सकाळचा प्रहर होता. दामू नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाखाली बसला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ एक वडाचे मोठे झाड होते. तिथे दामू नेहमी बसायचा. फाटलेली वस्त्रे , वाढलेल्या दाढी-मिश्या , राकट झालेले केस आणि खंगलेले शरीर ही त्याची बाह्य ओळख. तो समोरच असलेल्या पुलाकडे बघत आणि विचित्र भाव बनवत. तो कोण होता , कुठून आला होता याची माहिती कुणालाच नव्हती. सिग्नलवर भीक मागणारी काही लहान मुले त्याची काळजी घेत. त्याला खायला आणून देत. दामू मात्र नेहमी शून्यात हरवलेला असायचा. कधीच हसत किंवा रडत नसे. कधी कधी मात्र अंगात भूत शिरल्यासारखे माती खणू लागत. " सरदार वल्लभभाई पटेल पूल " म्हणजे शहराची नस. पुलावर कितीतरी आलिशान गाड्या भर वेगाने धावत. पुलाखाली मात्र भीक मागणाऱ्या लोकांनी आपली तात्पुरती निवासस्थाने बनवली होती. असो. एकेदिवशी मात्र कहर झाला. सकाळच्या अकरा वाजता तो पूल कोसळून पडला. सर्वत्र हाहाकार माजला. कितीतरी लोकांनी आपले प्राण गमावले. सर्वत्र धूळीचे साम्राज्य निर्माण झाले. हळूहळू पोलीस , ॲम्बुलन्स , मीडिया वगैरे गोळा झाले. स्थानिक जनताही माणुसकीच्या नात्याने जखमी लोकांना आपापल्या परीने मदत करत होती. हळूहळू लोकांची गर्दी वाढत होती. ज्यांचे नातेवाईक मृत पावले होते ते आक्रोश करत होते. वडाचे झाड कधीही न सोडणारा दामू मात्र आज उठला. पोलिसांची नजर चुकवून तोही त्या ढिगात काहीतरी शोधू लागला. अचानक घटनास्थळी लाल दिव्याची एक गाडी येऊन थांबली. ती गाडी एका मंत्र्याची होती. अश्या घटनास्थळी नेहमीच नेतेमंडळी येत राहतात. मीडियासमोर लोकांची काळजी असल्याचा दिखावा करतात , खोटी आश्वासने देतात. पण यावेळी हा मंत्री फारच लवकर आला होता. याचे मीडियासहित सर्वानाच आश्चर्य वाटले. मीडियाने मंत्र्याला घेरले. पण मंत्र्याच्या मुखावर वेगळेच भाव होते. त्याने मीडियाला कसलाच भाव दिला नाही. तो ही कसलातरी शोध घेऊ लागला. एक भीती त्याला सतावत होती. अखेरीस ती भीती सत्य ठरली. थोड्या वेळापूर्वी त्याने आपल्या पत्नीला फोन केला होता. पत्नीने फोनवरच " सरदार वल्लभभाई पटेल " पूल क्रॉस करत असल्याचे सांगितले होते. अचानक फोनवर गोंधळ ऐकू आला. त्याच क्षणी पूल कोसळला होता. आपल्या पत्नीला आणि लहान मुलांना मृत पाहून तो मंत्री जमिनीवर कोसळला. तोही इतरांप्रमाणे आक्रोश करू लागला. जोरजोरात रडू लागला. मीडियाने आपले कॅमेरे मंत्र्याच्या दिशेने वळवले. दामूही तिथेच होता. त्या रडणाऱ्या मंत्र्याला पाहून त्याच्या निराकार भाव असलेल्या मुखावर अचानक हास्य उमटले. दामू खळखळून हसू लागला. मीडियाने हा कुणितरी वेडा मनुष्य असेल म्हणून दुर्लक्ष केले. पण मंत्र्याने दामूला बरोबर ओळखले. दामू म्हणजे दामोदर गांधी. एक अनाथ मुलगा. स्वकष्टाने शिक्षण घेऊन तो नोकरीला लागला होता. गायत्री नावाच्या अनाथ मुलीसोबत त्याने लग्न केले. मग दोघांचा सुखी संसार सुरू झाला. दोघांना एक गोंडस मुलगी झाली. लहानपणीपासून कधीच कुटुंबाच्या मायेची ऊब न मिळालेल्या दामूला आपल्या मुलीला जगाची सर्व सुखे द्यायची होती. खूप स्वप्ने त्याने पाहिली होती. त्यासाठी तो दिवसरात्र एक करत होता. पण विधात्याची कुदृष्टी पडली. काही वर्षांपूर्वी असाच एक पूल कोसळला होता. त्या अपघातात दामूने आपले कुटुंब गमावले. दामूही असाच ढिगात आपल्या पत्नीला आणि मुलीला शोधत होता. पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर दामू नैराश्यात गेला. तरीही त्याने आपल्या पत्नी आणि मुलीसाठी न्याय मिळवण्याचे ठरवले. या प्रकरणात बिल्डर दोषी होते. दामूने सर्व पुरावे गोळा केले. बिल्डरने स्वतःच्या फायद्यासाठी कमी दर्जाचा माल वापरला होता. परंतु , बिल्डर फार धुर्त व कपटी होता. त्याने भरभक्कम रक्कम देऊन सर्व नेत्यांना आणि पोलिसांना आपल्या बाजूने वळवले. दामू मंत्र्याला भेटला. विनवणी केली. पाय धरले.
" बिल्डरला शिक्षा झाली तर तुझी बायको आणि मुलगी परत येणारे का ?" मंत्र्याने कुत्सितपणे विचारले होते.
नंतर दामूला खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आले. तिथे पोलिसांनी इतका त्रास दिला की दामूचे मानसिक संतुलन बिघडले. भटकत भटकत तो वडाच्या झाडाखाली बसला आणि समोर पुलाकडे बघत कायमचा शून्यात हरवला. त्या दिवशी आपल्यावर हसणाऱ्या मंत्र्याला आज रडताना पाहून दामू खळखळत हसत होता. तेव्हा त्याला न्याय मिळाला नव्हता. पण आज त्याला " न्याय " मिळाला होता.
©® पार्थ धवन