Login

द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 25)

Reusable Newspaper, Extra Ordinary Concept
तनिषा म्हणाली की आपलं वर्तमानपत्र घराघरात, प्रत्येक दुकानात असेल. ते कसं? सर्वजण कान देऊन ऐकत होते..

"तनिषाने वर्तमानपत्र आकाराचा एक कागद आणला, त्यावर पट्टीने चारही बाजूंना पेन्सिलने समास सोडला, उजव्या समासाला आणि खालच्या समासाला डिंक लावला.

"हे बघा...काय समजलं?"

कुणाला काहीच समजत नव्हतं, सर्वजण एकमेकांकडे बघत होते आणि चेहऱ्यावर मोठी उत्सुकता होती.

"नाही समजलं? ह्या इथे जो डिंक लावलाय तिथे एक स्टीकी लाईन्स असतील. म्हणजे वरची पट्टी काढली की मध्ये स्टिक असेल.

"हे कशासाठी?"

तनिषाने समासाच्या लाईन्स ला फोल्ड केलं, व्हर्टिकल पेपरला मध्यभागी फोल्ड केलं आणि डिंकाच्या बाजू एकमेकांना चिटकवून दिल्या..तनिषाने ते समोर धरलं..

समोरचे सर्वजण बघतच राहिले.

"आयला, हे कधी सुचलंच नाही यार..!!!" आर्या मोठ्याने म्हणाली.

कार्ल आणि हेझल उठून उभे राहिले, ते हातात घेतलं, मागून पुढून पाहिलं..आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

"तर ही आहे पेपर बॅग, आज अमेरिकेतील सर्वात मोठी समस्या, प्लास्टिक...सरकार अनेक बंधनं टाकून सुद्धा याचा वापर वाढतच चाललाय. आपलं वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी अश्या पद्धतीने फोल्ड केलं की पेपर बॅग तयार. फेविकोल आणा, पेपर कट करा, माप घ्या याची झंझट नाही. प्रत्येक विक्रेता आणि घरातला प्रत्येकजण बॅग हवी असेल तर पटकन हे वर्तमानपत्र घेऊन त्याचा वापर करेल..समजा, हेझलच्या मैत्रिणीला तिचा एखादा ड्रेस हवाय, हेझलने पटकन या पेपर बॅग मध्ये गुंडाळला आणि तिला दिला. मैत्रिणीने इस्त्रीसाठी ही बॅग इस्त्री करायला दिली, त्या इस्त्री वाल्याने ती आणखी दुसऱ्याला दिली..म्हणजे एका वेळी हे वर्तमानपत्र किती ठिकाणी पोहोचलं बघा."

"पण बॅग वापरणारा त्यावरचा मजकूर का वाचेल?"

"तिथेच आपल्याला आपली मार्केटिंगची युक्ती वापरायची आहे.."

"ती कशी?"

"बॅगच्या बाहेरून दिसणाऱ्या दोन पानांवर मधोमध आपल्याला लक्ष वेधून घेणारं व्यंगचित्र आणि आपल्या वर्तमापत्राचं नाव ठळक अक्षरात द्यायचं आहे..लोकांच्या तोंडात हे नाव बसलं पाहिजे. ज्या कोणाकडे ही बॅग जाईल त्याला ते व्यंगचित्र वाचायची ईच्छा होईल..आपण फेसबुक वापरतो, सतत स्क्रोल करत असतो, पण एखादं मिम दिसलं की आपण थांबतो आणि वाचतो... लोकांच्या याच मानसिकतेचा वापर आपल्याला आपल्या मार्केटिंगसाठी करायचा आहे.."

हेझल, कार्ल आणि आर्या या कामासाठी खूप उत्सुक बनले. कार्ल म्हणाला,

"मॅम, आज खरोखर जाणीव झाली की face of america सोडून आम्ही काहीही चूक केली नाही म्हणून. हेच आहे ते, ज्याचा अनुभव आम्हाला हवा होता, काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचं समाधान आम्हाला हवं होतं.."

***

ठरल्याप्रमाणे रितसर राजीनामा देऊन भैरव शब्दांतर पासून वेगळा झाला आणि त्याने अमेरिकेकडे प्रयाण केले. जातांना त्याला आपल्या कंपनीकडे शेवटचं बघावसं सुद्धा वाटलं नाही..आपल्या लोकांना भेटावसं सुद्धा वाटलं नाही..लालच माणसाला किती कृतघ्न करते ना?

(Face of America office)

"वेलकम मिस्टर भैरव, the CEO of the face of America"

तिथल्या वागणुकीने आणि वातावरणाने भैरव भारावून जातो. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की इतकं प्रशस्त आणि मॉडर्न ऑफिसमध्ये आपण मुख्य असू. सर्वजण त्याच्याकडे आदराने बघत होते.

"सो मिस्टर भैरव, ही तुमची केबिन.. आता आजपासून तुम्हाला कंपनीचं सर्व बघायचं आहे, ते काय आणि कसं हे सांगायची गरज नाही..तुम्हाला यातला दांडगा अनुभव आहे..आता कंपनीला वर न्यायचं काम तुमचं.."

मिस्टर रॉन नकळतपणे हे सांगत होते की शब्दांतर मध्ये तनिषा मॅमने जे डोकं वापरलं ते इथे वापर म्हणून. Face of America जोवर तनिषा होती तोवर आलेख वरवर जात होता, जसं तिने ऑफिस सोडलं तसा हा आलेख खपकन कोसळला होता. मिस्टर रॉन यांनी बरेच प्रयत्न करून पाहिले पण कंपनी वर नेण्यासाठी तनिषा द बॉसचाच हात लागायला हवा हे त्यांना कळून चुकलेलं, तनिषा परत येणं शक्य नव्हतं..तनिषा नाही तर त्याची सावलीच सही.. म्हणून आपली माणसं कामाला लावून मिस्टर रॉन यांनी भारतातील त्यांच्या या सावलीला शोधून काढलं होतं.

****

(The real face of America)

"मॅम, खर्चाचं काय? खप जास्त असेल तर परवडेल, पण आपण हे स्टीकी लाईन्स, मर्जीन्स वगैरे जास्तीचं करणार असल्याने खर्च वाढणार आहे.."

"आपल्याला बऱ्याच देणग्या मिळाल्या आहेत, त्यातुन हे करू..किमान 6 महिने आपला खर्च निघेल..त्यानंतर मागणी वाढेल आणि परिणामी नफाही.."

"मॅडम, मी खूप excited आहे या कामासाठी... कधी एकदा वर्तमापत्राचा layout बघतोय असं झालंय मला.." - कार्ल

"खरंच? मग एडिटिंग डिपार्टमेंट हेड तू असशील.."

"मी? मॅडम माझा अनुभव.."

"ते सगळं दुय्यम आहे, काम करण्यासाठी तुझी हीच excitement कामात येईल..याला कायम धगधगत ठेव..कुठलंही काम केवळ करण्यामुळे यशस्वी होत नाही, तर त्या कामामागे आपली आतली आग जेव्हा स्वस्थ बसू देत नाही तेव्हा ते यशस्वी होतं.."

तनिषाने स्टाफला नेमायला सुरवात तर केली, पण सर्वात मोठं आव्हान होतं ते पत्रकार नेमायचं. कुठल्याही घटनेनंतर तिथे पत्रकारांचा लोंढा जमतो, एकच बातमी सर्व पत्रकार छापतात, त्यात वेगळं असं काय? TV वर लवकरात लवकर एखादी बातमी देण्यासाठी चॅनेल्स स्पर्धा करतात..मग वृत्तपत्रांना तेच बघून कॉपी करून लिहायला कितीसा वेळ लागेल? नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल..

*****

तनिषाचे या नव्या कामाला जोमाने सुरवात केली. एकदा आर्या तिच्याकडे आली आणि आजूबाजूला कुणी नाही हे पाहून तिने विचारलं,

"आई, भारतात कधी जातेय?"

"हे कामच संपत नाहीये...जाईन की नाही खात्री वाटत नाहीये"

"आई, असं करू नकोस, माई वाट बघताय तुझी.."

वीर भोसले असो वा मिस्टर रॉन, कुणालाही न घाबरणारी तनिषा माईंचं नाव ऐकताच उठून उभी राहते..

"म..म..माई? काय बोलतील गं आता त्या मला?"

आजीचा असलेला धाक पाहून आर्यालाही हसू आवरत नाही.

"काही नाही बोलणार, तू कर प्लॅन.."

"हो, जाऊनच येते आता.."

"आणि एकदा मेघना मावशीलाही विचार ना, ती सोबत येणार असेल तर?"

"गद्दार माणसांशी संबंध ठेवायचा नाहीये आता.."

"काय? मेघना मावशी?"

"होय..मिस्टर रॉन ला माझ्यापर्यंत पोहोचवायचं आणि इन्व्हेस्टर्स साठी सही करण्याचं काम तिनेच पाहिलं...माझ्या मागे लागून लागून तिने हे सगळं घडवून आणलं.."

"पण कशावरून? कसं कळलं तुला?"

"मागच्या महिन्यात टूर ला गेलेली म्हणे देशाबाहेर..आणि हेही म्हणाली की तिची आई तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्याकडे आलेली..तिचा वाढदिवस पंधरा दिवस आधीच झालेला, जेव्हा ती टूर वर होती..मेघना कॅनडा मध्ये, आणि त्याच वेळात तिची आई तिला इथे अमेरिकेत येऊन भेटते..कसं शक्य आहे? मग मी जरा खोलवर विचार केला..मेघनाने एकदम ओळख वाढवणं, सतत मदत करणं, लोकांशी ओळखी करून देणं... हेच तिचं प्रोफेशन आहे...नव्या स्टार्टअप ची माहिती मिस्टर रॉन यांना द्यायची..."

क्रमशः

🎭 Series Post

View all