Jan 26, 2022
कथामालिका

कॉलेज लाईफ भाग ७

Read Later
कॉलेज लाईफ भाग ७

कॉलेज लाईफ भाग ७

 

मागील भागाचा सारांश: किर्ती व प्रिया घरुन होस्टेलला आल्या नसल्याने अक्षराला खूप बोअर होत होते. रोहित सुद्धा घरुन न आल्याने निखिलला बोअर होत होते, त्यामुळे निखिल व अक्षरा मध्ये गप्पा झाल्या आणि दोघांची चांगली मैत्री झाली. पुढील तीन- चार दिवसांनी किर्ती व प्रिया होस्टेलला परत आल्या, तेव्हा अक्षराला किर्ती डिस्टर्ब झालेली वाटली.

 

आता बघूया पुढे….

 

प्रिया म्हणाली,

"मी तुला सगळं काही सांगते, पण याबद्दल कितू सोबत काहीच बोलायला जाऊ नकोस."

 

अक्षरा म्हणाली,

"नाही बोलणार, तु पहिले काय झालंय? ते सांग."

 

प्रिया म्हणाली,

"आम्ही दोघी घरी पोहोचलो, तेव्हा माझी काकू आमच्या घरी आलेली होती, ती सोलापूर मध्येच रहायला आहे. काकूने मला व किर्तीला घरी जेवायला बोलावलं होतं. दुसऱ्या दिवशी मला थोडीफार शॉपिंग करायची होती, त्यामुळे मी काकू राहते त्या एरियात जाणार होतेच. मग मी विचार केला की आपण काकूकडे जाऊन येऊयात. आम्ही थोडावेळ शॉपिंग केली व काकूच्या घरी पोहोचलो. काकूच्या घरी पोहोचल्यापासून कितू काहीतरी वेगळयाच विचारात होती. जेवण करताना पण तिचं लक्ष नव्हतं.

 

जेवण झाल्यावर मी तिला विचारले," कितू तुला काय झालंय? तु कसला विचार करत आहेस?"

 तेव्हा कितू म्हणाली," प्रांजलचं घर सुद्धा ह्याच एरियात आहे."

कितूला तो एरिया ओळखीचा वाटत होता, पण कितूला नेमकं प्रांजलचं घर कोणतं? हे आठवत नव्हतं, कारण तो एरिया बराच बदलला आहे.

आमच्या दोघींचा हा विषय काकूने ऐकला, तेव्हा तिने कितूला प्रांजल बद्दल माहिती विचारली. 

मग काकू म्हणाली, " प्रांजलचे आई वडील समोरच्याच घरात राहतात."

 काकूने आम्हाला प्रांजल बद्दल एक शॉकींग बातमी सांगितली," प्रांजलने आत्महत्या घरच्यांच्या दबावामुळे केली."

 काकूला नेमकं काय ते माहीत नसल्याने कितूने प्रांजलच्या आई वडिलांची भेट घेण्याचे ठरवले. मी पण तिच्या सोबत प्रांजलच्या घरी गेले होते.

 

प्रांजलच्या आई वडिलांनी कितूला लगेच ओळखले. कितूने माझी त्यांच्या सोबत ओळख करुन दिली. कितूला बघून प्रांजलच्या आईच्या डोळयात पाणी आले होते, तेव्हा कितू त्यांना म्हणाली की काकू प्रांजल आपल्याला सोडून गेल्यापासून तुम्ही मला फोन पण केला नाही. प्रांजलच्या अचानक जाण्याने मला खूप मोठा धक्का बसला होता. प्रांजल ही माझी एकमेव जवळची मैत्रीण होती आणि तिचं जाण्याचं खर कारण सुद्धा मला अजून पर्यंत कळलेलं नाही.

 

कितू थोडी इमोशनल झाल्यावर प्रांजलच्या आईने जे सांगितलं, त्यावर कितूचा विश्वास बसायला तयार नव्हता. प्रांजलने आत्महत्या का केली? याचे खरे कारण तिच्या आईने आम्हाला सांगितले."

 

अक्षरा प्रियाला मध्येच थांबवत म्हणाली,

"प्रांजलच्या आत्महत्येचे खरे कारण काय होते?"

 

प्रिया चिडून म्हणाली,

"तेच तर मी तुला सांगत आहे ना. प्लिज डिस्टर्ब करु नकोस. प्रांजल ही कितूची किती जवळची मैत्रीण होती ते तर तुला ठाऊक आहेच, त्यामुळे आपली इतकी जवळची मैत्रीण आपल्या पासून इतकं काही लपवू शकेल हेच कितूला पचत नाहीये. 

 

प्रांजलचा एक आत्त्याचा मुलगा आहे, तो तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. एकाच गावात राहत असल्याने त्याच प्रांजलच्या घरी नेहमीच येणंजाणं होतं. प्रांजल सुट्टीसाठी घरी आली की तो जरा जास्तच यायचा पण प्रांजलच्या घरच्यांना कधी संशय आला नाही. प्रांजल आठवीत असल्यापासून या दोघांचं अफेअर चालू होतं. प्रांजल मैत्रिणीकडे जाते असं सांगून त्याच्या सोबत फिरायला जात होती. अकरावीला असताना प्रांजल होस्टेल वरुन घरी गेल्यावर तिला बरं वाटतं नव्हतं म्हणून तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली, तेव्हा डॉक्टरांनी तिच्या काही टेस्टस करुन घ्यायला सांगितल्या, त्यात प्रेग्नन्सी टेस्ट पण होती. डॉक्टरांनी सांगितल्या म्हणून यांनी तिच्या सगळया टेस्टस करुन घेतल्या, तेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉजिटिव्ह आली. आपली अकरावीत असणारी मुलगी प्रेग्नंट आहे, हे ऐकल्यावर तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 

प्रांजलला दमदाटी केल्यावर तिने सगळं काही खरं सांगून टाकलं, तेव्हा प्रांजलच्या घरच्यांनी तिच्या आत्त्याच्या मुलाला बोलावून याबद्दल विचारलं असता त्याने सरळ सांगून टाकलं की माझा प्रांजल सोबत काहीच संबंध नाहीये, ती दुसऱ्या कोणाचं तरी पाप माझ्या माथ्यावर मांडत आहे, तो खूप काही बोलला होता. प्रांजलला हे काही सहन झाले नाही, आपल्या बाजूने कोणीच नाही हे तिला समजले होते. आपल्या चुकीमुळे आपल्या आई वडिलांची बदनामी व्हायला नको, म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. प्रांजलने दोन पत्र लिहून ठेवली होती. एक ज्यात रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचं होतं आणि दुसरं तिने आत्महत्या का केली? याचं खरं कारण लिहिलेलं होतं. प्रांजलच्या घरच्यांनी तिचं खोटं कारण लिहिलेलं पत्र पोलिसांना दाखवलं होतं."

 

यावर अक्षरा म्हणाली,

"बापरे हे सगळं किती भयानक आहे. कितूने प्रांजलचं जे वर्णन केलं होतं, त्यापेक्षा ही प्रांजल खूपच वेगळी निघाली."

 

प्रिया म्हणाली,

"विचार कर, तुला आणि मला इतका धक्का बसलाय तर कितूला किती मोठा धक्का बसला असेल."

 

अक्षरा म्हणाली,

"हो ना, पण मला एक सांग पियू, तुझ्यामते या सगळयात चूक कोणाची असेल? प्रांजलची की त्या मुलाची?"

 

प्रिया म्हणाली,

"अक्षू प्रेम हे आंधळं असतं. प्रेमात पडणं चुकीचं नाही पण दोघांनीही आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजे. एवढंच आहे की प्रांजल जरा जास्तच लवकर प्रेमात पडली होती आणि याबद्दल ती कोणाशीही बोलली नाही त्यामुळे काय योग्य की काय अयोग्य हेच तिला समजले नाही. तो मुलगा जसं सांगत राहिला तसंच ती वागत होती. त्या मुलाने प्रांजलची साथ दिली नाही, हेच तिला सहन झाले नसेल. प्रांजल मनाने कमकुवत असेल म्हणूनच तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल. या सगळयात जास्त तोटा हा तिचाच झाला, ती जीवानिशी गेली त्यामुळे तिचे आई वडील दुःखी झाले, पण या सगळ्याचा त्या मुलावर काहीच परिणाम झाला नाही. तो मुलगा तर मस्त मजेत जगत आहे."

 

अक्षरा म्हणाली,

"हो ना. कितूला जास्तच धक्का बसला असेल ना?"

 

प्रिया म्हणाली,

"हो, त्यामुळे तिला बरं वाटत नव्हतं, म्हणून आम्ही ती बरी होईपर्यंत घरीच थांबलो. आपल्या जवळच्या मैत्रिणीने आपल्या पासून इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली, हेच तिला पटत नाहीये."

 

अक्षरा म्हणाली,

"असो, बरं मी संध्याकाळी लायब्ररीत जाणार आहे, तर तु माझ्यासोबत येणार आहेस का?"

 

प्रिया म्हणाली,

"तु कधीपासून लायब्ररीत अभ्यास करायला जायला लागलीस?"

 

अक्षरा म्हणाली,

"तुम्ही इथे नसल्यापासून. निखिल माझी वाट बघत असेल. आज जर मी गेले नाहीतर तो म्हणेल की मैत्रिणी आल्या तर मी त्याला विसरले म्हणून."

 

प्रिया म्हणाली,

"तु लायब्ररीत जा. मला जरावेळ आराम करायचा आहे."

 

अक्षरा आपलं आवरुन लायब्ररीत निघून गेली. किर्ती व प्रिया परत आल्या तरी अक्षराने आपलं रुटीन बदललं नाही, ती दररोज निखिल सोबत लायब्ररीत जाऊन अभ्यास करत होती. किर्तीला नॉर्मल व्हायला जरा वेळ लागला. पुढील काही दिवस किर्ती अक्षरा व प्रियासोबत फारसं बोलत नव्हती. एका आठवड्याने परीक्षेचा निकाल लागला, त्यात किर्तीला सर्वांत जास्त मार्क्स मिळाले होते. अक्षरा व निखिलला सुद्धा चांगले मार्क्स मिळाले होते. प्रिया काठावर पास झाली होती तर रोहित दोन विषयात नापास झाला होता.

निखिलने फोन करुन रोहितला त्याचा निकाल सांगितल्यावर तो दुसऱ्याच दिवशी कॉलेजला परत आला. अक्षराला एका विषयात कमी मार्क्स मिळाल्याने ती नाराज होती तेव्हा निखिलने तो विषय निखिल स्वतः तिला शिकवणार असल्याचे सांगितले आणि पुढील परीक्षेत तिला अजून चांगले मार्क्स मिळू शकतील याची खात्री त्याने तिला दिली तेव्हा तिला जरा रिलीफ मिळाला.

किर्तीला सर्वांत जास्त मार्क्स मिळाले होते पण त्यामुळे तिला खूप काही आनंद झाला नव्हता. किर्तीला जास्त मार्क्स मिळाल्याचा आनंद तिच्यापेक्षा अक्षरा व प्रियाला जास्त झाला होता.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now