दमानिया मेंशन भाग 1

राजेश नावाच्या दुष्ट शक्तींना नष्ट करणाऱ्या एका योध्यावर खुनी हल्ला झाला



दमानिया मेंशन भाग 1

ऑपरेशन थिटरमध्ये डॉक्टर सी.पी.आर. देण्यासाठी ओरडत होते,"घाई करा,अजून हृदय चालू आहे.वन, टू,थ्री अँड पुश."

नर्स त्याप्रमाणे मशीनने छातीवर प्रेस करत होती. तीन वेळा प्रेस करूनही रिस्पॉन्स येईना.

थोडे थांबून डॉक्टर म्हणाले,"शेवटचा प्रयत्न करूयात."

शेवटचा प्रेस झाला आणि श्वास चालू झाला. बाहेर पोलीस हजर होतेच.

डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले,"इन्स्पेक्टर,सुदैवाने तो वाचला आहे. घरच्यांचा काही तपास लागला का?"

त्यावर इन्स्पेक्टर म्हणाले,"हो,त्याचे आई वडील येतील थोड्याच वेळात. रुग्णाचे नाव आहे राजेश प्रधान."

ते ऐकताच नर्स ओरडली,"काय? राजेश प्रधान? म्हणजे ते भुते पकडणारे राजेश प्रधान का?"

डॉक्टर रागावले,"सिस्टर, भूत वगैरे काही असत नाही. तुम्ही दवाखान्यात काम करता विसरू नका."

डॉक्टर निघून गेले. इन्स्पेक्टर मात्र थांबून होते. राजेशच्या आई वडिलांची वाट पहात.


जवळपास पहाटेचे तीन वाजत आले होते. राजेशच्या आई वडिलांनी धावतच आय. सी. यू. युनिट गाठले.

इन्स्पेक्टरला पाहून राजेशच्या वडिलांनी विचारले,"कुठे सापडला राजेश? तुम्हाला कोणी कळवले? आता तो बरा आहे ना? त्याला काही लागले नाही ना?"

तसे इन्स्पेक्टर म्हणाले,"तीच तर आश्चर्याची गोष्ट आहे. तीनशे फूट दरीत गाडी कोसळली तरीही राजेशच्या अंगावर ओरखडा नाही की अंतर्गत जखम नाही. पण गाडीत त्याच्याबरोबर कोणीही नव्हते."

राजेशची आई म्हणाली,"असे कसे होईल? एकतीस डिसेंबअखेर पार्टी आहे म्हणून सगळे मित्र मिळून फार्म हाऊसवर गेले होते."


इन्स्पेक्टर म्हणाले,"तुमच्याकडे त्या मित्रांपैकी कोणाचा नंबर आहे का?"

राजेशच्या वडिलांनी लगेच नंबर दिला. त्यानंतर पोलीस निघून गेले. इकडे राजेश शुद्धीवर येत होता. तेव्हा त्याला फक्त गाडी दरीत पडताना आठवत होते. आपले मित्र ठीक असतील ना? आपल्याला दमनियाच्या बंगल्यावर दुसऱ्या दिवशी जायचे होते. गाडी अशी अचानक कशी दरीत पडली? दरीत गाडी पडूनही आपल्याला काहीच कसे झाले नाही?"


तेवढ्यात त्याला आठवले,"रक्षा कवच बरोबर असल्याने राजेश वाचला होता."


हा विचार मनात येताच राजेश दचकला. याचा अर्थ त्याला संपवायचा प्रयत्न झाला होता.

त्याला ऐंशी पार मिसेस दमानियानी आपल्या भेटीला बोलावले होते.

मिसेस हंसा दमानिया. करोडो रुपयांची मालकीण असलेली एकटी जगणारी म्हातारी. तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. अशा बाईने बोलावले होते. अनेकजण म्हणत की तिला वेड लागले आहे. तरीही तिच्या समाधानासाठी राजेश तयार झालेला. फक्त एकतीस तारखेला मित्रांसोबत पार्टी करून एक तारखेला ते भेटणार होते.


दुसऱ्या दिवसापर्यंत राजेश एकदम ठीक झाला. डॉक्टरांनी घरी जायला परवानगी दिली. त्याने आई बाबांना समजावले आणि तडक गाडी मिसेस हंसाच्या बंगल्याकडे वळवली. शहरापासून दूर असलेल्या ह्या बंगल्यात म्हातारी आणि तिचे दोन नोकर एवढेच राहत होते.


सर्व सुखसोयींनी युक्त बंगला बघत राजेश आत आला. त्याला बसायला सांगून नोकर आत निघून गेला. थोड्याच वेळात समोरून एक विलक्षण देखणी वृध्द स्त्री चालत आली. आजही तिच्या व्यक्तिम्त्वातील आकर्षण टिकून होते.


राजेशला पाहून ती म्हणाली,"तुम्हीच राजेश प्रधान ना? "


दमानिया आडनावाची बाई एवढे छान मराठी बोलते. राजेशने हा मुद्दा मनात नोंदवला.

त्यानंतर ती म्हणाली,"माझी मातृभाषा मराठी आहे. माझे एक काम होते तुमच्याकडे."


राजेश आजूबाजूला पहात म्हणाला,"बोला,काय काम आहे."


मिसेस दमानिया थांबून म्हणाली,"मला एका तरुण मुलीचा आत्मा त्रास देतोय. तुम्ही तिचा बंदोबस्त करावा असे मला वाटते."


ती बोलत असताना राजेशचे लक्ष तिच्या शरीरावर होते. तिचे लक्ष जाताच तो दुसरीकडे पाहू लागला.


हंसा पुढे बोलू लागली,"रात्री बंगल्यात आवाज ऐकू येतात. कोणीतरी फिरल्याचे भास होतात. तर तुम्ही शक्ती पंथातील सिद्धी प्राप्त आहात. हे थांबले तर बरे होईल."

कोण असेल ती तरुणी? तिचा आत्मा हंसाला का त्रास देत असेल?

©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all