पांडव - fantastic five⭐
भाग ५३
भाग ५३
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
मिराचे मोहन आणि अग्नेय मधील नाते सुधारण्याचे नकळत केलेले प्रयत्न.
टीम पांडवने केलेला माधवचा पाठलाग.
अम्माच्या वाड्यावरची मेजवानी.
रंगलेला आंधळी कोशिंबीरीचा खेळ.
थोड अंतर गेली नसेल, तेवढ्यात मागून रावणचा आवाज आला, " डेंजर."
पण काही उपयोग झाला नाही, त्याला आवाज द्यायला उशीर झाला होता. ती समोरच्या दगडाला अडखळून धडपडली.
आता ही तोंडावर पडणार म्हणून सगळीच जण घाबरली.
सांज नेही कापडी पट्टीच्या आत डोळे गच्च मिटून घेतले; पण ती पडली नाही.
तिला दोन मजबूत बाजूंनी आपल्या कवेत सावरलं.
सावरताना त्यांची मिठी नकळतच घट्ट झाली. त्या दोघांनाही कळलं नाही.
_______________________________________________________
आता पुढे -
थोड्या वेळापूर्वी दगडाला शिव्या घालणारी ती, पडली नाही म्हणून देवाचे आणि तिला सावरणाऱ्याचे आभार मनातल्या मनात मानत होती.
सगळ्यांनी तिला पाहून रोखलेला श्वास सोडला.
पण मिठी मात्र अजूनही तशीच होती.
त्याने ती सावरली आहे असे कळताच स्वतः दूर व्हायचा प्रयत्न केला; तरी तो जाऊ शकला नाही.
तिने अजूनही आपली पकड तशीच ठेवली होती.
\" कसला हा अनुभव आहे. हा स्पर्श मला ओळखीचा वाटतोय. पण हा बडी नाही आहे, ना हा ओ एम जी आहे, ना रावण, ना माधव. मग कोण आहे?स्वामी? आणि महत्त्वाचं म्हणजे याचा स्पर्श मला ओळखीचा का वाटतोय? काही असो आपण हा विचार नंतर करुया. त्याच्यापासून लांब व्हायला हवं. त्याशिवाय तो कोण आहे हे कळणार कसं?\"
डोक्याला सूचना पोहचत होत्या, शरीर मात्र साथ देत नव्हतं. तिने अथक प्रयासाने स्वतःला त्याच्यापासून दूर केलं.
दूर होऊनही तिने डोळ्यांची पट्टी काढली नव्हती. तिच्या अश्या प्रतिसादाला घाबरलेले सगळे तिच्या अवतीभवती गोळा झाले.
नंदूने तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली.
तशी तिने डोळे हाताने झाकले. अचानक सगळ्या आठवणी डोक्यात उतरू पाहत होत्या.
"संयु, काय ग? काय झालं?" देवेश घाबरून तिच्याजवळ गेला.
"...." ती मंद हसली. हाताने \" आय एम ओके.\" सांगत तिने सगळ्यांवर नजर फिरवली.
सगळ्यांचे चिंतातुर चेहरे पाहून तिने स्वतःला सावरलं.
" अरे असे काय बघताय? चला खेळ थांबलाय खेळूया." तिने असं म्हणताच सगळे एकमेकांचे चेहरे पाहू लागले.
" आता कोण आउट झालं?" तिला जाणून घ्यायचं होतं; की ती व्यक्ती कोण होती; जिच्या मजबूत हातांनी तिला सावरले होते.
"पुरे!!! कोणी खेळ नका आता." एक खणखणीत आवाज आला.
" असं काय करते अम्मा? आता तर खेळायला सुरुवात केली ना?" रेणू आणि बाकीच्या लहान मुलांनी एकच स्वर लावला.
" ते काही नाही, संध्याकाळ होत आली आहे. दिवा बत्ती, शुभं करोति सगळं राहिलं आहे. चला आत पळा." अम्मानी असं सांगताच काही मुलं मान खाली घालून वाड्यात गेली. काही मुलं आजूबाजूच्या घरात गेली.
" ही सगळी एकत्र नाही राहतं?"रावणने कुतूहलाने विचारलं.
" नाही. अम्माच्या वाड्यात फक्त तिच मुलं राहतात ज्यांना अजून कोणाचा आधार नाही मिळाला. ही जी आजूबाजूची घर आहेत त्यातली कुटुंब ही अम्माच्या आश्रयाला आली आणि इथेच घर बांधून राहू लागली." माधव बोलतं होता तसं अम्माने त्याला थांबवलं.
"चला सगळे आत बसू. मग मी सांगते तुम्हाला सगळं. नाहीतर हा माझ्या महानतेचे मनोरे रचून, इथेच माझ्या पुतळ्याला हार घालील. चला." अम्मा हसली; पण सगळे मात्र तिच्याकडे कौतुकाने बघत होते.
ती आत जायला वळणार तोच तिची नजर अग्नेयवर पडली.
" ???? अग्नेय ??? ना तू???" अम्माने असं विचारताच त्याला आश्चर्य वाटलं. मानेनेच हो म्हणतं तो तिच्या पाया पडला.
" तुम्ही कसं ओळखलं?" अग्नेयने विचारलं तसा मागून सगळ्या टीमचा एकसुरात आवाज आला.
"आपण तिला आता ओळखतोय; पण ती आपल्याला या माधव इतकीच ओळखते." त्यांचं स्पष्टीकरण ऐकून हशा पिकला.
रावणने माधवच्या डोक्यावर टपली मारली.
सगळे वाड्यात आले, तसे अम्मा तिच्या जागेवर बसताच सगळे सभोवती बसले.
" अम्मा, सांगा ना?"
" सांगते, सांगते, तर त्याचं झालं असं, मी जेव्हा जन्माला आले तेव्हा घरात खूप खूप आनंद झाला. त्याकाळी घरात मुलगा जन्माला येणं म्हणजे सुवर्ण योग. मला कुठे ठेवू अन् कुठे नको, असं झालं होतं सगळ्यांना. या आनंदात त्यांनी माझं नाव आनंद ठेवलं. पण हा आनंद आणि माझं नाव फार काळ टिकलं नाही. कोणी अज्ञात ज्योतिषाने घरात भविष्यवाणी केली; की मी मोठा होऊन एक तृतीयपंथी बनेन. या भविष्याची सत्यता न पडताळता, मागचा पुढचा कोणताही विचार न करता. त्यांनी मला या समाजाला द्यायचं ठरवलं. माझं खराब नशीब फक्त एका बाबतीत चांगलं निघालं; की तेव्हा माझी आणि गुरू माऊलींची भेट झाली. आता मला माझ्या आईबाबांच नावं, ते कसे दिसतात हे, काही आठवत नाही. गुरू माऊली हीच माझा बाप आणि तिचं आई." अम्मानी डोळ्याला पदर लावला.
"गुरू माऊलींच्या हे लक्षात यायला वेळ लागला; की मी एक तृतीयपंथी नाही आहे. तोपर्यंत माझे सगळे वागणे बदलले होते. जेव्हा मी सजाण झाले, तेव्हा माझ्याही ते लक्षात आले; पण वेळ निघून गेली होती. मी गुरू माउलींना सगळी गोष्ट सांगितली. मला वाटलं होतं, माझीच काही तरी चूक होत असेल मीच वाईट असेन. माझ्या अंगात……" एक दीर्घ श्वास घेतला अम्मानी आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली," काय घडतं होतं माझं मलाच कळत नव्हतं. तेव्हा हा सगळा माझा जन्म इतिहास मला गुरुमाऊलीनी सांगितला. माझी माफी ही मागितली. त्याची गरज तेव्हा नव्हती म्हणा. माझा मात्र तेव्हा दृढ निश्चय झाला. माझ्याबरोबर जे झालं ते इतर कोणाबरोबर ही होऊ द्यायचं नाही आणि ज्यांना कोणी नाही त्या सगळ्यांसाठी उभं राहायचं."
माधवने अम्माना एका बाजूने मिठी मारली.
" माझी आणि अम्माची कथा काही वेगळी नाही. फरक एवढाच आहे; की अम्माला आधी या सगळ्याचा अनुभव होता; म्हणून तिने माझं माधव हे अस्तित्त्व कायम ठेवलं. आज माझं आयुष्य हे अम्माचे आहे."
"नाही माधव, तू तृतीयपंथी असतास, तर मी तुला योग्य मार्गदर्शन केले असतेच; पण तुझं जे अस्तित्व आहे, ते तुला जगू देणं, हे काही तुझ्यावर उपकार नव्हेत. मी फक्त तुला माझ्या अनुभवामुळे योग्यवेळी योग्य मदत करण्याचं एक माध्यम बनले." अम्मानी माधवच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.
"हो. अम्माने सगळ्या प्रकारच्या पीडितांना आसरा दिला आहे. भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, बलात्कारित, एसिड अटॅक पीडित, ॲक्सिडेंट मध्ये सापडलेले. ही सगळी तिचं लोक आहेत जी आज एकमेकांचा आधार बनली आहेत आणि अम्मा आमची आधारस्तंभ." माधव अम्माच्या मांडीवर डोकं ठेवून भारवून बोलतं होता.
क्रमशः
©® स्वर्णा.
_______________________________________________________
गोष्ट त्या दोघांची पर्व २ नक्की वाचा आणि भरघोस प्रतिसाद नोंदवा. तुमचा मिळणारा प्रतिसाद हाच कथेची गाडी पुढे नेणार इंधन ठरेल. प्रतिसाद नोंदवताना कृपया विशेष टीप लक्षात घ्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा