रंग प्रेमाचा भाग-5

प्रेम जेव्हा होतं तेव्हा ती व्यक्ती सोडून इतरांना आधी कळत...अशीच श्वेता आणि विराटच्या प्रेमाची कथा नक्की वाचा..

भाग -5


\"किती खूश दिसतेय ना आई, जेव्हापासून विराट आमच्या आयुष्यात आलाय सगळंच किती बदलून गेलयं. किती करतोय विराट आईसाठी. फक्त आईलाच नाही आजीलाही आणि बाबांनाही त्याने प्रचंड लळा लावलाय. पण का करतोय तो हे सगळं ? म्हणजे इतका लळा लावून तो आमच्यापासून दुरावला तर नाही सहन होणार ना. मी आज स्पष्टच बोलेन विराटशी मी आता इमोशनल विचार करत नसले तरी घरच्यांचं काय ?\" हा मनात विचार करून श्वेता आईच्या खोलीत गेली. आणि आईला म्हणाली, "आई, अशी काय जादू केलीय गं याने ? की तू मला माझी आई कमी त्याचीच आई जास्त वाटतेय."


"ते तुला नाही कळणार. म्हणजे बघ ना प्रत्येक गोष्टीत साशंक असणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मनातील भावना  कशा कळणार?" विराट म्हणाला.


"नाही विराट, तू श्वेताला ओळखण्यात चूक करतोयस. माझी लेक दुसऱ्याच्या मनाचा आधी विचार करते अरे. (श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली. \"हो, पण माझ्या मनात काय आहे ? हे तिला गेली तीन वर्ष झालीत तरी अजून कुठे काय कळलेय?\" विराट मनात विचार करत होता.) खरंच तुझ्याशी आमचं एक नातं तयार झालंय. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही तुला ओळखतोय. खूप जीव लावला आहेस तू आम्हाला. पण…" आईच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.


"काय झालंय आई? तुमच्या डोळ्यात पाणी का?" विराट म्हणाला.


"काही नाही रे. डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं." आई डोळे पुसत म्हणाली.


"नाही हं खरं सांगा. तुम्हाला माझी शपथ ." विराट पुन्हा म्हणाला.


" मी किती स्वार्थी विचार करतेय असे तुला वाटेल. पण माणूस कधीकधी सवयीचा गुलाम होतो म्हणतात तेच खरं." आई म्हणाली.


"नाही वाटणार मला असं काही. हेच ओळखलं का तुम्ही मला गेल्या दोन वर्षांपासून ? सांगा ना का आलं डोळ्यात पाणी?" भावूक होऊन विराट म्हणाला.


"अरे विराट,आता बारावी नंतर तू कुठे तुझा नंबर लागेल तिकडे जाशील ना ? तेव्हा आम्ही तुला खूप मिस करू. म्हणूनच आले आहेत हे अश्रू." आईच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पाणावल्या होत्या.


"नाही ना आई, मी श्वेताइतका हुशार नाही. श्वेता जाऊ शकते नंबर लागेल तिकडे, पण मी मात्र बीए करत करत एमपीएससीचे क्लास जॉइन करणार आहे आणि ते ही इथेच. त्यामुळे मी येईन अधूनमधून तुम्हांला भेटायला. आईबाबांच प्रेम मला या घरात मिळालय आणि तुम्ही नेहमी म्हणता ना की, मी तुमच्या घरातील एक सदस्य आहे. मग मी येऊ शकतो ना?" विराट म्हणाला.


"काय सांगतोस विराट! अरे, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. माझी दोन्ही मुलं माझ्याजवळच असतील." आई म्हणाली.


"दोन्ही कोण?" विराट म्हणाला.


"तुला माहित नाही विराट ? बीए करत-करत एमपीएससीची तयारी मी ही करणार आहे." श्वेता रागाने म्हणाली.


"हो माहीत आहे. पण मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? माझीही सेम तिच इच्छा असू शकते ना?" विराट म्हणाला.


"अरे हो, कर तू ही बिनधास्तपणे एमपीएससीची तयारी. दोघेही अधिकारी झालात तर आम्हाला आनंदच होईल ना." श्वेताच्या आई आनंदाने म्हणाल्या. 


विराट आणि आई मनापासून हसले असले तरी श्वेता मात्र वरवर हसून विराटच्या मागोमाग आईच्या खोलीबाहेर आली.


विराट आजीच्या खोलीत गेला होता. श्वेताही त्याच्या मागोमाग खोलीत गेली. विराटने आजीला पेढा दिला आणि आजीचा हात डोक्यावर ठेवत विराट म्हणाला, "आजी आशीर्वाद दे."


 "चांगले मार्क्‍स मिळाले ना तुला बारावीत. आता यापुढेही चांगला अभ्यास कर. आणि खूप मोठा हो. माझ्या आशीर्वादापेक्षाही तुझ्या प्रामाणिक प्रयत्नात खूप मोठी ताकद असते." आजी विराटच्या डोक्यावरचा आपला हात त्याच्या गालावर टेकवत म्हणाली.


" हो गं आजी, मी यापुढे नेहमी प्रामाणिक प्रयत्न करून यशस्वी होईन. बरं, खूप वेळ झाला मी आलोय. आजी, जातो आता मी. मगाशी तू झोपली होतीस, म्हणून तुझ्या खोलीत नाही आलो." विराट म्हणाला.


"अरे किती वेळा सांगितलं तुला, जातो नाही येतो म्हणावं रे." आजी नाराज होऊन म्हणाली.


"बरं बाबा सॉरी. येतो गं आजी." विराट आपली चूक मान्य करून म्हणाला.


" सावकाश जा. आणि ये रे परत." आजी म्हणाली.


"नक्की!" म्हणून विराट निघाला होता. विराटला सोडायला श्वेता गेटपर्यंत आली होती. विराटने मागे वळून श्वेताकडे पाहिले.


"झालं तुमचं ? निघा मग आता." श्वेता मान हलवत म्हणाली.


"नाही. तू थांब म्हणत असशील तर थांबेन मी आणखी थोडा वेळ." विराट फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला.


"जा विराट." श्वेता म्हणाली.


विराट निघणार होता तितक्यात त्याला सायली सोहमच्या गाडीतून उतरताना दिसली म्हणून तो तिथेच थांबला. 


"हा घे सायली पेढा." विराट सायलीच्या हातावर पेढा टेकवत म्हणाला.


"अभिनंदन!" सायली म्हणाली.


"थॅंक्स! पण सायली एक ऐकशील का माझं ?" विराट म्हणाला.


"हं." सायली म्हणाली.


"सायली, तू त्या सोहमसोबतची तुझी मैत्री सोडून दे. तो चांगला मुलगा नाही." विराट म्हणाला.


"अरे आणि तू कशावरून चांगला मुलगा आहेस ? सांग ना ? माझ्या आईला ब्लड डोनेट केलं म्हणून ? की सतत आमच्या घरी येतोस म्हणून? तू आता आमच्या घरचे निर्णय घेणार आहेस का? कोणत्या हक्काने तु हे सगळं मला सांगतोस? तुझा काय संबंध? तू सगळ्यांना ज्ञान सांगू शकतोस पण मला नाही हं, हे लक्षात ठेव."  सायली चिडून म्हणाली आणि तिथून निघून गेली. 


सायली विराटला खूपच बोलली होती. तरीही विराट नॉर्मल बिहेव करत होता. श्वेताच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. विराटला कळू न देता तिने ते अलगद टिपले. आणि ती विराटला म्हणाली," खरं सांगू विराट, माझ्या बहिणीला चांगल्या वाईटाची चांगली पारख आहे. तेव्हा तू यापुढे तिला काहीच बोलू नकोस. आमच्या घरीही नकोस येऊस यापुढे. मी माझ्या घरच्यांना समजावेन. आणि जरी आई म्हणाली की, माणूस सवयीचा गुलाम असतो तरी सवय लागते, तशी ती मोडता ही येते हे आई विसरली आहे होईल तिला सवय."


"ठीक आहे. यापुढे मी सायलीलाच काय तुलाही काही नाही बोलणार. बरोबर बोलतेस तू ,होईल सगळ्यांना सवय मी नसण्याची. माझा आणि या घराचा काहीच संबंध नाही हे मी ही आता मान्य करायला हवं" विराटचा स्वर बदलला होता. त्याला गहिवरून आले होते त्याने क्षणात तिथून काढता पाय घेतला.


\" मला विराट सायलीच्या मित्राविषयी चुकीचे बोलला म्हणून वाईट वाटतेय की, सायली खूपच रूडली विराटशी बोलली म्हणून वाईट वाटतेय ? हेच कळत नाहीये. मी ही जरा जास्तच बोलले विराटला. मी उद्या ऍडीमिशन घ्यायला  कॉलेजला गेल्यावर विराटला बोलेन. त्याला समजावेन आज सायली जे बोलली ते उद्या बाहेरचे लोक बोलू शकतात. तेव्हा घेईल तो मला समजून. \" हा मनात विचार करून श्वेता आत निघून गेली.


रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. कधी एकदा सकाळ होतेय आणि कधी एकदा ती विराटला भेटतेय असं झालं होतं तिला. दिवस उगवला. आपला नित्यक्रम आटोपून श्वेता डबा घेऊन कॉलेजला निघाली होती. 


"आई, येते गं." श्वेता म्हणाली. 


"हो. सावकाश जा." आई म्हणाली. 


"हो." म्हणून श्वेता गाडीवर बसली. श्वेता कॉलेजमध्ये पोहोचली. तिची नजर फक्त विराटला शोधत होती. श्वेता तिच्या मैत्रिणीला म्हणाली, "नम्रता विराट का आला नसेल गं आज?" 


"काय माहीत ? पण तुझं काही काम असेल तर कॉल कर ना त्याला." नम्रता म्हणाली.


"अगं केला होता मी कॉल, पण स्विच ऑफ लागतोय." श्वेता घाबरून म्हणाली. 


"बरं, मग असेल त्याचा काही प्रॉब्लेम. तुला काही हवं असेल तर मला सांग, मी करेन तुला मदत." नम्रता म्हणाली.


श्वेता गप्प बसली पण तिचं विचारचक्र सुरूच होतं. तिचा जीव विराटच्या काळजीने कासावीस होत होता. पण मन कठोर करत विराट उद्या नक्की येईल या आशेने श्वेता दुसऱ्या दिवशीची वाट पाहू लागली. रोज वेळेवर कॉलेजला येऊन श्वेताची वाट बघत थांबलेला विराट सलग तीन दिवस दिसला नाही म्हणून श्वेता खूपच घाबरली. ती विराटच्या मित्रांनाही विराटबद्दल विचारून थकली होती. आणि अचानकच तिच्या समोर विराट दिसताच ती त्याला जाऊन बिलगली. त्याच्या हृदयाशी तिच्या हृदयाची स्पंदने जुळली होती. \"प्रेम म्हणतात ते हेच का ?\" हा मनात विचार करून श्वेता पटकन मागे सरकली. 


"असा कसा रे तू ? तीन दिवस झाले तुझा फोन लागत नाही की तू येणार नाहीस हा निरोपही नाही. तुला माहितीय किती घाबरले होते मी? " श्वेता म्हणाली. 


"का? हो श्वेता, का घाबरलीस तू? हाच प्रश्न विचारलाय मी तुला. त्यादिवशी तूच म्हणालीस ना की, आमच्या घरी येऊ नकोस. तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. मग एखाद्या व्यक्तीचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसेल तर घाबरतो का आपण?" विराट म्हणाला.


"अरे, पण तू माझा चांगला मित्र आहेस ना. म्हणुन काळजी वाटली." श्वेता म्हणाली. 


"बरं माझी काळजी केलीस म्हणून आभारी आहे तुझा." असं म्हणून विराट पुढे गेला.


"विराट पण दोन-तीन दिवस का आला नव्हतास तू?" श्वेता म्हणाली. 


"ते माझं प्रायव्हेट कारण होतं. जे तुझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नव्हतं." असं म्हणून विराट निघून गेला.


थोड्या वेळाने विराटच्या मित्राने, "विराटची आजी आजारी असल्यामुळे तो तिला डॉ. असलेल्या त्याच्या आत्याकडे घेऊन दुसऱ्या शहरात गेलेला आणि त्याचा मोबाईल घाईत तो इथेच विसरला होता." हे सांगितले.


श्वेताला मनापासून विराटला सॉरी म्हणायचे होते. लंच ब्रेकमध्ये विराट दिसताच क्षणी श्वेताने त्याला आवाज दिला. 


" विराट, हे घे आईने तुझ्यासाठी या तिळाच्या पोळ्या बनवल्या आहेत. तू दोन दिवस झाले घराकडे फिरकला नाहीस म्हणून मुद्दाम तिने हा डबा दिलाय." डबा विराटसमोर धरून श्वेता म्हणाली.  


"नकोय अगं मला काही." विराट म्हणाला.


"माझी शपथ आहे तुला." श्वेता म्हणाली.  


विराट श्वेताने शपथ घातलीय म्हटल्यावर तो डबा घेईल ? की श्वेताकडून त्याबदल्यात काही मागेल ? पाहूया पुढील भागात क्रमश:


सौ. प्राजक्ता पाटील.











🎭 Series Post

View all