दैव जाणिले कुणी

Bhavishyat kay ghadanar aahe he kunihi sangu shakat nahi ... Vidhilikhit Talat nahi hehi titkech khare ..

  "गौरी , बेटा गौरी.."  वसंतरावांनी  दोन वेळा आवाज देऊनही गौरीची साचुल ही त्यांना लागेना ..  'हरवली असेल पुन्हा विचारात'  ते पुटपुटले.. आज काल गौरी गप्प गप्प असते, विचारांच्या तंद्रीत हरवलेली असते हे वसंतरावांच्या  लक्षात आल्यावाचून राहीलं नाही .. आणि ते स्वाभाविक आहे हे त्यांनी मनोमन मान्य केलं होतं .. अंगातून सदरा काढून त्यांनी  खुंटीला टांगला आणि ते लाकडी आराम खुर्चीत विसावले .. डोळे मिटून शांत पडून चिंतन करणे हे त्यांचं नित्याचच झालं होतं .. डोळे मिटल्यावर त्यांना दिसायची त्यांची पत्नी ..  कावेरी .. वयात येणारी पोरीची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकून जाणारी.. 'का गेलीस तू कावेरी ? सात जन्म सोबत करण्याच्या आणाभाका घेऊन आणि अर्ध्या संसारातून असं निघून जाणं तुला शोभलं नाही.. त्याचा जाब मी तुला विचारणारच आहे वर आल्यावर ..'   हेही त्यांचे मनातले ठरलेले शब्द ..   उंच , नाकी डोळी  नीटस , रेखीव ,  सडपातळ , गौर वर्णाची  गौरी ..  बाबा आल्याचं आपल्याला कळलं कसं नाही हा अपराधी भाव घेऊन दरवाजात उभी होती.. बाबांच्या उन्हाने.. त्याहीपेक्षा अधिक आपल्या काळजीने रापलेला चेहरा बघत होती .. बाबांना आईची आठवण येत असणार हे तिने अचूक हेरलं होतं ..  दारातल्या  झिजलेल्या चपला बघून तिची नजर त्यांच्या पायाकडे वळली ..  ती  तेलाची वाटी घेऊन त्यांच्या पायाशी बसली अन्  पावलांवरून हळूवार फिरणाऱ्या बोटांच्या  स्पर्शाने वसंतराव  दचकून तंद्रीतून बाहेर आले ..  "अग बाळा , केव्हा आलीस तू ? आणि  काय करतेस ?"  गौरी न बोलता तेल लावत होती .. "गौरी , कुठे होतीस तू ?"  वसंतरावांनी विचारलं .. "इथेच होते बाबा .. का? तुम्ही आवाज दिला होता का मला ?" क्षणभर अपराधी भाव तिच्या  स्वरात उमटले .. वसंतरावांनी ते ओळखले ..  "नाही ग ..  मी सहजच विचारलं .." त्यांनी सावरून घेतलं ..  "बाबा एक सांगू ?" गौरीच्या प्रश्नाने वसंतरावांच्या काळजाचा ठोका चुकला .. तरीही ते , "हो .. सांग ना" म्हणाले .. "बाबा , मला नाही करायचं लग्न .. किती त्रास होतो तुम्हाला माझ्यामुळे .. आणि समोरच उत्तर तर ठरलेलंच असतं .. मग कशासाठी हे सर्व .. ?"  गौरी एका दमात सगळं बोलली .. वसंतरावांकडे बघण्याची तिची हिंमत होईना .. पण वसंतराव मोठ्याने हसले .. तिने चमकून त्यांच्याकडे पाहिले .. "बाबा .. काय झालं ?"  तिने आश्चर्याने विचारले .. "अगं किती विचार करतेस ..  कन्यादान हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं .. त्रास नसतो तो .."  वसंतराव तिला समजवत होते .."  पण बाबा .. पत्रिकेतला दोष.."   " गौरी अगं मला येऊन एवढा वेळ झाला आणि तू चहा ही नाही दिलास अजून"  गौरीच्या बोलण्याला मध्येच थांबवत वसंतरावांनी विषय बदलला .. गौरीच्या ते लक्षात आलं नाही असं नाही पण तीही पुढे काही न बोलता स्वयंपाक घरात निघून गेली .. 'कसं समजवाव आता पोरीला .. तिच्या मनातून पत्रिकेची भीती , विचार कसे घालवावे कळतच नाहीये .. कुणा एका स्थळाने पत्रिकेत दोष आहे सांगून ऐन साखरपुडा च्या दिवशी लग्न मोडलं ..  दोष काय तर , मृत्यू षडाष्टक  योग .. म्हणजे दोघांचं लग्न झालं तर सहा महिन्यात जोडीदाराचा मृत्यू होईल .. तेव्हापासून पोरीने धास्तीच घेतली आहे ..'  वसंतरावांनी स्वतःशीच सगळ्या गोष्टींची उजळणी केली .. आणि हताशपणे एक दीर्घ श्वास घेतला .. "बरं झालं तुम्ही घरीच भेटलात वसंतराव .."  मागे वळून त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं .. "अरे या ना पंत .. आज खूप दिवसांनी आणि असं अचानक ..?"  वसंतरावांनी स्वागत केलं ..  पंत म्हणजे वसंतरावांचे निकटचे स्नेही .. नातेवाईक , मित्र , हितचिंतक वसंतरावांसाठी सगळेच होते पंत .. 
  "गौरी , पाणी आण आणि चहा ठेव .. पंत आलेय .." वसंतरावांनी गौरीला आवाज देऊन सांगितलं .. "हो बाबा .."  गौरी.  "बोला पंत , काय विशेष आज आमच्यासाठी ..?"  वसंतरावांनी थेट विषयाला सुरुवात केली आणि पंतही बोलते झाले , "हे घ्या मुलाची माहिती .. मुलगा एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला आहे .. चार आकडी पगार आहे .. आणि  मुलगा सुस्वभावी  आहे .. गौरीचा फोटो पाहूनच त्याचा खुललेला चेहरा ह्या नजरेतून सुटला नाही वसंतराव .."  पंतांनी निर्णयच दिला जवळजवळ .. "पण पंत पत्रिका .." वसंतराव चाचरत म्हणाले ..  "ते काही मला माहित नाही बुवा .. येत्या गुरुवारी मी त्यांना आमंत्रण करून आलोय तुमच्या वतीने .."  पंतांनी  वसंतरावांचे सगळे विचार , सगळ्या शंका मोडून काढल्या .. तेवढ्यात गौरी चहा घेऊन आली .. गौरीने पंतांना वाकून  नमस्कार केला .. तसा त्यांनी भरभरून आशीर्वाद ही दिला .. नेहमीप्रमाणे .. चहा पिता पिता ते म्हणाले , "वा ! चहा एकदम फक्कड .." गौरी हसली .. "गुरुवारच्या तयारीला लागा आता बरं का गौरी बेटा .. येतो मी वसंतराव .."  असं म्हणून पंत निघून गेले .. "मामा काय म्हणत होते?  कसली तयारी बाबा ..?" गौरीने विचारलं .. वसंतरावांनी मुलाच्या माहितीचा कागद तिच्या हातात दिला आणि ते त्यांच्या खोलीत निघून गेले .. गौरीने माहिती वाचली आणि विषण्ण हसत मनाशीच म्हणाली , 'चला अजून एक डाव मांडायचा .. पण हरण्याच्या तयारीने ..' 
     गुरुवारी सकाळ पासून बाप लेकीची लगबग सुरू झाली .. बापाच्या मनात चलबिचल आणि एक आशा .. तर लेक मात्र निर्विकार ..  सगळं आवरून झाल्यावर गौरीने छानशी चिंतामणी रंगाची साडी नेसली , तिच्या गोऱ्या कांतीवर तो रंग अगदीच खुलला होता.. नाजूक कानातले आणि त्यावर साजेसा खड्यांचा हार गळ्यात घातला .. जातीचीच सुंदर गौरी अजूनच मनमोहक दिसत होती .. 
      बरोबर ३ वाजता पंत पाहुण्यांना घेऊन आले ..वसंतरावांनी स्वागत केलं .. मुलगा , महेश नाव त्याचं .. आणि  मुलाचे आई वडील ... पंतांनी सांगितल्या प्रमाणे महेश व्यवस्थित होता .. व्यक्तिमत्व ही आकर्षक .. आणि बोलताना मोकळा .. आई वडील साधेच वाटले .. गौरीने पोहे आणले .. गौरी ला बघताच महेशच भान हरपलं .. तो तिच्याकडे बघतच राहिला .. "मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा .."  पंतांच्या बोलल्याने महेश विचारातून बाहेर आला .. "अं ? .. नाही काहीच नाही .."  तो हसून म्हणाला .. आई वडिलांनी काही जुजबी विचारणा केली .. गौरी, गौरीचे आई वडील आणि एकंदरीतच परिस्थितीची माहिती पंतांनी मुलाकडच्याना दिलेली होतीच.. गौरी  मनातला कल्लोळ मत्प्रयासाने शांत करून ओठावर हसू कायम ठेवत होती .. बाबांसाठी ..!! वसंतरावांनी महेश आणि गौरी दोघांकडे पाहिलं अन् त्यांच्या मनात आलं , 'नावही एकमेकांना साजेस आहे आणि जोडा ही ..'  हे लग्न जमण्याच्या त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या .. शेवटी बापाच मन ते .. !! ..  "मुला मुलीला एकमेकांशी काही बोलायचं असेल तर हरकत नसावी .. काय कुलकर्णी ?"  पंतांनी मुलाच्या वडिलांना विचारलं .. पण त्या आधीच  "नाही .. त्याची काही गरज नाही .."  महेश म्हणाला ..  पोहे नाष्टा झाल्यानंतर गौरीने चहा आणला.. चहाच्या कपबशी सोबत इतर कुणाला कळणार नाही अशा पद्धतीने एक कागदाची घडी तिने महेशच्या हाती दिली .. त्याला क्षणभर काही कळलं नाही .. पण कळताच ती घडी जशीच्या तशी त्याने खिशात टाकली ..  
   पंतांकरवी निर्णय कळवतो असे सांगून  पाहुणे गेले आणि गौरी ला हूरहूर लागली .. रात्री उशिरा सगळं बळ एकवटून लिहिलेलं पत्र .. त्यातला शब्द न शब्द ती आठवू लागली .. त्यात लिहिलं होतं , 
            ' पंतांनी सांगितलेलं तुमचं स्वभाव वर्णन ऐकून मी हे लिहिण्याच धाडस करतेय .. योग्य आहे की नाही मला माहित नाही पण तुम्हाला अंधारात ठेवणं मला चुकीचं वाटतंय .. तुम्ही कुठलाही निर्णय घेण्याआधी काही गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगणे अत्यावश्यक आहे .. माझी पत्रिका .. तुमचा पत्रिकेवर विश्वास आहे की नाही हेही मला ठाऊक नाही .. मी मात्र साशंक आहे .. माझ्या पत्रिकेत मृत्यू षडाष्टक योग आहे .. म्हणजे लग्नाच्या ६ महिन्यांनी जोडीदाराचा मृत्यु संभवतो .. ह्या गोष्टीचा तुम्ही आणि तुमच्या घरच्यांकडून विचार व्हावा .. तो भावनिक नसून सारासार असावा ही विनंती .. माझं काही चुकलं असल्यास क्षमस्व .. ज्येष्ठांना नमस्कार ..'
                                        गौरी
"गौरी बेटा .. गौरी .."  वसंतरावांच्या हाकेने गौरी दचकली .. विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली .. पण तिला खूप घाम आला होता .. "अं .. ओ बाबा .." "काय ग .. एवढी का घाबरलीस ?"  वसंतरावांनी काळजीने विचारलं .. "काही नाही बाबा .. मी ठीक आहे .."  गौरी सावरली .. "अगं , कसं वाटलं तुला सगळ्यांना भेटून ? माणसं कशी वाटली ? मला तर मोकळी आणि समजदार वाटली सगळी .. पण तुझं मत जास्त महत्वाचं आहे बाळा माझ्यासाठी .."  वसंतरावांनी स्वतःच मत तिच्यावर न लादता तिचं मत आणि मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला .. "चांगली वाटली माणसं मलाही .. पण निर्णय त्यांचा असेल ना .."  गौरी च्या मनातले विचार पुन्हा डोकं वर काढू पहात होते ..  "एक सांगू गौरी ?"  वसंतराव .  "बोला ना बाबा .. असं विचारताय का ?"  ते काय बोलणार याचा अंदाज गौरीला होता .. "आपल्या पूर्वानुभवाचं सावट यावर पडू नये असं वाटत मला .. आपण सकारात्मक विचाराने पुढे चालावं हे योग्य नव्हे का ?"  वसंतराव तिची समजूत काढत होते .. "बरोबर आहे बाबा तुमचं .. मी प्रयत्न करेल .."  उसनं हसू आणून गौरी म्हणाली .. "निःशंक हो बेटा .. मनातला अंधार जाऊन निश्चितच पुढे स्वच्छ प्रकाश दिसेल बघ.." वसंतरावांनी पुन्हा प्रयत्न केला .. "बाबा मी तुमच्यापासून कधीच काही लपवत नाही .. आजही लपवणार नाही .. तुम्हाला आवडणार नाही कदाचित पण मी हे पाऊल उचललं आहे .. मला माफ करा .."  गौरी निर्धाराने बोलली .. "म्हणजे ? मी नाही समजलो"  वसंतराव मनातून जरा घाबरले .. "बाबा मी त्यांना म्हणजे महेश यांना एक पत्र दिलंय .. पत्रिका दोष स्पष्ट करणार .."  गौरीने सांगून टाकलं .. "काय सांगतेस पोरी ?  अगं पण .. तू .."  वसंतराव मटकन खाली बसले .. गौरी त्यांच्या जवळ गेली .. "बाबा , माझं चुकलं असेल कदाचित पण  कुणाला अंधारात ठेऊन मी पुढची वाटचाल कशी करू शकेल .. त्यांनी कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांना सगळं कळणं मला आवश्यक वाटलं .. नवीन नात्याची सुरुवात होणारच असेल तर मनात कुठलेही किंतू परंतु नसावे असे तुम्हीच मला सांगत आला आहात ना? .. बोला ना बाबा?"  गौरी आर्जवाच्या स्वरात म्हणाली .. "काय बोलू बाळा .. मला आज कळतंय की तू मोठी झालीस .. समजदार झालीस ..  तुझ्या रुपात आज तुझी आईच माझ्या पुढ्यात उभी आहे असा भास झाला .."  वसंतराव डोळे पुसत म्हणाले .. "बाबा .."  गौरी ने त्यांचे हात हातात घेतले .. "नाही बेटा .. हे अश्रु समाधानाचे आहेत .. भरून पावल्याचे आहेत .."  म्हणत ते त्यांच्या खोलीत निघून गेले .. 
    दुसऱ्या दिवशी सकाळीच , "आहे का कुणी घरात .. येऊ का?"  अनोळखी तर काहीसा ओळखीचा असा आवाज आला .. गौरी लगबगीने आली आणि दारातच थबकली .. "तुम्ही .. ??!!" समोर महेश ला बघून आश्चर्य आणि अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली .. "हो मीच .. काका आहेत का?"  त्याने आदबीने विचारलं .. "नाही .. ते ..  बाबा .. पूजा .."  गौरी अजूनही त्याच स्थितीत .. "तुमची स्थिती मी समजू शकतो .. मला असं अचानक समोर पाहून तुम्ही घाबरलात कदाचित .."  महेश गौरीची मनस्थिती जाणून म्हणाला .. गौरी काही बोलली नाही ..  "खर तर मला तुमच्याशीच बोलायचं आहे ..पण तुमच्या बाबांसमोर .."  महेश.  "बाबा पूजा करताय .. ते उठू शकणार नाहीत .."  गौरी थोडी शांत झाली .. "ठीक आहे .. काल तुम्हाला मी पसंत केलं होतं .. आवडला होतात तुम्ही मला .. पण .."  महेश थांबला .. कदाचित गौरीच्या चेहऱ्यावरून तिच्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न तो करत होता .. "मला तुमचा निर्णय मान्य आहे .."  ती ठामपणे म्हणाली .. "नक्की ??" महेश ने पुन्हा तिला न्याहाळलं .. गौरी ने होकारार्थी मान हलवली .. "मग मला तुमच्याशी लग्न करायचे आहे .."  महेशचे शब्द कानावर पडताच गौरीने चमकून वर बघितलं .. "काय बोलताय तुम्ही ? पण मी .."  "हो तुमच्या पत्रिकेत दोष असला तरीही .."  तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच महेशही तितक्याच ठामपणे म्हणाला .. "काल तुम्ही मला पसंत होतात पण तुमचं पत्र वाचल्यानंतर माझा निर्णय पक्का झाला .. तुमच्यासारख्या विचारी , निर्मळ मनाच्या, भावनिक तितकीच धाडसी , आणि वेळ पडल्यास व्यवहारी विचार करणारी सुंदर मुली सोबत ६ महिन्यांचा सुखी संसार करायला मी तयार आहे .."  महेश हसत म्हणाला .. "नाही .. असं म्हणू नका .. "गौरीला त्यांचं बोलणं आवडलं नाही .. "गौरी माझा पत्रिकेवर विश्वास आहे की नाही हे खरं तर मलाही माहीत नाही .. पण माझं आयुष्य सहाच महिन्यांचं असेल तर ते मी आवडत्या व्यक्ती सोबत जगणं योग्य नाही वाटतं का तुम्हाला ?"  महेश तिला तयार करत होता .. गौरी गप्प .. "तुमचं मत आणि मन दोन्हीही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे .."  महेश आंतरिक बोलत होता .. "बसा तुम्ही मी पाणी आणि चहा आणते.."  असं म्हणून गौरी जायला निघाली .. "मला  केवळ तुमचा निर्णय हवाय .."  महेशच्या बोलण्याने गौरी जागीच थांबली ..क्षणभर तिने त्याच्याकडे बघितलं .. त्याच्या नजरेत तिला खरेपणा व ओढ दिसली .. आणि प्रेम ही .. "आलेच मी .."  असं म्हणून ती भरकन मध्ये गेली .. काही वेळाने वसंतराव बाहेर आले .. तेही हसत .. "तुम्ही अजून उभेच..? बसा महेशराव"  विचारमग्न महेश भानावर आला .. "अ .. हो .. ते मी असं सहजच इकडून .."  महेशला काय बोलावं कळेना .. "माफ करा .. पण मी तुमचं दोघांचं बोलणं ऐकत होतो .."  वसंतराव  म्हणाले .. "मी समोर येतच होतो बर का .. पण तुम्ही गौरीशी जे बोलत होतात ते खूप गरजेचं होत .. ते ह्या बापाला जमत नव्हतं एवढे दिवस .. म्हणून थांबून घेतलं .. माफ करा"  त्यांनी मनातलं बोलून टाकलं .. "तुम्ही मोठे आहात .. माफी नका मागू .. खर तर काका मी पण प्रयत्नच करत होतो .. कदाचित तो अयशस्वी .."  महेशचा स्वर निराश होता .. "नाही नाही महेशराव .. तुमचा प्रयत्न १००% यशस्वी झाला आहे .. गौरीने लग्नाला होकार दिलाय .."  काय सांगता बाबा..!!"  महेश उठून उभा राहत म्हणाला .. "हो बरोबर ऐकताय तुम्ही .." वसंतरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता आणि आता महेश देखील भारावून गेला .. तेवढ्यात गौरी पाणी आणि चहा घेऊन आली .. चहा देताना दोघांची नजरानजर झाली .. गौरीने गालात हसून आणि लाजून नजर खाली वळवली .. 
     गौरी आणि महेशचा लग्न सोहळा यथासांग पार पडला ..  त्यानंतरचे सत्यनारायण पूजा , मांडव परतणी सारच छान पार पडलं .. गौरीच जे रूप बघण्यासाठी  वसंतरावांचे डोळे आसुसले होते ते पाहून त्यांचे मन तृप्त झाले होते .. आणि बाबांना आनंदात बघून गौरी ही सुखावली होती .. वरवर दाखवत नसली तरी मनात कुठेतरी बोच आणि भीती मात्र होतीच .. महेश सारखा खूप प्रेम करणारा नवरा आणि सासू सासरे सगळेच माणसं चांगली होती .. त्यांच्या सहवासात गौरीचा संसार फुलत होता .. आणि भूतकाळा वर एक अदृश्य पडता पडला .. 
     "आज आपल्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले गौरी .."  महेश अत्यानंदाने म्हणाला .. "अय्या हो .. खरच की .."  गौरीचेही डोळे चमकले ..  "कळलं तरी का हे दिवस कसे गेले ते" म्हणत महेशने गौरीला खांद्याला हलकासा धक्का देऊन डोळा मारला .. "इश्य .. चला काहीतरीच तुमचं .." गौरी लाजली ..  "हे काय निघाले तुम्ही?" महेशची तयारी बघून गौरी ने विचारलं .. "हो आज जरा लवकर जायचयं .. घाई आहे .."  गौरीने दिलेला रुमाल घेत  महेश म्हणाला ..  "आणि हो ऐका .."  "हो राणी सरकार .. गाडी हळू चालवणार , दुपारी वेळेवर जेवण करणार आणि संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करणार .. आता खुश ?" महेश हसत म्हणाला .. गौरीने लटक्या रागाने त्याच्याकडे बघितलं .. महेशला दारापर्यंत सोडून गौरी घरातल्या कामाला लागली .. 
   काम आवरून झाल्यावर  दुपारी तिचा जरा डोळा लागला की इतक्यात दार वाजल्याचा आवाज आला .. दार उघडताच एक अनोळखी माणूस समोर उभा होता .. "महेश कुलकर्णी इथेच राहतात का?" त्याने विचारलं .. "हो" गौरी .. "त्यांच्या गाडीला अपघात झालाय .."  त्याचं बोलणं ऐकून गौरी  "काय" म्हणून किंचाळली .. पुढचे शब्द तिला ऐकूच आले नाही .. तिच्या डोळ्या समोर पत्रिका .. मृत्यू   षडाष्टक ..जोडीदार .. हे शब्द नाचू लागले आणि चक्कर येऊन ती धाडकन खाली पडली .. 
     काही वेळाने गौरी शुध्दीवर आली .. डोळे उघडताच प्रथम समोर उभा दिसला तो महेश .. तिला विश्वास बसेना .. आश्चर्य आणि आनंदाने ती भारावून गेली .. "तुम्ही..!! तुमचा अपघात .." एवढंच बोलून तिने तोंडावर हात ठेवला .. "अगं तू पूर्ण ऐकलंच नाहीस .. माझ्या गाडीला अपघात झाला .. पण गाडी एक शिपाई घेऊन गेलेला होता .. त्याला जरा मार लागला आणि गाडी दुरुस्तीला टाकल्याने मला यायला उशीर होईल असा निरोप मी पाठवला होता .. पण त्या आधीच तू .."  सगळं ऐकताच गौरी महेशला बिलगली .. आणि तिचे डोळे वाहू लागले .. "ये वेडाबाई आता रडायचं नाही .. आता तू आनंदी राहायचं .."  महेश हसून म्हणाला .. "म्हणजे ?" गौरीने न समजून विचारलं .. "अगं म्हणजे आम्ही आजी आजोबा होणार आहोत .."  असं म्हणत गौरीचे सासू सासरे , वसंतराव आणि त्यांच्यासोबत पंत ही आले .. ऐकताच गौरी लाजली आणि सावरून बसली .. "आणि बरं का गौरी आम्हाला पत्रिकेच सगळं प्रकरण कळलं हो .. आम्ही तुझी आणि महेशरावांची पत्रिका गुरुजींना दाखवली .. उत्तम गुण जुळताय .. पत्रिकेत कुठलाही दोष नाही .." पंत बोलत होते .. "अगं बाळा प्रत्येक पत्रिकेच दुसऱ्या पत्रिकेशी जुळणारे गुणमिलन , ग्रहदशा , योग हे सगळं वेगवेगळं असतं .. त्यानुसार चांगले वाईट योग ही बदलतात .."  पंतांनी अजून उलगडून सांगितलं .. "तेव्हा आता मनातली भीती पूर्णपणे काढून टाक .. मागचं सगळं विसरून  नवीन येणाऱ्या पाहुण्याचा विचार  करायचा .. कळलं का?"  सासूबाईंची प्रेमळ दटावणी गौरीने हसून स्वीकारली .. सगळ्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते .. गौरी आणि महेशने एकमेकांकडे बघितलं आणि पुन्हा एकदा नजरेने एकमेकांना प्रेमाची कबुली दिली .. 

© सौ. गायत्री प्रशांत देशपांडे