पांडव भाग ३५

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ३५


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले - तिरुपतीला बुलेट लागल्यामुळे तो हॉस्पिटल मध्ये होता. त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. सगळ्यांनी पुन्हा केस वर काम करायला सुरुवात केली आहे. ज्युलिया आणि अग्नेयच्या स्पॉट विझिटमुळे डी प्लस पॉइंट पूर्ण सील केला गेला.

सांज आणि तिरुपतीला एक छोटा पण महत्त्वाचा क्लू सापडला आहे.

माधव आणि रावणने चैत्रा बेणेच्या घरी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यात सगळ्यांच्या भुवया चित्रगुप्त शास्त्री याचे नावं ऐकून उंचावल्या.


रणछोड आणि मीरा खूपच भावूक क्षण आणि तेव्हाच अग्नेयच्या एन्ट्रीने सगळं स्तब्ध झाले.

आता पुढे-

ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


(वर्तमान काळ)


तो तिच्याशी बोलण्याचा पुन्हा प्रयत्न करत होता तेवढ्यात…..


काही क्षणातच अग्नेय त्या दोघांच्या मध्ये एका अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला.

"हाऊ डेयर यू?????" अग्नेयचा स्वर रागात थरथरत होता.


"हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी फक्त त्यांना जेवायला चला असे सांगत होतो." रणछोडने सावध पवित्रा घेतला.

"........" अग्नेयने रागात फणफणत त्याच्याकडे आग ओकणाऱ्या डोळ्यांनी पाहिले.


तो काही बोलणार तेवढ्यात त्याला मागे शर्टला बिथरलेल्या मिराचा स्पर्श झाला.
त्याच्यासाठी ती जास्त महत्त्वाची होती. सगळ्यात जास्त त्याच्या जिवाच्या पलीकडे.


त्या अवस्थेतच तिला पाठमोरा असताना त्याने क्षणभर डोळे मिटले. स्वतःला शांत करून तो मिराकडे डोळे मिटूनच वळला.


अलगद डोळे उघडून त्याने मीराकडे पाहिले.

"तु, ठीक आहेस ना?" स्वरातली काळजी प्रत्येक कृतीतून वाहत होती.

"हो. मी ठीक आहे. मला फक्त आता एवढ्यात जेवायचं नाही. असं मी यांना सांगत होते; पण ते माझं ऐकायलाच तयार नाहीत. थँक्यू. तू मध्ये येऊन त्यांना थांबवले." ती एवढं बोलून तिथून जाऊ लागली.


अग्नेयने तिचा हात मागून धरला. तशी ती थांबली आणि प्रश्नार्थक अनोळखी नजरेने त्याला पाहू लागली.

"तुला काही मदत हवी आहे का? तसं असेल तर रिसेप्शन वरुन घे. मला ना इथलं जास्त काही माहित नाही. मी इथे नवीन आली आहे." त्याच्या हातातून हात सोडवून घेत मीरा म्हणाली आणि मागे वळून पेशंट वॉर्डच्या दिशेने निघाली.



सोबत मला नसताना कुणाची
कठीण आयुष्य मी जगले.
आता सवय तुम्हीही करून घ्या
वाट पाहून मीही होते थकले.



हे दोघेही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिथेच उभे होते.


ती दिसेनाशी झाली तसा अग्नेय चवताळून मागे वळला. रागाने लालबुंद होऊन त्याने रणछोडचा गळा पकडला.


अग्नेयचा आवेग एवढा होता; की आता रणछोडचा श्वास कोंडू लागला होता.


कोणीतरी हा सगळा प्रकार धावत जाऊन डॉक्टर लोबोंच्या कानावर आधीच घातला असल्यामुळे ते तिथे तातडीने आले आणि त्यांनी अग्नेयला रणछोडपासून वेगळं केलं.

रणछोड वेगाने खोकायला लागला. त्याचा श्वास पूर्ववत करण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावा लागला.

"काय करतोयस तू हे? तुझं डोकं ठिकाणावर आहे का?" डॉ. लोबो अग्नेयवर डाफरले. जो अजूनही रागाच्या भरात रणछोडच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता.


"हाऊ डेअर ही? तुम्हाला माहित आहे आता इथे काय घडलं? हिंमतच कशी होते कोणाचीही? तिच्याजवळ जायची." अग्नेय अजूनही धुसफूस करत बोलत होता.


"अह!!! अह!!! मला ही काही हौस नाही आहे. त्यांच्याजवळ जायची. डॉ. लोबोनी विनंती केली म्हणून मी गेलो. तसं ही मी या सगळ्याला तयार नव्हतो. त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, म्हणून मी हे सगळं नाटकं करायला तयार झालो." रणछोड वैतागत म्हणाला आणि त्या दोघांकडे पाठ फिरवून आपल्या खोलीकडे निघूनही गेला.


आता मात्र अग्नेय रागात डॉ. लोबोकडे बघत होता.

"हो. तो खरं बोलला. तू केबिन मध्ये चल. मी तुला सगळं समजावून सांगतो." डॉ. लोबो एवढं बोलून त्यांच्या केबिनच्या दिशेने निघाले.



_______________________________________________________


ठिकाण: डॉक्टर लोबोंच केबिन.


"म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. त्या व्यक्तीला माझ्या आईपासून दूर ठेवा. तो ……!!!!!" अग्नेय रागात त्याच्या नावाप्रमाणे आग ओकत धुसपुस करत होता.


"काय केलं त्याने? तू ना अग्नेय, ओव्हर रियाक्ट होतं आहेस." डॉ. लोबो समोरचे कागदपत्र उगीचच चाळत म्हणाले.

"काय केलं????? म्हणजे त्याने काही करायची वाट बघायची का आपण? तो त्याच्या सारखा दिसतो हे पुरेस कारण नाही आहे का?" अग्नेय निखाऱ्याप्रमाणे लालबुंद झाला होता.

" फक्त तो मोहन सारखा दिसतो, हे एकच कारण त्याच्यावर संशय घ्यायला सध्यातरी आपल्याकडे आहे." वैतागून डॉ. लोबोंचा ही आवाज जरा चढलाच.

"आणि तो तोच असला तर?" अग्नेयने रागात मुठी वळल्या.


"तर तर काय वाईट आहे? तो आल्यापासून मिराची तब्येत स्थिर आहे. रादर तो आमची मदतच करत आहे आणि या सगळ्या जर तरच्या गोष्टी कराच कशाला? मी तर म्हणतो आपण सरळ डीएनए टेस्ट करूया." डॉ. लोबोनी त्याच्या चेहऱ्याचा अंदाज घेतला.


"डू व्हॉट एवर यू वॉन्ट; पण एक लक्षात ठेवा. यातून तिला त्रास नाही झाला पाहिजे." तो पाय आपटत निघून गेला.



_______________________________________________________



सकाळी गाडी स्टार्ट करत असताना सांजच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली फोन हातात घेऊन तिने मेसेज वाचला आणि गाडी गेटच्या बाहेर काढली.


_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर


पार्किंग एरिया मध्ये गाडी पार्क करत असताना सांजला नंदू दिसला.

"हे बडी, गुड मॉर्निंग."

" हाय डार्लिंग, गुड मॉर्निंग. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. बरं झालं, तू आता भेटलीस. आपण कॅन्टीनमध्ये बसून बोलूया." नंदूने असं म्हणताच ते दोघेही कॅंटीनच्या दिशेने निघाले.


_______________________________________________________

ठिकाण: कॅन्टीन सीबीआय.


"बोल रे. कश्याविषयी बोलायचं आहे तुला?" टेबलासमोरची खुर्ची ओढून बसत सांज म्हणाली.

"काल जे काही घडलं त्याच्याबद्दल…." नंदू पहिल्यांदाच इतका बोलताना संकोचला.

"हां. पण त्याविषयी काय बोलायचं. आपलं हे आयुष्यच असं जीवावर उदार झालेलं. एका क्षणाला हुरहूर लागते खरी; पण त्याचं वेळी घेतलेली शपथ आठवते.
\"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\" " ती बोलत असताना, तिला मधेच थांबवून नंदू म्हणाला,

"मी \" चित्रगुप्त शास्त्री \" बद्दल बोलतोय. \"देवेश तिरुपती \" बद्दल नाही." त्याने चित्रगुप्त शास्त्रीच्या नावावर जोर दिला.

तशी ती गूढ हसली.

"तू हसतेस?? याचा काय अर्थ झाला?? मी इथे कालपासून काळजीत आहे आणि तू फक्त हसतेस???" आता मात्र नंदूच्या आवाजात राग आणि काळजी दोन्ही होते.

ती काही बोलणार तेवढ्यात,


"मॅम आणि सर, तुम्हां दोघांना तिरुपती सरांनी बोलावलं आहे." एक माणूस त्या दोघांना बोलवायला आला.

"हो. आलोच." सांजने त्या माणसाला सांगून ती नंदूकडे वळली, "चल आधी खुरापाती काय म्हणतोय ते बघून येऊ. बाकीचं नंतर बोलूच. नाहीतरी काल पासून टाळतोय तो आपल्याला. आतातरी बघू या साहेब बोलतायत का?" सांज हसली आणि जागेवरून उठतं नंदूचा हात धरून त्याला ओढत घेऊन गेली.

_______________________________________________________


ठिकाण: पांडवांची डिस्कशन रूम.


सांजने डिस्कशन रूमचा दरवाजा ढकलला. ती आणि नंदू आत आले तेव्हा आतमध्ये आधीच आठ जण बसले होते.

उर्वरित टीम मेंबर सोबत एक नवीन मुलगा आणि एक मुलगी सुद्धा पाठमोरे बसले होते.

जसे नंदू आणि सांज त्या नवीन दोघांना ओलांडून पुढे जाऊन वळले असता यांचा चेहरा त्यांच्या समोर आला.

"हाय डियर." चित्रगुप्तने सांजला डोळा मारला आणि हात हलवून अभिवादन केले.

"हीच ती माझी मानलेली बहीण जिच्याबद्दल आपण काल रात्री बोललो होतो." सांजने त्याच्या अभिवादनाला हातानेच प्रतिसाद देताच पुढे तो बोलू लागला.

"ताई, मी काल तुला बोललो नव्हतो; की माझी प्रेयसी एक सुपर कॉप आहे. ती आपल्याला योग्य मदत करेल. ती हीच." बोलता बोलता चित्रगुप्त जाग्यावरून उठला आणि सांजच्या जवळ तिच्या पाठी उभा राहिला. "चैत्रा ताई, ही सांज. सांज अय्यर. सीबीआय ऑफिसर आणि माझी पहिली आणि शेवटची एकमेव प्रेयसी."
\" प्रेयसी \" हा शब्द त्याच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा उमटवत होते. सांजने त्याच्याकडे जरा रागाने बघताच तो वरमला," ओके. ओके. मैत्रीण आहे जिला मी प्रेयसी बनवू इच्छितो. आता ठीक आहे."त्याने ॲप्रुवलसाठी सांज कडे बघितले. तिने \" याच काही होऊ शकत नाही. \" अश्या आविर्भावात त्याच्याकडे पाहिले. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे म्हणाला, "डियर, ही चैत्रा ताई. हिला तुझी मदत हवी आहे."

त्या दोघींनी पुन्हा एकदा एकमेकांना अभिवादन केले.


आता मात्र या तिघांच्या व्यतिरिक्त इतर सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

"यांची बॉडीची ओळख करून झाली का?" सांजने रावणला विचारले.

त्याने नजरेनेच होकार दिला.

सांजने चैत्राकडे पाहताच चैत्रा बोलू लागली.

"हो, तो माणूस तोच आहे. जो माझा त्यादिवशी पाठलाग करत होता.मी त्याचा चेहरा विसरू शकत नाही. दादामुळे मी वाचले." तिने कृतकृत्य भावाने चित्रगुप्तकडे पाहिले. "तुम्हाला वाटतं असेल; की मी या माझ्यापेक्षा लहान मुलाला दादा का म्हणते? खरंच त्यादिवशी तो मोठ्या भावासारखा धावून आला माझ्यासाठी. नाहीतर आज तुम्ही माझी बॉडी ओळखायला कोणाला तरी इथे बोलावल असतं." तिचा रुमाल डोळ्यांना लागला. आपसूकच चित्रगुप्तचा हात तिच्या खांद्यावर विसावला. त्याच्याही पापण्या ओलावल्या होत्या.


"डियर. आता ताईने ओळखली ना, डेड बॉडी. मग तिला आता पुन्हा इथे नको ना यायला. हां तशी ती येईल ही तुला भेटायला. शेवटी आता माझ्या लग्नाची बोलणी तिलाच तर करावी लागतील तुझ्या बरोबर. हो ना ताई." चित्रगुप्त मस्करीच्या स्वरात चैत्राला म्हणाला. वातावरण हलकं करायचा त्याचा प्रयत्न सफल झाला. चैत्रा डोळे फुसत हसली, तर सांजने त्याच्यावर डोळे वटारले.

"तुम्हाला आता लगेच नको यायला; पण केस सॉल्व होतं नाही, तोपर्यंत शहर सोडून कुठेही जाऊ नका आणि तशीच गरज वाटली तर तुम्हाला परत चौकशी साठी बोलावू. तुम्हाला काही माहिती मिळाली तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा." असं म्हणत सांजने तिचं विझिटिंग कार्ड पुढे केलं.


"मी देतो ना तिला तुझा नो. माझ्याकडे सेव्ह आहे ना." चैत्राला कार्ड घेताना बघून चित्रगुप्त म्हणाला आणि बोलता बोलता त्याने मोबाईल मधला नो. सांजला दाखवला.

सांज तिचं सेव्ह केलेलं नाव निरखून बघेपर्यंत त्याने तो लगेच स्वतःकडे घेतला.

"बघितला ना! बसं." त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.

" तू माझा नो. काय म्हणून सेव्ह केला आहेस?" सांजने डोळे बारीक करत विचारले.

"काय म्हणजे काय??? चल ताई, आपण इथे राहायला थोडीच आलोय. मला तुला घरी सोडून माझ्या पार्ट टाईम जॉब वर जायचं आहे. तू काय बोलत राहिलीस. सांज काय आपल्याकडेच येणारं आहे ना. तेव्हा गप्पा मारा हव्या तेवढ्या." त्याने सांजच्या प्रश्नाचं उत्तर टाळण्यासाठी तिथून पळ काढला.

नंदू आणि बाकीचे सर्व टीम मेंबर ह्या सगळ्या प्रकाराचे बारकाईने निरीक्षण करत होते.


चित्रगुप्त आणि चैत्रा गेले. तश्या त्या सगळ्यांच्या नजरा सांजवर रोखल्या.


"काल रात्री त्याने मला फोन करून सगळा प्रकार सांगितला आणि तो चैत्रा बरोबर येणार म्हणून सांगितलं. सकाळी ते दोघे निघाल्याचा मेसेज सुद्धा त्याने मला केला होता." सांज जसं जसं सांगत होती तसतशा नंदूच्या कपाळावर आठ्या निर्माण होतं होत्या.

"हे तू आम्हाला फार लवकर सांगितलं असं नाही वाटत का तुला?" तिरुपतीने असं विचारताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर सेम प्रश्न होता.


"....." सांज काही बोलणारच होती तेवढ्यात नंदू रागाने तिथून निघून गेला.


_______________________________________________________



क्रमशः

©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट च्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.


🎭 Series Post

View all