ती एक पुस्तकवेडी

Just Try To Give Some Glimps Of My Reading Hobby


लहानपण चिंटू, चंपक, नागराज, ध्रुव, शक्ती, डोगा अशा कॉमिक्स पासून ते रामायण, महाभारतातील पंचतंत्र गोष्टी वाचण्यात गेलं.

आईला वाचन छंद असल्याने किशोर वयातच बाबा कदम, ना सी फडके, पु ल देशपांडे इति मराठी लेखक मंडळी सतत नजरेत भरली. ययाति, गारंबीचा बापु, खोत, वैशालीची नगरवधू, कर्णायन अश्या बाल बुद्धीवरच्या पुस्तकांचे आईच्या चोरून वाचन झाले.

पुढे नागपूरतील सुप्रसिद्ध विदयालय "लेडी अमृता बाई डागा" मधे दाखलाच मुळी तिथल्या ग्रंथालयविषयी वाचून घेतलेला. तिथे गेल्यावर खऱ्या अर्थाने वाचन प्रगल्भ झालं.

विविध पुस्तकं वाचनात आली. समजून आलं कि विदेशी साहित्य फक्त शेक्सपियर पुरतं मर्यादित नाही. जेन ऑस्टीनचं प्राईड अँड प्रेजुडाईस वाचून मिस्टर डार्सीच्या प्रेमात पडली तर एलिझाबेथ कडून स्वाभिमानी राहणं शिकली. डफने दु मारियो यांची रिबेका वाचून स्त्रीचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं.

कवी कुलगुरू कालिदास यांचे शाकुंतलम वाचून सोन्या चांदीचे अलंकार काढून फुलांचे दागिने घालायचा मोह आवरला नाही. काय ते वर्णन, तो शृंगार रस ! तेव्हा कळलं का शेक्सपियर शाकुंतलम वाचून आनंदाने नाचले असे म्हणतात.

मला सर्वात जास्त दुःख शेक्सपियरच्या कादंबऱ्या वाचून झालं. हॅम्लेट, ऑथेल्लो, मॅकबेथ व किंग लियर हे चारही नायक किती हुशार, चपळ, शक्तीशाली पण त्यांचा अंत अगदीच दुःखद असा का व्हावा?

म्हणून मी परत त्या वाटेला गेलीच नाही. पण उदासीन झालेल्या मनाला दुसरीकडे वळवणं खूपच गरजेचं होतं म्हणून मी आपल्या मातृभाषेकडे आली. प्रोतिमा बेदी, शोभा डे, अमृता प्रितम यांना वाचून डोक्यात स्त्रियांच्या कितीतरी प्रश्नांना वाचा फुटली. मनाशी निश्चय झाला,"स्वावलंबी बनायचं" तेही सर्वार्थाने. म्हणून कि काय पदवीधर होईस्तोवर मी बरीच बंडखोर वृत्तीची झाली.

माझी गती वाचन सोडून प्रत्येक कामात अतिशय संथ होती. मला स्वतःला प्रेरणा द्यावी लागे तेव्हा कुठे माझ्या कडून अभ्यास व्हायचा. म्हणून यापुढे प्रेरणादायी वाचनावर जास्त भर दिल्या गेला. जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयातच जायचा. "शिव खेडा" यांचं "यु कॅन विन" ने खूप मदत केली.

पदवीधर झाली तेव्हा हातात Rhonda Byrne चे "द सिक्रेट" आले. जणू हातात खजिना लागला. इंग्रजी तेव्हा इतकी चांगली नव्हती म्हणून ते परत परत वाचून काढलं. पारायण केलं. लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घेतलं. या पुस्तकाने खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात क्रांती घडवून आणली. स्वतःचे निर्णय स्वतः घेत मी लिखाण वर्तमान पत्रात दिलं. सोबतच अभ्यासावर जोर दिला. स्थावर झाली. मैत्रिणीजवळ "द सिक्रेट" बद्दल बोलली. तिने वाचायला घेतलं ते परत मिळालं नाही. म्हणजे या हातातून त्या हातात फिरू लागलं. ज्यांनी मला ते पुस्तक दिलेलं त्यांनी सांगितलं होतं, "तुझं वाचून झालं कि जवळ साठवून न ठेवता गरजूंना देशील."

पण आयुष्यात कितीही स्थिर झालं तरीही कधीतरी, काहीतरी असं होतंच ज्याने आपण उदासीन होतो. असंच माझ्याबरोबर झालं. आपल्याला काय हवं हे जाणुन मी परत माझ्या प्रिय सवंगडी पुस्तकांकडे वळली. मन म्हणालं, "नवीन प्रेरणादायी पुस्तकं खरेदी करायची वेळ झाली."

एव्हाना माझा इंग्रजीवर बराच जम बसलेला. मार्केटमधेही अव्वल दर्जाची पुस्तकं आलेली. सहज गुगल केलं. पावलो कोहेलोची, 'द अल्केमिस्ट', रॉबिन शर्माची 'द मॉंक व्हू सोल्ड हिज फेरारी' ही नावं बेस्ट सेलरच्या यादीत दिसली.

कम्माल पुस्तकं दोन्हीही. वाचतच राहावी अशी.
"कसं काय सुचतं यांना असं इतकं प्रेरणादायी लिहायला तेही कथेच्या स्वरूपात?"

स्वतः स्वतःलाच केलेला प्रश्न व आपणही असंच प्रेरणादायी लिहायचं असा मनोमन झालेला निश्चय. म्हणून माझ्या सर्व लिखाणातून मी काहीतरी प्रेरणादायी संदेश द्यायचा प्रयत्न करत असते.

तळटीप : बऱ्याच पुस्तकांबद्दल लिहायचं होतं. पण ते एकाच लेखात लिहिणं अशक्य. जमल्यास समीक्षा टाकायचा प्रयत्न नक्की करेल.

धन्यवाद

©®अर्चना सोनाग्रे वसतकार