Jan 29, 2022
कथामालिका

कॉलेज लाईफ भाग ६

Read Later
कॉलेज लाईफ भाग ६

कॉलेज लाईफ भाग ६


मागील भागाचा सारांश:- निखिल व रोहित सोबत अक्षरा व प्रियाची ओळख झाली. निखिल व रोहित त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले. परीक्षा संपल्यावर दोन ते तीन दिवसांची सुट्टी असल्याने अक्षरा व प्रिया घरी गेल्या, प्रिया आपल्या सोबत किर्तीला पण घेऊन गेली. अक्षरा घरुन होस्टेलला परतली होती पण प्रिया व किर्ती अजून आल्या नव्हत्या.

आता बघूया पुढे....

किर्ती व प्रिया सोबत नसल्याने अक्षरा एकटीच कॉलेजला गेली होती. वर्गात सोनाली तिच्या सोबत बेंचवर बसली होती,पण तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. अक्षराला खूप जास्त बोअर झाले होते म्हणून शेवटचे लेक्चर न करता ती लायब्ररीत जाऊन बसली. निखिलने तिला वर्गातून एकटीला बाहेर पडताना बघितले होते म्हणून तोही तिच्या पाठोपाठ लायब्ररीत गेला.

अक्षरा लायब्ररीतील एका कोपऱ्यात जाऊन बसली होती. निखिल तिच्या जवळ जाऊन म्हणाला,

"मी इथे बसू शकतो का?"


"हो" अक्षराने उत्तर दिले.

निखिल म्हणाला,

"तु एवढी उदास का आहेस? आणि तु शेवटचं लेक्चर सुद्धा केलं नाहीस."


अक्षरा म्हणाली,

"प्रिया आणि किर्ती अजून दोन तीन दिवस येणार नाहीयेत, कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मला त्या सोबत असण्याची सवय आहे. त्या दोघी नाहीयेत तर मला जाम बोअर होत आहे."


निखिल म्हणाला,

"सेम पिंच".


अक्षरा पुढे म्हणाली,

"आता यात काय सेम पिंच?"


निखिल म्हणाला,

"रोहित महाराज पण आले नाहीयेत. रोहित तर पुढील पंधरा दिवस येणार नाहीये. मलापण त्याची सवय झाली आहे,रुममध्ये भयानक शांतता पसरली आहे."


अक्षरा म्हणाली,

"पंधरा दिवस रोहित घरी राहून काय करणार आहे?"


निखिल म्हणाला,

"गाडीवरुन पडलाय म्हणे, हातापायाला बराच मार लागलेला आहे. पूर्ण बरा होईपर्यंत तो येणार नाहीये."


अक्षरा म्हणाली,

"अरे बापरे, रोहित खूपच उद्योगी आहे ना?"


निखिल म्हणाला,

"हो, श्रीमंत बापाचा मुलगा आहे. घरी वडिलांचा बिजनेस सेट आहे, याला फक्त नावाला डिग्री घ्यायची आहे."


अक्षरा म्हणाली,

"हो का? मला नव्हतं माहीत."


निखिल म्हणाला,

"तु आमच्यासोबत जास्त बोलतच नाही,तेव्हा तुला आमच्याबद्दल कळणार कसं?"


यावर अक्षरा फक्त हसली, ती काहीच बोलली नाही.

निखिल म्हणाला,

"मला एक सांग,आपण दोघे बोलत असताना तुला किर्ती किंवा प्रियाची आठवण आली का? तुला बोअर झालं का?"


अक्षरा म्हणाली,

"अजिबात नाही."


निखिल म्हणाला,

"मला पण बोअर नाही झालं.मला कल्पना आहे की तुला मुलांसोबत बोलायची सवय नसेल, पण आता आपण एकमेकांना ओळखायला लागलो आहे,तर थोडंफार मनमोकळेपणाने बोलू शकतो की नाही."


अक्षरा म्हणाली,

"हो"


निखिल त्याचा हात अक्षरापुढे धरत म्हणाला,

"फ्रेंड्स"


अक्षरा त्याच्या हातात आपला हात देत हसून म्हणाली,

"फ्रेंड्स"


निखिल पुढे म्हणाला,

"आता आपण फ्रेंड्स झालो आहोतच,तर आपल्याबद्दल एकमेकांना बेसिक माहिती देऊयात."


अक्षरा म्हणाली,

"हो चालेल."


निखिल म्हणाला,

"माझं नाव निखिल जाधव आहे. माझं घर अहमदनगरला आहे. मी दहावीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. माझी आई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. मला एक मोठी बहीण आहे, ती इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. माझी ताई मुंबईत असते."


अक्षरा म्हणाली,

" माझं नाव अक्षरा कदम आहे. माझ्या गावाचं नाव चिंचखेड आहे, ते नाशिक जिल्ह्यात आहे. माझे बाबा शेती करतात. मला एक मोठा भाऊ आहे, तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, तो मुंबईत असतो."


निखिल म्हणाला,

"मला खूप जास्त भूक लागली आहे, चल कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊन येऊयात."


अक्षरा म्हणाली,

"नाही नको. मी मेसमध्ये जाऊन जेवण करते."


निखिल म्हणाला,

"तुमच्या मेसमध्ये जेवण खूप चविष्ट मिळतं का? तुला एकटीला जेवताना बोअर होणार नाही का?"


अक्षरा म्हणाला,

"मेसचं जेवण कधी चविष्ट असतं का? मला एकटीला जेवताना बोअरच होईल, पण आईने सांगितलंय की पैश्यांची उधळपट्टी करायची नाही."


निखिल म्हणाला,

"अक्षरा आपण दररोज कॅन्टीन मध्ये जाऊन काही खात नाही. आजच्या दिवस काहीतरी खाऊ म्हणजे आपल्या दोघांचा मूड चांगला राहील. मी तुझे पैसे देतो चल."


अक्षरा म्हणाली,

"नाही नको. मी माझे पैसे देईल."


अक्षरा व निखिल दोघे कॅन्टीनमध्ये जाऊन आपापल्या आवडीचे पदार्थ खाल्ले. कॅन्टीन मधून बाहेर पडल्यावर अक्षरा म्हणाली,

"चल मी रुमवर जाते.रात्री नीट झोप झाली नाहीये, थोड्यावेळ जाऊन झोपते."


निखिल म्हणाला,

"झोपेतून उठल्यावर काय करणार आहेस?"


अक्षरा म्हणाली,

"आईसोबत फोनवर बोलेल. थोडाफार अभ्यास करेल."


निखिल म्हणाला,

"अभ्यास करण्यासाठी लायब्ररीत ये. मी पण येतो. चालेल ना?"


अक्षरा म्हणाली,

"हो, चालेल ना."


निखिल म्हणाला,

"आणि हो दुसरी गोष्ट, तुला बोअर झालं तर मला बिनधास्त फोन करु शकतेस."


अक्षरा स्माईल देऊन आपल्या होस्टेलच्या दिशेने निघून गेली. होस्टेलवर जाता जाता अक्षरा विचार करत होती की, निखिल बोलून चालून चांगला मुलगा आहे. मी उगाच त्याच्या सोबत बोलायला घाबरत होते. निखिल असल्यामुळे प्रिया व किर्तीची जास्त कमी वाटत तर नाहीये.

झोपेतून उठल्यावर फ्रेश होऊन अक्षरा लायब्ररीत गेली. निखिल अक्षराच्या आधीच लायब्ररीत येऊन बसलेला होता. दोघांनी सोबत गप्पा मारता मारता अभ्यास केला. होस्टेलचे गेट बंद होण्याची वेळ झाल्याने अक्षरा होस्टेलवर निघून गेली. अक्षराचं आता रुटीन फिक्स झालं होतं. लेक्चर्स संपल्यावर निखिल सोबत जरावेळ गप्पा मारत बसायची, त्यानंतर होस्टेलला येऊन जेवण करायचं, जरावेळ झोप काढायची आणि संध्याकाळी लायब्ररीत जाऊन निखिल सोबत अभ्यास करत बसायची.

रात्री झोप आली नाहीतर ती निखिलला फोन करुन गप्पा मारत बसायची. निखिल फोनवर विनोद सांगून तिला हसवायचा. अक्षराला निखिल सोबत बोलायला आवडायला लागले होते.

पुढील तीन ते चार दिवसांनी किर्ती व प्रिया होस्टेलला परत आल्या होत्या. नेहमीप्रमाणे अक्षरा कॉलेजवरुन रुममध्ये परतली होती तेव्हा तिने बघितलं की प्रिया व किर्ती दोघीजणी परत आल्या आहेत, त्यांना बघून अक्षरा म्हणाली,

"हाय गर्ल्स, तुम्ही कधी आलात?"


प्रिया म्हणाली,

"एक तास झाला असेल."


किर्ती म्हणाली,

"मी लायब्ररीत जाऊन येते."


किर्ती निघून गेल्यावर अक्षरा प्रियाला म्हणाली,

"कितूला काय झालंय? ती माझ्यासोबत काहीच बोलली नाही. तुम्ही उशिरा का आल्यात?"


प्रिया म्हणाली,

"ते मी तुला निवांत सांगेल. मला वाटलं होतं की आम्ही नाही तर तु खूपच दुःखी असशील,पण तु तर जरा जास्तच खुश वाटत आहेस."


अक्षरा म्हणाली,

"तुम्ही दोघी नव्हत्या तर मला खरंच खूप बोअर झालं होतं, करमतचं नव्हतं. असं वाटतं होतं की आपण घरुन यायलाच नको होतं. दुसऱ्या दिवशी निखिल कॉलेजमध्ये भेटला, त्याने सांगितलं की रोहित पण घरुन आलेला नाहीये. निखिलला सुद्धा बोअर होत होतं, त्यादिवशी पहिल्यांदा निखिल सोबत गप्पा मारल्या तेव्हा जरा बरं वाटलं. निखिल बोलून चालून चांगला वाटला. निखिल सोबत बोलल्याने तुमची अनुपस्थिती एवढी जाणवली नाही. रात्रीच्या वेळी सोनाली रुममध्ये झोपायला येत होती."


प्रिया म्हणाली,

"निखिल सोबत अक्षरा मॅडमची मैत्री झाली म्हणायची. रोहित अजून पण आला नाहीये का?"


अक्षरा म्हणाली,

"हो, अग त्याचा अपघात झाला आहे, हातापायाला थोडफार लागलं आहे,तेव्हा तो बरा झाल्यावर येणार आहे. तुम्ही उशिरा का आल्या? हे सांग ना."


प्रिया म्हणाली,

"किर्तीची तब्येत बरी नव्हती, मग आई म्हणाली की तिला बरं वाटल्यावर जा."


अक्षरा म्हणाली,

"किर्ती नाराज का दिसत होती?"


प्रिया म्हणाली,

"अक्षू तुला एक म्हण माहित असेल ना की 'अज्ञानात शहाणपण असतं.' ती अगदी योग्य म्हण आहे. काही गोष्टी आपल्याला न कळलेल्याच बऱ्या असतात. सत्य परिस्थिती समजल्यावर त्याचा आपल्याला जास्त त्रास होतो. कितूचं सुद्धा असंच काहीतरी झालंय."


अक्षरा म्हणाली,

"पियू प्रस्तावना देण्यापेक्षा मुद्द्याचं बोलशील का?"


किर्तीला असं काय सत्य कळलं असेल? ज्यामुळे तिला इतका त्रास होत आहे, बघूया पुढील भागात…

©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now