Jan 29, 2022
कथामालिका

कॉलेज लाईफ भाग ४

Read Later
कॉलेज लाईफ भाग ४

कॉलेज लाईफ भाग ४


मागील भागाचा सारांश: पहिल्या वर्षाच्या मुलींची सिनिअर मुली रॅगिंग घेण्याच्या विचारात होत्या म्हणून त्यांनी पहिल्या वर्षाच्या सर्व मुलींना आपल्या रुममध्ये बोलावलं होतं. किर्तीला सिनिअरचा प्लॅन लक्षात आल्याने तिने पहिल्या वर्षाच्या सर्व मुलींना एकजूट होऊन सिनिअर विरोधात जाण्याचा सल्ला दिला, त्यामुळे सिनिअर मुलींचा प्लॅन उधळून लावण्यात किर्तीला यश आले.


आता बघूया पुढे……

जेवण झाल्यावर अक्षरा, किर्ती व प्रिया रुममध्ये परत आल्या. किर्ती झोपण्याची तयारी करत होती, तेव्हा प्रिया तिला म्हणाली,

"किर्ती तु लगेच झोपणार आहेस का?"

किर्ती म्हणाली,

"हो ग, बडबड करुन डोकं दुखायला लागलं आहे."

यावर अक्षरा म्हणाली,

"कितू एक मिनिटं, तु लगेच झोपायचं नाहीये. तु रुममध्ये आल्यावर मला सगळं सांगणार होतीस, पण नेमकं त्यात हे सिनिअर, रॅगिंग प्रकरण निघालं आणि आपलं बोलणंच झालं नाही. तु आता मेसमध्येही त्यांना तुझ्या एका मैत्रिणीचा रॅगिंग मध्ये जीव गेला असं सांगत होतीस, हे सगळं खरं आहे का?"

किर्ती हसून म्हणाली,

"मी तुम्हाला दोघींना सर्व काही सांगते पण ते तुम्ही कोणालाच सांगायचं नाही. माझ्या प्रत्येक कृतीवर तुमच्या डोळ्यात असलेले प्रश्नचिन्ह मला जाणवते."

प्रिया म्हणाली,

"आम्ही तुझ्याबद्दल कोणालाच काहीच सांगणार नाही पण असं का? याचंही उत्तर आम्हाला मिळालं तर बरं होईल."

किर्ती म्हणाली,

" मला कोणाचीच सहानुभूती नकोय म्हणून मी माझ्याबद्दल सहसा कोणाला सांगत नाही. तुम्ही दोघी माझ्या रुममेट आहात म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. मला सहानुभूती या शब्दाचीच खूप चीड आहे, का? हे तुम्हाला माझं बोलणं ऐकल्यावर कळेल.

मी दोन वर्षांची असताना माझ्या आई बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला. अतिशय भीषण अपघात होता. मी त्या अपघातात कशी वाचले? हा सर्वांनाच प्रश्न पडतो. आई बाबा गेल्यावर मला कोणी सांभाळायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. माझ्या मावश्या मामांच म्हणणं होतं की, माझ्या बाबांची शेती माझे काका करतील मग माझा सांभाळ सुद्धा त्यांनीच करायला पाहिजे. जर माझा सांभाळ करणे माझ्या काकांना जमणार नसेल तर त्यांनी बाबांची शेती माझ्या मामांच्या ताब्यात द्यायची, त्यामुळे माझे काका मला सांभाळायला तयार झाले होते.

माझ्या काकांना माझ्या एवढीच मुलगी आहे, आमच्या दोघींमध्ये मी दिसायला जरा चांगली आहे त्यामुळे काकूला मी कधी आवडलेच नाही. मला सांभाळण्यासाठी एक आजी बाई ठेवली होती, त्या आजीबाईनेच माझा सांभाळ केला. मी चार वर्षांची झाल्यावर काकांनी शाळेत टाकण्याच्या निमित्ताने मला एका होस्टेलला ठेवले, तेव्हापासून मी होस्टेलला राहते आहे. काकांनी स्वतःची मुलगी मात्र त्यांच्या जवळच ठेवली होती. दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्या सोडल्या तर काका मला कधीच भेटायला किंवा घरी न्यायला येत नव्हते. सुट्टीत घरी गेल्यावर काकू माझ्यासोबत कधीच प्रेमाने वागत नव्हती.

मी जसजशी मोठी होत होते, तसतसं मला काका व काकूचं वागणं खटकत होतं पण मी काहीचं करु शकत नव्हते. एका सुट्टीत माझ्या काकांनी मला माझ्या मामाच्या घरी सोडलं तर तिथेही काही वेगळी परिस्थिती नव्हती. लहानपणापासून माझ्या मनावर एक गोष्ट अगदी ठळकपणे कोरलेली आहे की माझ्यावर प्रेम करणार, माझं असं म्हणावं ह्या जगात कोणीच नाही. सुरवातीला इतर मुलींचे आई वडील, बहीण भाऊ बघून त्यांचा खूप हेवा वाटायचा पण कालांतराने ते आकर्षण सुद्धा कमी झालं. आतातर आपले आई वडील असायला पाहिजे होते हेही वाटतं नाही.

मी पाचवीला नवोदय परीक्षा दिली व त्यात मी उत्तीर्ण झाले त्यामुळे माझी रवानगी नवोदय विद्यालयात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी माझी प्रांजल सोबत ओळख झाली. आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड्स झालो होतो. प्रांजलची आई तिच्यासाठी चिवडा लाडू बनवून द्यायची, प्रांजल ते माझ्यासोबत शेअर करायची. प्रांजलच्या आईला मला आई वडील नसल्याचे कळल्यावर ती खास माझ्यासाठी वेगळा चिवडा व लाडू करुन द्यायची. प्रांजलचे आई वडील तिला भेटायला येताना माझ्यासाठी सुद्धा जेवणाचा डबा घेऊन यायचे. दहावीची सुट्टी खूप मोठी होती त्या सुट्टीत प्रांजल मला त्यांच्या घरी घेऊन गेली होती. प्रांजलच्या घरी मला जे प्रेम मिळाले होते तसे प्रेम त्याआधी मला कधीच मिळाले नव्हते.

अकरावीला प्रांजल व मी आम्ही दोघींनी एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतले. ते कॉलेज,होस्टेल आमच्यासाठी नवीन होते. प्रांजल स्वभावाने खूप चांगली होती, पण ती पूर्णपणे माझ्या विरुद्ध होती. प्रांजल स्वभावाने शांत, मृदू आणि कोणालाही उद्धट न बोलणारी होती. प्रांजल तिच्या मनात काय चालू आहे? हे कोणालाही सांगत नव्हती. कॉलेजच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी सिनिअर मुलींनी आमची रॅगिंग घेतली होती, त्यांनी जरा अतीच केलं होतं. आम्ही कोणते नियम पाळून तिथे रहायचं ह्याची त्यांनी मोठी यादीच दिली होती. प्रांजलने ते खूपच मनावर घेतलं होतं. मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की प्रांजल ह्या सिनिअर लोकांचं एवढं मनावर घेऊ नकोस पण माहीत नाही तिला काय झालं होतं? काही दिवसांनी ती सुट्टीसाठी घरी गेली तेव्हा तिने आत्महत्या केली.

माझी एकुलती एक जवळची मैत्रीण मी गमावली. मी तिच्याच बद्दल आत्ता सिनिअर सोबत बोलत होते."

किर्तीला भरुन आल्यामुळे तिने बोलणं थांबवलं तेव्हा प्रिया म्हणाली,

"सॉरी कितू पण मला एक प्रश्न पडलाय म्हणून विचारते, प्रांजलने रॅगिंगला वैतागून आत्महत्या केली की अजून दुसऱ्या कोणत्या कारणाने केली हे तुला कसे माहीत?"

किर्ती डोळे पुसत म्हणाली,

"तु अगदी बरोबर प्रश्न विचारलास. मलाही हा प्रश्न पडला होता तेव्हा मी तिच्या आईला फोन करुन विचारले होते तर त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की प्रांजलने आत्महत्या रॅगिंग मुळेच केली. मी पण जास्त खोलात जाऊ शकले नाही. प्रांजलच्या घरी जावं असं अनेकदा वाटलं पण ती नसल्यावर तिच्या घरी जाणे मला बरोबर वाटले नाही."

प्रिया म्हणाली,

"प्रांजल रहायला कुठे होती?"

"सोलापूर" किर्तीने उत्तर दिले.

अक्षरा म्हणाली,

"कितू ते सगळं ठीक आहे पण मग तु कमवा व शिका या योजनेत लायब्ररीत काम का करत आहेस?"

किर्ती म्हणाली,

"माझ्या बाबांची शेती काका करतात आणि ती शेतजमीन कायद्याने माझ्या नावावर झाली असल्याने काका माझी कॉलेज, होस्टेल व मेसची फी भरतात, पण वरखर्चाला मला पैसे देताना काका खूप प्रश्न विचारतात, त्यामुळे मी ह्या योजनेअंतर्गत लायब्ररीत काम करायचे ठरवले म्हणजे छोट छोट्या गोष्टींसाठी मला काकांकडे पैसे मागावे लागणार नाही."

अक्षरा म्हणाली,

"किर्ती आज तुझा खूप अभिमान वाटतो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा तुला बारावीत किती छान मार्क्स मिळाले आहेत. कितू मला तुझा स्वाभिमान दुखवायचा नाहीये, पण तुला कधीही काही मदत लागली तर हक्काने सांगशील."

किर्ती म्हणाली,

"तुला माझ्या स्वाभिमानाची काळजी आहे हे बघून खरंच खूप छान वाटलं."

किर्ती व अक्षराचं बोलणं चालू असताना प्रियाचं लक्ष मात्र त्या दोघींकडे नव्हतं, ती वेगळयाच विचारात रममाण झाली होती, हे बघून अक्षरा म्हणाली,

"पियू तुझं लक्ष कुठं आहे? तु कसला विचार करत आहेस?"

प्रिया म्हणाली,

"कितूची मैत्रीण प्रांजल ही आमच्या सोलापूरची होती, तेव्हा तिचा शोध लावायला हवा म्हणजे तिच्या आत्महत्येमागील खरं कारण कळेल."

यावर किर्ती म्हणाली,

"अग असूदेत, त्यावर एवढा विचार करु नकोस, मी केव्हाच ते कानामागे टाकलं आहे."

प्रिया म्हणाली,

"कितू तु तुझ्या काका काकूंबद्दल पोलिसात तक्रार का करत नाहीस?"

किर्ती मिश्कीलपणे हसून म्हणाली,

"पियू आपल्याच लोकांविरुद्ध अशी पोलिसात तक्रार करुन काय साध्य होईल? उलट ते माझा अजून रागराग करतील. माझे काका काकू आहेत, म्हणून दोन दिवस का होईना मला जायला एक हक्काची जागा तर आहे. आता हेच बघ ना, मी व प्रांजल खूप चांगल्या मैत्रिणी होतो, तसेच तिच्या घरच्यांना माझ्याबद्दल सर्व काही माहिती होतं, प्रांजल गेल्यावर ते माझी चौकशी करायला तरी आले का? नाही ना. माझे काका कसेही असले तरी महिन्यातून एक फोन करुन मी कशी आहे? याची चौकशी तर करतात. पियू रक्ताचं नातं कसही असलं तरी ते शेवटी रक्ताचंच असतं. मी हे सगळं अनुभवातून शिकले आहे."

अक्षरा म्हणाली,

"तु तत्वज्ञानी माणसासारखं बोलू शकतेस हेही आज कळालं."

किर्ती म्हणाली,

"मी आशा व्यक्त करते की तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. तुम्ही निवांत झोपा आणि मलाही झोपूद्यात. गुड नाईट."

©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now