Jan 19, 2022
नारीवादी

धैर्याचे_पाऊल

Read Later
धैर्याचे_पाऊल

#धैर्याचं_पाऊल

कानिवळे गाव,सह्याद्रीच्या कुशीतलं एक लहानसं खेडं. निसर्गाने भरभरुन स्रुष्टीसौंदर्य दिलेलं गावाला. गाव सधन होतं. बारमाही वहाणाऱ्या नदीमुळे तिथली जमीन अत्यंत सुपीक होती. लोकं कष्टाळू होती. देवाधर्मावर श्रद्धा होती लोकांची.

काही वर्षांपुर्वी, मुरलीधर बुवा यांनी आपल्या शिष्यगणांसह या गावास भेट दिली. नदीकाठच्या झाडाजवळ त्यांनी  तात्पुरती चूल मांडली. पहाटे उठून स्नानादी विधी आवरुन बुवा ज्ञानदानास बसत.

दुपारी भोजन केल्यावर थोडीशी वामकुक्षी व सायंकाळी गावभ्रमण,गावातल्या ग्रामस्थांना उपदेश..असा त्यांचा दिनक्रम होता. बुवांच्या प्रवचनाला गावकर मंडळी जमू लागली. बुवांची बोली अतिशय मधाळ होती. पुराणातले प्रसंग ते असे काही रंगवून सांगत की बायाबापये त्या कथनात रममाण होत. बुवा त्यांच्या ओघवत्या भाषाशैलीद्वारे पुराणातली पात्रं  ग्रामस्थांसमोर जीवंत उभी करत.

गावकऱ्यांनी बुवांना गावातच रहाण्याची विनंती केली. आधी बुवा तयार होईनात पण सगळ्यांनीच कळकळीने विनंती केल्यावर बुवा तेथे रहाण्यास तयार झाले. नदीच्या काठावर,देवळाच्यानजीक बुवांसाठी मठ बांधण्यात आला. 

गावातल्या बाया, बुवांचे चार चांगले बोल कानी पडावेत यासाठी घरातलं सगळं आवरुनसावरुन संध्याकाळी मठात जायच्या. मठाची स्वच्छता करणं,बुवांसाठी गोड पदार्थ घेऊन जाणं हे त्या मनापासून करु लागल्या. 

आपल्या समस्या गावकरी बुवांसमोर मांडत मग बुवा ध्यान लावून बसत व आपल्या दिव्य द्रुष्टीने गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत. घरातल्यांसाठी अंगाऱ्याची पुडी देत. आजुबाजूच्या गावांतूनही गावकरी बुवांच्या दर्शनाला येऊ लागले.

लता नुकतच लग्न होऊन या गावातील दाढेंच्या घरची कनिष्ठ स्नुषा बनली होती.

 दाढेंची थोरली सुनबाई,सीमा नेमाने मठात जाई. मठात जवळच्या विहिरीवरुन पाणी भरणे,मठाचे आवार झाडून काढणे..अशी कामे ती इतर भक्तगणांसोबत करत असे.

 सीमाने धाकट्या जाऊबाईसही तिच्यासोबत मठात येण्याचा आग्रह केला पण लताचा या गोष्टींत विश्वास नव्हता. लता नास्तिक मुळीच नव्हती पण तिला मठात वगैरे जऊन सेवा करणे पसंत नव्हते. घरातल्या देवांची मात्र ती मनापासून पुजा करे.

मुरलीधर बुवांच्या आशीर्वादामुळे गावातील दोन बाया,ज्यांना साताठ वर्ष मुलबाळ नव्हतं त्या गर्भवती राहिल्या होत्या.

 सीमाच्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी तिला मुलबाळ नव्हतं. डॉक्टरी उपचार करुन,गोळ्या,औषधे घेऊन तसंच सारखंसारखं तपासून घेऊन सीमा अक्षरश: वैतागली होती. तिला सासुबाईंनी बुवांची मनोभावे सेवा केल्याने मुलं होतात हे सांगितल्याने तिने हा शेवटचा मार्ग निवडला होता. 

सीमाच्या नवऱ्याला, अशोकला यात विश्वास नव्हता पण सीमाचं मन त्यात रमतय व रोज रात्री रडत रहाणारी सीमा तिच्या मनात आशेची पालवी जाग्रुत झाल्याने शांत झोपू लागल्याने अशोक तिच्या सेवेत अडथळा बनत नव्हता. अशोकचं सीमावर जीवापाड प्रेम होतं. कोणत्याही प्रकारे ती सुखी रहावी हीच त्याची इच्छा होती.

लताला मात्र सीमाचं असं तिन्हीसांजेनंतर घराबाहेर पडणं मुळीच पटत नव्हतं. 
एकदा लता वहिनीला बोललीच
"वहिनी,तुम्ही तिन्हीसांजेनंतर अशा नटूनथटून मठात जाता. ते बुवा तिन्हीसांजेआधी का बरं प्रवचन घेत नाहीत? व प्रवचन ऐकण्यासाठी इतकं सजण्याधजण्याची,भारीतल्या साड्या नेसण्याची काय आवश्यकता?"

सीमाला लताचा राग आला. ती म्हणाली,"कसं रहायचं,कुठे जायचं..हे तू मला आता शिकवणार? बुवांबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. त्यांच्या सवडीनुसार ते आम्हाला ज्ञान देतात. तुला ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा नाही हे तुझं दुर्दैव पण म्हणून तू माझ्या मार्गातला अडथळा बनू नकोस. मी घरातली सारी कामं आवरून जाते. तुझ्या जीवावर ठेवत नाही."

लताला सीमाचं बोलणं खूप लागलं तरी ती थोरल्या जावेला उलट बोलली नाही पण तिने निश्चय केला की थोरली जाऊ कोणत्या धर्मसंकटात पडणार नाही याची काळजी घ्यायची. 

तिने तिच्या नवऱ्याला,सुजयलाही याबद्दल सांगितले. पण सुजय तिच्यावरच डाफरला कि वहिनीला काय करायचं ते करुदे,तुला कोणी तुझा अपमान करुन घ्यायला सांगितलय.

त्यादिवशी मठाच्या सुशोभिकरणासाठी बऱ्याजजणांना बोलावलं होतं. दुसऱ्या दिवशी बुवांचे परममित्र यायचे होते. सीमाही जरा लवकरच मठाकडे जायला निघाली होती. तिने घरातून विविध रंगांची रांगोळी न्हेली होती.

 मठाच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर मोर काढण्यात सीमा बेभान झाली होती. मोरपंखांमधे निळे,हिरवे,जांभळे रंग भरुन जणू ती त्या मखमली मानेच्या मोरांना सजीवरुप देत होती. 

बाकीच्या बाया फुलापानांनी मठातल्या खांबांना सजवत होत्या..सगळ्यांच झालं..त्या जायला निघाल्या पण सीमेच्या एक मोराच्या पिसाऱ्यात रंग भरायचे राहिले होते.

 सीमा म्हणाली,"जरा मदत करता का गं मला?" पण तिच्या सखींपैकी कुणालाच ते कुशल काम येत नव्हते. शेवटी सीमा म्हणाली,"तुम्ही व्हा पुढे मी तासाभरात येते."

सीमाने मोराच्या डोळ्यांत रंग भरले,तुरे रेखाटले,दोन्ही मोर अगदी स्वागतासाठी सज्ज आहेत असे वाटत होते. सीमाने उरलेले रंग पेटीत भरले. आजुबाजूची जागा फडक्याने स्वच्छ केली व बाजूच्या कट्ट्यावर बसून आपली कलाक्रुती पाहू लागली. तिचं तिलाच कौतुक वाटत होतं. लहानपणी किती हौस होती सीमाला रांगोळी काढायची! गालिचा रांगोळीपासून तिने केलेली सुरुवात ती यौवनात येईस्तोवर निसर्गचित्र,संस्कारभारती अशा अनेक रांगोळ्या ती शिकली होती. 

सासरीही पहिली दोन वर्ष ती उत्साहाने रांगोळी काढायची पण मुल होणार नाही या निराशेने ती जेव्हा ग्रस्त झाली तेव्हापासून तिने रांगोळीचे रंग हातात घेतलेच नव्हते. 

सीमाने मनोमन बुवांचे आभार मानले. घड्याळात पाहिले तर अकरा वाजून गेले होते. अगं बाई,खूपच उशीर झाला. सगळी वाट बघत असतील घरी. निघालं पाहिजे,असं म्हणत ती पिशवी घ्यायला वाकली तोच तिला पाठून बलदंड बाहुंनी घेरलं. 

तिच्या डोळ्यांवर एकाने पट्टी बांधली तर एकाने तिच्या तोंडात बोळा कोंबला. आता सीमा अगदी असहाय्य ,अगतिक झाली. तिच्या आरोळ्या कोणाला ऐकू येत नव्हत्या. त्या बलदंड हातांनी तिला उचलून घेतले व ती पावलं झपाझप आतल्या कक्षात जाऊ लागली. सीमाला एका मऊशार गादीवर ठेवण्यात आलं. तिच्या डोळ्यांवरची पट्टी व तोंडातला बोळा काढला गेला. बुवांनी इशारा करताच बाकीचे शिष्यगण तेथून निघून गेले. 

सीमाने डोळे उघडून पाहिले तर समोर बुवा छद्मीपणे हसत उभे होते. बालिके..सीमे,मुल हवे ना तुला. ये आम्हाला आलिंगन दे. खूष कर आम्हाला. आम्ही तुला पुत्रवती घडवून आणू."

सीमाचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती अतिव क्रोधाने थरथर कापत होती.
"चांडाळा,बुवाच्या वेषात हे असले धंदे करतोस. लाज नाही वाटत तुला. कुठे फेडशील ही पापं. मला जाऊदे नाहीतर मी किंचाळून अख्खं गाव गोळा करेन बघ."

"बुवा अधिकच विक्रुतपणे हसत तिच्याजवळ,अगदी जवळ येऊ लागला. त्याने तिच्या कंबरेला हात घातला व दुसरा हात तिच्या बेंबीकडे न्हेला. सीमाच्या अंगात कुठून ताकद आली कोणास ठाऊक. तिने त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला व त्याला हिसका देऊन तिथून पळू लागली पण बुवाने तिची साडी ओढली. ती धावत होती,तसतशी तिची साडी सुटत होती. नुसत्या परकर पोलक्यावर सीमा देवळाच्या दिशेने धावू लागली. 

इतका वेळ झाला तरी सीमा वहिनी आली नाही म्हणून लता तिला अर्ध्या वाटेत जाऊन पहाते असं सांगून निघाली होती पण सीमावहिनी वाटेत दिसेना म्हणून लता मठाकडे यायला निघाली. सीमाच्या आर्त किंचिळ्या त्या अंधाराला भेदत होत्या. 

लताच्या कानी सीमाची किंचाळी पडताच ती जोरात धावत सुटली. देवळातून आवाज येत होता. लता देवळात घुसली. मंदिराच्या गाभाऱ्यात सीमा देवीमागे लपली होती. देवळातला पुजारी एका कोनात भीतीने थरथरत बसला होता व आडदांड शरीरयष्टीचा,कंबरेला भगवं वस्त्र गुंडाळलेला उघडाबंब बुवा सीमाच्या दिशेने पावलं टाकत होता. 

लताने देवीला नमस्कार केला. टेबलावरचं हळदकुंकवाने भरलेलं ताट तिने हातात घेतलं व वीजेच्या वेगाने पुढे जात तिने ते हळदकुंकू बुवाच्या डोळ्यांत भिरकावलं. हळदकुंकू डोळ्यात उडवल्याने बुवाला काहीच दिसेना झालं. 

सीमालाही आता धीर आला. तिने देवीच्या हातातलं त्रिशूळ उपसलं व जोराने धावत येऊन डोळे पुसत पडलेल्या बुवाच्या जांघेवर पाय देऊन उभी राहिली. तिने देवीकडे पहात तो त्रिशूळ बुवाच्या पोटात खुपसला. 
बुवाच्या पोटातून उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्यांनी लताच्या चेहऱ्यावर,परकरपोलक्यावर रक्ताचे डाग उडवले. 

देवळातली देवी प्रसन्न वदनाने हसत होती. आज लतासारख्या असंख्य स्त्रियांना ती जणू सांगत होती,"पोरींनो,अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि या अब्रू लुटणाऱ्या राक्षसांवर त्वेषाने तुटून पडा. तुमच्या मदतीला कोणी श्रीकृष्ण येईल याची वाट पहात राहू नका. स्वतः च्या बचावासाठी या अशा नराधमांचा बळी घेतलात तरी त्याचं पातक तुम्हाला लागणार नाही. मी तुमच्या पाठीशी आहेच पण धैर्याचं पाऊल तर तुम्हालाच उचलावं लागेल."

सीमाने लताला कडकडून मिठी मारली. या जावाजावांची ही कहाणी अजुनही कानिवळे गावात सांगितली जाते.

-------सौ गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now