मण्यार - Command Krait

पोलादी निळसर काळा रंगाचा नी अंगावर पांढरे पट्टे असलेला हा मण्यार भारतातील सर्वात जहाल विषारी ?

२. कॉमन क्रेट - मण्यार 

        भारतामध्ये जे चार प्रमुख विषारी सर्प आहेत, त्यामध्ये दोन क्रमांकाचा जहाल विषारी साप म्हणून मण्यारची गणना होते. देशामध्ये मण्यार सापाच्या प्रमुख तीन प्रजाती आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात आढळणारा साधा मण्यार. साधारण एक ते दीड मीटर्सच्या आसपास लांबी असून त्याच्या अंगावर डोक्यापासून बऱ्याच अंतरापर्यंत पांढरे टिपके आणी नंतर पांढरे पट्टे असतात. कधी हे पट्टे दुहेरी तर कधी एकेरी समांतर अंतरावर असतात. संपूर्ण शरीर पोलादी निळसर काळ्या रंगाचं असतं. त्याच्या पाठीवर अगदी मधोमध डोक्यापासून ते शेपटी पर्यंत षट्कोनी आकाराची खवल्यांची रांग असते. त्यामुळे त्याची ओळख आपल्याला सहज पटू शकते. त्याची शेपटी निमुळती, लांब आणि गोलाकार असते. पट्टेरी मण्यार आणि काळा मण्यार पूर्व भारतामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पट्टेरी मण्यारच्या काळ्या - निळ्या पोलादी रंगाच्या अंगावर कधी पांढरे तर कधी पिवळे पट्टे असतात. तर काळा मण्यार पूर्णपणे पोलादी निळसर काळ्या रंगात आढळतो. नवजात पिल्ले अर्ध्या फुटाच्या आसपास लांब असतात.

     आपल्या भागामध्ये मण्यार सारखाच दिसणारा "कवड्या" हा बिन विषारी सर्प आहे. हा सुद्धा अतिशय आक्रमक आणि चपळ असतो. कवड्याचा रंग तपकिरी, अंगावर कवड्याच्या आकाराच्या पांढऱ्या रेषा, त्यावर काळी किनार असते. त्यामुळे कवड्या चॉकलेटी तर मण्यार पोलादी निळसर काळा रंग.

    विषारी सापांमध्ये सर्वात चपळ असा हा मण्यार साप. मण्यार तसा निशाचर आहे, दिवसा सहजासहजी तो नजरेस पडणार नाही आणि मोकळ्या जागेतही तो वावरत नाही. अन्नाच्या शोधात (बेडूक, उंदीर, सरडे, पाल) तो रात्रीचाच फिरतो. त्यामुळे माणसाला जास्त करून रात्रीच्याच वेळी मण्यार चावल्याचे प्रकार घडतात. अन्नाच्या आणि उबदार ठिकाणाच्या शोधात बहुदा मण्यार आपल्या आजूबाजूला पडक्या घरामध्ये, बागेमध्ये, अडीअडचणीच्या जागी, झुडपांमध्ये असण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये मण्यारच्या दंशाच्या घटना घडलेल्या पाहायला मिळतात.

        नागाच्या विषाच्या अंदाजे पंधरा पट जहाल मण्यारचं विष असतं. मण्यारचे विष नागाप्रमाणेच न्यूरोटॉक्सिक (Neurotoxic) म्हणजे चेतासंस्थेवर परिणाम करणारे असते. कधी कधी मण्यार जरी चावला तरी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. कारण त्याचा चावा घेतल्याच्या जागी जास्त वेदना जाणवत नाहीत. एखादा मच्छर, डास चावल्यासारखे वाटते. शिवाय, त्याचे विषाचे दातही लहान असल्याने, विष कमीप्रमाणात सोडले जाते आणि त्यामुळे शरीरात विष पसरायला वेळ लागतो. सर्पदंशानंतर काहीच वेळात प्रचंड तहान लागायला सुरुवात होते. पोटातील आतडी पिळल्यासारखे वाटायला लागते, पोटात प्रचंड दुखायला लागतं आणि श्वास घेण्यास अडथळा यायला लागतो. आणि उपचार जर लवकर मिळाले नाहीत तर श्वसनक्रिया बंद पडून सहा ते चोवीस तासांमध्ये माणसाचा मृत्यू होतो. मण्यार चावल्यानंतर शक्य तितक्या लवकर दवाखान्यात जाऊन उपचार घेणे केव्हाही फायदेशीर ठरतं.

     मण्यार रात्रीच्या वेळी जमिनीवर झोपलेल्या माणसांच्या अंथरुणात शिरून चावून मृत्यू झाल्याच्या बहुतांश घटना घडलेल्या आहेत. मण्यारचा चावा अत्यंत बारीक आणि वेदना दायक नसल्यामुळे झोपलेल्या माणसाला कळतही नाही. आपल्या देशामध्ये बहुतांश भागामध्ये सर्पदंशानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू ओढावल्याच्या खूप घटना घडलेल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. एक म्हणजे साप चावला म्हणजे आपण मरणारच अशी काहींची मानसिकता झालेली असते. त्याच भीतीमुळे रक्तदाब वाढून किंवा हार्ट अटॅकने बऱ्याच वेळा मृत्यू ओढवतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी बाहेर पडताना शक्यतो बुट घालूनच निघा. रात्री घराबाहेर उघड्यावर, आणि  शेतात झोपणे शक्यतो टाळलं पाहिजे.

पुढीलभागात आपण पाहुयात फुरसे (Saw Scaled Viper) या सापाविषयी.

धन्यवाद.

🎭 Series Post

View all