Login

संसारात नणदेची भूमिका काय? भाग १

, एक कथा
संसारात नणदेची भूमिका काय? भाग १ –
सकाळी सूर्याची किरणं घरातील भिंतीवर पडली आणि साक्षीला हळूहळू जाग आली. ती उठली. सासरी आजचा तिचा पहिला दिवस.मनात विचारांचं वादळ होतं – हे नवं घर, नवी माणसं, आणि पूर्णतः नवं आयुष्य. आईच्या कुशीतून नुकतीच बाहेर पडलेली ती मुलगी आज एक सून म्हणून उभी होती.
स्वयंपाकघरातून पातेल्यांची किणकिण ऐकू आली. सासूबाई आधीच उठून कामाला लागल्या होत्या. साक्षीने पदर नीट केला, आणि धडधडत्या हृदयाने स्वयंपाकघरात पावलं टाकली.
“गुड मॉर्निंग आई…” ती म्हणाली.
सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं, “ गुड मॉर्नि बर हे बघ पातेल्यात दूध गरम करत ठेवलय.चहा कर सगळ्यांसाठी., साखर मोजून टाक.”
साक्षीने ते काम हाती घेतलं. पण तिच्या कडून साखर जरा जास्तच पडली पण तिच्या लक्षात आलं नाही. कपात चहा ओतल्यावर सासूबाईंनी घेतला एक घोट… आणि कप टेबलवर ठेवत म्हणाल्या, “ही काय गोडी? इतकी साखर कोण टाकतं चहात?चहा म्हणजे बासुंदी झाली आहे.”
साक्षी घाबरली . ती म्हणाली, “सॉरी आई… सवय नाहीये अजून इतक्या जणांसाठी चहा करायची. म्हणुन साखरेचं माप चुकलं असैल.”
“माहेरी चालतं ग सगळं पण सासरी शिस्तीत काम करावं लागतं,” सासूबाई ताशेरे देत म्हणाल्या.
तेवढ्यात मागून एक प्रसन्न हास्य ऐकू आलं – “आई, पहिल्याच दिवशी इतके ताशेरे नकोत ना. तिच्या चेहऱ्यावरूनच कळतंय की तिने मुद्दाम केलं नाहीये.”
ही होती – नंदिनी. घरातील मोठी मुलगी. साक्षीने पहिल्यांदाच नीट तिच्याकडे पाहिलं – साधं वागणं, पण डोळ्यांत मृदुतेची चमक.
“माफ करा,” साक्षी कुजबुजली.
नंदिनी पुढे आली, चहा उचलून घेतला. “मीच घेते हा गोडसर चहा. तुझ्या हातची चव घेऊन बघते.” चहाचा घोट घेत ती म्हणाली, “वा! साखरेसारखी गोड आहेस ग तू! मला खूप आवडला चहा”
साक्षी ओशाळून हसली. सासूबाई काहीशा शांत झाल्या, पण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर थोडा कडकपणा होताच.
नंतरच्या क्षणी, नंदिनी तिला घेऊन अंगणात आली. दोघी झाडाखाली बसल्या.
“सॉरी, मी थोडी गोंधळले,” साक्षी म्हणाली.
“अगं, इतकं मनावर घेऊ नकोस. नवीन घरात जुळवून घ्यायला वेळ लागतोच. आणि मी आहे ना? तुझी सखी म्हणून.”
“खरंच?” साक्षीच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे भाव उमटले.
“हो गं. नणंद म्हणजे फक्त नवऱ्याची बहीण नाही. तसच ती फक्त त्रास देणारी असते असं नाही. ती एक मैत्रीण असू शकते,एक मदतीचा हात तिच्या कडूनही असू शकतो.. आणि तुझ्यासारख्या गोड मुलीला का नाही समजून घेणार?”
त्या दिवशी साक्षीच्या मनात एक छान विचार रूजला. या घरात मला खरी ओळख देणारी जर कोणी असेल, तर ती नंदिनीच… माझी नणंद. आतापर्यंत नणदेबद्दल ब-याच गोष्टी ऐकल्या होत्या. पण नंदिनी वेगळीच आहे हे साक्षीला पटलं.
पुढे काय होईल. नंतरही नंदिनी अशीच मदत करेल का की बदलेल

🎭 Series Post

View all