सर्वांगसुंदर रिटायर्मेंट

रिटायर्मेंटचा खरा अर्थ सांगणारी कथा


आशाचा एकसष्टीचा कार्यक्रम पार पडला. मागच्याच वर्षी सरकारी नोकरीतून रिटायर्ड झालेली, मुलामुलीचं लग्न झालेली आशा, आता मुक्त पक्षी होती. छान गाण्याचा क्लास, योगा क्लास शिवाय हास्य क्लब, अधून मधून एखादी ट्रिप असं तिचं छान चाललं होतं. ह्या पंधरा दिवसात तर ती खूपच आनंदी होती.

सगळ्यांनी आशाला दोन शब्द बोलण्याचा आग्रह केला. ती उभी राहिली आणि म्हणाली, " मी ठरवलंय, मी आता रिटायर्ड होणार.... " सगळे बघू लागले तिच्याकडे, झाली आहे कि आधीच!

" आई, घरच्या जबाबदाऱ्यांमधून असं म्हणायचंय का तुला? खरंच आई रिटायर्ड होते आहे घरच्या कामातून असं? "मीराने, आशाच्या लेकीने विचारलं.

" एक गोष्ट सांगते तुम्हाला. पूर्वा, आधी तुझी माफी मागते, हो, सून असलीस तरी! कारण मी तुझं बोलणं चोरून ऐकलं म्हणून.... " आशा म्हणाली.

"......" पूर्वा भयंकर टेन्शनमध्ये आली.

" प्रथमेश तुला म्हणत होता ना, आईची एकसष्टी मोठी करूयात, तिच्या रिटायर्मेंट वेळी पण आपण घरगुती कार्यक्रम केला होता. आता छान मोठा कार्यक्रम करू. तू म्हणालीस, हो, करूया नक्की! सरकारी नोकरीतून आणि \"ए आई\" च्या जबाबदाऱ्यातून त्या रिटायर्ड आहेत पण अहो आई म्हणून कधी रिटायर्ड व्हायच्या काय माहित? तुझं हे बोलणं मी चोरून ऐकलं होतं.... " आशा

" आई, म्हणजे, सॉरी, तसं नव्हतं म्हणायचं .... "पूर्वा ओशाळली होती.

" अगं ऐक तरी, आधी मलाही राग आला पण मग मी स्वतः अवलोकन करायचं ठरवलं की मी कशी वागते. तर लक्षात आलं कि खरंच की, काही जबाबदाऱ्या जसं की नातीची शाळेत जाण्याची वेळ सांभाळणे, ही मी ओढवून घेतलेली जबाबदारी आहे. पूर्वाला गरज पडली तर ती मदत मागेलच किंवा एखाद्या दिवशी नाही जाग आली तिला तर मी करेल तयारी. पण ओढवून घेतलेल्या कामामुळे माझी लुडबुड आणि मग कुरकुर उगाच होते. तसेच आज अमुक तमुक कर, हे मी सासू म्हणून सांगितलं पाहिजे असं मीच ठरवून घेतलंय आणि मग त्यावरून पूर्वाला सूचना. त्यामुळे इथून पुढे जिथे आणि जेव्हा माझी गरज असेल तिथे मी नक्की असेल प्रथमेश पूर्वा पण स्वतःहून जबाबदारी घेणार नाही.... " आशा म्हणाली तसं तिच्या मैत्रिणींनी बरोबर आहे म्हणत आपणही रिटायर्ड व्हावं हा विचार पक्का केला.

आशा पुढे बोलत होती, " काम करून आपण थकतो आणि आता हे काम नको, ही निवृत्त भावना म्हणजे रिटायर्मेंट, हो ना? मग मी हे ठरवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं कार्यालयीन आणि सांसारिक कामातून मी रिटायर्ड व्हायचं ठरवलं पण भावनिक काय? म्हणजे बघा, गॉसिप करणे, दुसऱ्याची उणी दुणी काढणे, राग राग करणे, एखाद्याचा द्वेष करणे अशी अनेक वाईट कामं आपण रोज करत असतो. जबाबदारी घ्यायची हे चांगलं काम असूनही त्यातून रिटायर्ड व्हायला आपण पटकन तयार झालो पण मग ह्या unwanted भावनांपासून कधी निवृत्ती घेणार? उलट त्यांच्यापासून आधी निवृत्ती घेतली पाहिजे. ह्या जाणीवेतूनच गेले काही दिवस मी खूप शांत झाले. गृहस्थाश्रमाकडून वानप्रस्थाश्रमकडे प्रयाण म्हणजे काय ह्याचा अर्थ मला सापडला होता. अलिप्त राहून, कुणाचाच राग रोष न धरता आपलं काम आपण करणे म्हणजेच खरी रिटायर्मेंट हे मला कळून चुकलंय. तसं राहण्यात एक वेगळी मनःशांती मिळते हे मी ह्या पंधरा दिवसात अनुभवलं आणि म्हणूनच आज सगळ्यांना मला कळलेला अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. संतांसारखं अगदी स्थितप्रज्ञ कदाचित मला नाही होता येणार पण अनावश्यक भावनाच्या गुंत्यातून मी रिटायर्ड होते आहे, सर्वांगसुंदर होण्यासाठी! "

आशाचे हे मनोगत ऐकून पूर्वा आणि मीराला वाटलं, अशी भावनिक VRS आपणही घेऊ शकलो तर किती बरं होईल ना? सर्वांगसुंदर रिटायर्मेंट!

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर