Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

दगडाची काळी पाटी

Read Later
दगडाची काळी पाटी


गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय_गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

शीर्षक _दगडाची काळी पाटी

त्या खुर्चीवर बसतांना आज त्याचे डोळे भरून आले होते. आपल्या आई वडीलांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आनंद पाहून त्यांची तळमळ आणि तगमग दिसून येत होते. मनातले विचार आज बोलायचे होते.
तेवढ्यात श्री. डॉ. सार्थक विसपुते यांना मी स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे.

सार्थकचे मात्र लक्षच नव्हते.

सर, प्लीज. या ना.

"हो ,हो आलोच."

सार्थक उभा राहिला स्वतः चा अनुभव सांगण्यासाठी. गावातील अनेक प्रतिष्ठित लोक, विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माईक हातात घेण्या अगोदर सार्थकने सुरवातीला त्याच्या आईवडीलांच्या पाया पडला आणि नंतर त्याच्यासाठी आदर्श , सत्यवचनी असे एकमेव असलेले साठेगुरूजी यांचे देखील त्याने आशीर्वाद घेतला.
आज गुरूपौर्णिमा आणि मला लहानपणापासून ज्यांनी ज्यांनी सहन केले आणि त्रास भोगला. त्या सर्वांना माझे त्रिवार वंदन. आज या स्टेजवर मी उभा आहे. तो फक्त साठे गुरूजी मुळे.

गुरु शिष्याची खरी परीक्षा
संयम ,धीर आणि विश्वासामुळे
तरून गेलो पैलतीरावर मी
गुरूने पाठीवर दिलेल्या शाबासकीमुळे


" तसे तर तुम्ही मला लहानपणापासून ओळखता. भविष्याची पाने पलटवली तर मी कसा होतो ? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मी आज माझ्या आईवडीलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. हे सांगताना. सार्थकच्या डोळ्यांतले अश्रू कोणापासूनच लपले नाही. साठे गुरूजी यांनी माझ्या आयुष्यात जो काही बदल केला की मी स्वतः बदललो आणि माझ्यातल्या वाईट प्रवृत्तीला देखील बदलले. मी खरोखरच त्यांचा खूप ऋणी आहे."

मला अजूनही आठवते," माझे वडील जेव्हा मला मारत , झोडत मला शाळेत शिकायला घेऊन येत असत. "गुरूजी गुरूजी, माह्या सार्थकला काय तरी सांगा ओ. लय तंग करतोय बगा. दिसभर उनाडक्या करीत फिरतो गावभर. म्या काय करू सांगा बरं. पैका कायसाठी कमावतो. तर या लेकरासाठी आन् ह्यो आपला नाय ते उद्योग करीत बसतो. त्याला आतालोक चारदा दगडाची पाटी घेतली म्या. पण, मुद्दामच ह्यो फोडून टाकीतो . आन् शाळेमंदी यायला घाबरतो. काय करू याचे."

माझे वडील हात जोडायचे, पाया पडायचे. त्यांचे ते शब्द माझ्या कानात अजूनही फिरत असतात. आई वडीलांना सतत वाटायचे. आपण शिकलो नाही. पण, आपल्या मुलाने शिकलेच पाहिजे. त्यासाठी ते मारत मारत शाळेत आणायचे मला. पण, साठे गुरूजींनी मला कधीच मारले नाही. उलट ते वडीलांना समजावून सांगायचे. मला प्रेमाने जवळ घेऊन समजवायचे. पण, मी आपला निगरगट्ट. काही न बोलता, उपहासाने हसत , छाती फुलवत येऊन बसायचो आणि साठे गुरुजींना प्रत्यक्ष , अप्रत्यक्षपणे त्रास देत होतो. खरंतर मला त्या दगडी पाटीचा कंटाळा आला होता. माझे असे विचार होते. की , आपण जे पाटीवर लिहीले आहे. ते परत मिटवायचे नाही, परत लिहायचे, परत परत , रोज रोज तेच. कंटाळा यायचा मला. पण, मला तेव्हा हे कळत नव्हते. की ही दगडाची काळी पाटी माझे भविष्य घडवित आहे. त्या काळ्या पाटीवर उमटवणारी पांढरी अक्षरे गिरवितांना मला खूप आनंद व्हायचा. कारण, माझे अक्षर मोत्यासारखे सुंदर होते आणि ते मला मिटवायचे नसायचे. मी दुसऱ्या विषयाचा अभ्यास सांगितला तरी करीत नसे. किंवा प्रश्नांची उत्तरे पाटीवर लिहीत नसे. पण, साठे गुरूजी नेहमी एक वाक्य सांगायचे.

आयुष्याची रिकामी पाटी
जरी कोरी करकरीत वाटत असली
तरी अक्षरांच्या सहाय्याने
आपली भविष्याची रेखा त्यावर आपणच कोरायची.


"थांब सार्थक" पुढे मी बोलतो. अचानक साठे सर उभे राहिले.

"अक्षरे कुठे सोबत करतात
मिटणार कधीतरी ते
मनात मात्र साचलेले मळभ
कधी पाटीवरती उमटते "

सार्थक हा माझा एक बंड नाही. तर बंडखोर विद्यार्थी होता. याच्या आई वडीलांना कधी वाटलेच नाही. की हा शिकून मोठा होणार. पण, मी कधीच आशा सोडली नाही. तसेही मी प्रत्येक विद्यार्थ्याकडे
एका आशेने बघत असतो. पण, हा सार्थक जरा वेगळ्याच विचारांचा होता. दहावी नंतर त्याने आणखी अभ्यास केला आणि स्काॅलरशीप मिळवून त्यांचे शिक्षण पुर्ण केले. आज त्याने जे करून दाखवले आहे. त्याचा मला अभिमान आहे की माझ्या हातून असे शिष्य घडतात. आज आपल्या गावातील हा पहिला डाॅक्टर आहे.
एका काळ्या पाटीने त्याची दिशा बदलली. त्याला कळून चुकले की काळ्या पाटीवर उमटणारी अक्षरांची सोबत ही जरी काही काळापुरती असली. तरी त्याचे कधीच विस्मरण होत नाही. साक्षात सरस्वतीचे दर्शन घडतं होते.

गुरूने दिलेला हा वसा कधीच मिटणार नाही. गुरू शिष्याचा हा संवाद मात्र सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
पुढे मात्र फक्त टाळ्या आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू होते. नकळत ही गुरू शिष्याची परीक्षा आज खऱ्याअर्थाने सार्थकी लागली होती. एका आयुष्याला कलाटणी मिळाली होती.

©®आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//