Jan 29, 2022
कथामालिका

कॉलेज लाईफ भाग ८

Read Later
कॉलेज लाईफ भाग ८
कॉलेज लाईफ भाग ८

मागील भागाचा सारांश:- किर्ती प्रियासोबत सोलापूरला जाते, तेव्हा तिची भेट प्रांजलच्या आई वडिलांसोबत होते. किर्तीला प्रांजलच्या आत्महत्ये मागील खरं कारण तिच्या आईकडून समजलं, ते ऐकून किर्तीला त्यावर विश्वास बसत नव्हता, कारण प्रांजल व किर्ती इतक्या जवळच्या मैत्रिणी असून सुद्धा प्रांजल तिच्या आयुष्यातील एवढी मोठी गोष्ट तिच्या पासून लपवून ठेवली होती.

आता बघूया पुढे….
 
अक्षराने तिच्या परीक्षेचा निकाल कळवण्यासाठी प्रसाद दादाला फोन केला. अक्षराने दोन तीन वेळेस फोन लावला पण प्रसादने फोन उचलला नाही. तिसऱ्या वेळेस फोन कट होता होता उचलला,

"हॅलो, कोण बोलतंय?"
प्रसादच्या फोनवरुन एका मुलीचा आवाज ऐकून अक्षरा प्रश्नचिन्हात पडली होती.

अक्षरा हळूच म्हणाली,
"तुम्ही कोण बोलत आहात? हा फोन तर माझ्या प्रसाद दादाचा आहे ना?"

समोरील मुलगी म्हणाली,
"अरे यार, प्रसादला आज जरा जास्तच झाली होती वाटतं, तो त्याच्या धुंदीत माझा फोन घेऊन गेलाय वाटतं आणि माझ्याही ते लक्षात आलं नाही."

अक्षराला तिचं बोलणं नीट समजलं नसल्याने ती थोडी मोठ्याने म्हणाली,
"Excuse me, तुम्ही कोण आहात? आणि प्रसाद दादाचा फोन तुमच्याकडे काय करत आहे? प्रसाद दादा कुठे आहे?"

फोनवरील मुलगी म्हणाली,
"हाय अक्षरा, माझं नाव अमृता आहे. मी प्रसादची मैत्रीण आहे. आज आमच्या एका कॉमन मित्राचा बर्थडे असल्याने पार्टी होती आणि त्याच पार्टीत आमच्या मोबाईलची अदलाबदली झाली. माझा व त्याचा मोबाईल एकसारखा असल्याने हे झालं असेल. मी प्रसादपर्यंत त्याचा मोबाईल पोहोचवते व तुला फोन करायला सांगते."

अक्षरा काही बोलण्याच्या आत अमृताने फोन कट केला. प्रसादच्या फोनवर ही कोण अमृता असेल? या प्रश्नात अक्षरा पडली होती. तेवढ्यात अक्षराच्या फोनची रिंग वाजली. अक्षराला वाटलं होतं की प्रसादचा फोन असेल पण निखिलचा फोन होता.

"हॅलो निखिल, बोल काय म्हणतोस?"
अक्षरा एकदम कमी आवाजात बोलली.

अक्षराच्या आवाजातील बदल ओळखून निखिल म्हणाला,
"अक्षरा तु कसला विचार करत आहेस?"

अक्षरा म्हणाली,
"मी आत्ता माझ्या प्रसाद दादाला फोन केला होता, पण त्याचा फोन त्याच्या एका मैत्रिणीकडे होता."

निखिल म्हणाला,
"मग त्यात एवढा विचार करण्यासारखं काय आहे?"

अक्षरा म्हणाली,
"दादाला मैत्रीण कशी असू शकते?"

निखिल म्हणाला,
"जशी मला आहे तशीच."

अक्षरा म्हणाली,
"दादाने यापूर्वी कधी सांगितलं नाही."

निखिल म्हणाला,
"तु दादाला कधी माझ्याबद्दल किंवा रोहीत बद्दल सांगितलं आहेस का?"

अक्षरा म्हणाली,
"नाही कारण दादाला कदाचित ते आवडणार नाही."

निखिल म्हणाला,
"अग दादाने पण हाच विचार केला असेल. यावर एवढा विचार करत बसण्यापेक्षा दादाचा फोन आला की त्यालाच हा प्रश्न विचार."

अक्षरा म्हणाली,
"हो आत मी तेच करते. बरं तु फोन कशाला केला होतास?"

निखिल म्हणाला,
"काही नाही, बरेच दिवस झाले तु संध्याकाळच्या वेळी लायब्ररीत अभ्यासाला आली नाहीस."

अक्षरा म्हणाली,
"कितू व पियूमध्ये इतका वेळ निघून जातो की लायब्ररीत यायला वेळच मिळणार नाही."

निखिल म्हणाला,
"अक्षरा बी सिरिअस. पुढच्या महिन्यात आपली पहिल्या सेमिस्टरची परीक्षा आहे. खूप अभ्यास करणे बाकी आहे, त्यात तुला एका विषयात कमी मार्क्स मिळाले आहेत. थोड्या दिवस मैत्रिणींना बाजूला ठेव. किर्ती बरोबर वेळ काढून अभ्यास करते. प्रियाच्या अभ्यासबद्दल मला फारशी कल्पना नाहीये. पण तुला अजून अभ्यासाची गरज आहे. अक्षरा अभ्यासात सातत्य गरजेचे आहे."

अक्षरा म्हणाली,
"हो रे, मलाही तसंच वाटतं. उद्यापासून मी दररोज संध्याकाळी लायब्ररीत येत जाईल, आपण दोघे मिळून अभ्यास करुयात."

निखिल म्हणाला,
"ये हुई ना बात. आजच्या दिवस किर्ती आणि प्रिया सोबत काय गप्पा मारायच्या त्या मारुन घेत. उद्यापासून नो टाईमपास ओन्ली अभ्यास."

निखिल सोबत बोलून झाल्यावर अक्षरा रुममध्ये गेली, तेव्हा प्रिया तिला म्हणाली,
"रिझल्ट ऐकून दादाची काय प्रतिक्रिया होती?"

अक्षरा म्हणाली,
"दादाने फोनच उचलला नाही."

प्रिया म्हणाली,
"मग तु एवढ्या वेळ कोणासोबत फोनवर बोलत होतीस?"

अक्षरा म्हणाली,
"निखीलचा फोन आला होता."

यावर किर्ती म्हणाली,
"आत्ता काही वेळापूर्वी निखीलची व आपली भेट कॉलेजमध्ये झाली होती ना? मग लगेच त्याला तुझ्यासोबत काय बोलायचं होतं?"

अक्षरा म्हणाली,
"अग कितू, तुम्ही दोघी इथे नसताना दररोज संध्याकाळी आम्ही दोघे लायब्ररीत अभ्यास करत बसायचो. हल्ली मला लायब्ररीत जाणचं जमत नाहीये म्हणून त्याने फोन केला होता."

किर्ती म्हणाली,
"मग तु लायब्ररीत जाणारेस का?"

अक्षरा म्हणाली,
"हो, उद्यापासून संध्याकाळी लायब्ररीत जात जाईल, तेवढाच अभ्यास पण होईल. पुढच्या महिन्यात आपली सेमिस्टर एक्साम आहे ना? अभ्यासाला लागायला हवं. निखिल सोबत अभ्यास करायला बरं वाटतं."

प्रिया म्हणाली,
"आमच्या सोबत अभ्यास करताना बोअर होतं वाटतं."

अक्षरा म्हणाली,
"पियू गैरसमज करुन घेऊ नकोस पण एखादी कन्सेप्ट समजली नाहीतर निखिल खूप छान पध्दतीने समजावून सांगतो. हवंतर तु आमच्यासोबत अभ्यासाला बस म्हणजे तुझ्याही लक्षात येईल."

प्रिया म्हणाली,
"चालेल, उद्या मी पण तुझ्या सोबत लायब्ररीत येते."

किर्ती म्हणाली,
"अक्षू तुला राग येणार नसेल तर एक विचारु?"

अक्षरा म्हणाली,
"विचार ना?"

किर्ती म्हणाली,
"तुझ्या व निखीलमध्ये फक्त मैत्रीचं आहे ना? कारण मी गेले काही दिवस बघत आहे की, तु निखिल सोबत जरा जास्तच मोकळेपणाने बोलत आहेस."

अक्षरा हसून म्हणाली,
"कितू तुच एकदा मला सांगितलं होतं ना की, मुलांसोबत बोलणं किंवा मैत्री करणं चुकीचं नाहीये. निखिल सोबत बोलताना मला अगदी मोकळं वाटतं. बऱ्याचदा तो माझ्या दादासारखा वागतो. आमच्यामध्ये फक्त मैत्रीच आहे आणि त्यापेक्षा वेगळं काही घडलेलं मला चालणार पण नाही."

किर्ती म्हणाली,
"तुमच्यामध्ये काही असलं तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रांजलच्या बाबतीत मला काहीच माहिती नसल्याने मी तिची मदत करु शकले नाही. मनात शंका आली म्हणून त्याचं निरसन करुन घेतलं. पुढे जाऊन तुला जर त्याच्या बद्दल काही वाटलं तर प्लिज मला सांगशील. प्रांजल सारखं माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस."

अक्षरा म्हणाली,
"कितू मी तुमच्या दोघींपासून काहीच लपवत नाही आणि पुढे जाऊन काही लपवणार सुद्धा नाही."

दुसऱ्या दिवशी सकाळीच अक्षराला प्रसादचा फोन आला. अक्षरा कॉलेजला जाण्याच्या गडबडीत होती. प्रसादचा फोन आलेला बघून ती प्रियाला म्हणाली,

"प्रिया प्रसाद दादाचा फोन आला आहे. मी खाली जाऊन त्याच्यासोबत बोलते. तुझं आवरलं की खाली ये, मग आपण कॉलेजला जाऊ."

प्रियाने मान हलवल्यावर अक्षराने रुमच्या बाहेर पडून फोन उचलला,
"हॅलो, अक्षू फोन उचलायला किती वेळ लावलास?"

अक्षरा म्हणाली,
"दादा मी तुला काल फोन केला होता आणि त्याचा रिप्लाय तु आत्ता देतो आहेस, उशीर कोणी केला?"

प्रसाद म्हणाला,
"सॉरी अक्षू, अग मोबाईलची अदलाबदल झाली म्हणून प्रॉब्लेम झाला. बरं मी तुझा रिझल्ट बघितला. एका विषयात तुला कमी मार्क्स मिळाले आहेत, बाकी विषयात चांगले मार्क्स आहेत."

अक्षरा म्हणाली,
"दादा तुझा मोबाईल अदलाबदल झाला ते बरं झालं, त्यानिमित्ताने तुला अमृता नावाची एक मैत्रीण आहे, हे तरी मला कळालं. दादा तिला माझं नाव पण माहीत आहे रे."

प्रसाद म्हणाला,
"अग आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत म्हणून बाकी खास असं काही नाहीये. मी तुझ्याबद्दल एकदा दोनदा तिला असंच बोललो होतो ना, म्हणून ती तुला ओळखते."

अक्षरा म्हणाली,
"दादा ती तुझी मैत्रीण असेल तरी माझी काहीच हरकत नाहीये. दादा मला तिच्याकडून हेही कळालं की तु ड्रिंक करतोस म्हणून."

प्रसादला पुढे काय बोलावं? हे सुचत नव्हतं म्हणून तो म्हणाला,
"अक्षू मी आता कॉलेजला चाललोय, मी संध्याकाळी निवांत तुला फोन करतो मग आपण सविस्तर बोलूयात."

अक्षराच्या उत्तराची वाट न पाहता प्रसादने फोन कट केला. फोन ठेवल्यावर अक्षराला प्रसादच्या मॅसेज आला,
'अक्षू मित्रांच्या आग्रहाखातर मी ड्रिंक करायला लागलो. कधीतरी थोडंफार घेतो. प्लिज आई बाबांना यातलं काही सांगू नकोस.'
अक्षरा मॅसेज वाचत असतानाच मागून प्रिया येऊन म्हणाली,
"अक्षू चल पटकन कॉलेजला जाऊ, नाहीतर लेक्चर सुरु होईल."

कॉलेजला जाण्याच्या गडबडीत अक्षरा प्रसादला रिप्लाय करणे विसरुन गेली.
©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now