स-स्वयंपाकाचा नाही,स-तर स्त्रीच्या सहनशक्तीचा

Every Woman Cook's For Her Family But No-one Gives Importans For Her Cooking , very Strange Truth Of Every Woman's Life

स- स्वयंपाकाचा नाही, स- तर स्त्री च्या सहनशक्तीचा





        ‌ त्यादिवशी मीना स्वयंपाकघरात फुलके करत होती. दुपारी साडेबारा - एकची वेळ म्हणजे माई -अण्णा (मीनाचे सासू-सासरे) यांच्या जेवणाची वेळ. ती वेळ जर चुकली तर घरात रामायण-महाभारत आणखीन काय काय होणार याची शाश्वती खुद्द मिनालाच नसायची. म्हणून मीना एकीकडे भराभर फुलके बनवत होती , तर दुसरीकडे वरणाला तडका देऊन तेही उकळत होतं, मधल्या शेगडीवर भरवा भेंडी गरम होत होती. तेवढ्यात सोनू (मीनाचा दहा अकरा वर्षाचा मुलगा ) मीना जवळ आला आणि मीनाला स्वयंपाक करताना पाहत होता.


      मीनाने छोटा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि परतून घेतला. तोपर्यंत दुसरा फुलका लाटून तयार होताच. एका हाताने मीनाने पकड घेऊन तवा उचलला आणि फुलका चीमट्याने गॅसवर धरला लगेच तो फुगून आला. सोनू आश्चर्याने म्हणाला,\"झाला पण फुलका? इतका सोप्पा?\"


  मीना - \"हो कठीण नसतोच मूळी फुलका, खरं तर सगळा स्वयंपाकच खूप सोपा असतो. कठीण असतं ते रोज रोज करणं. अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणं.\"


      तेवढ्यात सासूबाईंचा चिडका आवाज आला.


सासू -\"अगं किती वेळ आहे अजून ? साडेबारा कधीच वाजून गेलेत! आज जेवायला देणार आहेस की, करावी आम्ही निर्जला एकादशी?\"


       मीना सोनूकडे बघून कसनुसं हसली आणि डायनिंग हॉलकडे वळली. सासू-सासर्‍यांचे ताट वाढलं. पण शांततेने सगळं पार पडेल तो स्वयंपाक कसला? भरवा भेंडी थोडी करपली म्हणून सासूने दोन टोमणे मारूनच घेतले. तर वरण थोडं पातळ झालं म्हणून सासर्‍यांनी नाक मुरडलं.

      मीनाला आता या सगळ्याची सवय झाली होती . पण तरीही मीनाच्या मनात कुठेतरी वेदना उमटत होतीच. सगळे व्यवस्थित केलं तरी काही ना काही दोष काढायचा हा माई -अण्णांचा स्वभाव झाला होता.



        तर मंडळी एव्हाना तुमच्या हे लक्षात आलंच असेल की ही कथा आहे - मीनाची.

    


     मीनाच्या घरात ती, तिचा नवरा- रमेश,

     तिचा मुलगा- सोनू, सासू सासरे-अण्णा माई,

       लहान दिर -सुरेश, जाऊ- मधुरा.


     मीनाचे सासरे हे निवृत्त सनदी अधिकारी असल्याने त्यांना कुठल्याही कामात दिरंगाई, चालढकल ,बेशिस्तपणा किंवा दर्जाबाबत न्यूनता खपत नसे. शिवाय हाताखालच्या प्रत्येकाला एवढी वर्षे त्यांनी केवळ आदेशच दिले होते, त्यामुळे तोच बाणा आता निवृत्तीनंतरच्या पाच वर्षात तसूभरही कमी झाला नव्हता. मीनाच्या सासुबाई माध्यमिक शाळा शिक्षिका, केवळ शिक्षिकाच नव्हे तर राज्य शासनाच्या पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका होत्या. मीनाचा नवरा विद्यापीठात रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता, पण घरात प्रेमाचं , सलोख्याचे रसायनशास्त्र कसं टिकवायचं ते लग्नाच्या बारा वर्षानंतरही त्याला जमलं नव्हतं. मीनाचा लहान दिर कम्प्युटर हार्डवेअर चा व्यवसाय करायचा , शिवाय तो एका राजकीय पक्षात वरच्या पदावर कार्यरत होता. लहान जाऊ मधुरा मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत होती. तर असं हे मीनाचं सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंब……


        मीना पण भौतिक विषयात एम. एस. सी. ला गोल्ड मेडल घेऊन विद्यापीठात प्रथम आली होती. रमेशने तर तिला तेव्हाच पसंत केले आणि घरच्यांच्या इच्छेनुसार- मीनाच्या दृष्टीने अरेंज तर- रमेशच्या दृष्टीने त्यांचे लव्हमॅरेज झालं. (मीना सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील थोरली मुलगी. तिला एवढं चांगलं स्थळ म्हणजे- आर्थिक, शैक्षणिक , आणि सामाजिक दृष्टीने , मीनाच्या घरच्यापेक्षा वरचढ स्थळ सांगून आलं. त्यामुळे मीनाच्या घरच्यांचा नकार येणे शक्यच नव्हतं. कारण या स्थळामुळे मीनाच्या लहान दोन्ही बहिणींना पण चांगली स्थळं येतील असा मीनाच्या वडिलांना विश्वास होता).



          रमेश तसा अबोलच . बालपणी वडिलांचा दरारा आणि आईचा शिस्तप्रिय स्वभाव आणि नोकरीमुळे तो जरा एकलकोंडा झाला होता. लग्न झाल्यावर रमेशने मीनाला नोकरी करूच दिली नाही. पण त्यामुळे झालं असं की , गुणवत्ता असूनही मीनाची सगळी हुशारी चुलीसमोर नव्हे गॅससमोर वाया जात होती.


          लहान जावू मधुरा मीनाला शक्य तेवढी मदत करत होती,पण जोशींच्या घरातले नियम आणि पद्धती तिला जास्त काही करण्याचा वावच देत नव्हत्या. मधुरा सकाळी स्वतःचा ,सोनूचा डबा आणि बाकी सगळ्यांसाठी नाश्ता एवढच करून नोकरीच्या ठिकाणी निघून जाई. बाकी सगळं मीनालाच बघावं लागे. त्यातही सासूबाईंची मुक्ताफळ तिला ऐकावी लागत.


सासुबाई - \"चार-पाच जणांचा स्वयंपाक तो काय? पण तरीही नीट जमत नाही. काय तर म्हणे एम. एस. सी. गोल्ड मेडलिस्ट.\"


       मीनाला आता या वाक्यांची सवय झाली होती तरीही मनाला वेदना मात्र नक्कीच व्हायच्या.


        असाच एक प्रसंग…..


     दिवाळी झाल्यानंतरची गोष्ट…..


    पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. मीनाचा दीर सुरेश राजकारणात असल्याने जोशींच्या वाड्यावर कार्यकर्त्याची ये-जा आणि वर्दळ वाढली होती आणि त्यामुळे मीनाचा स्वयंपाक घरातला वेळही वाढला होता.


      सुरेश प्रत्येक कार्यकर्त्याला चहा पाण्याचा आणि जेवणाचा आग्रह करत होता. येणारा प्रत्येकजण जेवूनच गेला पाहिजे याकडे सुरेशचं जातीने लक्ष असायचं. या सार्‍या धावपळीत मीनाची अवस्था मात्र शिंगरू मेलं हेलपाट्यानं अशी झाली होती.



         मीनाच्या सासू-सासर्‍यांना कार्यकर्त्यांसाठी बनवलेले जेवण नको असायचं. त्यांना सारं साग्रसंगीत जेवण पाहिजे होतं . चौथीतला सोनू , \" मम्मा माझा अभ्यास घे.\" म्हणून मीनाची पाठ सोडत नव्हता. पुढच्याच आठवड्यात सोनूची अर्धवार्षिक परीक्षा होती.


सोनू - \"मम्मा चल ना! मला हे गणित समजावून सांग. नफा- तोट्याची गणित फार कठीण जातात मला सोडवायला.\"


मीना- \"बाळा आजोबा - आजीचं आधी जेवण होऊ दे. मग दुपारभर तुझा अभ्यास घेते. तोपर्यंत तू इंग्रजीची कार्यपत्रिका सोडव बरं!\"


सोनू - \"मम्मा तू नक्की लवकर येशील ना?\"


मीना -\"हो रे राजा ! पंधरा मिनिटात येते मी. जा पळ आता, अभ्यासाला सुरुवात कर बरं तू.\"


सोनू - \"मम्मा लवकर ये हं!\"


         पाऊणतास झाला तरी मम्मा अभ्यास घ्यायला आली नाहीत म्हणून सोनू मीनाला शोधत होता. शोधता शोधता सोनू स्वयंपाक घरात पोहचला तर मीना तिथे पोळ्या करत होती.


सोनू - \"मम्मा तू आता दुपारी दीड वाजता कोणासाठी पोळ्या करते आहे?\"


मीना - \"अरे सुरेश काकांचे कार्यकर्ते आले आहेत ना त्यांच्यासाठी.\"


सोनू - \"अग पण माझा अभ्यास राहिला ना! चल तू माझा अभ्यास घे आधी. बंद कर पोळ्या करणं.\"


मीना - \"सोनू अरे आता अशा अर्ध्या पोळ्या , भिजवलेला उंडा आणि खरकटा ओटा सोडून नाही येता येणार मला. तु एक काम कर थोडा वेळ टीव्ही बघ, मी येतेच अर्ध्या तासात.\"


सोनू - \"मम्मा लवकर ये हं! माझा खूप अभ्यास बाकी आहे.\"



           दुपारी मीनाने सोनुला नफा-तोटाची गणित, इंग्रजीचा डायरेक्ट- इन -डायरेक्ट शिकवलं आणि थोडा वेळ विश्रांती म्हणून जरा लोळली. तिला माहिती होतं दिवसभर जरी ती किचनच्या ओट्याशी झुंजली तरी, दुपारी साडेचार- पाचला, सासू-सासऱ्यांसाठी हलकाफुलका नाश्ता आणि चहा तिला करावाच लागणार होता. म्हणून वेळेच गणित डोक्यात घोळवत मीना सोफ्यावर जरा टेकली आणि तिचा डोळा लागला. मीनाला जाग आली तेव्हा मीनाची सासू तणतणत होती.


सासू - \"काय बाई आजकालच्या सुनांच्या एके - एक तर्‍हा. जरा चार पोळ्या करायला लागल्या की असं दाखवतात जणू वीस-पंचवीस लोकांचा स्वयंपाक केला आहे. ओटा असाच खरकटा, बेसिनमध्ये पोळपाट ,लाटणं, चिमटा , तवा, कणिक भिजवलेला कोपर ही तसाच. मावशीबाई येईल सहा वाजता तोपर्यंत सगळा तसाच भनभन पसारा शी….\"


मीना- \"काय झालं आई? काही हवं आहे का तुम्हाला?\"


सासू - \"अगं घड्याळाकडे बघ जरा! पाच केव्हाच वाजून गेलेत. सव्वा पाच, झालेत सव्वापाच! चहा केव्हा देणार आहे ? की चहा ला सुट्टी आज ? आणि हे काय गॅसच्या बटणावर पीठ तसंच ? पोळपाट लाटणं का धुतलं नाही लगेचच?\"


मीना- \"आई मी सगळं स्वच्छ करून ,भांडी घासून सोनूचा अभ्यास घ्यायला गेले होते.\"


सासू - \"उलट उत्तर देऊ नकोस! लाटण्याच्या टोकाला नख भर कणिक होती, पोळपाटाच्या पायाला पीठ लागलं होतं, म्हणे भांडी घासली! ही अशी खरकटी ?मी परत सगळी भांडी घासायला टाकली. ह्या पेक्षा मोलकरीण तरी बरी !\"


      आणि सासूबाई तणतणत निघून गेल्या. मीनाने डोळ्यातले अश्रू खाली पडू दिले नाही. परत सगळे स्वच्छ करून चहा आणि ढोकळे बनवून सासू-सासर्यांच्या खोलीकडे गेली.


सासरे - \"तरी मी तुला सांगत होतो गरिबाघरची मुलगी करू नकोस,एवढी वर्षे झाली तरी ही तिला एकही काम धड जमत नाही, कामाचा उरक ही नाही आणि वेळेचे भान तर अजिबातच नाही.\"


सासू - \"अहो मला तरी कुठे पसंत होती ती? पण रमेश भाळला ना तिच्यावर ! आपलाच दाम खोटा….\"


मीना - \"मी ढोकळा आणला आहे खाऊन घ्या.\"


सासरे - \"खोलीत येण्यापूर्वी टकटक करावी हे सुद्धा कळत नाही का तुला? वागण्याचे काही मॅनर्स असतात की नाही?\"


            झालेल्या अपमानामुळे मीना काहीच न बोलता तिथून लगेच निघून गेली. रात्री मीनाने पोळ्याकरिता बाई लावायची का म्हणून रमेशकडे विषय काढला.


रमेश - (मीनाला प्रेमाने जवळ घेत) \"अग पोळ्याला बाईची काय गरज आहे? सोनूचा डबा आणि आपल्या सगळ्यांचा नाश्ता तर मधुराच बनवते ना! दुपारी फक्त चार जणांचा स्वयंपाक. आणि रात्री आपण सगळेजण किती साधं जेवण घेतो. साधी खिचडी किंवा मसाले भात किंवा एखादवेळी गोळा भात. माझ्यामते याकरिता बाईची काहीच आवश्यकता नाही.\"


मीना - \"अहो ऐका ना! साधी खिचडी असली तरी दही मिरच्या, सांडगे , पापड, कढीशिवाय सुरेश भाऊ आणि सोनू साठी मला पोळ्या कराव्यातच लागतात. पोळ्या केल्या म्हणजे एखादी भाजी आलीच. मसाले भाताबरोबर ओली- कोरडी शेंगदाणे -खोबऱ्याची चटणी, मठ्ठा आणि गोळा- भात तर साग्रसंगीतच हवा ना! गोळा- भाताबरोबर चिंचेचा सार, बारीक चिरलेला कांदा- कोथिंबीर , सुक्या लाल मिरच्यांचा ठेचा, आणि गोळ्यावर हिंगाचे तेल. सुटका आहे का माझी कुठे?\"


            मीना एवढे बोलेपर्यंत रमेश निद्रादेवीच्या अधीन झाला होता.


            दुसऱ्या दिवशी मीनाला फुलका करतांना बघुन, सोनू मीनाला परत म्हणत होता \"फुलका खरच सोपा असतो कागं आई?\"



मीना - \"हो, कठीण नसतोच मुळी फुलका. खर तर सगळा स्वैपाकच मुळी सोप्पा असतो. कठिण असतं ते... तो रोज रोज करणे, दिवसातून अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे आपल्या मूडचा, मनःस्थितीचा ,आजारपणाचा, दुखण्याचा कशाकशाचा विचार न करता ,अचूक आपली भूमिका निभावत, भयंकर उकाड्यात देखील शेगडीजवळ न कंटाळता लढत देणे .


           सगळे संपले असे वाटत असतानाच ,ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून,चार पोळ्या जास्त कराव्या लागणे , स्वैपाक घर आवरून ठेवल्यावर,\"संपली एकदाची दगदग आतापुरती.\"असे वाटत असतानाच... ……….. बैठकीतून,आज जेवूनच जा\" चा पुरुष मंडळींनी पाहुण्यांना केलेला आग्रह हसून साजरा करणे ,आणि तडक बिनपगारी ओव्हर टाईम करणे.

              हे करीत असताना, प्रत्येकाची भाजी, आमटी , तिखट, चटणीची वेगळी आवड आणि तर्‍हा समजून त्यानुसार,जास्तीत जास्त मने सांभाळत खपणे. बरे एवढे करून भागेल तर कसले स्वैपाकघर? म्हणुन सगळा जिव निघून गेल्यावरही, ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून , पुन्हा लख्ख करून ठेवणे, 


          ईतक्या मेहनतीला साधा कुणी थॅन्क्यु चा उच्चार ही करत नाही ,साधं पुढलं ताट देखील उचलत नाही आणि तसेच निघून जातात.भरीस भर म्हणून ह्यात कोणते जग जिंकले?? स्त्रिया असतातच स्वैपाक आणि घरकाम करण्यासाठी यासारखी सामाजिक मान्यता असणे..


         शिवाय शिकल्या सवरल्या स्त्रिया आहात म्हणुन बँक, शाळा, नोकर्‍या, उद्योग, मुलांचा अभ्यास , घरातील मंडळींची आजारपण, स्वयंपाक घरातलं मीठ- मसाला, नातेवाईक, सण समारंभ ईत्यादी व इतर अनेक गोष्टी जास्तीच्या सांभाळुन फिरून ओट्याशी दोन हात करीत न कुरकुरता उभे राहणे. 


        कामवाल्या बाईला निदान पगार तरी देतात आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी. घरच्या बाईला तर तेवढीही किम्मत नसते.


अरे .. 

 फुलका कठीण नसतोच मुळी… 

 कठीण असतो तो स्त्री जन्म\"





जय हिंद

२०/३/२०२२



   मंडळी कथा कशी वाटली नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.....



संदर्भ - समाज माध्यमावरील पोस्टवर आधारित.

फोटो -  साभार गुगल.

🎭 Series Post

View all