रंग प्रेमाचा भाग 10 (अंतिम भाग )

दोघांपासून सुरू झालेलं प्रेम जेव्हा लग्नात परिवर्तित होतं तेव्हा दोघांच्या प्रेमात रंग भरताना सासरच्या माणसांची स्वप्नेही रंगवता आली पाहिजेत तरच ते चित्र नयनांना सुखावतं."

भाग- 10



विराट आणि श्वेता ट्रेनिंगसाठी नाशिकला पोहोचले होते. घरच्या सगळ्यांसोबत मस्त एन्जॉय करत प्रवासात दोघांनीही पीएसआय झाल्यावर काय-काय करायचं ? हे अगदी मनमोकळेपणाने सांगितलं. 


गाडी नाशिकमधील ट्रेनिंग सेंटरमध्ये आली. गाडीतून उतरून सर्वांनी विराट आणि श्वेतासोबत थोडा वेळ घालवला आणि निघण्याची तयारी करून सर्वजण मुलांना भरभरून आशिर्वाद देत परत आले.


सायंकाळी एका कट्ट्यावर विराट आणि श्वेता गप्पा मारत बसले होते.


"मी माझ्या कर्तव्यात कसूर न करता देशात शांतता आणि सुव्यवस्था राखणार! तसेच देशसेवेसाठी परिधान केलेल्या खाकी वर्दीची शानही राखणारच." विराट म्हणाला.


"मी ही. हा, पण या कर्तव्यासोबत एकमेकांचे जन्मोजन्मीचे नाते प्रेमाने गुंफण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठाही करणार." श्वेता आनंदाने म्हणाली.


"हो गं, ते ही आहेच. नोकरीसोबतच आपण आपला संसारही सुखाचा करूया." श्वेताचा हात हातात घेत विराट म्हणाला.


दुसर्‍यादिवशी पहाटे ट्रेनिंगला सुरुवात झाली. आणि कोणालाच स्वप्नातही वाटले नव्हते असेच भयानक घडले. विराटला एक्सीडेंट दरम्यान पायात रॉड टाकला होता. आता त्याला पळताना असह्य वेदना होऊ लागल्या. तो एकटाच मागे राहिला होता श्वेताचा जीव तीळतीळ तुटत होता. पण ट्रेनिंग देणाऱ्या सरांचा आदेश आणि विराटचेही "श्वेता तु पळ." हे शब्द श्वेताला धावण्यास भाग पाडत होते. श्वेताने पहिल्याच दिवशी आपली चुणूक दाखवली असली तरी ती फार खुश नव्हती तिच्या डोक्यात सतत विराटचा विचार सुरू होता. रात्री ती विराटला भेटायला गेली पाहते तर काय! विराट परत जाण्यासाठी बॅग पॅक करत होता.


"विराट तू काय करतोय?" श्वेता खिन्न होऊन म्हणाली.


"अगं मला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे ट्रेनिंग नाही करता येणार मग मी इथे थांबून काय उपयोग? मी बॅग भरली की तुला भेटूनच निघणार होतो." विराट हताश होऊन म्हणाला.


"मलाही नाही करायचय मग हे ट्रेनिंग तुझ्याशिवाय." श्वेता रडत- रडत विराटला म्हणाली.


विराटने श्वेताच्या ओठांवर आपले बोट अलगत टेकवले आणि डोळ्यात पाणी आणून विराट म्हणाला," श्वेता, यापुढे तू असं काही नाही बोलणार हे मला वचन दे. हे तुझं स्वप्न होतं आणि तुला ते पूर्ण करावच लागेल. तुला माझी शपथ आहे. मला तुला पोलीस ऑफिसर झालेले पाहायचे आहे. अगं मी इथून गेल्यावर पुन्हा येऊ शकतो ना तुला भेटायला. मी या क्षेत्रात पात्र नसलो तरी अजूनही कितीतरी क्षेत्रात पदार्पण करत पात्र ठरू शकतोच ना. आपण शरीराने लांब असलो तरी मनाने मात्र कायम जवळ राहूया. फक्त अकरा महिन्यांचा तर प्रश्न आहे ना परत आपण जन्मोजन्मीसाठी एका बंधनात अडकणार आहोत ज्यातून आपल्याला कोणीही वेगळे करू शकणार नाही." 


श्वेताने विराटला मिठी मारली. विराटनेही पाणावलेल्या डोळ्यांनी श्वेताला निरोप दिला. विराट गेला पण श्वेताचेही ट्रेनिंगमध्ये लक्ष लागत नव्हते ती सतत त्याचाच विचार करत होती. पण विराटने श्वेताला दर रविवारी भेटायला येण्याचं केलंल प्रॉमीस आठवलं आणि श्वेता खूश झाली. ती अगदी जीव ओतून ट्रेनिंग पार पाडत होती दर रविवारी तिला प्रोत्साहन देणारी विराटची भेट यामुळे श्वेता खडतर प्रवास पार करू शकली. अखेर श्वेता पीएसआय श्वेता होण्याकरिता सज्ज झाली. दीक्षांत सोहळ्याचा तो भाग्याचा दिवस उजाडला. आज श्वेताचे स्टार ओपनिंग. तिचा आनंद ओसांडून वाहत होता. श्वेताच्या आईबाबांना तर आपल्या मुलीचा अभिमान वाटत होताच त्याचबरोबर विराटचे आईबाबांही आपल्या होणाऱ्या सुनेचे तोंडभरून कौतुक करत होते. आज सगळेजण श्वेताच्या दीक्षांत सोहळ्याला हजर होते. आईबाबांना पाहिल्यावर श्वेताने त्यांना प्रेमाने मिठी मारली. 


"खरंच श्वेता, आज दोन मुलीनंतर ऑपरेशन करण्याचा आम्हा दोघांचा निर्णय योग्य होता असेच मला वाटतेय. विराटसारखा गुणी मुलगा मिळाला धन्य झालो आम्ही." आई श्वेताकडे आपलं मन मोकळे करत म्हणाली.


"हो आणि आम्हालाही देवाने श्वेतासारखी समजूतदार लेक दिली त्यामुळे आम्हीही धन्य झालो." विराटच्या आई श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.


कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती. कार्यक्रम पाहण्यास आलेल्या प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येत होता. ते मनोरम दृश्य पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.


तेवढ्यात पोलीस झालेली सायली श्वेताला म्हणाली, "तायडे, तू बाबांनाच सॅल्युट करणार हो न." 


श्वेताने विराटकडे पाहिले तिला मनापासून विराटला सॅल्युट करायचे होते. कारण अप्रत्यक्षपणे विराटचा एक्सीडेंट होण्यासाठी श्वेता स्वतःला दोष देत होती. 


\"एक्सीडेंट झाला नसता तर, विराटही आज पीएसआय बनून समाजाची सेवा करण्यासाठी सज्ज झाला असता.\" श्वेता मनात विचार करत होती. तिचे डोळे पाणावले होते. तिला आपल्या पित्याचाही सार्थ अभिमान होता. ज्यांनी आपल्या कन्यारत्नाना मुलाप्रमाणे वाढवलं होतं. वंशाच्या दिव्याएवढंच पणतीचंही महत्त्व स्वतःच्या कृतीतून समाजापुढे ठेवलं होतं. श्वेताच्या मनाची द्विधा श्वेताच्या बाबांच्या लक्षात आली. ते सायलीला म्हणाले, "अगं सायली, तुझ्या तायडीवर जीवापाड प्रेम करणारा हा तुझा जीजू विराट, कामामुळे मला नाही जमलं तरी तो मात्र प्रत्येक रविवारी न चुकता तायडीला भेटायला आला. म्हणजे श्वेताने त्यालाच पहिला सॅल्युट मारावा अशी माझी इच्छा आहे." 


"नाही बाबा, लहानपणापासून पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न ज्यांच्यामुळे श्वेता पाहू शकली ते खरे प्रेरक तुम्ही आहात. त्यामुळे तिने तुम्हांलाच पहिला सॅल्युट करावा असं मला वाटतं." विराट म्हणाला.


तेवढ्यात  श्वेताला सरांनी बोलावलं. आणि श्वेता तिथून निघून गेली. श्वेता उत्तर न देताच निघून गेली त्यामुळे तायडी कोणाला सॅल्युट करणार ही उत्सुकता सायलीच्या मनात तशीच राहिली. अगदी थोड्याच वेळात दीक्षांत सोहळ्याला सुरूवात झाली. प्रत्येकजण आपल्यासाठी जे प्रेरणास्थान आहेत त्यांना सॅल्युट करत, स्टार ओपनिंग करत होते. श्वेताचा नंबर आला आणि सगळ्यांच्या नजरा श्वेतावर खिळल्या होत्या. श्वेताने विराटला पहिला सॅल्युट मारला. विराटच्या अंगावर शहारा आला. सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कार्यक्रम संपल्यानंतर श्वेताने विराटला घट्ट मिठी मारली.


विराटही खूप खुश होता. आज त्याला आपल्या होणाऱ्या बायकोचे कौतुक वाटत होते. 


आईबाबा जवळ येत असलेले पाहून विराटने श्वेताला हळूच आपल्या मिठीतून दूर केले. 


"अरे विराट, तू सांगणार आहेस की आम्ही सांगू ? दुसरी आनंदाची बातमी." विराटची आई म्हणाली.


"सांग ना, काय आहे दुसरी आनंदाची बातमी?" श्वेता विराटला उत्सुकतेने म्हणाली.


"तुझ्या यशापुढे ही आनंदाची बातमी इतकीही मोठी नाही. सांगेन घरी गेल्यावर." विराट श्वेताला म्हणाला.


" आता सांग ना विराट,  प्लीज." श्वेता हात जोडून म्हणाली.


"अगं, मी इथून गेल्यावर बीएड्ला ऍडमिशन घेतले होते. मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालोय आणि आपल्याच हायस्कूलमध्ये संस्थेच्या संस्थापकांनी मला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून उद्यापासून जॉइन व्हायला सांगितले आहे." विराट आनंदाने म्हणाला.


"काय! इतकी आनंदाची बातमी तू मला आता सांगतोस." श्वेता नाराजीच्या सुरात म्हणाली.


"अगं, तू खूप मेहनत घेऊन हे यश मिळवले आहे म्हणटल्यावर आज मला फक्त तुझं कौतुक ऐकायचं आणि पहायचं होतं. मग उद्या माझा कौतुक सोहळा असं ठरलं होतं माझं." विराट श्वेताची नाराजी दूर करत म्हणाला.


"कसा आहेस रे तू . दुसऱ्याच कौतुक करायला सर्वात पुढे पण आपलं कौतुक करून घ्यायला मागे. बरं ते जाऊ दे मनापासून अभिनंदन तुझं." श्वेता म्हणाली.


" श्वेता, तुझेही श्रेय आहे हो माझ्या लेकाच्या यशात आणि त्याला एक चांगला व्यक्ती बनवण्यात." विराटच्या आई श्वेताचा प्रेमाने हात हातात घेत म्हणाल्या.


"खरंच आई, मी खूप नशीबवान आहे.माझ्या घरात सासू-सून म्हणजे भांडणाचा विषय, हे कधीच मला दिसलच नाही. कारण माझ्या आजीने आणि आईने कधीही भांड्याला भांड लागूच दिलं नाही किंवा त्याचा आवाज आमच्या कानावर पडला नाही. आणि आज माझी होणारी सासू इतकी प्रेमळ आहे,  जी आपल्या सुनेचे तोंडभरून कौतुक करतेय तर ती आईच झाली ना माझी." श्वेता विराटच्या आईच्या गळ्यात पडत म्हणाली.


विराटच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. श्वेताच्या रुपाने मिळालेली मुलगी त्याच्यासाठी अपूर्ण असलेल्या स्वप्नाची पूर्ती होती.


"खरंच श्वेता, दोघांपासून सुरू झालेलं प्रेम जेव्हा लग्नात परिवर्तित होतं तेव्हा दोघांच्या प्रेमात रंग भरताना सासरच्या माणसांची स्वप्नेही रंगवता आली पाहिजेत तरच ते चित्र नयनांना सुखावतं." श्वेताची आई आपल्या लेकीला समजावत म्हणाली. 


"हो आई, नक्की ! मी ही तुम्हांला श्वेताच्या आणि माझ्या वतीने खात्री देतो." लाडका जावई विराट सासूबाईंना आश्वासन देत म्हणाला.


काही दिवसातच विराट आणि श्वेता लग्नबंधनात अडकले आणि अशा प्रकारे हा विराट आणि श्वेताच्या प्रेमाचा रंग लग्नानंतर अधिक-अधिक चढत गेला.



सौ. प्राजक्ता पाटील



🎭 Series Post

View all