द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 27)

माई आणि मानवचं Surprise...!!!


एकीकडे नव्या कंपनीचं आर्थिक संकट आणि दुसरीकडे आपल्याच लोकांनी फिरवलेली पाठ ! या सगळ्यामध्ये तिचं नवीन हाती घेतलेलं काम डळमळीत होत होतं. तनिषाच्याही हे लक्षात येत होतं, पण इतक्या अनुभवांनातर त्यातून उभं कसं राहायचं हेही तिला अवगत होतं. तिचं भारतात येणं पोस्टपोन झालंय मानवला सांगितल्यानंतर त्याचाही फोन येणं बंद झालं होतं. घरचे आपल्यावर नाराज आहेत हेही तिला समजत होतं.

दुसरीकडे हेझल, कार्ल आणि आर्या जोमाने काम करत होते. काही नवीन एम्प्लॉयी त्यांनी सिलेक्ट केले, आता तनिषा मॅमच्या परवानगीची सर्वजण वाट बघत होते. आलेल्या देणगीतून एक मोठं ऑफिस सुद्धा पाहिलं होतं, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च, नवीन एम्प्लॉयीज ला लागणारा पगार, प्रिंटिंग चा खर्च हे सगळं टीमने तिच्या समोर आणून ठेवलं. पण कसलाच टाळा बसत नव्हता, होणाऱ्या खर्चाच्या निम्मा पैसाही जवळ नव्हता. टीमचा उत्साह एवढा होता की त्यांना थांबवणंसुद्धा योग्य वाटत नव्हतं. पूर्ण दिवस कसाबसा टेन्शनमध्ये घालवल्यानंतर संध्याकाळी तनिषा घरी आली. आता पुढे काय करायचं हाच विचार डोक्यात सुरू होता. माघार घेणं शक्य नव्हतं, तसं केलं असतं तर ती स्वतःच्याच नजरेत अपयशी दिसली असती.काहीतरी मार्ग काढावा लागेल, काहीतरी हालचाल करावीच लागेल. हे सगळं विचारचक सुरू असतांना दारावरची बेल वाजली.

"यावेळी कोण आलं असेल?"

तनिषाने घाईघाईने दार उघडलं...

तीन भल्यामोठ्या बॅग्स घेऊन माई आणि मानव दारात हजर..!!!

तनिषा स्तब्ध झाली. राग, रुसवा आणि अचानक असं दिलेलं सारप्राइज सगळं राहिलं बाजूला. ते दोघे तनिषाकडे आणि तनिषा त्या दोघांकडे डोळेभरून पाहू लागले.इतक्या वर्षांनी ते एकमेकांना बघत होते. वयानुसार चेहऱ्यावरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसू लागलेल्या पण नात्याची ती नजर अजूनही तशीच होती. मधल्या काळात मानव आणि माईंनी तनिषा नसतांना खूप काही ऍडजस्ट केलं होतं, आणि तनिषा जरी तिच्या महत्वाकांक्षेत अडकून असली तरी आपल्या माणसांच्या उबेची कमी तिला जाणवत होती. क्षणभरपूर्वी तिला वाटत असलेला तणाव एकदम नाहीसा झाला, माई आणि मानव ला बघून तिला एकदम हलकं वाटू लागलं.तसं पाहिलं तर ते काय करू शकणार होते? पण आपल्या माणसांची हीच ताकद असते, नुसते नजरेसमोर असले तरी एक चमत्कारिक आधार वाटतो.

भेटीची ओढ संपल्यानंतर सर्वजण आपापल्या भूमिकेत शिरले..

"मग तनिषा, कसं वाटलं सारप्राइज?"

"मला काहीच सुचत नाहीये काय बोलू, तुम्ही या ना, आत या"

माईंचा अवतार मात्र पाहण्यासारखा होता. त्यांना अमेरिकेत येऊन जरा मॉडर्नही राहायचं होतं पण मुळ पेहरावही त्यांना सोडवत नव्हता. त्यातला सुवर्णमध्य साधून माईंनी भलताच वेष धारण केलेला. चमकीचा, नेट ची ओढणी असलेला पण अगदी ढगळा असा एक ड्रेस घातला होता, मोठ्या नंबरचा चष्मा होता पण गॉगल घालायची भारी हौस...चालताना चाचपडत होत्या पण गॉगल काही काढला नाही, पार्लर मधून हेअर स्ट्रेटनिंग केलेली पण मोकळ्या केसातही गजरा अडकवलेला, पायात शूज पण त्यावर भरगच्च फुलांची डिजाईन,लिपस्टिक लावू की नको, लावू की नको म्हणत चार वेळा पुसून परत लावलेली आणि पुसल्याने चेहऱ्यावर उमटलेल्या हलक्याश्या रेषा...तनिषाला हसताही येत नव्हतं आणि रडताही !

तिघांनी आपल्या भावना दाबून ठेवल्या. माई पुन्हा कॅरेक्टरमध्ये शिरल्या..

"आज झाडू मारला नाही वाटतं घराला, पायाला किती कचकच लागतेय"

मानवने आईला इशारा करून गप राहायला सांगितलं. तनिषाला मात्र हे वाक्य ऐकून काहीतरी गवसल्यासारखं वाटलं. तिचे जुने दिवस, तिच्या घरातले... शब्दांतरमधले...किती सुख होतं ना ! संघर्ष होता पण सोबत आपली माणसं होती, स्पर्धा होती पण विश्वासघात नव्हता..इथे आपली माणसं तर नव्हतीच, वर पदोपदी विश्वासघात वाट्याला आलेला.

"हा पत्ता आर्याने दिला असेल ना?" तनिषा

"हम्म..दुसरं कोण देणार !" मानव

"पण आर्या कुठे आहे?"

आता माईंना कळलं की एका देशात राहून माय लेकी वेगळ्या राहताय तर आकांडतांडव केलं असतं त्यांनी,

"ही काय मी इथे.."

आर्या दारात उभी,

"कुठे गेलेलीस?"

"इथेच, जरा बाहेर..तुम्ही कधी आलात?"

"आत्ताच.."

"बरं फ्रेश व्हा, मी मस्तपैकी कॉफी करून आणते"

आर्याने त्यांना आत पाठवलं आणि हळूच आपली बॅग आतल्या बेड मध्ये ठेऊन दिली..

"सॉरी आई, काही दिवस फक्त...इनाया मावशीची अट मोडतेय, पण आता पर्याय नाही"

"असुदेत, रहा इथे.."

आर्या बॅग ठेवायला आत निघून गेली. तनिषा घराकडे बघू लागली. तिचं कुटुंब तिच्यासोबत होतं..कितीतरी वर्षांनी..ती खोलीत गेली, दार लावून घेतलं आणि मनसोक्त रडून घेतलं.काहीवेळाने मानव आला, दोघांनी कडकडून मिठी मारली आणि मनसोक्त रडून घेतलं.

तो दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी तनिषाला ऑफिसमध्ये जायचं होतं. पण जायच्या आधी माईंनी तिला बोलवून घेतलं.त्यांना तिच्याशी काहीतरी बोलायचं होतं.

"तने, वेळ आहे का जरा.."

"हो माई, बोला ना.."

"गेली बरीच वर्षे तू आमच्यापासून लांब होतीस. तुझं स्वप्न, तुझं काम..सगळं मान्य, सुरवातीला मला तुझं काम पटायचं नाही, पण जसजसं वय वाढतं तेव्हा लक्षात येतं की आपण खूप चुकीचे वागलो पूर्वायुष्यात. पण तेव्हा वेळ गेलेली असते..."

"नाही माई तुम्ही असं बोलू नका.."

"नाही नाही, तुझी माफी वगैरे मागायला रिकामी नाही मी.."

"म्हणे जाणीव झाली, कसलं काय" तनिषा मनातल्या मनात..

"तने, तू गेलीस अन आमच्या आयुष्यात खड्डा पडला गं. एकीकडे तुझी काळजी, दुसरीकडे मला या घराची काळजी..तू गेल्यानंतर कित्येक दिवस नीट जेवण गेलं नाही आम्हाला. तू गेली अन घराची रयाच गेली बघ. पण नंतर हळूहळू सवय केली, तुझ्याविना राहू लागलो. तुला खरं सांगू तनिषा, कितीही म्हटलं तरी कुणाचं कुणावाचून अडत नाही. प्रत्येकजण आपापला मार्ग शोधून काढतो. मला काळजी होती ती तुझी, एक स्त्री म्हणून नाही पण एक माणूस म्हणून तुला समाधान, सुख असं कधी मिळालं? तुला चार क्षण निवांत बसून चहा पितांना मी कधी पाहिलेलं नाही..माणूस काम कशासाठी करतो? समाधान मिळवण्यासाठीच ना?"

"पण माई, काम केल्यानेच मला समाधान मिळतं.."

"हे बघ तनिषा, काम वगैरे सगळं मान्य..ते तुला एक उंची देईल, एक ओळख देईल..पण जगण्यासाठी आपल्या माणसांची साथ खूप महत्त्वाची असते तने..शेवटच्या क्षणापर्यंत तू काम करशील खरं, त्यावेळी तू सर्वात मोठ्या उंचीवर असशील..पण तिथून तुला आपल्या माणसांना बघता येणार नाही, ती उंची तुला एक दिवस एकटेपणा देईल..माणसं ही खूप मोठी संपत्ती असते तनिषा. ती जपून ठेव..माझं सोड, पण तुझा नवरा आणि तुझ्या मुली...यांना गरज आहे तुझी, तुझ्या प्रेमाची.. ते सगळे तुझीच बाजू घेतात गं.. तुला काम आहे, तुला वेळ द्यायला हवा वैगरे..पण आतून तुझी किती आठवण काढत असतात हे मला महितीये..तने, आता झालं तेवढं बस, आता परत चल..सुखा समाधानाने जग..आराम कर, संघर्ष करतांना झालेली झीज आता भरून काढ. काम कधीही संपत नाही, पण एक दिवस ते आपल्याला संपवतं... त्यामुळे त्याला कधी संपवायचं हे आपण ठरवावं..आणि राहिली गोष्ट तुझ्या इथल्या कामाची, तर माझे शब्द लिहून ठेव..तू उभी केलेली माणसं, तुझ्या रक्ताच्या नात्यातील माणसं आणि तुझं वलय...हेच तुला मोठ्यातल्या मोठ्या संकटातून तारून नेईन.."

माई आज पोटतिडकीने बोलत होत्या आणि पहिल्यांदा त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. इतक्या वर्षाच्या सहवासानंतर तिच्याबद्दल काळजी वाटणं साहजिकच होतं...त्यांचं बरोबरच होतं, कुटुंब हेही महत्वाचं आहे, आपली माणसं महत्वाची आहेत...

तनिषा नेमकी ऑफिसला जायला निघालेली असते आणि माई हे असं बोलतात.आता तिची पंचाईत होते.. माई ते ओळखतात,

"जा तू ऑफिसला..पण मी जे बोलले त्याचा विचार कर.."

***

तनिषा या विचारातच ऑफिसला पोहोचते. टीम तिच्या सूचनांची वाट बघत होती..तनिषा आता पूर्णपणे कोलमडून गेलेली..एकीकडे ही कंपनी उभी राहणार नाही याची होत असलेली जाणीव आणि दुसरीकडे भारतात आपल्या घरी जाण्याची ओढ. हे सगळं थांबवावं, आणि जावं का परत भारतात? नको आता ती स्पर्धा, नको कसला प्रपंच..

आर्या एक फाईल घेऊन तनिषाच्या केबिनमध्ये आली..

"मॅम, हे नवीन नेमलेल्या एम्प्लॉयी चे डिटेल्स आहेत..आणि डिपार्टमेंटमध्ये किती संख्या असावी याबद्दल आपल्याला एक मिटिंग...मॅम, मॅम?? आई...आई??"

तनिषा खुर्चीवर मागे मान टाकून डोळे मिटून बसलेली होती, आर्याच्या बोलण्यालाही तिने प्रतिसाद दिला नाही..आर्या घाबरली, आईच्या जवळ गेली आणि तिला हलवू लागली..आईने मान टाकून दिली...खुर्चीखाली कोसळत असतांना आर्याने सावरलं...आणि जीवाच्या आकांताने स्टाफला मदतीसाठी ओरडून बोलवू लागली...

क्रमशः

🎭 Series Post

View all