तुमच्या मुलीला स्वयंपाक येतो का?

In Today's Modern Life Cooking Is The Only Responsibility Of Women

तुमच्या मुलीला स्वयंपाक येतो का?




        सर्वसाधारणपणे कुठल्याही मुलीचं लग्न ठरवताना मध्यस्थ मंडळी किंवा मुलाकडचे विचारतात, "बाळ तुला स्वयंपाक येतो का? किंवा तुमच्या मुलीला स्वयंपाक येतो का?" आज-काल मुलीही मुलांइतक्याच शिकतात, उच्च शिक्षण घेतात, आपापल्या नोकऱ्यांमध्ये वरच्या हुद्याच्या जागा पटकावतात. पण तरीही लग्न जुळवताना मध्यस्थ मंडळी किंवा मुलाकडचे ,मुलीला "तुला स्वयंपाक येतो का"? हा प्रश्न नक्कीच विचारतात. आपण म्हणतो, समाज आता आधुनिक झाला आहे, इंटरनेटचा जमाना आलाय, पण मग तरीही मुलीला स्वयंपाक येतो का हा प्रश्न विचारणं किती योग्य आहे?



******************************************


            रमेश जोशी आणि सीमा जोशी हे एक मध्यमवर्गीय जोडपे. निशा आणि नीरजा त्यांच्या मुली. रमेश जोशी हे पोस्टात हेडक्लार्क आहेत तर सीमा जोशी या माध्यमिक शाळा शिक्षक.


              रमेश जोशी यांच्या कुटुंबात सीमा त्यांच्या पत्नी, निशा आणि नीरजा या दोन मुली आणि रमेश रावांच्या आई असं संपूर्ण हे कुटुंब आहे. रमेश रावांचे आपल्या दोन्ही मुलींवर फार प्रेम आणि या दोघीही त्यांच्या अतिशय लाडाच्या. मोठी निशा एम. एस. सी. भौतिकशास्त्र करून विद्यापीठातून गोल्ड मेडल सह प्रथम आलेली आणि आता विद्यापीठातच लेक्चरर्शिप करता करता पी. एच.डी.  करत होती. तर लहान नीरजा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग च्या प्रथम वर्षाला होती. दोघीही बहिणी दिसायला अत्यंत सुंदर आणि अभ्यासात खुप हुशार. नीरजा दहावी आणि बारावीला राज्यातून अनुक्रमे पहिली आणि तिसरी आली होती.


          निशा आणि नीरजा या दोघीही जरी बाबांच्या खूप लाडक्या होत्या, तरी सीमा ताईंनी आपल्या मुलींना योग्य वळण लावण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न याकरिता की , सीमाताई मुलींना लहानपणी आणि आताही जेव्हा जेव्हा लहान-मोठ्या कामात मदत मागायच्या तेव्हा रमेशराव त्यांना आधीपासूनच टोकायचे, म्हणायचे, " काय हे सीमा लहान आहेत त्या अजुन आतापासून नको त्यांना कामाला घालू". आजी पण, रमेशरावांची आई  पण त्यांचीच "री" ओढायची.


आजी - "अगं मुलींची जात, पुढे करावाच लागणार ना स्वयंपाक ! बाईच्या जातीला चुकलंय का स्वयंपाक घर कधी?"


सीमा - "हो आई आत्तापासून लावली सवय तर पुढे जड जात नाही ना! आता माझेच उदाहरण घ्या ना. मी शाळेत नोकरी करते. सकाळी सगळे आवरून मग शाळेत जाते. तिकडून आल्यावर परत घरकाम . सकाळी लवकर उठायचं, सगळ्यांचा नाष्टा मग स्वयंपाक, बरे एवढे करून होत नाही . तुमच्या मुलाला आवडतात म्हणून चटण्या, लोणची, चिवडा, निशाला नुसती कढी -खिचडी नको ,म्हणून मग सांडगे ,दही मिरच्या, नीरजाला कच्चा चिवडा हवा म्हणून मग तो. तुम्हाला रात्री अल्पाहार हवा म्हणून, मग कधी उपमा- उपीट ,तर कधी ज्वारी नाचणीचा घाटा, नाही तर अजुन काहीतरी . मला आधीपासून सवय होती म्हणून नोकरी करून घर सांभाळणं कठीण नाही गेलं. माझी पण आता पन्नाशी आली आहे .घरातून दहाच्या काट्याला निघताना माझी दमछाक होते.


          सगळं सगळ्यांना वेळच्यावेळी द्या. या शिवाय बाहेरचा कोणाला काही आवडत नाही म्हणून मग उन्हाळ्याची वाळवणं. दिवाळी फराळ. मला स्वतःला म्हणून काही सवड नाही, आणि छंद जोपासायचे तर वेळ ही नाही."


आजी -"अग पण आम्ही कुठे म्हणतो, तू सगळं कर."

सीमा - "मला कोणी काही म्हणत नाही आणि कामात मदतही करत नाही." ( सीमा ताई वैतागाने बोलत होत्या.)


         हा संवाद आताशा जोशींकडे वारंवार घडत होता .कोणी काही बोलत नव्हतं आणि सीमाताईंना घरकामात मदतही करत नव्हतं.



सीमा - "निशा उठ . सकाळी नऊ वाजता तुझं लेक्चर आहे ना!"


रमेश - "झोपु दे ग तिला अजून सातच वाजलेत उशिरा झोपली ती रात्री. रात्री नोट्स काढत बसली होती उशिरापर्यंत."


सीमा - "अहो आता उठली तर, नऊ वाजेपर्यंत तयार होईल. उशीर झाला तर माझ्याच मागे किरकिर करेल."


         निशा उठली कारण ती जर अजून झोपली तर, आईचे प्रश्न आणि बाबांची उत्तर तिला नको होती. निशा स्वतःच आवरून विद्यापीठात निघून गेली.


सीमा - "नीरजा उठ. अग नऊ वाजलेत.चल मला थोडी मदत कर स्वयंपाक करायला."


नीरजा - "आई झोपू दे ना! आज माझा एकही लेक्चर नाही. आम्ही सगळेजण आज दांडी मारणार आहोत कॉलेजला."


सीमा - "पण नाश्ता आणि जेवणाला तर दांडी नाही ना! चल मला मदत कर . उठ लवकर."


रमेश - "सीमा , झोपू दे ना ! तिला थोड्यावेळ अजून."


सीमा- "मग एक काम करा आज तुम्ही फक्त नाश्ता करूनच ऑफिसला जा. आणि हो डबा पण मिळणार नाही. आज माझ्या शाळेत इन्स्पेक्शन आहे. मला लवकर निघायचं आहे."


         रमेश आणि नीरजाने एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावले.


रमेश - "बर ठीक आहे. तु जा. जेवणाची काळजी करू नकोस. आम्ही ऑनलाइन बोलावू."


      सीमा काही न बोलता , तयार होऊन शाळेत निघून गेली. रमेश आणि नीरजाने ऑनलाइन जेवण बोलवले आणि एकमेकांना टाळी दिली.


            मधल्या काळात सीमाने एकदा पोळ्याला बाई लावली होती. कामाचा ताण वाढल्याने तिला असं वाटलं, आपल्याला तेवढीच मदत होईल. पण बाईच्या हातच्या पोळ्या आजीच्याने चावत नव्हत्या, तर रमेश राव आणि निशाला पोळ्या वातड वाटायच्या. त्यामुळे सीमाताईंना तो प्रयत्नही फुकट गेला होता. या ना त्या कारणाने सीमा ताईचे  प्रयत्न असे फोल ठरत होते.


              काही महिन्यानंतर निशा करता एक चांगलं स्थळ सांगून आलं. मुलगा स्टेट बँकेत मॅनेजर होता. एका दूरच्या, रमेशराव यांच्या बहिणीने सीमाताईंना फोन करून ह्या सुयोग्य वराची माहिती सीमाताईंना दिली.

               रात्री नऊ साडेनऊला त्या आत्याबाईंचा फोन आला.


आत्या - "हॅलो सीमा, अग मी आशा बोलते आहे. रमेश ची चुलत मावस बहीण , ओळखलस का?"


सीमा - "हो ताई, तुमचा नंबर सेव आहे माझ्याकडे."


आत्या - "मावशी कशी आहे?"


सीमा - "मध्ये त्यांना जरा दम्याचा त्रास झाला होता ,पण आता त्यांची तब्येत ठीक आहे."


आत्या - "अच्छा, आता वयोमानानुसार हे असं चालणारच."


सीमा - "हो ताई."


आत्या - "अगं , मी ह्या करिता फोन केला होता की ,निशाच लग्न करायचा तुमचा काही मानस आहे का? की अजून वेळ आहे?"


सीमा - "ताई अजून तसं काही ठरवलं नाही. एखादं योग्य स्थळ मिळालं तर आमची काही हरकत नाही. पण आमची एक अट आहे."


आत्या - "मला माहिती आहे, तू आहेस हाडाची शिक्षिका . तू काही हुंडा देणार नाहीस."


सीमा - "हो ते तर आहेच .पण आमचं दुसरं असं म्हणणं आहे की, लग्न झाल्यावरही तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांनी, तिचे शिक्षण पूर्ण करू द्यावं. ती सध्या पी.एचडी. करते आहे ,म्हणून म्हंटलं तुमच्या कानावर एकदा घालावं , नाही का?"


आत्या - "सीमा याबाबतीत तू काही काळजी करू नकोस. मी जे स्थळ आणलं आहे ना! ते लोक सुशिक्षित आणि आधुनिक विचारसरणीचे आहेत. निशाला ते नक्कीच तिची पी.एच.डी. पूर्ण करू देतील. बर मला सांग निशाला स्वयंपाक तर येतच असेल ना?" (तेवढ्यात हॉलमध्ये निशा, नीरजा, रमेशराव आणि आजी असे सगळे आलेत. त्यांनी सीमाताई फोनवर काय बोलत आहे ? ते लक्षपूर्वक ऐकलं

)


सीमा - "हो तर! आमची मिशा खूपच छान स्वयंपाक करते. (निशाकडे सीमाताईनी तिरपा कटाक्ष टाकला.) अहो तुम्हाला तर माहिती आहे ती भौतिकशास्त्राची प्राध्यापक आहे. तिला इतकं छान पाणी उकळता येते ना! आणि त्या उकळत्या पाण्याच्या वेगवेगळ्या डिशेश आणि रेसिपीज पण येतात तिला."


आत्या -( उत्सुकतेने ) "अग बाई हो का! कुठल्या आहे त्या उकळत्या पाण्यातल्या रेसिपी?"


सीमा - "आमची निशा पाणी उकळून त्याचा "ग्रीन टी" छान बनवते, उकळत्या पाण्यातले इन्स्टन्ट नूडल्स , सूप आणि झालंच तर "लेमन टी" आणि हो कधी कधी डाळ -तांदूळ एकत्र करून त्याची उकळत्या पाण्यातली खिचडी सुद्धा बनवते, कधी कधी ती बटाटेपण वाफवते त्या उकळत्या पाण्यात.

(सीमा ताईंच्या या उत्तराने सगळे अवाक झाले आणि एकमेकांकडे बघायला लागले. सीमा ताईंच्या बोलण्यातली मेख सगळ्यांनाच कळली होती.)

              अहो ताई ,आज-काल मुलगा मुलगी असा भेद आपण मानत नाही, नाही का? आज मुलीही मुलानं इतक्याच हुशार आहेत. त्यांच्या इतकचं शिकतात. तेवढ्याच पगाराच्या मोठ्या हुद्द्यावर च्या नोकऱ्या करतात. त्यामुळे त्यांना कुठे वेळ आहे स्वयंपाक वगैरे करायला? (सीमा ताईंचा टोमणा निशाच्या लक्षात आला.) आधीचे दिवस गेले. घरचं करा, सगळ्यांची मर्जी सांभाळा, मग मिळालाच वेळ तर आपली एखादी छोटी - मोठी नोकरी करा. मुली आता सर्वात आधी नोकरी किंवा करिअरचा विचार करतात. बाकी लग्न - नवरा - मुलं-बाळं हे सगळं त्यानंतर, हो की नाही?

           अहो ताई, स्त्री पुरुष समानता काय फक्त अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये आणि वर्तमानपत्राचे रकाने भरवण्यासाठीच असली पाहिजे का? तुमच्या- आमच्यासारखे लोक, जेव्हा चाकोरीबाहेरचा विचार करतील तेव्हाच समाजात स्त्री-पुरुष समानता येईल."


आत्या - "सीमा खरंच ग! मी तर असा विचारच केला नाही . पण तू तर मला आता मुलींकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला."


सीमा - "आशाताई मी एक प्रश्न विचारू का?"


आत्या - "हो,अग नक्की विचार."


सीमा - "ताई तुम्ही म्हणता ना, ते लोक सुशिक्षित आहेत ,आधुनिक विचारांचे आहेत तर मग "तो मुलगा" आपल्या आईला घरकामात थोडीफार मदत तर करतच असेल ना? शिवाय आंघोळ झाल्यावर टॉवेल सर बेडवर न टाकता बाहेर वाळत घालणे, झोपेतून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी करून पलंगावरची चादर व्यवस्थित करणे, स्वतःचे कपडे स्वतः कपाटातून घेणे , आधीचे कपडे इकडेतिकडे न टाकता बाथरूम मध्ये धुवायला टाकणे, पायात घालायचे मोजे रोज बदलणे, ते  घरभर इकडे तिकडे न टाकता धुवायला देणे, रोजचा ऑफिसचा जेवणाचा डबा ऑफिसमधून आल्यावर घासायला टाकणे अशा सगळ्या चांगल्या सवयी तर त्याला नक्कीच असतील ना!"


         सीमा ताईंच्या या प्रश्नांवर आत्या बाईंकडून फोनवर भयाण शांतता पसरली , कारण त्यांच्याकडे या प्रश्नांची कुठलीही उत्तरं नव्हती. पण सीमा ताईंच्या घरातले इतरांचे चेहरे मात्र उजळले.


        आता नीरजा आणि निशा दोघीही त्यांच्या आईला घरकामात मदत तर करतातच पण आवडीने स्वयंपाक पण शिकत आहेत. सकाळचा नाष्टा नीरजा बनवते, तर रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी निशाने घेतली आहे. रमेश रावांनी पण स्वतःच्या सवयींमध्ये आता अनेक बदल केले. ते आता आंघोळीचा टॉवेल दोरीवर वाळत घालतात, ऑफिसचा डबा स्वतः घासायला टाकतात, आणि स्वतः सोबतच सीमा ताईंचे कपडे पण स्वतः च प्रेस करतात.

🎭 Series Post

View all