?" अनघा आता चिडली होती.
गेला अर्धा तास आशू आवरत होती.

"मॉम,आपण टाईला इकडेच सोडून जाऊ." उन्मेष म्हणाला.

"यु लिट्ल मॉनस्टर. थांब तुला दाखवते." आशू रागाने त्याला पकडायला गेली.

त्यात तिच्या चप्पलचा बंध तुटला. ती आपले सामान आण्णा आजोबांच्या शेजारी ठेवून पटकन आत गेली. तेवढ्यात व्हॉट्स ॲप नोटिफिकेशन मध्ये मॅसेज दिसला.

"बेबी, सेंडींग सम न्यूड. वाना बी वाईल्ड युअर रॉनी."

तेवढ्यात आशू बाहेर आली. आण्णा अस्वस्थ झाले. पण त्यांनी स्वतः ला सावरले. सगळेजण छान चालत खालच्या वाडीला जायला निघाले. पुर्वा आणि तिच्या दोन तीन मैत्रिणी सोबत आल्या होत्या.


खालच्या वाडीत आंब्यांची,काजूची,फणसाची आणि माडाची दाट झाडी होती. मधोमध एक छान सुंदर खोली बांधलेली होती.

तेवढ्यात आण्णा म्हणाले,"पूर्वा,जागा स्वच्छ कर. छान चुल मांडू."

पुर्वाने लगेच सुरुवात केली. आशू आणि उन्मेषसुद्धा त्यांच्या मदतीला गेले. त्यांचा अंदाज घेत आण्णा अनघाजवळ गेले.

"अनघा,हा रॉनी कोण आहे? आशुच्या वर्गात आहे का?"

"तो आमच्या शेजारी राहतो वीस एकवीस वर्षांचा असेल. काय झाले आण्णा?"
अनघा आता थोडी चिंतेत होती.

आण्णा बोलताना संकोचत होते. तरीही त्यांनी अनघाला सगळे सांगितले. अनघा प्रचंड चिडली होती.

"आशू कम हिअर." अनघा जोरात ओरडली.

"मॉम व्हॉट हॅपन?" आशुने आवाज दिला.

"इकडे ये. आता लगेच." अनघाने शक्य तेवढे नियंत्रण ठेवून तिला परत आवाज दिला.

"मॉम,काय झाले एवढे? इथे सगळ्यांसमोर काय ओरडते तू मला?" आशू जवळ येत बोलली.

"व्हॉट्स गोईंग ऑन बिट्वीन यु अँड रॉनी? आय वॉन्ट द आनसर राईट नाऊ." अनघा चिडली होती.

" मॉम, आय एम ग्रोन अप नाऊ. दिस इज माय पर्सनल इश्यू. आय कॅन हॅण्डल इट." आशू रागाने बोलली.

अनघा तिला मारायला हात उचलणार इतक्यात विजयाताई तिला थांबवत म्हणाल्या,"आशू,तू जरा फिरून ये. तोपर्यंत मी तुझ्या आई बरोबर बोलते."


अनघा प्रचंड संतापली होती. तिची चौदा वर्षांची मुलगी एका वीस एकवीस वर्ष वयाच्या मुलाबाबत असे काही विचार ठेवते हेच तिला पचत नव्हते.

"तिचा फोन आणि लॅपटॉप काढून घे. येईल वठणीवर." सुलभाताई रागाने म्हणाल्या.

" नाही,त्यामुळे ती आणखी बिथरेल. आधी त्या मुलाची नीट माहिती काढली पाहिजे. ह्या वयात आकर्षण वाटणे नैसर्गिक असले तरी त्यातील धोके काय आहेत याची तिला जाणीव व्हायला हवी." विजयाताई म्हणाल्या.

"हो,तिला स्वतः ला जाणीव झाल्यावर ती ह्यातून सहज बाहेर येईल." आण्णा म्हणाले.

"अनघा,तू सुबोधला ह्या रॉनीबद्दल माहिती मिळवायला सांग. बाकी माझ्यावर सोड." विजयाताई अगदी शांत होत्या.

"आण्णानु,चूल बनून झाली बर." मुलींनी आवाज दिला.

मस्त कोकणी बेत चुलीवर शिजू लागला. ओल्या काजूची भाजी,नारळाच्या करंज्या,सगळे तयार होऊ लागले. तोवर मुली आंब्याच्या झाडाखाली पाड शोधू लागल्या.

"पूर्वा,ते कृष्णा तुला काय म्हणाला ग परवा?" अनिताने विचारले.

"आने,अग हळू. मोठी माणसे आहेत बरोबर. मुळात मला त्याच्याशी बोलायचं नाहीच आहे." पुर्वा रागावली.

"कशाला इतका भाव खाते. मला कुणी विचारलं तर मला खूप भारी वाटेल." सुमन बोलली.

"भारी तर वाटतेच ग.पण मग मला सुवर्णा आठवते. तिच्या आणि माझ्या आईचा चेहरा आठवतो." पूर्वा गंभीर झाली.


आशू जरा रागात ह्या गप्पा ऐकत होती. तिला समजले की एका मुलाला पूर्वा आवडते. मग पूर्वा नाही का म्हणत असेल. तिला नंतर विचारायचे आशुने ठरवले. आण्णा आजोबांनी जेवायला आवाज दिला. मस्त गप्पा मारत जेवण चालू होते. आशू आणि अनघा मात्र काहीच बोलत नव्हत्या.

"आने,तुझा बाप लग्न करायचे म्हणत होता तुझे." सुलभाताईंनी मुद्दाम विषय काढला.

"आजी,मला नाही करायचे लग्न. मला शिकायचं आहे." अनिता रडत म्हणाली.

"कशाला,कॉलेजात जाऊन त्या सूवर्णासारखी थेर करायला?" सुलभाताई परत चिडल्या.

"आपण आधी जेवू. अनिता मी समजावेल तुझ्या वडिलांना. आजपासून पुर्वाबरोबर तू ही अभ्यासाला ये." विजयाताई सगळ्यांना शांत करत म्हणाल्या.


दिवसभर गप्पा मारून आणि खेळून झाल्यावर सगळे घरी आले. अनघा प्रचंड रागावली होती. विजयाताईंनी सुबोधला फोन करून सगळे समजावले. माय लेकित आलेला अबोला सगळ्यांना असह्य झाला होता.


इकडे रॉनी गोड गोड बोलून आशुला त्याचे म्हणणे पटवून देत होता.


असेच चार पाच दिवस गेले. एक दिवस सकाळी उन्मेष ओरडत आला.

"टाई उठ लवकर. आपल्याला मुंबई वरून येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करायचे आहे."

आशू एकीकडे मॉम आणि दुसरीकडे रॉनी यांच्यामुळे वैतागली होती. तिने उन्मेषकडे दुर्लक्ष केले.

"आजी,मी पुर्वाकडे जाते." एवढे बोलून ती निघून गेली.


सुवर्णा कोण असेल? पुर्वाला कृष्णाने काय विचारले असेल? येणारा पाहुणा कोण आहे?


वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all