पांडव भाग ३०

The Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ३०


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक आशेचा किरण दिसला. त्याचा आधार घेऊन इनवेस्टीगेशन पुढे सरकत होते. माधव आणि रावण त्या व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या मुलीची माहिती काढायला निघून गेले. अग्नेय आणि ज्युलिया डी प्लस पॉइंटच्या गुप्त रहस्याचा माग काढत आहेत. तिरुपती आणि सांज पोलीस स्टेशनला भेट देऊन काही माहिती मिळते का ते पाहतात.

मीराला रणछोड \" मोहन \" बनून भेटतो; की तोच खरा मोहन आहे? हा प्रश्न लोबोंना ही पडलाय.




आता पुढे -

ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.



तिचा हातातला हात चादरीखाली अलगद ठेवून तो उठला. खोलीतला पंखा सुरू करून, लाईट बंद केली आणि तो बाहेर निघून गेला.


काही अंतर चालला नसेल त्याच्या खांद्यावर हात विसावला.


"रणछोड."

हाक ऐकून तो मागे वळला.

समोर डॉ. लोबो उभे होते. डोळ्यात अगणित प्रश्न घेऊन.


"हां सर बोला." शांत चेहऱ्याने डॉ. लोबोंच्या डोळ्यात पाहत रणछोड डॉक्टरांच्या बोलण्याची वाट पहात उभा राहिला.


\" जेव्हा मी पहिल्यांदा याला बघितलं तेव्हा माझ्या ही लक्षात आलं होतं; त्याचं कारणामुळे मी खूप कसून, जातीने स्वतः लक्ष घालून याची सगळी चौकशी केली होती. अग्नेय सुद्धा याचं कारणामुळे चलबिचल झाला होता.


याचा आणि मोहनचा चेहरा हुबेहूब जुळतो; म्हणून अजूनही याच्यावर मी बारीक लक्ष ठेवून आहे. कामाच्या व्यापातून वेळ न मिळाल्याने अग्नेय हल्ली इकडे येत नाही. नाही तर त्याला कंट्रोल करणं मला अशक्य झालं असतं.\"

बराच वेळ डॉक्टर काही न बोलता नुसते बघत उभे आहेत, हे पाहून रणछोड गडबडला.


"काय झालं डॉ.? तुम्ही काहीच का बोलत नाहीत? माझं काही चुकलं का? मला क्षमा करा. " तो मनापासून डॉक्टरांची माफी मागू लागला.


"नाही. तुझ काहीच चुकलं नाही. तुला मी सांगितलं तसचं तू वागलास." डॉ. लोबो म्हणाले.


_________________________________________________________


काही वेळापूर्वी………

ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.

"सॉरी, डॉक्टर हे मला शक्य नाही." रणछोड अस्वस्थ होऊन म्हणाला.


"मी समजू शकतो. तुला हे सगळं अवघड वाटतं असेल; पण अरे तिचा जीव धोक्यात आहे रे." डॉ. लोबो हताश होऊन म्हणाले.

" डॉक्टर, तो तर नंतर ही असेल. जेव्हा त्यांना खरं काय ते कळेल. तो धोका त्यांच्यासाठी फार मोठा असू शकतो. नाही. मी अस काही करणार नाही आहे. तुम्हाला वाटतं असेल तर मी हे सेंटर सोडून जातो." त्याचा विरोध काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नव्हता. तो उठून उभा राहिला आणि दाराकडे तोंड करून चालू लागला.


"ठीक आहे. तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस. फार फार तर काय होईल. तुझ्या जाण्याने मीरा पूर्ण शॉक मध्ये जाईल. जशी तुझी इच्छा." डॉ.लोबोनी शेवटचा प्रयत्न केला.

त्याची डॉक्टरांच्या केबिनच्या दाराकडे जाणारी पावले तिथेच थबकली.


"ओके. मी करेन तुम्ही सांगाल ते आणि तसे." त्याने डॉक्टरांकडे पाठ करूनच आपली संमती दर्शवली.


_______________________________________________________




ठिकाण: त्या व्हिडिओ मधील मुलीचे ऑफिस.


"एक्सक्युझ मी." माधव रिसेप्शन काउंटर जवळ जाऊन म्हणाला.


"येस. हाऊ कॅन आय हेल्प यू?" रेखीव पण मोजका मेकअप केलेली रिसेप्शनिस्ट त्याला म्हणाली.


"हिला आपण ओळखता का?" त्याने त्याच्या मोबाईल मध्ये घेतलेला व्हिडिओचा घेतलेला स्क्रीनशॉट दाखवला.

"हो. ही इथेच काम करत होती." त्या मुलीने तुटकपणे माहिती दिली.

"नाव काय हीच?" माधवच्या या प्रश्नावर मात्र तिच्या चेहऱ्यावर आठ्यांचे जाळे पसरले.

\" किती प्रश्न विचारत आहेत? \" ती त्यांच्याकडे संशयाने बघत काही बोलणार एवढ्यात रावणने तिला आपले आयकार्ड दाखवले.


"सीबीआय ऑफिसर, शांताराम पाटील." तिला दाखवून त्याने ते कार्ड पुन्हा खिश्यात ठेवले.


"चैत्रा बेणे. ती एक कॉल रीप्रेझेंटेंटीव्ह होती; पण काही दिवसांपूर्वीच तिने हा जॉब सोडला." ती धडाधड माहिती देऊ लागली. तसा माधव गालात हसत ऐकत उभा होता.


"तिचा ॲड्रेस, मोबाईल नंबर वैगरे काही मिळेल का?" शांतारामने माधवला एक लूक दिला आणि पुन्हा त्या रिसेप्शनिस्ट कडे वळून विचारू लागला.

"येस सर." तिने लगेच एका नोट पॅडवर सगळी माहिती खरडून त्याला दिली. खरडून म्हणायचं कारण; की तिला मनातून भीती वाटत होती. हे दोघे कधी एकदा जातात असे झाले तिला. यात तिचा किंवा यां दोघांचा काही दोष नव्हता. सामान्य माणूस पोलिसांनाच इतकं घाबरतो. हे दोघे तर सीबीआय ऑफिसर्स होते.???


"थँक्यू." माधवने तो पेपर ताब्यात घेतला.


_______________________________________________________


माधव आणि रावण पेपर घेऊन निघाले.

"चल, तिच्या घरी जाऊ, जेणेकरून आपल्याला तिची सध्याची कंडीशन कळेल." रावणच्या म्हणण्याला माधवने दुजोरा दिला.


_______________________________________________________



ठिकाण: त्या मुलीचे घर.


रावण आणि माधव काही ठिकाणी पता विचारत विचारत एका चाळी समोर येऊन उभे राहिले. चाळीची इमारत तशी जुनी होती. हल्लीच डागडुजी झाल्यासारखी दिसत होती. खाली क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना विचारलं असता त्यांनी एका दरवाज्याकडे बोट दाखवले.


दोघेही त्या दिशेने निघाले खरे; पण रावणची पावले जरा पुढे जाऊन जागीच थांबली.

सोबत पडणाऱ्या पावलांची जाग नाही म्हणताच दोन - चार पावलं पुढे गेलेला माधव जागीच मागे वळला.


"काय रे? असा का थांबलास?"


"मला कसं तरी होतंय रे." रावणने असं म्हणताच सगळा प्रकार माधवच्या लक्षात आला.

" तिला काही झालं नसणार तू नको काळजी करू. आपल्या मनात तिच्यासाठी चांगले विचार ठेवू, जे काही असेल ते तिच्यासाठी चांगलं असेल."माधवने त्याची समजूत काढली.
त्याचबरोबर स्वतःचा ही सगळा धीर एकवटून घेतला.


"कधी कधी तू खूप समजूतदार वागतोस." रावणने त्याच्या पाठीवर थाप मारली.


"तू मात्र नेहमीच माझी हाडं मोडतोस." पाठ चोळण्याच नाटक करत वातावरण हलकं करण्यासाठी माधव बोलला आणि दाराच्या दिशेने रावणला पुढे ढकलून त्याच्या मागून निघाला.


\" हो. मी दार ठोठावेन आणि हा मागून गायब असेल. त्यापेक्षा माझ्या पुढे चालतोय ते बरं\" मनातच स्वतःच्या विचारांवर हसत माधव रावणच्या मागे चालू लागला.


दारावरची कडी वाजवताना दोघांचेही मन मात्र \" ती सुखरूप असावी.\" असा धावा करत होते.

एका क्षणाला असेही वाटून गेले की; हा दरवाजा बंद रहावा.

दाराचं बिजागर जुनं असावं, दार उघडताना करकरल.

समोर एक चाशमिश एकशिवडी मुलगा उभा होता. त्याने रावणकडे अनोळखी भावाने पाहिले.


" कोण आहे रे दादा?" दारातल्या मुलाने मागे वळून आत पाहिले. तोपर्यंत आतून एक मुलगी दारापर्यंत आली. रावण आणि माधव दोघेही दारात उभे होते.

"चैत्रा बेणे?" माधवने विचारताच तिने मानेनेच होकार दिला आणि त्यांना आत येण्यासाठी सुचवले.


आत जाताना माधव त्या मुलाकडे एकटक पाहत होता. त्या मुलाला माधवच्या अश्या बघण्याने अस्वस्थ वाटू लागले.

रावणने त्याला कोपर टोचले आणि \" असा काय बघतोयस?\" नजरेनेच विचारले.

माधवने मानेनेच काही नाही म्हणून सांगितले.

" कोण आपण? काय काम होतं?" चैत्राने विचारताच रावणने स्वतःची ओळख आणि तिथे येण्या मागचं कारण तिला समजावून सांगायला सुरुवात केली.

ते दोघे बोलत होते. रावणने सगळी गोष्ट तिला व्यवस्थित सांगत होता. तिला त्याने काही प्रश्न ही विचारले.

ते बोलत असताना माधवचे मात्र काहीतरी वेगळेच सुरू होते. राहून राहून त्याची नजर त्या मुलावर जात होती. ज्याला चैत्राने दादा म्हटले.

\" मी याला कुठेतरी पाहिले आहे; पण कुठे?\" या विचारातच माधव अडकला असताना रावणने मात्र त्या मुलीबरोबरचे बोलणे पूर्ण करून तिचा निरोप घ्यायला उठला.


"चला आम्ही येतो. काही लागल्यास तुम्हाला पुन्हा जरा तसदी देऊच. माझं कार्ड मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हीही काही माहिती मिळाल्यास आम्हाला संपर्क करा." रावण दाराच्या दिशेने जायला निघाला.


"माधव, चलायचं ना?" रावणने शून्यात नजर लावुन बसल्यासारख बसलेल्या माधवला म्हणाला.


"आं? हां? चल निघू. ओके मिस बेणे. येतो आम्ही." माधवने ही तिचा निरोप घेतला.


चाळीतून बाहेर पडताना सुद्धा माधव विचारत गढला होता.


"आठवला?" माधव जोरात ओरडला तसं रावणाने त्याच्याकडे पाहून \" कोण \" म्हणून भुवया उंचावल्या.


"चित्रगुप्त शास्त्री." माधवने असं म्हणताच रावणचे ही डोळे विस्फारले.


_______________________________________________________


.क्रमशः

©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा


🎭 Series Post

View all