Login

आबरा का डाबरा....

Comic Description
आमचं घर म्हणजे जादूच भंडार आहे, आणि इथे एक नाही तीन तीन जादूगार राहतात, आणि एक चेटकीण? इथे दर मिनिटाला वेगवेगळी जादू घडत असते. अगदी हॅरी पॉटर च्याही पेक्षा जलद गतीने. तुम्हीं मुद्दाम खुणेने ठेवलेली वस्तू एक मिनिटात गायब करण्याचं कसब या जादूगारामध्ये ठासून भरलेलं आहे.
या जादूगारांच्या टीम मध्ये एक बाबा जादूगार, एक चिमणी जादूगार आणि एक सिम्बा जादूगार असे तीन सदस्य आहेत. तर चेटकीण बिचारी एकटीच अहोरात्र झाडू घेऊन कचरा साफ करत फिरत असते. तरी देखील ही जादूगार मंडळी चेटकिणीला घाबरून असतात, कारण तिचा वचक ,दरारा तेवढा जबरदस्त आहे. पण या चेटकीणीचं अगदी झुरळ बनवण्याचा मंत्र या जादूगारांकडे आहे.
तर ही जादूगार मंडळी जेंव्हा आपापली कामे करत असतात तेंव्हा त्यांना सतत चेटकिणीची मदत लागत असते, किमान ते तसं ते भासवतात तरी.... स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी....
तर,गरिब बिचारा उनाड सिम्बा, जेंव्हा खाली खेळायला गेल्यावर काहीतरी राडा घालतो, आणि त्याला भांडणं करण्याची जबरी हौस येते, त्यावेळी बाबा जादूगार अगदी त्याच्या नजरे समोर असतांना देखील त्यांना युद्ध भूमीवर न बोलवता, चेटकिणीला आवाज देऊन आख्खी सोसायटी दारारून सोडतो. बिचारी चेटकीणदेखील आल्या हाकेला न्याय देत, हातातील कामं सोडून सिम्बा च्या मदतीला धावून जाते.आणि आपली इतिकर्तव्यता पार पाडते. आणि इकडे सिम्बा विजयी मुद्रेणे घरी परत येतो. अशीच गत कमीअधिक प्रमाणात चिमणीच्या बाबतीत देखील होत असते. तर प्रत्येक वेळी ही चेटकीण तिथे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हजर असतेच. त्यामुळे चेटकीण जरा जास्तच हजरजबाबी झाली आहे असो....???
तर बाबा जादूगार हा देखील चेटकिणीच्या शब्दा बाहेर "नव्हता, नाहीये, नसेल देखील!!"?? साधा खिळा देखील भिंतीला ठोकायचा असेल तरी तो दहावेळा चेटकिणीची परवानगी घेतो. आणि आपल्या कडून काही चुक होऊच नये म्हणून शेवटी ते काम चेटकीणीलाच करायला लावतो??तर अशी ही चेटकीण दिवसभर आपले शक्तिप्रदर्शन करून जेंव्हा दमते,थकते, तेंव्हा एखाद्या संध्याकाळी, ती या जादूगारांना जेवणासाठी आज खिचडी करू का असं विचारते, तेंव्हा हे सगळे जादूगार आपापली मायावी रूपं दाखवत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन रुसुन बसतात.आणि दमली भागलेली चेटकीण बिचारी खिचडी ??खिचडी ??असं विचारत बसते. आणि यांतच तिची सगळी शक्ती नाहीशी होते आणि जादूगारांना चेटकिणीची आज कशी जिरवली याचा आनंद मिळतो आणि ते,तोआनंद साजरा करण्यासाठी जेवणाचं एखादं पार्सल मागवतात. आणि तीनही जादूगार आनंदाने भोजन करतात. इकडे चेटकीण बिचारी खिचडी खिचडी म्हणत चरफडत बसते..........
©® सौ. सुषमा दडके