ती काळरात्र..

श्रद्धा असेल तर देव सापडतो..

सौ.प्राजक्ता पाटील 

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा 

विषय: काळ आला होता पण..

उपविषय: ती काळरात्र 

टीम सोलापूर..




आज सगळ्यांच्याच मनात थोडीशी धाकधूक होती. पण कीर्तीला नक्कीच चांगलं मेडिकल कॉलेज मिळेल याचीही निश्चित खात्री होती. सकाळपासून कीर्तीचा दादा किशोर लॅपटॉपवर काहीतरी करत बसला होता. कदाचित तो कीर्तीला कोणते मेडिकल कॉलेज मिळतेय? हेच ऑनलाईन पाहत असावा. पण आई-बाबांना सांगितलं तर ते काळजी करत बसतील म्हणून तो काहीच बोलला नाही. कीर्तीला मात्र माहीत होते की, आज आपल्याला कुठले कॉलेज मिळणार ते ऑनलाइन समजणार आहे. सीईटीमध्ये कीर्तीने चांगले मार्क्स मिळवले होते. 


अखेर दादाने आणून ठेवलेला पेढ्याचा बॉक्स बाबांच्या समोर धरला आणि म्हणाला, " घ्या बाबा, तोंड गोड करा. आपल्या कीर्तीला मुंबईचं जे. जे. हॉस्पिटल मेडिकलसाठी मिळाले आहे." 


सगळ्यांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले होते. आई-बाबांच्या कष्टाचे चीज झाले होते. "आता पुढे काय करायचे ? मुंबईला कधी जायचे ? ट्रेनने प्रवास करणे वगैरे मला काही जमणार नाही." बाबा म्हणाले. 


"तुम्ही नका ना काळजी करू बाबा. मी आहे ना. मी जाईन कीर्तीसोबत ऍडमिशन घ्यायला आणि शिवाय मावशी आहे की. आम्ही मावशीकडे एक दोन-दिवस राहू. एकदा का कीर्तीचे होस्टेलमध्ये ऍडमिशन झाले की, मी लगेच परत येतो." किशोर वडिलांना म्हणाला. 


आई-बाबांनी होकारार्थी मान हलवली. सर्वांनी पेढे खाऊन तोंड गोड केले. 'मध्यमवर्गीय कुटुंबातून आज आपली मुलगी डॉक्टर म्हणून झळकणार.' या विचाराने आईबाबा खूप आनंदी होते. 


"किशोर मावशीला म्हण, तिथे मुंबईमध्ये मुंबादेवी आहे ना रे आधी त्या देवीचे दर्शन घे. मी नवस बोलले होते." आई म्हणाली.


"काय हे आई ? नवस बोलून कुठे देवी प्रसन्न होत असते का? अगं कीर्तीने किती मेहनत घेतली आहे तुला माहितीये ना?" किशोर म्हणाला.


"असू दे रे. आईच्या समाधासाठी जा बरं तुम्ही दोघे. आधी मुंबादेवीचे दर्शन करा. हवं तर मावशीलाही सोबत घेऊन जा." बाबा म्हणाले. 


"ठीक आहे बाबा. जाईन मी." किशोर म्हणाला.


दुसऱ्या दिवशी कीर्ती आणि किशोर मुंबईमध्ये पोहोचले. कीर्तीला आईची देवीवरची श्रद्धा माहित होती. कीर्ती दादाला म्हणाली, "दादा आई काय म्हणाली तुझ्या लक्षात आहे ना ? आधी मुंबादेवीचे दर्शन घ्यायचेय आपल्याला." "अगं .." किशोर पुढे बोलणार तोच कीर्ती म्हणाली, "आता पुढे काहीच बोलू नकोस." कीर्ती रागाने म्हणाली. 


"ठीक आहे. तुझी इच्छा आहे ना तर जाऊया आपण मुंबादेवीला मावशीला घेऊन." किशोर म्हणाला.


किशोर आणि कीर्ती मुंबादेवीचे दर्शन करून आले. किशोरने ही मनोभावे देवीला हात जोडून आपल्या बहिणीच रक्षण करण्याची विनंती केली. कीर्तीनेही आपल्या भावाच्या रक्षणासाठी कुटुंबाच्या सुखासाठी देवीकडे प्रार्थना केली. सर्वजण परत आले. 


दुसऱ्या दिवशी कीर्तीला कॉलेजमध्ये जायचे होते. किशोर आणि कीर्ती दोघेच ऍडमिशन घ्यायला कॉलेजमध्ये पोहोचले. तिथेच होस्टेलचेही सोय होती. होस्टेलचेही तिचे ऍडमिशन झाले. हे सर्व प्रोसेस पूर्ण होईपर्यंत संध्याकाळ झाली. किशोर आता मावशीकडे जायला निघाला होता. "दादा सावकाश जा हं." कीर्ती म्हणाली.


"हो ग मी आलेलो आहे खूप वेळा मुंबईला. तू माझी काळजी नको करूस. तू फक्त व्यवस्थित अभ्यासावर लक्ष दे. लक्षात ठेव आई-बाबांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत." किशोर म्हणाला.


"हो दादा, नक्की. मी खूप अभ्यास करीन. 


"ओके बाय!" म्हणून दोघा बहिण भावांनी एकमेकांचा निरोप घेतला.


दिवसभर रिमझिम बरसणारा पाऊस धो- धो बरसायला लागला होता. ढगफुटी झाली की काय ? काहीच कळत नव्हते. रात्र झालेली. कॅबमध्ये बसलेला किशोर ड्रायव्हरला म्हणाला, "हे काय मुंबईमध्ये अरबी समुद्राचं पाणी शिरलं की काय?" अर्ध्या रस्त्यात आल्यावर ड्रायव्हर म्हणाला, "बघा ना साहेब, आता आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणजे आपल्याला रात्र अशीच काढावी लागणार. आपण एक आयडिया करूया आपण गाडीच्या टफावरती जाऊन बसुया म्हणजे हानी टळेल." 


"हो." म्हणून किशोर आणि ड्रायव्हर टफावरती जाऊन बसले. हेलिकॉप्टर मधून खाली खाऊची पाकिटे टाकण्यात येत होती. आजवर टीव्हीवर पाहिलेलं दृश्य किशोर स्वतः अनुभवत होता. आपण जिवंत राहू की नाही ? हाच प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. त्याला सतत मुंबादेवी दिसत होती.  


तिकडे आई-बाबाही फार चिंतेत होते. टीव्हीवर पाहिलेली बातमी त्यांना बेचैन करत होती. त्यातून किशोर आणि ड्रायव्हरचाही फोन स्विच ऑफ झालेला असल्यामुळे आई-बाबांना संपर्कही साधता येत नव्हता. आई देवीचा धावा करत होती कारण मुंबादेवीच्या नवसानेच तिला किशोर झाला होता. 


रात्रभर जीव मुठीत धरून बसलेले सगळेजण सकाळ झाली तसे आशेच्या सूर्योदयाकडे पाहू लागले.तिथे बोटीतून काही तरूण पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आले होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर किशोरही बोटीत बसून बाहेर आला. तो मावशीच्या घरी सुखरूप पोहोचला. मावशीच्याही जीवात जीव आला. फोन चार्जिंगला लावून त्यांनी आई-बाबांना तो सुखरूप असल्याचे सांगितले. कीर्तीचेही खूप मिस कॉल पडले होते तिलाही त्याने धीर दिला. संपूर्ण मुंबई परिसरात बाहेर फिरणे धोक्याचे झाले होते. चार दिवसांनी हळूहळू पाण्याची योग्य विल्हेवाट लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. त्यामुळे किशोर चार दिवसानंतर गावी परतला. आईबाबांनी लेकाला प्रेमाने मिठी मारली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. लाडक्या लेकाची दृष्ट काढत आई म्हणाली, " काळ आला होता पण मुंबादेवीने दूर केला."


"खरंय आई आज देवीआईमुळे तसेच त्या मदतीला धावून आलेल्या तरुणांमुळे मी सुखरूप आहे."


सगळ्यांनी देवीचे मनापासून आभार मानले.


सौ.प्राजक्ता पाटील