पांडव भाग २२

The Truth Always Comes Out
भाग २२
पांडव - fantastic five⭐

(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
तेवढ्यात सांजचे दोन्ही हात त्या दोन्ही चेल्यांनी धरले. तेव्हा ती एका चेल्याच्या दिशेने सरकली. त्यामुळे त्याच्या पकडीमधलं अंतर कमी होऊन पकड सैल झाली. याचा फायदा घेऊन तिने त्याच्या शरीरावर जोर देत, एक हाय किक दुसऱ्याच्या नाकावर ठेवून दिली.

इकडे सांज अगदी सराईतपणे त्या दोघांना मारत होती. तिच्या ताकदीपुढे त्यांचा निभाव लागत नव्हता.

तेवढ्यात त्यांच्या म्होरक्याने मागून तिच्या डोक्यात मारायला रॉड उचलला.

आता पुढे -

तिघेही एकदम धावले. तिरुपतीने त्याच्या हातातला रॉड मागच्या मागे ओढून काढला.

"ए भेकड." अग्नेयने चवताळून त्याच्या तोंडावर एक मुक्का मारला. म्होरक्याच्या तोंडातून भडाभडा रक्त येऊ लागले. तो जमिनीवर पडला, उठायचा प्रयत्न करतोय न करतोय तोच नंदुने दोन बोटांनी त्याच्या दोन्ही डोळ्यातील अश्रू बिंदू जोरात दाबले. त्याची दृष्टी निकामी व्हायला तेवढं पुरेसं होतं.

इकडे सांजने या दोन्ही चेल्यांना चंद्र, सूर्य आणि अगणित तारे दाखवले होते.


"वाह, वाह मज्जा आली." तो मुलगा टाळ्या वाजवू लागला. तसे ते चौघेही हसू लागले.

"हाय, मी सांज अय्यर, सीबीआय ऑफिसर." तिने तिचं विझीटिंग कार्ड त्याच्यापुढे धरलं. ते हातात घेताना एका लहान मुलापेक्षाही जास्त आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता.

"हाय, मी ……" तो आपलं नाव सांगताना अडखळला.

"काय झालं?" सांज.

"जरा विचित्र आहे आणि जुनंही. तुम्हाला सांगताना लाज वाटते." तो गोड लाजला.

हे चौघेही हसू लागले आणि एकमेकांकडे पाहू लागले.

"असू दे रे. आम्हाला आता विचित्र नावं ऐकायची सवय झाली आहे." नंदू तिरुपतीकडे पाहत हसत म्हणाला.

तिरुपती जरा जास्तच रागावला होता.

त्याने नंदूवर एक जळजळीत कटाक्ष टाकला.

“सांग तू, आम्ही कोणीही हसणार नाही.” अग्नेय पुढे येत हाताला लागलेलं रक्त पुसत म्हणाला.

“तूपण नाही ना हसणार?” त्याने सांजच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं.

तिने मानेनेच नकार दिला.

“चित्रगुप्त शास्त्री." तो केसात हात फिरवत म्हणाला.


"नाइस टू मीट यू, शास्त्रीजी." असं म्हणत सगळ्यांनी त्याच्याशी हस्तांदोलन केले.

"सेम हीअर." तो ही खुलला.

तसे ते चौघेही हसून आपल्या कामाकडे वळले.


हे तिघे पुढे आणि सांज मागे.

चालता चालता सांज थांबली. मागे वळून बघितलं तर चित्रगुप्तने तिचा हात धरला होता. ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली.

"काय?" सांज.

तिला गोंधळलेली पाहून त्याने तिचा हात सोडला. "सॉरी, थोड बोलायचं होतं."

"इट्स ओके. बोल ना." सांज आणि त्याचं बोलणं ऐकून हे तिघेपण थांबले आणि मागे वळून ते दोघे काय बोलतायत ते पाहू लागले.

"प्लीज, मला चुकीचा समजू नकोस; पण मला तुला काही पर्सनल प्रश्न विचारायचे आहेत विचारू का? त्यांची उत्तरं माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहेत." त्याने बाचकत बाचकत विचारले.

तिने मानेनेच स्वीकृती दिली.

"या तिघांच्या मधला कोणी तुझा बॉयफ्रेंड आहे का?" त्याने एका दमात प्रश्न विचारून तिचं उत्तर ऐकण्यासाठी डोळे मिटले, कान टवकारले. एका हाताची दोन जवळची बोटे एकमेकांवर ठेवून क्रॉसची खूण पाठीमागे बनवली. चातकाप्रमाणे तिचं उत्तर ऐकायला तो आसुसला होता.

त्यांना बघणारे हे तिघे मात्र भूत बघितल्यासारखे बघत होते.

"नो." सांज मात्र त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होती. आताच एवढी फाईट करताना पाहूनही त्याने तिला असं काही विचारावं याची तिला अपेक्षा नव्हती. आता तिला संकेत मिळत होते; की तो पुढें काय विचारेल.

त्याने मागचा बोट क्रॉस केलेला हात पुढे घेऊन मुठ आवळली आणि जोरात म्हणाला, "येस."

"ओह, दुसरा कोणी?" त्याचा चेहरा पुन्हा भीतीने भरला. मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली.

तिने नकारार्थी मान हलवली.

"प्लीज, बी माय गर्लफ्रेंड?" त्याने श्वास रोखून विचारले.

\"आता हा मार खाणार.\" तिरुपती.

\"हाऊ डेअर ही?\" अग्नेय.

\"बंदे में दम है; पण चुकीच्या ठिकाणी ट्राय करतोय. यहाँ दाल नहीं गलनेवाली.\" नंदू.

यांच्या मनातील विचारांनी अकस्मात घडलेल्या या घटनेच्या पथावर घोडदौड सुरू केलीच होती; की सांज मात्र गप्प उभी होती. ती पुढे काहीच बोलत नाही बघून तो अस्वस्थ झाला.

"हे बघ काळजी नको करू. मी फक्त तुला विचारत आहे. तू नाही म्हणू शकतेस; पण प्लीज नाही म्हणू नकोस. आधी आपण एकमेकांना समजून तर घेऊ, एकमेकांची ओळख करून घेऊ. मग जर तुला वाटलं; की मी तुझ्यासाठी...." आशेने बघू लागला.

ती गांभीर्याने त्याचा शब्दांशब्द ऐकत होती. शेवटच्या वाक्याने मात्र तिला हसू आवरले नाही.

"बोल ना काही तरी." तो त्याच्या मनातून अधीर झाला होता.

ती वळली आणि चालू लागली. तसे या तिघांनीही त्याच्याकडे केविलवाणा दृष्टिक्षेप टाकला आणि वळून चालू लागले.

"तू नाही म्हणाली नाहीस. माझ्यावर हात उचलू शकली असतीस, तोही उचलला नाहीस. याला मी तुझा होकार समजू का?" त्याच्या या बोलण्यावर मात्र ती अजूनच हसू लागली. हसता हसताच पाठमोरी राहून हाताने ओकेची खूण हात वर डोक्यावर धरून तिने केली.

याने तर जागेवर उंच उडीच मारली आणि जोरात ओरडला "ये SSSS."

तिघांनीही न कळून मागे वळून या दोघांकडे बघितलं तर तो धावत तिच्याकडे येऊन तिच्या बाजूने चालत तिच्याशी बोलत होता.

"तिने याला हो म्हटलं?" तिघांच्याही तोंडातून एकदम निघालं.

_____________________________________________________________________________




चित्रगुप्त तिच्या बरोबरीने चालत होता. ती मधेच थांबली आणि त्याच्याकडे रागाने बघू लागली.

“काय झालं? मी काहीच केलं नाही .” तो अगदी निष्पापपणे म्हणाला.

“आता झालं न आपलं बोलून. तू माझ्या मागून कुठे निघाला. मी ड्युटीवर आहे. माझ्याकडे सध्या वेळ नाही.” सांज कपाळावर बोट फिरवत म्हणाली.

“म्हणूनच तर. मी तुझ्याबरोबर जेवढा वेळ जास्त राहता येईल तेवढा राहायला प्रयत्न करतोय ना.” त्याच्या चेहऱ्यावर खूप गांभीर्य होतं.

“हो; पण आता मी महत्त्वाच्या कामात आहे.” ती जरा त्रस्त होऊन म्हणाली.

"मी काही मदत करू शकतो का?" त्याचं मन अधीर मधिर चांदवा.

"ओये हिरो, आता बस. हा काय पोरखेळ वाटला का तुला?" तिरुपती जरा रागातच म्हणाला.

"बाळ, मस्करी पुरे झाली. तू तुझ्या शाळेत जा. ती ताई तुला नंतर भेटायला येईल हां." नंदूने त्याला समजवणीच्या स्वरात सांगितलं.

"वेट. मी खूप सिरीयस आहे. तू मला मस्करीत घेतेस का?" तो काकुळतीला आला.

"नाही. मला माहित आहे तू मनापासून बोलत आहेस; पण तूही समजून घे मी इथे एका मर्डर केसच्या इन्वेस्टिगेशन साठी आली आहे." सांज त्याला समजावून सांगू लागली.

“हम्म, सॉरी. मी नाही तुला त्रास होईल असं वागणार. काही मदत लागली तर सांग. मी इथेच शेजारी राहतो. तुझं कार्ड आहेच माझ्याकडे; पण वेट माझा नो. देऊन ठेवतो तुला. काही मदत लागली तर सांग.” त्याने तिच्या विझिटिंग कार्डमध्ये बघत तिचा नंबर डायलपण केला. सांज मोबाईल बाहेर काढून आणि नंबर सेव्ह करत होती. तोपर्यंत तो खरंच विरुद्ध दिशेने जाऊ लागला.

हे चौघेही त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते.

“थांबा शास्त्रीजी.”नंदूच्या हाकेने तो चार पावलांवर थांबला.

मागे वळून त्याने कुतूहलाने नंदुकडे पहिले.

“तू इथेच जवळ पास राहतोस ना. “ असं विचारताच त्याने मानेनेच होकार दिला.

“मागच्या आठवड्यात काही संशयास्पद आढळलं का?” नंदू त्याच्याकडे उत्सुकतेने पाहू लागला. चित्रगुप्त आता मात्र मागच्या काळात घडलेल्या घटना आठवू लागला.

“जास्त काही नाही. काही दिवसांपूर्वी त्या कचराकुंडीजवळ बरीच गर्दी जमली होती. पोलीस आले होते. नक्की दिवस सांगता येत नाही; पण आदल्या दिवशी ती मोठी पार्टी झाली होती.” तो शेवटचं वाक्य कचरत बोलला.

सांज त्याच्याकडे रोखून पाहत होती. त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्या आवाजातील चढ उतार, शेवटचं वाक्य बोलताना डोळ्यातील दुःख लकेर. ती बारीक निरीक्षण करत होती.

"तुला अजून काही माहित आहे का?" अग्नेयने त्याला विचारले.

"......." तो गप्पच राहिला.

"घाबरु नकोस सांग तू." तिरुपती त्याला आश्वस्थ करतं म्हणाला.

"ती …...ती एक रेव्ह पार्टी होती. इथून दोन गल्या सोडल्या; की पुढच्या गल्लीत आमचं कॉलेज आहे. तिथे जवळच डी. प्लस पॉइंट आहे." तो दबकत दबकत बोलू लागला.

"डी प्लस पॉइंट?" नंदू.

"हो. डी प्लस पॉइंट, हा एक इंटरनेट कॅफे आहे; कॅफे कमी त्यात लपून छपून ड्रग्स सप्लायचं काम चालतं." त्याचा चेहरा भीती, राग आणि दुःख या भावनांनी भरून गेला होता.

"जी मुलं या सगळ्यापासून लांब राहतात त्यांनाही या न त्या मार्गाने यात ओढत होते. व्यसनाधीन होईपर्यंत त्यांचा पिच्छा पुरवला जातो. एकदा का या जाळ्यात ते ओढले गेले; की त्यांना इतर वाईट काम करायला उद्युक्त करतात." त्याचा स्वर जड होत गेला. तिरुपतीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"माझा मित्र माझ्या डोळ्यासमोर पक्षघात होऊन वारला. त्याला ड्रग्सचा ओवर डोस दिला गेला होता.” त्याने हाताच्या मुठी वळल्या.

“तू त्याला न्याय मिळवून देशील ना ग?” पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने सांजचा हात दोन्ही हातात घेतला. “त्या पब ओनरला तू पकड आणि त्याला खूप मार, खूप मार. इतकं की त्याने स्वप्नात पण कोणाला व्यसन लावायचा विचार करता नये.” त्याने अजूनही तिचा हात सोडला नव्हता. जणू तो तिच्या वचन देण्याची वाट बघत होता.
तिने दुसऱ्या हाताने त्याच्या दोन्ही हातावर हात ठेवत त्याला आश्वस्त केलं.

"कोण आहेत त्याचे ओनर?" अग्नेयने विचारलं.


"माहित नाही. तिथला मॅनेजर नेहमी बदलत असतो." तो डोळे पुसत म्हणाला.

"मिस्टर. के. जॉय." नंदूने असं म्हणताच सगळ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

त्याने मोबाईलच्या गूगल मॅप वर डी प्लस पॉइंट सर्च करताना आलेली इन्फॉर्मेशन दाखवली.

"आपण तिथे जाऊ या." सांजने असं सुचवताच सगळ्यांनी माना डोलावल्या.

"मी पण येतो." चित्रगुप्त जाण्यासाठी निघालेल्या सांजचा हात धरून म्हणाला.

"नको. तू नको येऊस. इट्स टू रिस्की आणि एक महत्त्वाचं असं सारखं सारखं अचानक माझा हात नको पकडूस ते जास्त घातक आहे तुझ्यासाठी." तिने मुठ वळून त्याला दाखवली.

"पण तू माझी गर्लफ्रेंड आहेस. हात पकडणं खुपच साधी गोष्ट आहे." तो जरा मिश्किल हास्य आणून म्हणाला.

"मी गर्लफ्रेंड होईन का? याबद्दल विचार करण्यासाठी येस म्हणाले आहे; पण अजून त्याला फार वेळ नाही झाला. तूही म्हणालास ना; की मी माझा वेळ घेऊ शकते. " तीही त्याच्या लॉजिक वर हसली.


"ओह, सॉरी." तो वरमला.

"बाय, काही अजून महत्त्वाचं कळलं तर मला नक्की फोन कर." ती अजूनही त्याच्या प्रतिक्रियेवर हसत होती.

"इतर कारणासाठी केला, तर नाही का चालणार? मी सारखा कॉल करून त्रास नाही देणार." सांजला त्याच्या चिकाटीचे कौतुक वाटले.

"चालेल." ते चौघे डी प्लस पॉइंट कडे जायला निघाले.

______________________________________________


गाडी डी प्लस पॉइंटच्या बाहेर थांबली. गाडीतून उतरण्यासाठी डोअर ओपन करत होते तेवढ्यात नंदू म्हणाला, "आपल्याला गन रेडी ठेवाव्या लागतील. माहित नाही, आत कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल."

"त्यापेक्षा मी काय म्हणते? मी एकटी जाते. त्यांना डाऊट येणार नाही." सांज दरवाजा उघडायला लागली तर तो उघडेना. तिने रागाने नंदूकडे बघितलं.

"रीस्की आहे हे."

"आय अग्री विथ नंदू. आपण पूर्ण प्लॅनने जाऊ. दोघांनी आत जायचं आणि दोघांनी बॅक अप साठी तयार राहायचं." तिरुपतीचं म्हणणं सगळ्यांना पटलं. आता मोठा प्रश्न \"आत कोण जाणार?\"

"तू आणि किडो जर आत गेलास; तर तुमचे कपडे सेम आहेत, सो डाऊट येऊ शकतो त्यांना. त्यापेक्षा मी आणि ती थोड्या अंतराने वेगवेगळे जातो. आणि तुम्ही दोघे बॅकअपसाठी तयार रहा."अग्नेयचा प्लॅन त्यांना पटला.


______________________________________________

-©® स्वर्णा


_________________________________________________________________








आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट्सच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा


🎭 Series Post

View all