भक्तांचा भाव वेडा विठुराया

If you do something good for common people God will definitely help you

भक्तांचा भाव वेडा विठुराया




 एकनाथ - " आजी, आजी कुठे आहे ग तू? "


 आजी - " काय झालं नाथा? तू एवढा का घाबरला आहेस? "


 एकनाथ - " आजी आपल्यावर गंडांतर आलं! आपलं सारं जाणार!! कुलकर्ण्याच्या नावाला बट्टा लागणार आहे!!!. "


 आजी - " नाथा आधी शांत हो! शोक आवर!! आणि माझ्याजवळ शांत बैस. दोन घोट पाणी पी, आणि सांग काय झालं ते! थांब मी गिरीजाला बोलावते. "

     


 तर वाचकहो हे आहे कुलकर्णी यांचं कुटुंब. या कुटुंबामध्ये आहेत आजी जिजाई. एकनाथ हा आजींचा 31 वर्षाचा तरुण नातू तर गिरीजा त्याची पत्नी आणि आजींची नात सुन. एकनाथ ला एक मुलगी पण आहे, आणि तिचं नाव मुक्ताई आहे. ती ब्लड कॅन्सर ने आजारी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एकनाथने त्याचे आईवडील गमावले आहेत. आणि आता त्याला फक्त त्याच्या आजीचा चा आधार आहे.




. एकनाथने पाणी पिले, आणि तो आजीला सांगू लागला….


 एकनाथ - " आजी तुला आठवतं का मागच्या वर्षी टाळेबंदी च्या काळात आपल्या या गावात अनेक परप्रांतीय त्यांच्या गावी परत जाण्याकरिता आले होते. "


 आजी - " होय रे ! बर मग?"


 एकनाथ - "आजी अग आपलं गाव महाराष्ट्राच्या सीमेवरचं! टाळेबंदी मुळे ते परप्रांतीय लोकं त्यांच्या प्रांतात जाऊ शकत नव्हते. कित्येक दिवसांपासून ते नुसते पायी चालत होते. डोक्यावर रणरणतं ऊन, काखेत गाठोड्यातला संसार, आणि हाताच्या बोटाला पोटच्या गोळ्यांना धरून, त्यांची अनवाणी पायपीट कित्येक आठवड्यांपासून सुरू होती."


 आजी - " होय रे नाथा, आठवतय मला तू आणि गिरीजा ने त्यांना पाच-सहा दिवस छान स्वयंपाक करून, स्वतः वाढून, जेवू घातलं. होय ना ग गिरीजा? "


. गिरिजा एकनाथाची बायको मात्र खाली मान घालून नुसतीच उभी होती.


 आजी - " नाथा आता नक्की काय झालं ते सांग बरं!"


 एकनाथ - " आजी त्यावेळी मी त्या परप्रांतीयांना जेवू घालण्यासाठी जे धान्य वापरलं होतं ते, धान्य होतं माझ्या सरकारी धान्य दुकानातल. "


 गिरीजा - " अहो आजी, त्या वेळी नगरसेवक, स्वयंसेवी संस्थेवाले सगळ्यांनी ह्यांना विनवणी केली म्हणूनच ह्यानी ते धान्य, त्या परप्रांतीयांकरिता वापरलं पण आता…. ( गिरीजा ने डोळ्यांना पदर लावला आणि ती टिपं गाळू लागली.)


 आजी - " नाथा आता काय झालं? सांग लवकर ! उगाच माझ्या जीवाला घोर लावू नकोस. "


 एकनाथ - " आजी , आजी मी ते सरकारी धान्य त्या परप्रांतीयांसाठी वापरल म्हणून, आता अन्न आणि औषधी प्रशासन अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उचलला आहे माझ्यावर. "


 गिरीजा -"आजी, तो नगरसेवक आणि स्वयंसेवी संस्था वाल्यांनी हात वर केलेत. "


 एकनाथ - " आजी, आता आपण त्या वापरलेल्या धान्य एवढे पैसे नाही भरले, तर ते सरकारी लोक, आपलं घर, दुकान सारे जप्त करतील. "



 गिरीजा - " आजी तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या मुक्ताईच्या आजारपणात आपण आपलं सारं गमावून बसलोय. आता एवढे मोठे पैसे कुठून आणायचे? आता कसं होणार आजी आपलं? "


 आजी -" नाथा - गिरीजा तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळा भार माझ्या पांडुरंगा वर सोपवा तो करेल सगळं नीट. "


 एकनाथ - " पण आजी सगळं कसं नीट होईल? मुक्तेच ब्लड कॅन्सर च ऑपरेशन पुढल्या महिन्यात आहे. आणि आता हे सगळं बालंट माझ्यावर आलाय. माझी तर मतीच कुंठित झाली आहे."


 आजी -" अरे नाथा खूप पूर्वी, म्हणजे तुझ्या खापरपणजोबानी आणि माझ्या आजे सासर्‍यांनी पण धान्याचं कोठार गरिबांना असंच खुलं केलं होतं. तेव्हा माझा पांडुरंगच त्यांच्या मदतीला धावला होता. तू फक्त त्या विठुराया वर विश्वास ठेव आणि सारा भार त्याच्यावर सोपव. सगळं नीट होईल असं माझं अंतर्मन मला ग्वाही देत आहे. "


 तेवढ्यात बाहेरचा दरवाजा वाजला आणि कोणी तरी विचारत होतं की, "एकनाथ कुलकर्णी इथेच राहतात का? " आता एकनाथ मात्र गर्भगळीत झाला होता आणि तो आजीला म्हणू लागला….


 एकनाथ - " आजी आज आपलं घर जप्त होणार वाटतं. ती सरकारी माणसंच दरवाजा वाजवत असतील. "


 आजी - " नाथा असं धीर सोडू नको. आधी बघ तरी दरवाजावर कोण आहे!"


 एकनाथ - " आपण कोण ? मी आपल्याला ओळखलं नाही!"


 निवृत्ती - " मी निवृत्ती, मागल्या वर्षी टाळे बंदीच्या काळात, आपल्याकडे माझी आई आणि लहान भाऊ सात दिवस राहून गेले होते. "


 एकनाथ मात्र निवृत्तीकडे अगदी प्रश्नार्थक नजरेने बघत होता कारण त्याला काहीच आठवत नव्हते.


 निवृत्ती - " माझी आई विठ्ठलाची निस्सिम भक्‍त. तिचं माहेर वारकरी संप्रदायातलं, माझी आई लहानपणी दरवर्षी वारीला जात असे. तुमच्या घरी त्या चार - पाच दिवसात तिने किर्तन ऐकलं, भजने म्हटली आणि तुमच्या देव्हाऱ्यातल्या विठ्ठलाच्या पाया पडली. आता तिने तिच्याकडच स्त्रीधन अन काही जमा रक्कम गिरिजा वहिनीन करता पाठवली आहे. गावात आल्यावर कळले, तुमची मुक्ताई आजारी आहे. आणि तिचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे. माझाही रक्तगट ओ निगेटिव्ह त्यामुळे मी तुमच्या मुक्ताईला माझा बोन मॅरो देण्याचं ठरवलं आहे."


. आजीने निवृत्तीला घरात घेतलं आणि गिरीजा वहिनींना पांडुरंगा पुढे एका वाटी साखर ठेवायला सांगितली.


*********************************************


 वाचकहो सदर कथा संपूर्णतः काल्पनिक असून तिचा वास्तवातील कुठल्याही व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. फार वर्षांपूर्वी मंगळवेढायात दुष्काळ पडल्यामुळे विठ्ठलाचे निस्सीम भक्त दामाजीपंतांनी धान्याची कोठारं गोर गरिबांसाठी खुली केली होती. स्वतः विठ्ठलाने, विठू महाराचा वेष घेऊन बिदरच्या बादशाह समोर मोहरांचा ढीग लावला होता. त्या घटनेचा आधार घेऊन ही लघु कथा मी लिहिली आहे. ही लघुकथा आपणास कशी वाटली नक्की कळवा. तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.