Dec 01, 2023
वैचारिक

दहन...वाईट विचारांचे !

Read Later
दहन...वाईट विचारांचे !


आज होळीचा सण आणि जाऊबाईंचा वाढदिवसही म्हणून होळीच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विभाने जाऊबाईंना फोन केला आणि छान, मस्त आनंदाने त्यांना होळीच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यांचे आपले नेहमीप्रमाणे  ..विभाने कधी फोन केला तर त्या कधीही आनंदी न वाटणाऱ्या,तिच्या शी बोलून त्यांना चांगले वाटले असे कधीही जाणवू न देणाऱ्या...

\"आपला मूड इतका चांगला असतो आणि त्यांच्याशी बोलले की मूड चांगला राहतच नाही उलट खराब होऊन जातो.

त्यामुळे त्यांच्याशी बोलावेसेच वाटत नाही. पण आपली ही सवय जात नाही ना!

काही तरी निमित्ताने त्यांच्याशी बोलावे लागतेच ना !\"
विभाचे विचारचक्र सुरू होते.

प्रत्येक वेळी त्यांची ठरलेली वाक्ये असतात.
\"आज असेच झाले... आज तसेच झाले... माझ्या मनासारखे कधी होतच नाही... माझे नशीबच फुटके....\"


त्यांच्या ह्या बोलण्यावर मी काय प्रतिक्रिया द्यावी हे ही कळत नाही.

बरं काही सांगायला गेले तर ऐकूनही घेत नाही.
\"मेरी सुनो\" च असते त्यांचे...

त्यांच्या बोलण्यावर  मी विचार करू लागली की मग मी ही दुःखी होऊन जाते. माझी पण इतरांवर चिडचिड सुरु होऊन जाते.
आज ही तसेच झाले..
होळीसारखा आनंदी सण ..मी सकाळपासून छान मूड मध्ये होती आणि त्यांना शुभेच्छा देवून आनंद देण्याचा प्रयत्न केला  तर  त्या आनंदी न दिसता नेहमीच्या सवयीनुसार बोलणे सुरु होते..

\" यांनी असे केले ...हा तसा वागला ...तो तसा वागला...\"


मी त्यांना यापूर्वी  अनेकदा माझ्या परीने समजावून सांगितले आणि आजही समजावून सांगितले की  " तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत रहा.. सारखी सारखी चिडचिड करत जाऊ नका. जे आहे त्यात समाधान मानत जा. कोठेतरी काहीतरी ऍडजस्ट करावेच लागते ना?"

पण माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. उलट चार गोष्टी मलाच सुनावतात.

देवाच्या कृपेने त्यांना नवरा,मुले सर्व चांगलेच मिळाले तरी यांना प्रत्येकात काहीतरी वाईट दिसतेच...


आज फोनवर त्यांच्याशी बोलणे झाले  आणि तेव्हापासून विभाचा मूडच बिघडला. कामात लक्ष लागत नव्हते. हातातून वस्तू पडत होत्या. वस्तूंची आदळआपट  होत होती. कोणी काही विचारले तर त्रासून उत्तर देत होती.

तिची ही स्थिती तिच्या नवऱ्याला समजून आली होती  आणि म्हणाले, " सकाळी तर मूड चांगला होता आमच्या राणीसाहेबांचा ....आता एकदम काय झाले? मूड बदलायला ... आमचे काही चुकले का बुवा ? "


आणि तिचा मूड चांगला व्हावा म्हणून गंमतीत,मजेत बोलू लागले.


" हमसे कोई भूल हो गयी हो तो माफ कर दीजिए हमे...."

पण ती तिच्याच मूडमध्ये होती. ती त्यांच्या बोलण्यावर हसत नव्हती, काही बोलत नव्हती. तेव्हा त्यांनी तिच्या हातातील कामे बाजूला ठेवायला लावली आणि तिला सांगू लागले.

" आज सणाच्या दिवशी दुःखी राहयचे नाही. छान आनंदात राहयचे.

काय झाले ते तर सांग..
आपण काहीतरी मार्ग काढू...पण तू अशी उदास चांगली नाही दिसत..."


त्यांना तिने सांगितले की "जाऊबाईंना फोन केला होता आणि नेहमीप्रमाणे त्यांना आनंद न होता त्यांचे आपले रडगाणे सुरु होते. आणि मलाच माझ्या चुका सांगत होत्या."तिचे हे सर्व ऐकून घेतल्यानंतर तिचा नवरा तिला म्हणाला , "अच्छा यह बात है क्या?
वही तो....मुझे लगा ही ऐसा...कुछ तो गडबड जरूर है।"


विभा वैतागून म्हणाली, "मला इथे विचार करून करून त्रास होतो आहे आणि तुम्हांला माझी गंमत करावीशी वाटते आहे..."

तिचा नवरा म्हणाला, "मी तुला आपले स्वतः चे जीवन कसे जगावे? हेच तर सांगतो आहे.... कोणाच्याही वागण्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम करून घ्यायचा नाही. आपण आपले जीवन आपल्या पद्धतीने आनंदाने जगायचे.


जगात दुःखी,सुखी,चांगले, वाईट असे सर्व प्रकारचे लोक भेटतात. मग त्या प्रत्येकाचा विचार करून आपण आपले आयुष्य वाया घालवायचे का ?


जगात वहिनींसारखे भरपूर लोक असतात. जे स्वतः ही आनंदाने जगत नाही आणि इतरांनाही जगू देत नाही. त्यांना कधीही, कोणात ,काहीही चांगले दिसत नाही. चांगल्यातही अशी लोक वाईटच शोधत असतात. म्हणून अशा लोकांचा जास्त विचार करायचा नाही. आणि आपण त्यांच्या सारखे व्हायचे नाही. याउलट आपण स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी ठेवायचे ....समजले का ? "


नवऱ्याचे हे बोलणे ऐकून विभाने ही विचार केला आणि ठरवले.

\"आज होळीच्या सणाच्या निमित्ताने होळीमध्ये आपल्यातील वाईट वृत्तीचे ,वाईट विचारांचे दहन करू या..म्हणजेच आपल्याशी कोणीही कितीही नकारात्मक बोलले तरी आपण त्यावर विचार करणे,त्याचे टेंशन  घेणे,आपला राग इतरांवर  काढणे,चिडचिड करणे,कामे व्यवस्थित न करणे,आपले आरोग्य आणि मनस्थिती बिघडविणे....
या वाईट वृत्तीचे दहन झाले म्हणजे मी स्वतः आनंदी तर राहीनच पण माझ्यामुळे माझे कुटुंब, माझे सखेसोबती हे सर्व ही आनंदी राहतील.


चिडचिड करणारी,सतत रागावणारी व्यक्ती कोणालाही आवडत नाही तर हसणारी,हसवणारी,कायम प्रसन्न राहणारी व्यक्तीच सर्वांना आवडत असते.

आणि आपले मन प्रसन्न राहिले तर कामे ही चांगली होतात.


रडत कढत जगून स्वतः बरोबर इतरांचेही जीवन दुःखी करण्यापेक्षा हसत खेळत जगून स्वतः चे आणि त्याचबरोबर इतरांचे ही जीवन आनंदी करु या..\"

विभाने नवऱ्याला यापुढे नेहमी आनंदी राहणार. असे सांगितले त्यामुळे त्याला  ही आनंद झाला. या आनंदात त्याने तिला स्वयंपाकात मदत ही  केली.आणि दोघांनी केलेल्या पुरणपोळीचा खमंग घरभर पसरला..समाप्त

नलिनी बहाळकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//