टीका आणि विरोध

काही माणसं अशी असतात.....

काही माणसं अशी असतात की ज्यांना त्यांच्या कोणत्याही कृतीवर टीका झालेली अथवा विरोध झालेला आवडत नाही. त्यांना सतत कौतुकाचीच‌ अपेक्षा असते. अशी माणसं अर्थातच कमी असावीत. साधारणपणे अशा लोकांना आपली कामं लोकांनी करावीत असं वाटतं. " मी काही करणार नाही,जे काही करायचं ते लोक करतील." आणि त्यातूनही मी जर काही केलं तर त्यावर टीका करायची नाही किंवा नकारात्मक प्रतिक्रिया द्यायची नाही. ही इच्छा प्रबळ असते.मात्र तसं झालं तर हे लोक अंगावर धावूनही जातात किंवा अतिशय नाराजी दर्शवतात.
हे म्हणजे कसं, कुंडीतल्या रोपट्यासारखं.त्याला जो पर्यंत माती, खत नियमित पाणी देता, तोपर्यंत ते तरारलेलं दिसतं. यातला एक जरी सोपस्कार थांबवला,तरी ते मान टाकायला लागतं. त्यामुळे तेच झाड जंगलात मुक्तपणे आणि टवटवीत दिसतं. तिथे त्याला सगळेच सोपस्कार नियमित न मिळता नैसर्गिकपणे मिळत असतात. कधी ते निरुत्साही दिसतं तर बहरलेलं दिसतं. कारण निसर्गात लाड हा प्रकार निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून असतो. माझ्या पाहण्यात अशी माणसं आहेत,जी परस्पर काम कसं‌ होईल,ते पाहात असतात.
तसाच प्रकार संधीसाधू माणसांचा असतो. "सरशी तिथे पारशी " म्हण आहेच. ( पारशी समाजाबद्दल कोणताही पूर्वग्रह नाही. केवळ म्हणीचा वापर समजावा. )फक्त निरीक्षण करतात. कोणत्याही झगड्यात कोण जिंकतो, हे पाहात राहतात. म्हणजे जिंकलेल्या माणसाच्या बाजूला जाऊन उभं राहिलं तरी काही ना काही फायदा होतोच. तोही विनासायास. चपखल उदाहरण व ओळख देत नाही कारण लगेच असे लोक नाराज होतील. अर्थात ते प्रतिक्रिया देणार नाहीत, कारण त्यासाठीही काहीतरी करावं लागतं. असे लोक नेहमीच दुसऱ्याच्या आधाराने जगतात.

अरूण कोर्डे
©®