दहीहंडी

This story is about mother's love for her son and her efforts for his betterment

# दहीहंडी
©अर्चना बोरावके"मनस्वी" 
          देवकीने प्रसादाचा द्रोण कान्हापुढे धरला... त्याने तो द्रोण उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी त्याच्या थरथरत्या हातांनी सारा प्रसाद सांडला. तिने तो पटकन उचलला.... मंदिरातल्या लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा झेलत कान्हाला उचलून व्हीलचेअर मध्ये बसवले आणि घरी निघाली...... मागच्या आठ वर्षांपासुन प्रयत्न करत होती ती, पण अजूनही तिच्या प्रयत्नाला यश काही येत नव्हते.
           जन्माष्टमीच्या दिवशी घरात बाळाचा जन्म झाला.. म्हणुन हौसेने त्याचे नाव कान्हा ठेवले... देवकीला शोभेल असा कान्हा! आता घरात गोकुळ नांदणार, त्याच्या बाललीलांनी घर आनंदाने न्हाऊन निघणार, छुम-छुम पैंजण वाजवत तो घरात दुडू-दुडू धावणार.... अशी स्वप्ने पहात एकेक दिवस पुढे सरकत होता. पण ही स्वप्नं सत्यात उतरणार नाहीत हे जेव्हा डॉक्टरांनी देवकी आणि अमरला सांगितले..... तेव्हा निराशेच्या खोल खाईत आपल्याला कोणी तरी लोटून दिले आहे असे त्यांना वाटले..... सगळ्या स्वप्नांचा एका क्षणात चक्काचूर झाला. कान्हाला स्नायूंचा असा आजार होता की, त्याच्यासाठी चालणे, धावणे, बोलणे, वस्तू उचलणे सर्वच खूप अवघड असणार होते.... त्याचे स्नायू खूपच कमकुवत होते. फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी , मसाज आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अथक प्रयत्न यामुळे काही सुधारणा होण्याची शक्यता होती.... तीही धूसर!
        अमरने तर आशाच सोडली... त्याने स्वतःला आपल्या कामात गुंतवून घेतले. देवकी आधी खूप रडली.... दैवाला दोष देत बसली..... पण जेव्हा जेव्हा  कान्हाचा तो गोंडस चेहरा तिच्यासमोर येई... ती सगळे दुःख विसरून जाई. त्याला जवळ घेऊन पटापट त्याचे पापे घेऊ लागे.... बाळ कसेही असले तरी आईची माया कमी थोडीच होणार होती? उलट आता प्रेमा बरोबर तिला जबाबदारीचीही जाणीव झाली.
  " श्रीकृष्णाने  गीतेत सांगितले आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात घडते , तीचं काही तरी प्रयोजन असतं, माझ्या बाबतीतही असेच असणार! देवाला माझी परिक्षा घ्यायची असेल.....मी खरंच माझ्या कान्हाची देवकी आहे ना,एक चांगली आई आहे ना? हे बघायचे असेल..... यातून नक्कीच काही तरी चांगले होणार असेल..... मी रडणार नाही. आजपासून माझे प्रयत्न सुरू! "
               आता देवकीचा सगळा वेळ फक्त कान्हासाठी होता..... त्याचा मसाज, दवाखान्याचे सेशन्स, वेगवेगळ्या  डॉक्टरांच्या अपाॅइंटमेंट्स  आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आसपासच्या लोकांशी लढा सुरू झाला.
" अरेरे, कसे होणार या मुलाचे? किती दुर्दैवी आई वडील आहेत! देव देतो तरी कशाला अशी मुले....." अशा विचारांशी खरा लढा सुरू झाला.
            ती त्याला खूप गोष्टी सांगे... हावभाव करून अभिनयासहित ती त्याला त्या गोष्टी जिवंत करून दाखवी. कान्हाला कृष्णाच्या गोष्टी खूप आवडत.. तो मन लावून त्या ऐके.... विशेषतः कृष्ण गोपींना कसा सतावायचा ... दही लोणी कसं पळवायचा.... राक्षसांचा कसा वध करायचा.. या गोष्टी ऐकताना त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत जात.... त्याचे हात, आई दाखवते तशा कृती करण्यासाठी शिवशिवत... एकेक शब्द तो उच्चारायचा प्रयत्न करी.... बरेचसे शब्द अस्पष्टपणे तो बोलू लागला होता. आधाराने चालूही लागला होता.... पण हातात तितके बळ अजून नव्हते... त्याला आवडते म्हणुन बासरी आणली होती देवकीने, पण तीही त्याला नीट पकडता येत नव्हती......
      एकदा देवकी त्याला कृष्ण कसा दहीहंडी फोडतो याची गोष्ट सांगत होती..... ती गोष्ट ऐकताना त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक यायची ..... तो तिला परत परत ती गोष्ट सांगायला लावी आणि कृष्णाने दहीहंडी फोडली की आनंदने खूप हसू लागे.... त्याला असे बघून देवकीच्या मनात एक कल्पना आली.... तिने एक मडके थोड्या उंचीवर लटकवले .... त्याच्या हातात काठी दिली आणि परत गोष्ट सुरू केली.....
 " कृष्णाच्या मित्रांनी एकावर एक थर रचले..... कृष्ण वर वर चढत गेला....पण हंडीपर्यंत हात जाईना.... त्याने एक काठी उचलली आणि दहीहंडी फोडली..." 
  असे ती  सांगत असतानाच कान्हाने पण इकडे काठी उचलली... जमिनीपासून थोडी वर गेलीच होती की, त्याच्या हातातून ती पडली. देवकीला उपाय मिळाला होता.... आता रोज ती हा प्रयोग करू लागली.... त्या गोष्टीच्या प्रभावामुळे कान्हा काठी उचलण्याचा आटोकाट प्रयत्न करी.... हळूहळू तो भिंतीला धरून उभा राहू लागला...त्याची काठी त्या मडक्यापर्यंत पोहोचायला लागली... पण हातात इतकी ताकद अजूनही नव्हती की, काठी मारून ती हंडी फुटेल.... पण प्रयत्न चालू होते..... दोघांचेही!
         आज कान्हाचा वाढदिवस! देवकीने त्याला कृष्णाची वेषभूषा केली... एक मोरपीसही त्याच्या मुकुटाला चिकटवला.... तिच्या कान्हाचे ते गोजिरे रूप बघून तिला किती भरून आले..... वाढदिवसाला सर्व मुले बोलावली..... केक कापायचाच होता. तोच कान्हाचे लक्ष टीव्हीकडे गेले... दहीहंडी फोडायचे  प्रक्षेपण सुरू होते.... एक मुलगा गोविंदाच्या अनेक थरांवरून वर चढला..... आणि क्षणात त्याने दहीहंडी फोडली.... सगळे टाळ्या वाजवू लागले...... कान्हा हळूच खुर्चीवरून उठला..... भिंतीचा आधार घेत घरात लटकवलेल्या हंडीपर्यंत पोहोचला.... काठी उचलली...... हळू हळू हात वर जाऊ लागला.... मुलांचा एकच गलका सुरू झाला.... " कान्हा.. कान्हा..." त्या प्रोत्साहनामुळे कान्हा हुरळून गेला... त्याने काठी वर उचलली... सगळी ताकत एकवटून हंडीवर प्रहार केला..... आणि क्षणात हंडीचे तुकडे झाले.... अमरने कॅमेऱ्यात तो क्षण टिपला.... देवकीच्या कान्हाने दहीहंडी फोडली होती..... इतक्या दिवसांच्या प्रयत्नाला यश मिळाले होते..... देवकी आता मागे वळून पाहणार नव्हती... प्रयत्न चालूच ठेवणार होती... .... दहीहंडी तर एक सुरुवात होती.......तिच्या कान्हाला अजून बरंच काही करायचं होतं. उशिरा का होईना  त्यांचे आयुष्य कान्हाच्या बाललीलांनी भरून जाणार होतं !
©अर्चना बोरावके"मनस्वी"
माझे सर्व लेख, कथा आणि कविता वाचण्यासाठी "मनस्वी" या माझ्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. 
   मला Like आणि follow ही करू शकता.