पांडव भाग १२

The Truth Always Comes Out
पांडव भाग १२
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
सांज सगळं लक्षपूर्वक ऐकत होती. डॉक्टरनी डोअर नॉक केले आणि हलकेच ढकलून आत गेले. खोली अगदी नीटनेटकी ठेवली होती. सांजची नजर खोलीत भिरभिरू लागली.

संपूर्ण खोली रिकामी होती.

"डॉक्टर, ताई बागेत आहेत." रुमच्या बाहेरून जाणाऱ्या नर्सने आत डोकावून सांगितले.

"ओह, थँक्यू. लेट्स गो." ते सगळे बागेकडे निघाले.

"डॉक्टर, इथलं वातावरण खूपच प्रसन्न आहे. " चालता चालता नंदू म्हणाला तसे प्रतिउत्तर म्हणून ते हसले.


आता पुढे -



सांजला मात्र कधी एकदा मीराला बघते असे झाले होते. तिला सुरुवातीला मीराविषयी कुतूहल वाटत होते; परंतु आता एक वेगळीच अनामिक ओढ जाणवत होती.

बागेत मध्यभागी असलेल्या कारंज्यातून उडत असणारे पाणी पाहत एक स्त्री पाण्यात पाय सोडून तिथेच कठड्यावर बसली होती.
ते तिघे हळू तिच्याजवळ गेले. डॉक्टरनी सांजला तिच्याकडे पाहून इशाऱ्याने सांगितले; की तीच मीरा आहे.

सांज हळुवारपणे तिच्या बाजूला जाऊन बसली.

"हाय."

सांजच्या आवाजाने मीराची तंद्री भंगली.

"हाय." तिने सांजकडे पाहत म्हटलं.

"किती सुंदर आहे हा. स्वतःबरोबर इतरांनाही पाण्याचा शिडकावा करून शीतलता देत आहे. "

"मी तुझ्याशी बोलणार नाही आहे. तू कितीही काव्यात्मक बोलायचा प्रयत्न केला तरी ही." मीरा रुसून म्हणाली.

"आणि ते का?"

"आज आठवण झाली तुला माझी. मी किती दिवस, नाही महिने, नाही वर्ष तुझी वाट पाहत होते." मीरा अजूनच रुसून म्हणाली.

"सॉरी; पण आता आले आहे ना आता रोज येत जाईन."

"खरंच? येताना मोहनला पण घेऊन येशील का?"
बॉसचं नाव ऐकून सांज आणि नंदूचे डोळे एकमेकांकडे वळले. सांजने नंदूला काहीच सांगितले नव्हते. ना त्याने तिला काही विचारले होते. तिने डोळ्यांनीच त्याला नंतर सांगते असं सुचवले. त्यानेही मानेने हामी भरली.

"हो येईन आणि मी ही येत जाईन."

" मोहन येणार. मोहन येईल. " बोलता बोलता ती गप्प झाली.
थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही.
सांज डॉक्टरांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली
त्यांनी सांजला खुणेने बाजूला व्हायला सांगितले.

" मीरा ताई, मीरा ताई."

"हां, काही म्हणालात का?" दोनदा हाक मारल्यानंतर डॉक्टरकडे पाहत ती म्हणाली.

"तुला भेटायला कोणी तरी आलंय." त्यांनी सांजकडे खूण करताच मीरा उठून तिच्या जवळ गेली.

"सॉरी, मी ओळखलं नाही तुला."

"मी सांज. तुमचं खूप कौतुक ऐकलंय डॉक्टरांकडून म्हणून भेटायला आले."

"ज्याने करायला हवं त्याने कधी केलं नाही. असो. तुला भेटून आनंद झाला. इथे आलीस; की ये भेटायला. डॉक्टर मी रूममध्ये जाते. माझं डोकं आज जरा जड वाटतंय." डॉक्टरनी मान डोलावली. मीराला जाताना बघून सांज कासावीस झाली.

"त्या बरोबर रूममध्ये पोहचतील ना."
तिने धावत जाऊन मीराचा हात धरला. मीराने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

"मी पण येऊ का?"

मीरा हसली आणि मायेने सांजच्या चेहऱ्यावरून हात फिरवत मूकसंमती दर्शवली.

जाणाऱ्या त्या दोघींकडे बघून डॉक्टरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.

"चला आपण माझ्या केबिनमध्ये बसू."
ते नंदूला म्हणाले.


_______________________________________________________

थोड्याच वेळात केबिनच्या दारावर टकटक झाली.

"कम इन."

सांज दार उघडून आत आली. बॉसनी तिला समोरच्या ? चेअरवर बसायला सांगितले.

तिने त्यांच्या पुढ्यात मोबाईल धरला. त्यावर तिने आणि मीराने तिच्या खोलीत काढलेला सेल्फी होता.

"त्याच आहेत का?"

त्यांनी उत्तरादाखल डोळे मिटून मान डोलावली.

"बॉस, शी इज इन सिरीयस कंडीशन.
अल्झायमर झाला आहे त्यांना."

एक निरव शांतता पसरली.



________________________________________________________


"कोणाला विचारून तुम्ही परवानगी दिलीत?" डोळ्यातून फुलणाऱ्या अंगाऱ्याना ही अचानक कळलेल्या बातमीची झुळूक फुलवून गेली होती.

"मी त्यांचा डॉक्टर आहे आणि ती माणसं चांगली होती."

"तुम्हाला कसं कळलं ते?" तो एका भूजांगप्रमाणे धुसपुसत होता.


"मी पूर्ण वेळ त्यांच्याबरोबरच होतो." डॉक्टरनी सांज आणि मीरा दोघेच तिच्या रूमपर्यंत गेले आणि ती तिथे काहीवेळ थांबली होती हे सांगायचं टाळलं.

"मीरा ताईंना कधी कधी असं बाहेरून आलेल्या व्यक्तीबरोबर वावरुन, गप्पा मारून बरं वाटेल. त्यांच्या मनाला जी आजाराची मळभ आली आहे ती दूर व्हायला मदत होईल आणि तू विसरतोयस मी तिला फक्त मानायला म्हणून बहीण मानत नाही." आता डॉक्टरांना पण राग आला.

"सॉरी. ती माझ्यासाठी काय आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि तिच्या जीवाला धोका होऊ शकतो." डॉक्टरनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.


"आय एम गोईंग टू चेक सीसीटीव्ही फूटेज." असं म्हणून तो रागात केबिनच्या बाहेर निघाला.

कॉम्प्युटर स्क्रीन बघून रागात मुठी आवळल्या जात होत्या. तो झरझर वेगवेगळ्या कॅमेराचं फुटेज चेक करत होता. जसे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्याचे वेगवेगळे अँगल सगळं तो परत परत तपासत होता. जसं जसं फुटेज पुढे सरकत होतं तसतसा याचा राग अधिक अनावर होत होता.

रागात त्याने हातातला ऑप्टिकल माऊस कॉम्प्युटर स्क्रीनवर फेकला आणि स्क्रीनला तडे गेले.

तिथला गोंधळ ऐकून डॉक्टर लोबो तिथे आले.

त्यांनी प्रश्नार्थकरित्या त्याच्याकडे पाहिले.

"एका ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचा चेहरा नीट दिसत नाही आहे." त्याने पुन्हा मुठी आवळल्या.

"खरंच त्यांनी माझ्याबद्दल काहीच विचारलं नाही किंवा तुमच्या तोंडून चुकून काहीही बाहेर पडलं नाही."

"मी सांगणं अशक्य आहे; पण त्यांनी विचारले सुद्धा नाही."

"याचा अर्थ काय? त्यांना माझ्याबद्दल आधीच कळलं असेल का?"

आता मात्र लोबो गोंधळून गेले.

"यावरून लक्षात येतं; की हे तितकं सोपं प्रकरण नाही आहे."
त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि रागाने एक मोठे जाळे पसरले होते.

________________________________________________________


खवळणाऱ्या समुद्राला शांतपणाने बघत राहणे हा सांजचा जिव्हाळ्याचा विषय. धावत उचंबळून येणारं फेसाळ लाटेतलं पाणी, जे जवळ येताना ओढ आणि दूर जाताना दुराव्याची भीती अश्या दुतर्फा भावना मनात सलग निर्माण करत होते.

"या लाटेतून किनाऱ्यावर येणाऱ्या समुद्राच्या पाण्याला परत समुद्रात जायचं असतं, तर का ते सारखं सारखं या किनाऱ्याला भिजवूनही अतृप्त सोडून जातं." डोळे लाटेवर खिळलेले आणि परत समुद्रात जाणाऱ्या पाण्याला बघून त्यातून मात्र पाण्याचे झरे लागले होते.

"सांज, आर यू इन लव्ह?" नंदूने तिच्याकडे बघत आश्चर्याने विचारले.

"नाही रे बडी, मी मीरा मॅमबद्दल विचार करत होते. लव्ह इज नॉट कप ऑफ माय टी. रादर आय एम नॉट मेड फॉर इट."

"पण बॉस आणि मीरा मॅम............."
तिच्याने पुढे बोलावले नाही.

तिने नंदूला सगळे सांगितले.

कधी तरी दुःख आपले नसते तरी मनात त्याचं वेदना निर्माण करून जाते.

नंदू शांतपणे सांजच्या शेजारी बसला. आता दोघेही त्या फेसाळून उठणाऱ्या समुद्रात बघत आपल्या मनातील वादळे शांत करत होते.

सगळ्याच गोष्टी आपल्याला वाटता येत नाहीत. दुःख त्यातलीच एक गोष्ट आहे. आपलं दुसऱ्यापेक्षा अधिक वाटत असताना, दुसरा मनाच्या कवाडात काय लपवून बसला आहे आपल्याला कळत ही नाही.

माणूस माझ्या मनासारखं आहे की नाही यापेक्षा ते माझ्या सोबत आहे ही भावना मनाला जास्त सुखावून जाते. जे मिळत नाही त्याची नेहमी ओढ जास्त असते मनाला.


________________________________________________________

"सांज, सांज..... ........सांज" रावण धावत पळत सांजजवळ आला. त्याला इतकी धाप लागली होती की त्याचे पुढचे शब्द घशातच अडकले.


"गदाधारी शांत, काय झालं? मी तर तुला आधीच प्रसन्न आहे. मग का एवढा जप करायचा?" सगळे हसू लागले.

रावण टेबलावरच पाण्याचं ग्लास उचलून घटाघट पाणी प्याला.

"यू कान्ट बीलिव्ह इट. आता मी जे सांगणार आहे ती एक बिग न्यूज आहे. इट्स बिग बॉम्ब"
तो बोलत असतानाच देवेश तिरुपती तिथे आला.

"आणि तो मी तुमच्यावर फोडणार आहे. आज पासून तुम्ही मला रिपोर्ट करणार आहात."

"व्हॉट?" आता मात्र पांडवांवर खरंच बॉम्ब फुटला होता. बॉम्ब नाही ऍटम बॉम्ब.

"रिलॅक्स गाईज, मिस्टर खुर.....तिरुपती, हे शक्य नाही. बॉस इज अल्वेज बॉस अँड ही इज अल्वेज राईट."
माधव टशन देत म्हणाला.

"मंकिज, स्वप्नातून जागे व्हा."
त्याने एक लेटर सांजच्या पुढ्यात सरकवले.

ते वाचताना मात्र सांजचा चेहरा निर्विकार होता.

"ही इज राईट." सांजने एवढंच सांगून ते लेटर नंदूच्या हातात दिले.

त्यामध्ये तिरुपतीला प्रमोशन मिळाल्याचं लिहिले होते आणि बॉसच्या रिटायरमेंतची बातमीही होती. बॉस एका महिन्याने रिटायर होणार होते.




-©® स्वर्णा.

__________________________________



आपलं नेहमीच आहेच ओ.......

वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा


🎭 Series Post

View all