झोपडी भाग २

What Is In The Cottage ?
चंद्राचा मंद प्रकाश पायवाटेवर पडला होता. दोन्ही बाजूंच्या झाडीत मात्र तो क्षीण होत होत गाभ्यात पूर्णपणे गडप झालेला‌. भयाण शांतता. रस्त्यालगतच्या एका झाडावर बसलेल घुबड अधूनमधून घुत्कार टाकीत होते. वटवाघूळे इकडून फडफड करत इकडून तिकडे घिरट्या घालत होती. मधूनच लांबवरून कोल्हेकुई ऐकू यायची. एवढाच काय तो आवाज. बाकी काही नाही. वाहतूकीसाठी फारच कमी वापरात असणाऱ्या या भागात अशावेळी शांतताच असणार म्हणा.
दूरवरून दोन हेडलाईन्स चमकताना दिसतात. बहुतेक कार असावी. हो.. कारच ती. जसजशी ती पुढे येत होती, तसा तिचा मोठा होत जाणारा आवाज शांततेला तडे देत होता. कारचा लाल रंग रात्रीच्या चंद्रप्रकाशात खूपच आकर्षक दिसत होता. आतमधील पिवळसर लाईटच्या उजेडात कार चालवणारी व्यक्ती दिसत होती. गोल, निमगोरा चेहरा. उग्र नजर रागीट, चिडचिडा स्वभाव दर्शवत होती. आखूड नाक आणि जाडजूड मिशी. तो होता प्रदीप चिटणीस. मुंबईतील एका नामांकित कंपनीचा सिनियर मॅनेजर. आज सकाळपासूनच ऑफिस मध्ये तो कामांनी घेरलेला होता. सगळी कामं मार्गी लावून घरी निघायला उशीरच झालेला. मेंदू शीणला होता. आता घरी गेल्यावर बाथ घेऊन सरळ बेडवर आडव व्हायचं. असा तो विचार करीत होता. कार वेगाने धावत होती. अचानक हेडलाईट्स च्या प्रकाशात एक तरूणी कारच्या समोरून पास होताना त्याला दिसली. त्याने कचकन ब्रेक लगावले. त्या आवाजाने ती दचकली. रागाच्या तिरीमिरीत प्रदीप खाली उतरला. काहीतरी बोलण्यासाठी त्या मुलीकडे बघितले, अन् त्याचे शब्द ओठांवरच थिजले. डोळे किंचित विस्फारले.
ती खूपच सुंदर होती. गोरीपान, मोठ्या डोळ्यांची, लालचुटुक ओठांची, बांधेसूद. तो तिला बघताना हरखून गेला. ती समोर येऊन काहीतरी बोलली. तेही त्याला समजले नाही. शेवटी तिने चुटकी वाजवून त्याला भानावर आणले.

" माफ करा साहेब. मी वेडी आपल्याच तंद्रीत चालले होते." ती म्हणाली. तिचा आवाजही खूप गोड होता.

" अगं माझी कसली माफी मागतेस. तुझी ही चूक तुझ्याच जीवावर बेतली असती. असं नको करत जाऊस गं. जीव मोलाचा असतो. " तो आवाजात सौम्यता आणत म्हणाला.

" हो साहेब, बरोबर आहे तुमचे. बरं, पण तुम्ही एवढ्या रात्री या जंगलातून कुठे चाललात ? "

" मी माझ्या घरी चाललो होतो. तसा रात्रीचा मी या वाटेने जात नाही ; पण हा जवळचा रस्ता आहे. आज कामावरून निघायला उशीर झाला, त्यामुळे इकडून चाललो होतो."

" अहो काय साहेब ! तुम्ही मला समजावत होता, आणि स्वतः चाच जीव धोक्यात घालता होय. अहो दिवसा इथून जाण-येण वेगळं. आता अशी रात्रीची वेळ. त्यात पावसामुळे एवढा चिखल झालाय."

" हो बाई, मान्य आहे ; पण घरी तर जायलाच हवं ना."

" उद्या सकाळी जा."

" सकाळी ? आणि रात्रभर काय कारमध्ये झोपू ? इतक्या गरमी मध्ये."

" नाही नाही. तुम्ही माझ्या घरी चला की."

" ऑं. नाही. असं कसं, तुझ्या घरी मी... तु मला नीट ओळखतही नाहीस. आणि "

" अहो त्यात काय. एका माणसानं माणुसकी म्हणून दुसऱ्या माणसाला मदत करायला ओळख असली पाहिजे का ?"

" तसं नाही. पण.."

त्याने जरा आढेवेढे घेतले ; पण मग तिच्या आग्रहापुढे मान तुकवल्याचा आविर्भाव करीत तो तयार झाला. ते सोबत निघाले.

" काय गं. तुझं नाव काय ? "

" निशा."

" ओह. सुंदर नाव आहे. अगदी तुझ्यासारखे."

ती जराशी लाजली. तो मुग्ध होउन तिच्या लाजऱ्या चेहऱ्याकडे बघत राहिला.

" अजून किती दूर आहे तुझं घर ?" जरावेळाने त्याने विचारलं.

" अहो दूर कसलं. ते काय समोरच." तिने बोटाने खुण केली. त्याने त्या दिशेने पाहिले. थोड्याच अंतरावर त्याला ती छोटीशी पण सुबक, टुमदार झोपडी दिसली.

🎭 Series Post

View all