Feb 24, 2024
नारीवादी

स्वयंपाक........... बापरे किती कठीण?.........छे खूपच सोपा!

Read Later
स्वयंपाक........... बापरे किती कठीण?.........छे खूपच सोपा!

स्वयंपाक……. कित्ती कठीण? किती सोपा!     आटपाट नगर होतं. त्या नगरात सगळं कसं व्यवस्थित होतं. गृहिणी घर सांभाळत होत्या, नोकरदार महिला ऑफिसमध्ये जात होत्या, मुलांच्या शाळेचा ऑनलाईन - ऑफलाइन असा गोंधळ सुरू होता. माणसं कामावर जात होती. कुणी मास्क लावत होते, कुणी बेपर्वाईने वागत होते.


     तर या आटपाट नगरात राहात होती वर्षा. वर्षा एक सर्वसामान्य गृहिणी होती. दोन मुलांची आई, कर्तव्यदक्ष पत्नी, आदर्श सुन अशा अनेक पदव्या तिच्याकडे होत्या, पण एक दिवस काय झालं! वर्षाची मुलं जेवतांना किरकिर करू लागली, तिच्या नवऱ्याला तिने बनवलेला स्वयंपाक आवडेनासा झाला, त्याचा डबा रोज तसाच न खाता घरी परत येऊ लागला, घरातल्या वृद्ध सासू-सासऱ्यांचा जेवणासाठी नाराजीचा स्वर सुरू झाला.


         हे असं आठ पंधरा दिवस सुरू होतं. वर्षाला सकाळचा उरलेला किंवा घरातल्या मंडळींनी न खाल्लेला नाश्ता जेवताना खावा लागायचा. दुपारचं उरलेलं अन्न रात्री, आणि रात्रीच अन्न परत दुसऱ्या दिवशी सकाळी खावं लागायचं. ह्या सगळ्या प्रकारामुळे वर्षा चिडली होती. अन्नाची होणारी नासाडी तिला बघवत नव्हती, पण उपायही सापडत नव्हता. वर्षा दिवसेंदिवस खंगत चालली होती. मुलांच्या पोषणाचा, नवऱ्याच्या तब्येतीचा आणि घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न तिला छळत होता.


       या दिवसेंदिवस गंभीर होणाऱ्या प्रश्नाची उत्तरं तिने आधी समाज माध्यमावर शोधली, मग मैत्रिणींशी चर्चा केली.पण शेवटी तिची आत्ते सासूच तिच्या मदतीला धावून आली.


      वर्षाच्या आत्तेसासुबाईंनी वर्षाला एक वसा सांगितला. वर्षाने तो वसा मनोभावे, पूर्ण श्रद्धेने वसला. चला तर बघुया काय आहे तो वसा…..


वर्षा - "आत्या आज काल मला स्वयंपाक करताना फार काळजी वाटते हो!"


आत्या - "अगं स्वयंपाक तो स्वयंपाकच असतो ,त्यात काळजी कसली करायची? आपण छान निगुतीनं संसार करतो तसाच स्वयंपाकही करायचा."


वर्षा - "पण आजकाल माझ्या हातचं कोणाला फारसं आवडत नाही. घरातली लहानथोर नाक मुरडतात मी बनवलेल्या पदार्थांना. नेहमी बाहेरचं खाणं चांगलं आहे का? परत घरी केलेलं- उरलेलं रोज रोज कोणाला द्यावे? मी एकटीच किती शिळं खाऊ? माझा ही जीव आहेच ना! करण्याचे श्रम आणि अन्न वाया गेलं की माझी फार चिडचिड होते."


आत्या - "एक काम कर, मी सांगते त्या टिप्स अंमलात आण आणि बघ काय चमत्कार होतो! आता लक्षपूर्वक ऐक हो!"


          "उत्तम स्वयंपाक येणे ही कला बिला नसून नुस्त एक मृगजळ आहे, त्याच्या मागे लागून आपलं आयुष्य खराब करून घेऊ नको. पदार्थ हा खाणाऱ्याला आवडला तर तो त्याला चांगला म्हणतो, नाही आवडला तर \"काही विशेष जमलं नाही\" असं म्हणतो. मुळात पदार्थ हा चांगला किंवा वाईट नसतोच…. तो फक्त असतो…आणि तेवढेच पुरेसा आहे, अन्न हे पूर्णब्रम्ह असे म्हणतात, अमकीच्या हातचे पूर्णब्रम्ह आणि तमकीच्या हातचे पावब्रम्ह असे काही शास्त्र सांगत नाही. तेव्हा जस्ट चिल…. आपण करतो ते अन्न पण पूर्ण ब्रह्मच असतं. एखाद्याला मुळीच न आवडलेला पदार्थ दुसऱ्याला अतिशय आवडतो असाही अनुभव तुला कित्येकदा आला असेल…याचं कारण म्हणजे खाणारी व्यक्ती बदलली की आवड बदलते…कित्येकदा बायकांना \"तू आईकडून शिकून का घेत नाही , आई किती छान करते हा पदार्थ\" असं नवऱ्याने म्हंटलं की तळपायाची आग मस्तकात जाते…असं काही वाटून घेण्याची गरज नसते…जे माणूस लहानपणापासून खातो ते त्याला प्रिय असते हा नैसर्गिक स्वभाव आहे. आपल्याला नाही का आपल्याच गावातली आणि अमुकच एका गाडीवाल्याची भेळपुरी, पॅटिस आवडत असतं, तसं सगळ्यांचच असतं.

   

       तरीही आपलं कुणी कौतुक केलं की सर्वांना आवडतं. काही लोक चुकून सुद्धा आपलं कौतुक करीत नाहीत म्हणा ! त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपण मेहनतीने केलेल्या स्वयंपाकचं,  एखाद्या नव्या शिकलेल्या पदार्थाचं कोणी कौतुक केलं की मन भरून येतं आणि श्रम सार्थकी लागतात. म्हणूनच काही गोष्टी तू लक्षात ठेव.


      सगळ्यात पहिली गोष्ट पोट भरलं असलं की, माणसाला राजभोग थाळी दिली तरी तो चुका काढतो. म्हणून दुपारच्या स्वयंपाकाचं पूर्ण चीज करायचं असेल तर घरातील मंडळींना नाश्ता देण्याच्या भानगडीत पडू नको, \"हे काय आत्ता करते स्वयंपाक, मग गरम गरम खाऊन घ्या\" असं प्रेमानं म्हण आणि सकाळची काम आवरून घरातल्या मंडळींची उपासमार होणार नाही आणि त्यांना कडकडून भूक लागेल असा सुवर्णमध्य साधून स्वयंपाक कर.


   भाजी किंवा कोणताही नवा किंवा खास पदार्थ बनवताना अगदी मोजका बनव. खाणाऱ्याला मनसोक्त खायला पदार्थ दिला की त्याची किंमत आणि चव कमी होते. त्यामुळे खायची इच्छा शाबूत असताना पदार्थ संपला की, माणसाला परत केव्हा खायला मिळेल याची आतुरता लागून राहते आणि त्या पदार्थाची पत वाढते.


       जेवण नेहमी गरम करून वाढ. चपात्या मात्र करून ठेवू नको. व्यक्ती जेवायला बसली कि गरम गरम तव्यावरून ताटात पोळी, फुलका वाढला की पैकीच्या पैकी मार्क मिळतात. बाकी पदार्थ सगळे उन्नीस-बीस झाले तरी गरमागरम , ताजी , तूप लावलेली पोळी तव्यावरून ताटात पडली की , समज तु गड सर केला. ताटातल्या गरम पोळीने खाणाऱ्याचा आत्मा सुखावतो.


      नुसती भाजी- पोळी- वरण -भात असा स्वयंपाक कधीच करू नको. दोन-चार लोणची, काही कोरड्या, काही ओल्या चटण्या, ठेचा, पापड, ताक, मेथांबा, लाडू, सलाड असे दोन तरी प्रकार, कांदा, लिंबू, भिजवलेल्या डाळी किंवा दही किंवा भिजवलेले शेंगदाणे असे सर्व आलटून पालटून ताटात रोज असावेत.


         खूप मेहनत नाही लागत. अगदी चमचाभर वाढावं. माणूस प्रथम नजरेने जेवतो. असं भरलेले ताट पाहून माणसाची तृप्ती होते, जेवणाची इच्छा होते. खातो शेवटी माणूस भाजी पोळीच पण जेवताना अधून मधून या पदार्थांनी जेवणाची लज्जत वाढते. साधी भाजी पोळी पण रुचकर लागते.


     भात नेहमी गरम करूनच वाढावा. थंड भात बाकी जेवणाची रया घालवतो. जेवणारी मंडळी जेवायला बसली की कुकर परत गॅसवर चढवावा किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्यावा.


    उन्हाळा असल्यास पाणी माफक थंड करूनच जेवणाऱ्याला द्यावे, जेवणाची खुमारी ह्याने टिकून राहते.


    जेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे जातीने लक्ष ठेवावे. सगळ्यांच्या पोटाला, मनाला, आत्म्याला शांती प्रदान करणारी ही एक सेवा आहे आणि ह्याची संधी गृहिणी म्हणून आपल्याला मिळाली आहे ही गोष्ट कदापि विसरू नको. तु जर भुकेल्या जीवांचा आत्मा सुखावला तर तुला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही ,याची खात्री ठेवावी.


     शक्य असल्यास जेवणाची कटलरी म्हणजेच भांडी सुंदर असावीत. पदार्थ जेवढा प्रेझेंटेबल असेल तेवढा तो खायला उत्तम लागतो. डीश डेकोरेशन ही थोड्याफार प्रमाणात शिकून घे.     भाज्या कापतांना नेहमी एकाच आकारात कापून नको. कधी छोटे तुकडे, कधी मोठे, कधी लांबुळके, मात्र सर्व एक सारखे असावेत. भाजी कशी कापली त्यावर पण भाजी अथवा सॅलड ची चव बदलते. एकच भाजीचे असे नुसते आकार बदलून व्हेरीएशन्स करता येतात आणि जेवणात नाविन्य आणता येते.


      फार नवे नवे पदार्थ समाज माध्यमावरून पाहुन करण्याच्या भानगडीत पडून स्वतःला शिणवु नको. एखादवेळी ठीक आहे . पण रोज रोज असा त्रास करून घेऊ नको. नाहीतर हे सर्वांच्या सवय झालं तर, तुलाच जड जाईल मग दोष कोणाला देशील? साधे नेहमीचे पदार्थ खावेत आणि खाऊ घालावेत. पोषणमूल्ये त्यातच आहेत हे लक्षात असू दे.


       शेवटी सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाक घर म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही, भरपूर वाचन कर,  सिनेमे बघ , जीवनाचा आनंद घे, खुश रहा आणि दुसऱ्या बायकांच्या हातचे पदार्थ खाल्ले तर त्यांचे मात्र खूप खूप कौतुक मनापासून कर."


       आतेसासूबाईंनी दिलेला हा अन्नपूर्णेचा वसा वर्षाने मनोभावे आणि श्रद्धेने पूर्ण केला. वर्षाच्या घरी आता सगळेजण सगळे पदार्थ आनंदाने खातातही आणि वर्षाचं कौतुकही करतात.


       ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.


संदर्भ - समाज माध्यमावरील पोस्ट वर आधारित

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//