पांडव भाग २६

The Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग २६


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
\" किलिंग इज हिलींग \" केसमध्ये म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. यावेळी पांडवना तोडीस तोड प्रतिस्पर्धी मिळाला होता. पांडव आणि इतर तिघांना खूप मेहनत घ्यावी लागणार होती.



आता पुढे -

ठिकाण - सीबीआय हेड क्वार्टर


गाड्या पार्किंगच्या बाहेर निघाल्या.


सांजने नेहमीप्रमाणे गेटजवळ येऊन ते उघडण्यासाठी हॉर्न वाजवला. गेट हळूहळू उघडत होतं. सांजने गाडी हॉर्न वाजल्यावर बंद केलेली गाडी स्टार्ट केली आणि उघडणाऱ्या गेटवर नजर रोखली.


उघडणाऱ्या गेट मधून पाठमोरी आकृती दिसू लागली. जसा गाडीचा आवाज आला, ती व्यक्ती वळली आणि सांजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.


"चित्रगुप्त शास्त्री?"

तिने गाडी गेटच्या बाहेर घेतली. तिची गाडी बाहेर येताच गेट बंद झाले. तशी तिने गाडी रस्त्याच्या एका बाजूला थांबवली. गाडीचा दरवाजा उघडणार. एवढ्यात तो तिला दरवाजा उघडू न देता त्याचं बाजूने दारासमोर येऊन उभा राहिला.


"मला लिफ्ट मिळेल का?" त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.

" लिफ्ट?" सांज अजूनही गोंधळलेली होती. त्या गोंधळातच तिने डोअर लॉक ओपन केलं आणि तो गाडीत येऊन बसला ही.

आता ती गाडीत तिच्या शेजारी बसलेल्या त्याच्याकडे वळून आश्चर्याने पाहत होती.

"मला कळेल का? हा नक्की काय प्रकार आहे? तू कॉलेजला न जाता संपूर्ण दिवस माझ्या ऑफिसच्या बाहेर उभा होतास का? मला हे अजिबात आवडलेल नाही." प्रत्येक प्रश्नाबरोबर तिच्या आवाजाचा स्वर चढत होता. तिचा गोंधळ आधी काळजी बनून शब्दातून आणि नंतर राग बनून डोळ्यातून डोकावत होता. तिच्या प्रश्नांनी तोही जरा बावरला.

तिने डोअर लॉक ओपन केलं आणि आपल्याला आत तिच्यासोबत बसायला दिलं. आता तिच्यासोबत वेळ घालवता येईल. या विचारांनी प्रफुल्लित होऊन गाडीत बसणारा तो. गाडीत बसल्यावर मात्र तिच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे दुःखी झाला. त्याचं मन जरी दुखावलं गेलं, तरी त्याने ते चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही.

त्याने बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि तिच्यासमोर धरली.

"घे. पी आणि शांतपणे मी काय सांगतोय ते ऐक." त्याच्या आवाजात एक वेगळाच विश्वास भरला होता. त्यामुळे सांजने संमोहित झाल्यासारखं त्याच्या हातून पाण्याची बाटली घेतली आणि तिचे झाकण काढून एक घोट पाणी प्याली.

"मी सकाळपासून इथे उभा नव्हतो. हो, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे; पण त्यासाठी मी माझं शिक्षण दुर्लक्षित करणार नाही. मी सकाळी इथून परत कॉलेजला गेलो होतो. माझं कॉलेज अटेंड करून इथे संध्याकाळी आलो. इथे आल्यावर वॉचमन काकांकडून कळलं; की तू अजून ऑफिस मधेच आहेस. मग तुझी वाट बघत थांबलो." धडाधड बोलून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या हातातली बाटली घेऊन तो एक घोट पाणी प्याला आणि पुढे बोलू लागला.


"मी तुला गंमत किंवा क्रेझ म्हणून प्रपोज नाही केलंय. मी माझ्या बाजूने खूप सिरीयस आहे. जर तुला मी विचारल आहे, तर त्याची जबाबदारी मी जाणतो. माझं करिअर, मी तुला साजेस बनवणं; ही माझी जबाबदारी आहे." तो पोटतिडकीने बोलला.

सांज ही जरा वरमली.

"सॉरी." तिला पुढे काय बोलावे सुचेना. तिच्या मनाची अवस्था समजून घेऊन तो मोकळं हसला.


"काही हरकत नाही. आपण एकमेकांना जास्त ओळखत नाही. त्यामुळे तुझा गैरसमज होण साहजिक आहे. मनाला नको लावून घेऊ. ते सोड. तू जेवली नसशील आपण जेवायला जाऊया; की तुला काही वेगळं हलकंफुलकं खायला हवं." त्याने अगदी सहज वातावरण बदललं. त्याच्या वयाच्या मानाने त्याचा समजूतदारपणा खुप होता आणि तोच सांजच्या मनात आपली जागा निर्माण करत होता.


त्याने तिच्या स्तब्ध झालेल्या डोळ्यांसमोर हात हलवला. तिने नजर खिडकीच्या दिशेने वळवली.


" मला माहित आहे. तू माझ्या प्रेमात पडत आहेस; पण सावकाश इतक्या लवकर नको. तू पड, पडताना मी तुझ्या आसपास आहे याची खात्री करून घे." तो बोलला तसे त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून तिने त्याच्याकडे पुन्हा नजर वळवली.

"अशी काय बघते? मी येईन ना धावत तुला सावरायला." त्याचे डोळे चमकले तसे हीचे हृदय दचकले.


"बोलना कुठे जाऊ या खायला? खूप भूक लागली आहे मला." त्याने अगदी लहान मुलासारखे तोंड केले.


ती मनातच हसली आणि गाडी तिच्या आवडत्या फूड जॉइंटकडे वळवली.

तिची गाडी दृष्टीआड होईपर्यंत, त्याची नजर तिच्या गाडीवर खिळली होती. एक विशिष्ट अंतर ठेवून त्यानेही पाठोपाठ गाडी स्टार्ट केली.

_______________________________________________________



-©® स्वर्णा.

__________________________________



आपलं नेहमीच आहेच ओ.......

वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा


🎭 Series Post

View all