रंग प्रेमाचा भाग-6

श्वेताच्या आयुष्यात विराटच्या प्रेमाचा रंग चढतोय..

भाग-6



"मला गोड किती आवडतं हे तुला माहिती आहे. तुला जर खरंच असं वाटत असेल की, मी या डब्यातल्या तिळाच्या पोळ्या संपवायला हव्या तर तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. चालेल ना?" विराटने श्वेताला इमोशनल प्रश्न विचारला.  


त्याला पक्की खात्री होती की, श्वेता त्याने त्या तिळाच्या पोळ्या खाव्या म्हणून नक्कीच हो म्हणणार. 


पण श्वेता विराटचा गोड गैरसमज दूर करत म्हणाली, "विराट ,आधी मला तुझी अट ऐकायला आवडेल ती जर माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटत असेल तर मी मान्य करेन अन्यथा नाही." श्वेताच्या या उत्तराने विराटचा खोटा भ्रम दूर झाला.


विराट अनपेक्षित असलेले उत्तर ऐकून निरुत्तर झाला होता.


"सांगणार आहेस ना अट?" श्वेता म्हणाली.


"अट तुला वाटते तेवढी अवघड मुळीच नाही. तुला फक्त आज माझ्यासोबत शॉपिंगला यावे लागेल बस इतकच." विराट म्हणाला.


"सॉरी विराट , माझी चॉईस अजिबात चांगली नाही अरे." श्वेता म्हणाली.


"अगं पण मला आवडते." विराट म्हणाला.


"कशावरून?" श्वेता म्हणाली.


"तू परवा आईला घेतलेली साडी पाहिली ना मी, खूप छान आहे ती. तशीच मला माझ्या आजीसाठी घ्यायची आहे. आणि मलाही थोडी शॉपिंग करायची आहे." विराट म्हणाला.


"अरे ती साडी फक्त मी साठवलेल्या पैशातून घेतली होती. बाकी चॉईस सायलीने केली होती. तिची चॉईस खूप  छान आहे. " श्वेता म्हणाली.


"अगं मग आज तर तुला यावच लागेल माझ्यासोबत  शॉपिंगला. बघ तुझी चॉईस चांगली नाही, हा तुझा न्यूनगंड शुन्य मिनीटात कसा दूर करतो ते. तू जे खरेदी करशील ते अगदी आवडीने घालेन अगं मी. कारण मुळातच सुंदर असलेला मी काहीही घातले तरी छानच दिसतो असं माझी आजी म्हणते. आणि आजीच्या साडीचं म्हणशील तर तिला मी घेतलेलं प्रत्येक गिफ्ट अगदी मनापासून आवडतं. मग कॉलेज सुटल्यानंतर जायचं ना शॉपिंगला ? आणि बाहेर काहीतरी खाऊन मग एमपीएससीचा क्लास जॉइन करू." विराट श्वेतामध्ये आत्मविश्वास निर्माण करत म्हणाला.


"थांब, मी आईला फोन करून विचारते." म्हणून श्वेताने आईला फोन केला. विराट सोबत आहे म्हटल्यावर आईनेही लगेच होकार दिला. श्वेता खूपच खूश झाली होती. विराटही मनापासून श्वेताच्या आईचे आभार मानत होता. त्यांनी जो विश्वास विराटवर पहिल्या दिवसापासून दाखवला होता तो विराटला सार्थ करून दाखवायचा होता. 


कॉलेज सुटल्यानंतर विराट श्वेताला घेऊन शॉपिंगला जाताना गाडीत बसल्यावर श्वेताला म्हणाला," सायलीही तुझीच बहीण आहे, पण बघ ती किती बिनधास्त असते. ती घेते का प्रत्येक वेळेस बाहेर जाताना आईबाबांची परमिशन?"


यावर श्वेता म्हणाली," हाताची पाच बोटे जशी सारखी नसतात तशी एकाच आईबाबांची सगळी मुले सारखी नसतात. माझा स्वभाव जसा आहे तसाच सायलीचाही असावा किंवा सायलीसारखाच माझाही असावा हा अट्टहास माझ्या आईबाबांनी कधीच केला नाही. आम्ही दोघी जशा स्वभावाच्या आहोत तसेच त्यांनी आम्हांला स्विकारले आहे म्हणजे मी सायलीची बहिण असले तरी माझा स्वभाव मात्र भिन्न आहे. तिला लग्नाआधी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला जाणून घ्यायची इच्छा आहे आणि म्हणूनच ती सोहमसोबत अगदी आईबाबांना सांगून फिरते आणि माझे बाबा पोलीस ऑफिसर आहेत त्यामुळे तो सोहम सायली बरोबर चुकीचा वागूच शकत नाही तसेच सायली ही नॅशनल कराटे चॅम्पियन आहे त्यामुळे स्वसंरक्षण करणं तिला चांगलं जमतं."


"हं आणि तुला येत स्वसंरक्षण करायला?" विराट म्हणाला.


"नाही येत, म्हणूनच मी माझ्या आईबाबांनी पसंत केलेल्या मुलाशीच लग्न करेन. त्यामुळे मला कोणत्याही मुलाची वर परीक्षा घ्यायचीच नाही." श्वेता मनमोकळेपणाने बोलत होती. विराट श्वेताच्या नावाप्रमाणेच श्वेत (अगदी स्वच्छ) असलेल्या तिच्या मनावर राज्य करत होता. पण ते ती बोलून दाखवू शकणार नाही हे विराटच्या पक्क लक्षात आलं होतं.


आज श्वेता मनसोक्त शॉपिंग करत होती. विराटही तिने चॉईस केलेला ड्रेस चेंजिंग रूममध्ये जाऊन घालून दाखवत होता. \"खरंच विराट, खूप छान दिसतोयस तू.\" श्वेता मनातच बोलत होती. 


विराटने श्वेतासाठी त्याच्या पसंतीचा ड्रेस खरेदी केला आणि त्याने तिला तो ड्रेस "घालून दाखवशील प्लीज!" अशी विनंती केली. 


"नको अरे उगाच का पैसे वेस्ट करतोय ? माझ्याकडे खूप ड्रेस आहेत." श्वेता म्हणाली.


"पण मी घेतलेला हा पहिलाच असेल ना. घे ना प्लीज!" विराट म्हणाला. विराटने खूपच आग्रह केल्यावर श्वेताने ड्रेस घेतला आणि ती चेंजिंग रूममध्ये गेली. ती बाहेर आली तेव्हा विराटच काय, दुकानातील सर्वजण श्वेताकडे " वॉव!" या आविर्भावात पाहत होते. मस्त पिंक कलर आणि हलकेच वर्क केलेला तो ड्रेस श्वेताच्या सौंदर्यात भर घालत होता. विराट श्वेताकडे पहातच राहिला.


"विराट ." श्वेता म्हणाली.


स्वप्नांच्या दुनियेत हरवलेला विराट श्वेताच्या आवाजाने वर्तमानात आला आणि म्हणाला," किती सुंदर दिसतेय! मस्त!" 


श्वेताने सभोवार पाहिले सगळे तिलाच न्याहाळत होते. एक मुलगी तर चक्क मला याच पॅटर्नमधला ड्रेस हवाय म्हणाली.  


विराट श्वेताच्या कानात येऊन हळूच पुटपुटला. "बघितलीस माझी चॉईस? " 


"हं " म्हणत श्वेता ड्रेस चेंज करायला गेली.


\"तुझ्याबाबतीत आणि ड्रेसच्या बाबतीतही एक नंबर आहे माझी चॉईस.\" विराट मनात विचार करून हसत होता.


" एकटाच का हसतोस असा वेड्यासारखा?" श्वेता म्हणाली.


"वेडाच झालोय मी तुझ्या प्रेमात. मलाच तुला हे बोलून दाखवावे लागेल." पुन्हा विराट मनात विचार करत होता.


"अरे सांगायच नसेल तर राहू दे. पण चल पटकन क्लासला उशीर होईल." श्वेता म्हणाली.


"क्लास सुरू व्हायला पुष्कळ वेळ आहे अजून.आधी पोटोबा मग विठोबा. मला जाम भूक लागलीय. मी बिल पेड करून आलोच तू जाऊन गाडीत बस तोपर्यंत. " विराट 


म्हणाला.


थोड्याच वेळात एका रेस्टॉरंटमध्ये श्वेता आणि विराट पोहोचले. अतिशय सुंदर रेस्टॉरंट होते ते. राजेशाही थाटात, पितळी थाळीत आणि भारतीय बैठक व्यवस्थेबरोबर विराटची सोबत श्वेता तर मनापासून सगळं एन्जॉय करत होती. पण आपल्या भावना सहजपणे व्यक्त करण्याची कला तिला तितकीशी अवगत नव्हती. 


"तुला माहितीय श्वेता, माझे डॅड भारतात आले की नेहमी माझ्या मॉमला घेऊन याच रेस्टॉरंट मध्ये येतात जेवायला." आज विराट भावनेच्या ओघात इतके दिवस लपवून ठेवलेलं सिक्रेट बोलून गेला.


"काय! तुझे मॉम आणि डॅड तर एकत्र रहात नाहीत ना ?" श्वेताच्या चाणाक्ष मेंदूने विराटचे हे बोलणे चटकन कॅच करत पुढचा प्रश्न विचारला.


\"श्वेता, मी लवकरच तुला सगळं खरं काय ते सांगणार आहे.  पण ही ती वेळ नाही. सकाळपासून तुझ्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहणारा माझ्या प्रेमाचा रंग मला रात्रीपर्यंत असाच पाहायचा आहे. आज हे शेवटचे खोटे असेल.\" विराटचे डोळे पाणावले होते, ते फक्त श्वेतासारख्या मुलीशी आपण खोटे बोलतोय म्हणून.  पण श्वेताला वाटले विराट नाराज झालाय मग तिने विषय बदलला.


"सॉरी विराट, हा विषय परत कधीच नको." म्हणून तिने विराटला प्रेमाने घास भरवला. विराटचा चेहरा पुन्हा खुलला. मस्त जेवण करून दोघेही क्लासमध्ये पोहोचले. आज क्लासमध्ये टेस्ट होती. अचानक घेतलेल्या या टेस्टमध्ये विराटने बाजी मारली. तो क्लासमधून फस्ट आला होता. श्वेताही तिसऱ्या क्रमांकावर होती. पण विराटच्या आनंदात श्वेताही आनंद मानत होती. 


" पीएसआयच्या प्री एक्झामची डेट आली आहे. प्रॅक्टीसाठीस म्हणून  तुमच्यापैकी कोण-कोण फॉर्म भरणार?" या मॅडमच्या प्रश्नावर श्वेताने चटकन हात वर केला. तसा विराटनेही हात वर केला. श्वेता विराटकडे आश्चर्याने पाहत होती. विराटला शिक्षणक्षेत्रात रूची आहे असे त्याने मागे श्वेताला सांगितले होते. पण आता तर तो पीएसआय व्हायचं महणतोय! 


क्लास संपताच श्वेता गाडीत बसल्यावर विराटला म्हणाली, "अरे, तुला शिक्षणविस्तार अधिकारी व्हायचं आहे ना! मग पीएसआयची एक्झाम का देतोय."


"तुझ्यासाठी." विराट म्हणाला.


"काय म्हणालास तू ?" श्वेता म्हणाली.


"यस श्वेता, आय रियली लव्ह यू! मला तुझ्यासोबतच माझं करियर आणि आयुष्यही व्यतीत करायचंय. पण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझंही माझ्यावर असावंच असं नाही. पण तुझा होकार असो किंवा नकार मी पचवायला तयार आहे. हवा तेवढा वेळ घे आणि नंतर सांग." विराट म्हणाला.


काय असेल श्वेताच्या मनात? विराटविषयी ओतप्रोत भरलेली आपुलकी, काळजी आणि चार दिवसाचा विरह सहन न झालेली श्वेता योग्य निर्णय घेऊ शकेल का? 


सौ. प्राजक्ता पाटील.









🎭 Series Post

View all