द बॉस - The Boss (पर्व 2- भाग 29)

"The Real Face Of America" Is Shutting Down


आईची तब्येत पुन्हा बिघडली म्हणून आर्या खूपच घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. एक तर इतक्या वर्षांनी आईची भेट घडली होती आणि त्यात हे असं..कार्ल आणि हेझल तिला सावरत होते. ऑफिस तर पूर्णपणे बंदच होतं. सगळं काम ठप्प झालेलं.

काही वेळाने तिघांनाही Face of America ची बातमी कळली, तिघेही हैराण झाले.एकमेकांकडे पाहू लागले.

"सोडा मला, मला ऑफिसमध्ये जायचं आहे. पुन्हा नव्याने सगळं करायचं आहे, खूप काम करायचं आहे, वर्तमानपत्र प्रकाशित करायचं आहे..

तनिषा ती बातमी ऐकून सैरभैर झालेली. आपल्या आयडियाज चोरल्या गेल्या याचं दुःखं एकीकडे आणि आपल्याच माणसांनी आपला घात केला याचं दुःखं जास्त ! या आयडियाज फक्त चार लोकांना माहिती होत्या, तनिषा, आर्या, कार्ल आणि हेझल..मग यातलं फुटलं कोण? तनिषा आणि आर्या सोडली तर हेझल आणि कार्ल उरतात..कार्ल मनापासून काम करत होता, हेझल सुद्धा नव्या कामासाठी उत्साही होती..मग कुणी केलं असेल हे? चौघांपैकी एकजण फुटला हे नक्की. त्याव्यतिरिक्त कुठल्याही माध्यमातून या कल्पना बाहेर जाणं शक्य नव्हत्या.

मानव आणि माईंनी तनिषाला शांत केलं. तिला शांतपणे पडून राहायला सांगितलं. दोघेही आता रडकुंडीला आलेले. तनिषाला कसं आवरावं दोघांना कळेना. तिचं वृत्तपत्र आणि मासिक यापलीकडे ती काही बोलतच नव्हती. तिला स्वतःची सुद्धा काळजी नव्हती. तिने उभं केलेलं विश्व हाच तिचा प्राण होता.

इकडे शब्दांतर मध्ये ही बातमी समजली, इनायाला धक्का बसला. आत्ता जाऊन तिला भेटावं असं तिला वाटू लागलं, ती आजारी पडली आणि शब्दांतरच जणू संथ झालं असं वाटू लागलं. थोडे दिवस आपण हे काम पाहिल्यानंतर तनिषा परत शब्दांतरचे सूत्र हातात घेईल असं इनायाचं ठरलं होतं. पण..तनिषाला काही झालं तर? मी लाख प्रयत्न करेन शब्दांतरला टिकवण्याचं.. पण तनिषाच्या स्पर्शाशिवाय शब्दांतर जास्त काळ तग धरू शकणार नव्हतं.

****

ऑस्ट्रेलिया मध्ये शिकत असलेली स्वरा आईची ही खबर ऐकून तातडीने अमेरिकेला रवाना झाली. हॉस्पिटलमध्ये जाताच आर्या तिच्या गळ्यात पडून रडू लागली.. मानव आणि माई तिला आधार देऊ लागले. स्वरा आईला भेटायला आत गेली, स्वराला पाहून तनिषा जरा शांत झाली.आज तिच्या दोन्ही लेकी तिच्या जवळ होत्या. तिचा हरवलेला आधार तिला पुन्हा मिळाला. तिचं पूर्ण कुटुंब आज तिच्या जवळ होतं.

स्वरा इतके दिवस बाहेर होती, पण ती आर्या सारखी नव्हती, आयुष्याबद्दल गंभीर होती. इथे शिकून आईच्या कंपनीसाठी शिक्षणाचा तिला वापर करायचा होता. तिने आईला धीर दिला.

"आई, मी परत आलीये..आता तुला सोडून कुठेच जाणार नाही. The real face of America चं काम मी बघेन"

हे वाक्य ऐकून तनिषाला हायसं वाटलं. केवळ आपली मुलगी आहे म्हणून नाही तर आपलं रक्त, आपला अंश तिच्यात आहे...शब्दांतर साठी केलेला संघर्ष स्वराने गर्भातूनच अनुभवला होता, बिझनेसचे बाळकडू तिला गर्भातूनच शिकायला मिळाले होते.

काही दिवसांनी तनिषाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. सर्वजण तनिषाच्या अमेरिकेतील बंगल्यावर परत आले. आल्यानंतर आर्याने तो विषय मुद्दाम टाळला. तनिषाची काळजी घेण्यात सर्वजण व्यस्त होते.

तनिषाची तब्येत सुधारली होती. माईंना भारतात परत जाण्याचा निर्णय सर्वांना ऐकवला.

"आता सर्वांनी चुपचाप भारतात चलायचं आणि तिथेच तुम्हाला जे काही उद्योग करायचे ते करायचे..तने, आता बस्स, आता कसलंही खूळ डोक्यात घालून घेऊ नकोस..झालं तेवढं पुरे..भारतात चलायचं, आराम करायचा.. आणि तुला वाटलंच तर शब्दांतर मध्ये एखादा चक्कर मारून यायचा. आता निवृत्त झालीस तू..समजलं?"

तनिषा गप होती. माई त्यांच्या जागेवर बरोबर होत्या. मानव, आर्या आणि स्वरानेही त्यांच्या निर्णयाला दुजोरा दिला. तनिषाचा पाय निघणार नव्हता, पण आता इथे आपल्याला कुणी थांबू देणार नाही हे तिला समजलं होतं. खोलीत आराम करायला गेल्यावर तनिषा मनसोक्त रडली..

अमेरिकेत ती आलेली ते स्वतःचं विश्व उभं करायला, शब्दांतरचं साम्राज्य दशदिशात पोचवायला..भारतीयांची छाप असलेली मासिकं जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला..पण हे स्वप्न अर्ध्यावरच मोडलं..आपल्याच लोकांनी घात केला..आपल्याच माणसांनी आज ही वेळ आणली, याहून मोठं दुर्दैव ते काय? हा पराजय तिच्या जिव्हारी लागलेला...भारतात गेल्यानंतर शब्दांतरला काय तोंड दाखवू? अमेरिकेत गेलेले आपला झेंडा फडकवायला, पण रिकाम्या हाताने परत आले..ती स्वतःला आरशातही पाहू शकत नव्हती.

पण आता काहीही केलं तरी तिला माघारी जाणं भाग होतं. या विचारात असतांनाच तिला एक फोन आला,

"हॅलो मिस तनिषा.. मिस्टर रॉन हिअर...तुमची तब्येत बिघडली असं समजलं, सो sad.."

"काय काम आहे?"

"मिस तनिषा, तुम्ही इथे येत नसला तरी अजूनही face of America च्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये आहात तुम्ही. आणि आमच्या...सॉरी, आपल्या नवीन स्ट्रॅटेजीज बद्दल तुम्ही ऐकलंच असेल..त्याचीच ऑफिशियल announcement कंपनीच्या सर्व महत्वाच्या व्यक्तींना बोलावून करायची आहे..हे घ्या, तुम्हाला एक व्यक्ती स्पेशल आमंत्रण देत आहे.."

"हॅलो...तनिषा मॅम.."

"भैरव?"

"तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय, आमच्या भन्नाट कल्पना ऐकून तुम्हालाही आमचं कौतुक वाटेल यात शंकाच नाही. तुम्हाला यावच लागेल..याल ना?"

"हो..येईल मी भैरव..मी फक्त कागदोपत्री कंपनीचा भाग आहे..पण त्यासाठी येणार नाहीये..येणार आहे ते तुझं कौतुक पहायला.. तुझा होत असलेला सन्मान पहायला..लहान होतास, आईच्या काळजीने कासावीस झालेलास, आणि आज इतक्या मोठ्या पदावर राहून जबाबदारी पेलतोय. तुझं कौतुक पाहायला येणार मी..नक्की येणार..!"

"धन्यवाद"

भावुक झालेल्या तनिषाला असा कोरडा प्रतिसाद देऊन भैरवने फोन ठेऊन दिला.तनिषाने जड अंतःकरणाने फोन खाली ठेवला. तिने डोळे गच्च मिटले आणि मनाला समजावलं. आता यापुढे कुणाकडूनही कसलीही अपेक्षा करायची नाही. या जगापासून दूर राहायचं... आपल्या घरी, आपल्या माणसांसाठी जगायचं.

आर्याला फोनवर फोन येऊ लागले होते. The real face of America साठी अनेक नवीन लोकांना नेमलं होतं, पण अजून joining date आली नाही म्हणून तिला विचारणा होत होती. प्रिंटिंग मशीन चं कोटेशन आणलेला माणूस रोज ऑफिसमधून परत जात होता. डिस्ट्रिब्युशन साठी पेपर वाटणारी लोकं काम मिळण्यासाठी डोळे लावून बसली होती..

अखेर आर्याने तनिषाची कुठलीही परवानगी न घेता सर्वांना एक मेल करून दिला.

"Due to some unexpected circumstances, we are shutting down. There will be no more interviews and work conducted here. We apologize for the inconvenience"

कंपनी बंद झालीये हे आर्याने परस्पर ठरवून टाकलं. आईला हे समजल्यावर ती काय म्हणेल यापेक्षा आईसाठी काय योग्य आहे हे करणं तिला महत्वाचं वाटलं. तिने पहिल्यांदा असा मोठा निर्णय घेतला होता.

आर्याने दबकत तनिषाच्या खोलीत पावलं टाकली. ती काही म्हणायच्या आत तनिषाच म्हणाली,

"खूप लोकं नाराज झालेत या निर्णयाने.."

"आई..तुला कसं कळलं?"

"तू मेल केलास आणि हेझल, कार्लचा लगेच मला मेसेज आला. आपण कंपनी बंद तर केली, पण हेझल आणि कार्लचं काय? त्यांचं भविष्य आता काय?"

"आई काळजी करू नकोस, त्यांचंच नाही..आपलंही भविष्य खूप चांगलं असणार आहे"

आर्या बोलून गेली, तिच्या बोलण्यात इतका आत्मविश्वास तनिषाला पहिल्यांदा दिसला.

"आर्या? तुझ्या डोक्यात काही दुसरं शिजत तर नाहीये ना?"

आर्या फक्त हसली, आणि निघून गेली. तनिषाला आज आर्या मध्ये तिची झलक दिसली. काहीतरी ब्लास्ट करण्याआधी तनिषा असंच मौन राहून हसत असायची. आज तेच हसू, तोच आत्मविश्वास... काही घडणार आहे का?

क्रमशः

🎭 Series Post

View all