डॅड आय हेट यु

.
" हे बघा. तुमच्या पुहूला देवच नीट करू शकतो. " डॉक्टर विहान त्रस्त होऊन म्हणाले.

निराश होऊन राघव परत घराकडे निघाला. त्याची लाडकी लेक पुहू वाटच पाहत होती. राघवचे ओले डोळे तिच्यापासून लपले नाही आणि त्याची भीतीही.

" डाडा , तू माझ्यामुळे सॅड आहेस ना. मला कॅन्सर आहे म्हणून. मी देवाघरी गेले तर तिथे मम्मापण असेल. किती मज्जा. मी देवबाप्पाला सांगून तुला पण बोलवून घेईल. आपलीही फॅमिली पूर्ण होईल. " पुहू म्हणाली.

" नाही बाळा. अस बोलू नये. तू कुठेही जाणार नाहीस. प्रिन्सेस माझी. " राघवने पुहूला कवटाळले.

राघवने आपल्या जीवनात बरेच धक्के पचवले होते. त्याचे वडील डॉक्टर होते. वीस वर्षांपूर्वी कोविड विषाणूने थैमान घातले होते. राघवचे वडील हॉस्पिटलमध्ये मोस्ट सिनियर डॉक्टर असल्याने ते सतत रूग्णांची सेवा करण्यात व्यग्र असत. राघवच्या आईने आणि स्वतः राघवने खूप दबाव टाकूनही ते स्वतःच्या कर्तव्याला मुकले नाहीत. शेवटी जे नको व्हायचे तेच झाले. राघवच्या वडिलांनाही कोविड झाला. कित्येक रुग्णांना बरे करणारे डॉक्टर स्वतः मात्र वाचू शकले नाही. राघवच्या डोक्यावरून पित्याची छाया कायमची हटली. पतीच्या मृत्यूने राघवच्या आईला खूप मोठा धक्का बसला. त्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्याही देवाघरी गेल्या. राघव पोरका झाला. क्रूर नियतीने इथेच त्रास देणे बंद केले नाही. राघवची पत्नीदेखील पुहूला जन्म देताच स्वर्गवासी झाली. आता पुहूलाही कॅन्सर झाला होता. राघव नेहमी वडिलांच्या फोटोसमोर जात.

" आय हेट यु डॅड. महामारीत तुम्ही रुग्णांची सेवा करून लोकांच्या नजरेत हिरो जरी झाले असले तरी तुम्ही स्वतःच्या कुटुंबासोबत अन्याय केलात. मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तुमच्या त्या एका कर्तव्यामुळे एक अख्खे कुटुंब उध्वस्त झाले. " राघव रडत हीच वाक्ये त्याच्या बाबांच्या फोटोसमोर म्हणून दाखवत.

असो. राघवने खूप प्रयत्न केले. डॉक्टर मल्होत्रा यांची अपॉइंटमेंट भेटली. डॉक्टर मल्होत्रा यांनी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुहूला बरे केले. राघवला आसमंत ठेंगणे झाले. पेढे घेऊन तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. डॉक्टर कुणासोबत तरी व्हिडीओ चॅट करत होते.

" आय हेट यु डॅड. माझ्या लग्नालाही नाही आलात तुम्ही. " एक तरुण समोरून म्हणत होता.

" सॉरी बेटा. पुहू नावाच्या गोड मुलीची ट्रीटमेंट चालू होती. आता ती सुखरूप आहे. तिचे हास्य बघितले तर आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटते. " डॉक्टर मल्होत्रा म्हणाले.

" हो डॅड. आय वॉज जस्ट किडींग. आय एम प्राउड ऑफ यु डॅड. " समोरचा तरुण म्हणाला.

राघवने सर्व संभाषण ऐकले. त्याचे डोळे पाणावले. डॉक्टरांचे आभार मानले. घरी येऊन एक पेढा बाबांच्या फोटोसमोरही ठेवला.

" रुग्ण दगावला तर डॉक्टरवर लोक हल्ला करतात. रुग्ण ठीक झाला तर लोक डॉक्टरला देव समजू लागतात. पण कुणीच डॉक्टरकडे एक माणूस म्हणून पाहत नाही. सीमेवर उभा सैनिक , लोकांना अन्न मिळावे म्हणून जमीन कसणारा शेतकरी आणि विद्यादान करणारा शिक्षक याबरोबरच पवित्र काम डॉक्टराचे. आय लव्ह यु डॅड. आय एम प्राउड ऑफ यु. "

©®पार्थ धवन