कॉलेज लाईफ भाग ५

Nikhil And Rohit Are Added In Akshara's Friends Group

कॉलेज लाईफ भाग ५


मागील भागाचा सारांश: किर्तीने तिच्या आयुष्याबद्दल सर्व काही अक्षरा व प्रियाला सांगितले.


आता बघूया पुढे....

किर्ती तिचं बोलणं संपवून झोपून गेली होती. अक्षरा व प्रिया तिच्याकडे बघतच होत्या. प्रियाने अक्षराला रुमबाहेर जाण्याच्या खाणाखुणा केल्या. प्रिया रुमबाहेर गेल्यावर अक्षरा तिच्या पाठोपाठ जाऊन म्हणाली,

"पियू काय झालं? मला बाहेर का बोलावलंस?"

प्रिया म्हणाली,

"कितू बद्दल मला जरा बोलायचं होतं. आता तिच्यासमोर कसं बोलू शकतो? म्हणून मी तुला बाहेर बोलावलं."

अक्षरा म्हणाली,

"बोल, काय बोलायचं होतं?"

प्रिया म्हणाली,

"आपण किर्तीची सगळी मदत करत जाऊयात. बिचारीने किती दुःख सहन केले आहे."

अक्षरा म्हणाली,

"बरं केलं हे फक्त तु मलाच बोललीस. किर्ती काय बोलली होती? हे तुला आठवत नाहीये का? तिला कोणाचीच सहानुभूती नकोय?"

प्रिया म्हणाली,

"अग पण"

अक्षरा म्हणाली,

"पियू आपण कितूची मदत करु पण त्यामुळे तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचायला नकोय. कितू समोर तिची मदत करण्याचा विषय काढू नकोस."

प्रिया म्हणाली,

"बरं ठीक आहे."

कॉलेज सुरु होऊन एक आठवडा झाला होता. अक्षरा होस्टेल व कॉलेजच्या वातावरणात रमायला लागली होती. मेसचं जेवण जेवताना मात्र आईची आठवण व्हायची. किर्ती लेक्चर्स संपल्यावर लायब्ररीत जाऊन काम करत होती. लेक्चर्स नियमित चालू झाल्याने अभ्यासाला सुरुवात झाली होती. अक्षराला तिच्या दादाने सांगितल्याप्रमाणे ती सुरुवातीपासूनच अभ्यास करायला लागली होती. 

एके दिवशी प्रिया व अक्षरा लेक्चर्स संपल्यावर लायब्ररीत जर्नल पूर्ण करत बसल्या होत्या. तेवढ्यात तिथे एक मुलगा येऊन म्हणाला,

"हाय गर्ल्स, तुम्ही दोघी हे जर्नल पूर्ण करत आहात ना, तेच मला पण लिहायचं आहे. तुमचं लिहून झाल्यावर मला तुम्ही तुमचं जर्नल द्याल का?"

अक्षराला मुलांसोबत बोलण्याची सवय नसल्याने ती काहीच बोलली नाही. प्रिया त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली,

"ए हॅलो, एकतर आम्ही तुला ओळखत नाही, मग आम्ही तुला आमचं जर्नल कसं काय देणार?"

तो मुलगा एक खुर्ची घेऊन प्रियाच्या शेजारी जाऊन बसला व तो म्हणाला,

"हाय मी रोहित, तुमच्याच वर्गात आहे. तुम्हा मुलींचं आमच्याकडे लक्षच नसल्याने तुम्ही मला ओळखलंच नाही."

प्रिया पुढे म्हणाली,

"आम्ही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आलो आहोत, मुलांकडे बघण्यासाठी नाही."

रोहित म्हणाला,

"म्हणजे आम्ही मुलं कॉलेजमध्ये मुलींना बघायला येतो, असं तुला म्हणायचं आहे का?"

प्रिया व रोहित बोलत असतानाच अजून एक मुलगा येऊन म्हणाला,

"तुम्ही याचं काही ऐकू नका. रोहित कॉलेजला कधी नसतोच,त्याची सकाळ दुपारी १२ ला होते."

रोहित त्या मुलाकडे रागाने बघत म्हणाला,

"निखिल माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरवू नकोस."

प्रिया निखिल कडे बघत म्हणाली,

"मी तुला क्लास मध्ये बघितलं आहे, पण हा रोहित कधी दिसलाच नाही."

निखिल म्हणाला,

"रोहितने मोजून एक किंवा दोन लेक्चर अटेंड केले असतील. एनिवेज तुमचं हे जर्नल लिहून झालं असेल तर प्लिज आम्हाला देण्याची कृपा कराल. माझं दुसऱ्या विषयाचं जर्नल लिहून झालं आहे, हवंतर मी ते तुम्हाला देतो."

प्रिया अक्षराकडे बघून म्हणाली,

"अक्षरा द्यायचं का?"

अक्षरा म्हणाली,

"तु मला का विचारत आहेस? तुझं तु ठरव."

प्रिया थोडा विचार करुन म्हणाली,

"निखिल आमचं जर्नल पूर्ण व्हायला अजून एक तास तरी लागेल,मग मी तुला माझं जर्नल देते आणि तु तुझं जर्नल मला दे. मी तुझ्यावर विश्वास ठेवून हे जर्नल देत आहे,ह्या रोहितवर तर माझा अजिबात विश्वास नाहीये."

रोहित रागाने प्रियाकडे बघत म्हणाला,

"एक दिवस तुला माझ्या मदतीची गरज लागेल,तेव्हा मी बघून घेईल."

रोहित तेथून निघून गेल्यावर निखिल हसत म्हणाला,

"तु त्या नौटंकीकडे लक्ष नको देऊस. मी तासाभरात माझं जर्नल आणून देतो."

एवढं बोलून निखिल निघून गेला, तो गेल्यावर प्रिया अक्षराकडे बघून म्हणाली,

"अक्षू तू निखिल व रोहित सोबत काहीच का बोलली नाही?"

अक्षरा म्हणाली,

"मला मुलांसोबत बोलायला आवडत नाही."

प्रिया म्हणाली,

"अग पण का? मुलं काय आपल्याला खाऊन घेतात का?"

अक्षरा म्हणाली,

"अग मी आजपर्यंत परक्या मुलांसोबत बोललेलीच नाहीये. शाळेत असताना मी मुलांसोबत बोलली नाहीये म्हणून मला जरा वेगळंच वाटतं."

प्रिया म्हणाली,

"अक्षू आपल्या कामापुरतं बोलून घ्यायचं? किती दिवस अशी लाजत राहशील?"

अक्षरा म्हणाली,

"बघू,हळूहळू सवय करेल."

पुढच्या तासाभरात अक्षरा व प्रिया जर्नल पूर्ण लिहून झालं. निखिल येऊन प्रियाचं जर्नल घेऊन व स्वतःच जर्नल तिला देऊन गेला.

अक्षरा व प्रिया निखिलचं जर्नल घेऊन रुमवर निघून गेल्या. जेवण झाल्यावर दोघीजणी जर्नल लिहायला बसल्यावर किर्ती त्यांना म्हणाली,

"तुम्ही कोणाच्या जर्नलमध्ये बघून लिहीत आहात."

यावर प्रिया म्हणाली,

"अग आपल्या वर्गात तो निखिल आहे ना, त्याचं हे जर्नल आहे. माझं पूर्ण झालेलं जर्नल तो घेऊन गेला व त्याबदल्यात त्याचं जर्नल तो मला देऊन गेला."

किर्ती पुढे म्हणाली,

"तुमची व निखिलची ओळख कुठे झाली?म्हणजे कधी तुम्हाला बोलताना मी बघितलं नव्हतं."

प्रिया म्हणाली,

"आमची भेट लायब्ररीत झाली. निखिल जरा सिंसिअर वाटतो पण त्याचा मित्र रोहित टपोरी वाटतोय."

किर्ती म्हणाली,

"बरीच ओळख झालेली दिसतेय."

अक्षरा म्हणाली,

"हो ना, ही उगाच त्या रोहित सोबत डोकं लावत होती."

प्रिया म्हणाली,

"कितू तु हीच काही ऐकू नकोस. अक्षूला तर मुलांसोबत बोलायची भीती वाटते."

किर्ती अक्षरा जवळ जाऊन बसली व तिला म्हणाली,

"हे बघ अक्षू, मला कल्पना आहे की तु एका खेडेगावात वाढल्यामुळे,तु मुलांसोबत बोलू शकली नसशील,पण हे बघ आपण सध्या अश्या जगात आहोत, तिथे आपल्याला प्रत्येक पावलावर मुलं भेटणार आहेत आणि कामाच्या निमित्ताने का होईना, आपल्याला त्यांच्या सोबत बोलावे लागणारच आहे. अक्षू मुलांसोबत बोलणं हे काही चुकीचं नाहीये. एवढंच आहे की आपल्या कामाशी काम ठेवायचं."

प्रिया म्हणाली,

"मी तिला हेच समजावण्याचा प्रयत्न करत होते."

अक्षरा म्हणाली,

"कितूने किती व्यवस्थित समजावून सांगितलं."

किर्ती म्हणाली,

"आपण आता गप्पा मारत बसण्यापेक्षा जर्नल लिहायला घेऊयात. तुमचं एक तरी पूर्ण झालं आहे, माझं तर तेही बाकी आहे."

दुसऱ्या दिवशी प्रियाने निखिल व रोहितची ओळख किर्ती सोबत करुन दिली. जर्नलची देवाण घेवाण करता करता निखिल व रोहित ह्या तिघींच्या ग्रुपमध्ये सामील झाले. अक्षरा निखिल व रोहित फारसं बोलायची नाही. रोहित एकदा असंच अक्षराला अक्षू म्हणाला तर तिने त्याला स्पष्ट सांगून टाकले की तिला अक्षू फक्त तिच्या जवळचे लोकचं म्हणू शकलात,तेव्हापासून निखिल व रोहित अक्षरा सोबत कमीत कमी बोलायचे. 

चाचणी परीक्षा झाल्यावर तीन ते चार दिवसांची कॉलेजला सुट्टी होती तेव्हा अक्षरा व प्रियाने ठरवले होते की घरी जाऊन यायचे. किर्ती तिच्या काकांच्या घरी जाणार नव्हती म्हणून प्रियाने तिला आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. किर्तीला एकटीला बोअर झाले असते म्हणून ती प्रिया सोबत तिच्या घरी जायला तयार झाली. 

परीक्षा संपल्यावर अक्षराचे बाबा तिला घ्यायला आले होते तर प्रिया व किर्ती बसने जाणार होत्या. अक्षराच्या बाबांनी किर्ती व प्रियाला बस स्टँडवर सोडले.

एवढ्या दिवसांनी घरी गेल्यावर अक्षराला मस्त वाटले होते. तीन-चार दिवसांच्या सुट्टीत अक्षराला आईने तिच्या आवडीचे सर्व पदार्थ करुन खाऊ घातले. अक्षराने आईला कॉलेज व होस्टेलच्या गमतीजमती सांगितल्या तसेच प्रिया व किर्ती बद्दल भरभरुन सांगितले. किर्तीचा प्रवास ऐकून अक्षराच्या आईच्या डोळ्यात पाणी आले.

होस्टेलला परत जाताना अक्षरा बसने एकटी पुण्याला गेली. अक्षराचा पुण्याला जाण्याचा एकटीचा तो पहिला प्रवास होता. अक्षरा होस्टेलला पोहोचल्यावर तिला कळले की प्रिया व किर्ती अजून परत आल्या नाहीयेत,त्यावेळी अक्षराने प्रियाला फोन करुन विचारले तर तिने सांगितले की त्या अजून दोन तीन दिवस परत येणार नाहीयेत. प्रिया व किर्ती रुममध्ये नसल्यावर आपल्याला किती बोअर होईल, ह्या विचारानेच तिला रडायला आले.

अक्षरा मेसमध्ये एकटी जेवत बसली होती, तिला एकटं बघून सोनाली तिच्याजवळ येऊन म्हणाली,

"प्रिया आणि किर्ती अजून घरुन आल्या नाहीत का?"

अक्षरा उदास होऊन म्हणाली,

"नाही ना, त्या नाहीयेत तर मला खूप बोअर झालं आहे. मला रुममध्ये एकटीला झोपायला सुद्धा भीती वाटत आहे."

यावर सोनाली म्हणाली,

"मी तुझ्या रुममध्ये तुझ्या येऊन झोपेल. अग अश्या वेळेस सांगायचं ग. मी तुझी मैत्रीण नाहीये का?"

सोनाली आपल्या सोबत रुममध्ये झोपायला येणार आहे म्हटल्यावर अक्षराच्या मनातील भीती कमी झाली होती.

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all