कॉन्फिडेंशीअल (भाग ५ अंतिम)
“चल, दवाखान्यात जाऊ. मी माझं ब्लड सॅम्पल लॅबमध्ये देऊन आलोय काल. रिपोर्ट आला असेल. जाताना घेऊ आणि डॉक्टरांना दाखवून येऊ.” दुसऱ्यादिवशी सकाळी तो तिला म्हणाला. ती मात्र शून्यात नजर लावून बसली होती.
“चल, दवाखान्यात जाऊन येऊ.” तो तिला परत म्हणाला.
“काय करायचं आहे जाऊन तरी.” ती
“चल म्हटलं ना.” त्यानं तिचा हात धरून तिला ओढत नेलं. त्याचे रिपोर्ट घेऊन दोघे दवाखान्यात गेले.
“तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. यांचा पॉसिटीव्ह आणि तुमचा निगेटिव्ह… स्ट्रेंज!” डॉक्टर म्हणाल्या.
“डॉक्टर, माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. एच. आय. व्ही. होण्यासारखं तिची वागणूकच नाहीये. मग हा रिपोर्ट कसा काय पॉसिटिव्ह आला?” तो
“एच.आय.व्ही. म्हटलं की आपण नेहमी एकाच कारणाचा विचार करतो. पण इन्फेक्टेड रक्त चढवल्यामुळे, किंवा इन्फेक्टेड इंजेक्शन वापरल्यामुळे देखील हा रोग होऊ शकतो.” डॉक्टर
“पण डिलिव्हरी सोडली तर तसं काही हिच्यासोबत झालंच नाहीये. कधी इंजेक्शन नाही की काही नाही. मला वाटतं, तुम्ही लॅबवाल्यांसोबत परत एकदा बोलून टेस्ट रिपीट करायला पाहिजे.” तो आत्मविश्वासाने बोलत होता. ती मात्र त्याच्याकडे बघतच राहिली.
“ठीक आहे. तुमची इच्छा असेल तर आपण परत टेस्ट करूया. तुम्हाला कदाचित परत रक्त तपासणीसाठी द्यावं लागेल.” डॉक्टर म्हणाल्या.
“चालेल. हरकत नाही.” तो म्हणाला. दोघे तिथून उठले. बाजूच्या लॅबमध्ये त्यांनी परत रक्त तपासणीसाठी दिलं.
“अजून एका लॅबमध्ये रक्त देऊन येऊ म्हणजे शंकेला काही कारणच राहणार नाही.” तो म्हणाला आणि ती काहीच न बोलता त्याच्यासोबत गेली.
दुसऱ्यादिवशी दोन्ही रिपोर्ट घेऊन दोघे डॉक्टरांकडे गेले.
“खरंतर, तुम्ही इथून गेल्यावर माझं कालच लॅबवाल्यासोबत बोलणं झालं होतं. लॅब असिस्टंट नवा होता आणि त्याच्याकडून चुकून सॅम्पलची अदलाबदली झाली होती. त्यामुळं तुम्हाला चुकीचा रिपोर्ट देण्यात आला होता. सॉरी फॉर दॅट.” डॉक्टर बोलताना एकदम खजील झाल्या होत्या.
“काय म्हणालात, सॉरी! तुमच्या एका चुकीमुळे आमचं आयुष्य उध्वस्त होता होता राहिलं. माझा स्वतःवर आणि माझ्या बायकोवर विश्वास होता म्हणून मला परत टेस्ट करायची सद्बुद्धी तरी सुचली. दुसरं कुणी असतं ना तर त्याच्या आयुष्याची तर वाटच लागली असती. देव म्हणतात लोकं तुम्हाला! जरा देवासारखे राहा!” तो चिडून तिथुन निघाला. तीही त्याच्या मागे गेली. दोघे घरी पोहोचले.
“सॉरी!” ती त्याच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला लागली.
“इट्स ओके. मला माहितीये, तुझ्याकडून असली चूक कधीच होऊ शकणार नाही. मान्य आहे, मी होतो फ्लर्टी; पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी फक्त तुझाच आहे.” तो म्हणाला.
“मी पण.” ती त्याच्या मिठीत सामावली.
“मग कसा धडा दिला आयुष्याने?” तो तिला चिडवत म्हणाला.
“एकदम कॉन्फिडेंशीअल!” ती म्हणाली आणि दोघे खळखळून हसले.
समाप्त
©® डॉ. किमया मुळावकर
©® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा