Login

पांडव भाग १०

The Truth Always Comes Out


भाग १०

(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

पोलिस स्टेशनच्या आवारात खूप गर्दी जमा झाली होती. पोलिस लोकांना लांब ठेवत होते. पांडव गाडीतून उतरले आणि तिथे आले. रावणने बॉम्ब डिटेक्टर बाहेर काढला. पोत्यांवरून फिरवतच होता की एक पोत हलू लागले.

"रावण, त्यात माणसं आहेत." नंदूचं वाक्य ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले.

रावणने पटपट पोती उघडली. त्यातून बाहेर पडलेली माणसं बघून सांज किंचाळली.

"अरे, ह्यांनीच माझ्यावर हल्ला केला होता."

त्यांच्यातील एकाच्या तोंडावरची टेप बाजूला करताच तो बोलला.

"ए तुझ्या त्या हिरोने आम्हाला खूप धुतलं. अग बाई........" तो पुढे बोलणार तेवढ्यात नंदूने त्याला एक ठोसा लगावला.

आता पुढे -


काही तासांपूर्वी.............


विखुरलेले केस त्यातून टपकणारे घामाचे थेंब. जमिनीला समांतर असलेल्या लोखंडी बार वर जमिनीच्या दिशेला तोंड करून उलटे पुश अप्स किंवा वर्टिकल पुश अप्स ज्याला म्हणतात ते मारणारा तो. प्रत्येक पुशने खाली वर होणारा अर्ध अनावृत देह. ती एक्सेरसाइज पूर्ण करून तो खाली उतरला. घामाने चिंब झालेल्या केसांना त्याने मानेने एक झटका दिला. देहातून घामाबरोबर व्यायामामुळे वाफा बाहेर पडत होत्या. कानशिलं आणि संपूर्ण चेहेरा लालबुंद झाला होता. तसाच तो बाथरूम मध्ये शिरला आणि थंड पाण्याच्या ? शॉवर खाली उभा राहिला. हळू हळू पाणी केसातुन शरीरावर धावत सुटले. आधी हळू सुरू असणारी थेंबाची चढाओढ नंतर वाढू लागली. पूर्ण देह आता थंड पाण्याच्या तूषारांनी व्यापला होता. वर्कआऊट करताना आलेला सगळा शीण त्या थेंबांबरोबर वाहून जात होता.
आंघोळ आटपून टॉवेल कमरेला बांधून तो त्याच्या बेडच्या गॅलरीच्या बंद काचेच्या दरवाजा समोर उभा राहून बाहेरचं दृश्य पाहू लागला.


सकाळ पासून सारखा सांजचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. आज त्याचं डेली वर्कआऊट सुद्धा त्यामुळे डिस्टर्ब होत होतं. ते आटपतं घेऊन त्याने ? मोबाईल हातात घेतला आणि एक नंबर फिरवला.

"मला आताच्या आता त्या एरियाचं सीसीटीव्ही फुटेज हवं आहे. डू इट फास्ट." एक करारी आवाज समोरच्या माणसाच्या अंगावर काटे उभे करून गेला.

काही सेकंदात त्याच्या फोनच्या मेसेज टोन सलग वाजू लागल्या. मोबाईल वर आलेले स्क्रीनशॉट त्याने आपल्या खबरीला पाठवले. खबरीने लगेच त्याला त्यांचा पत्ता पाठवला होता. मोबाईल हातात घेऊन तो उठला आणि घाई घाईने गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला.

त्याने आपली फायर प्रिंट असलेली ब्लॅक यामाहा वायझेडएफ आर १५ व्ही ३ स्टार्ट केली. यामाहा कंपनीची बेस्ट स्पोर्ट्स बाईक. बाईकच्या समोरच्या मोबाईल स्टँडमध्ये मोबाईल बाईक मोड सेट करून अडकवला.

त्यांना पुन्हा समोर बघून याच्या मुठी आवळल्या. त्याला बघूनच त्या गुंडांची पाचावर धारण बसली. ते सैरभैर पळत होते आणि हा एखाद्या चपळ चित्त्याप्रमाणे त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळत होता.

एक एक करून चार ही जण पोत्यात बंधीस्त झाले. तेव्हा कुठे याने थोडा मोकळा श्वास घेतला.

ती पोती त्याने एका माणसाला सांगून पोलीस स्टेशनच्या आवारात सोडली होती.

***************

"सर, यांना आम्ही घेऊन जातो. ते आमच्या केसशी रीलेट करतात. ज्या काही फॉर्मलितीज आहेत त्या पूर्ण करून घेऊन जाऊ. यू डोन्ट वरी." सांज तिथल्या सब इन्स्पेक्टरशी बोलत होती.

"ओके मॅम. नो इशु." ते त्या चौघांना गाडीत घालून निघून गेले.


*********************

ठिकाण - सीबीआय हेड क्वार्टर

रावण त्या चौघांना इंत्रोगेशन रूम मध्ये घेऊन गेला. त्याच्या बरोबर नंदू आणि माधव सुद्धा गेले.

ज्युलिया तिच्या लॅबमध्ये निघून गेली.
सांज रावण बरोबर जायला वळतच होती; की तिला देवेश दिसला. तो तिच्याकडेच बघत होता. तिची एक भुवई उंचावली.

"तुला गप्प गुमान राहणं कठीण जातं का? पडायला होतं तर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला कशाला हव्यात?" तिरुपती कुत्सितपणाने म्हणाला.

सांज त्याला काही बोलणार एवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. तिला हातानेच त्याने \"रफु चक्कर हो\" असा इशारा करून स्वतःच तिथून निघून गेला.

"खरंच हा डोक्यावर पडलाय. खुरापाती कुठला?" सांज त्याला जाताना बघत होती. अचानक सांजच्या भुवया इतक्या वर गेल्या की तिला वाटलं आता डोळे बाहेर येतील.


"हा काय करतोय याच्यासोबत? नक्की तोच आहे ना? की मला भास होतोय?" सांज त्या दोघांना बोलताना एकटक पाहत होती.

देवेशचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं तो समोरच्या माणसाला घेऊन दुसरीकडे निघून गेला.

"व्हॉट?? मी काय खाणार होते काय त्या दोघांना? असा काय लगेच निघून गेला?" सांज नक्की का चिडली होती. देवेशच्या वागण्यामुळे की तिला त्या व्यक्तीला नीट बघता न आल्यामुळे.

सांज अजूनही ते गेले त्या दिशेने बघत उभी होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.

"हॅलो. हां बोला बॉस."

"तू ऑफिस मध्ये आली आहेस? तुला आज सुट्टी दिली होती ना?" त्यांच्या स्वरात काळजी होती.

"कम टू माय केबिन." बॉसनी फोन ठेवला.

\"ही मुलगी अगदी रामवर गेली आहे.
तो ही कामाच्या वेळी स्वतःकडे असंच दुर्लक्ष करायचा. \"राम अय्यर\" माय बेस्ट फ्रेंड. माझं कुटुंब होता तो माझ्यासाठी. आम्ही ड्युटी एकत्र जॉईन केली. त्याच्या आणि सीता वहिनीच्या लग्नात मला म्हणाला होता; \"बघ कोणी आवडते का? तुझं पण आताच उरकून घेऊ. नाही तर असाच राहशील.\" तेव्हा मी फक्त हसलो होतो. काय सांगणार होती त्याला? त्यानंतर त्याचं आणि वहिनीच जण इतकं मनावर परिणाम करून गेलं; की मी घेतलेला मीराला कधीही न भेटण्याचा निर्णय अजूनच ठाम झाला. तिचं आयुष्य मला माझ्यामुळे संकटात घालायचं नव्हतं. तिच्या पत्रांना उत्तरे दिली नाही; की ती साधी वाचली ही नाहीत. तिचे फोनही उचलले नाहीत. बॉस विचार करत असताना डोअर टकटकलं.

"येस. कम इन."

सांज आत आली. ते तिच्याकडे काळजीने पाहू लागले.

"आय एम फाइन बॉस. डोन्ट वरी." ती कसंनुसं हसली.

"सुट्टी दिली म्हणजे आराम करायचा असतो हे समजवायला हवं का? काय हे सांज आता मला तुझ्यावर वॉच ठेवायला माणूस आणायला हवं." त्यांचा स्वर भरून आलं होता.

सांजची नजर इथे तिथे भिरभिरू लागली. तेवढ्यात तिला टेबलावर डायरी मधून थोडंसं बाहेर आलेले पत्र दिसले.

"परत आलं का?"

बॉसनी पत्र तिच्यासमोर धरले.

"वाच. मला तर काहीच कळत नाही आहे."

तिने ते घेऊन वाचायला सुरुवात केली.

"प्रिय मोहन,

तुला प्रिय नाही म्हणायचं हे मनाशी खूप ठरवलं होतं पण मन धोका देऊन गेलं. मी आठवते का रे तुला? सॉरी असं समोर यायचं नव्हतं मला; पण काय करू. तेव्हा तूझ्या बरोबर राहून तुझे गुण लागले मला.
अचानक आयुष्यात येणे, दुसऱ्याचं आयुष्य बदलून टाकणे, त्याला स्वतःची सवय लावणे
आणि सवय लागली की कधीच नसल्यासारखा अदृश्य होणे.
सांग ना? काय होता माझा दोष? तुझ्यावर प्रेम करत होते हा? तुला आपलं सर्वस्व मानलं, दिलं ही, हा?
असो आता या उत्तरांची वेळ निघून गेली आहे. तू कदाचित देशील ही पण ती ऐकायला मी असेन की नाही.
नको, डोळ्यात पाणी आणून माझी माफी मागायचा विचार ही करू नको.\" सांजचं लक्ष बॉसकडे गेले. खरंच त्यांचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते.
तिने पुढे वाचायला सुरुवात केली.

\"मी कदाचित तुला माफ करेन ही पण तो?
तो तुला कधीच माफ करणार नाही.

आई माझं नाव ठेवताना म्हणाली होती, काही तरी वेगळं ठेवू; पण मीरा नको. तिचं नशीब माझ्या लेकीच्या नशिबी नाही जोडायचं मला.

बघ शेवटी तू ते खरं करून दाखवलंस.


आता कधीही तुझी न होऊ शकणारी

मीरा.\"

सांजने पत्र मिटले आणि त्याच्या बरोबर डोळेही.

तिने हळुवारपणे त्याची घडी करून एन्विलोप मध्ये ठेवले. त्याच्यावर पत्ता होता.

"बॉस, यावर पत्ता आहे."

"हो, आधीची पत्र निनावी आणि पत्ता नसलेली होती. त्याचं आणि या पत्राचं अक्षर ही वेगळं आहे. हे मीराचंच अक्षर आहे. "

"बॉस, त्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली का? तिथे माहिती मिळाली असती."

बॉसनी डोळे घट्ट मिटून घेतले.

"बाळा, मला धीर नाही ग होत तिथे जाण्याचा."

बॉस नी ? फिरवली आणि पाणावलेले डोळे पुसले.

"मी..... जाऊन येऊ का?" तिने कचरत विचारले.

त्यांचे डोळे चमकले.

"तू खरंच जाशील." त्यांनी तिचे दोन्ही हात हातात घेतले.

सांजने मानेनेच होकार दिला.



-©® स्वर्णा.

__________________________________



आपलं नेहमीच आहेच ओ.......

वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.

0

🎭 Series Post

View all